(पहिला भाग)
कथा * पूनम अहमद
सगळ्या खोलीत रक्ताचा सडा पडलेला अन् रक्तात लडबडलेले मृतदेह...मुलं, मोठी माणसं, स्त्रिया सगळेच आपल्या माणसांकडून मारले गेले होते. वर जाणाऱ्या जिन्यावर रक्तात भिजलेल्या बुटाचे ठसे होते. एवढे कठोर हृदयाचे पोलीस...पण समोरचं दृश्य पाहून तेही हादरले. वर ही प्रेतं अन् आईच्या ओढणीने गळफास घेतलेला हसन.
मुंबईच्या ठाणे भागातल्या या मुस्लिमबहुल वस्तीत, कासारवडावलीत लहानलहान बोळ्यांच्या दुतर्फा दुकानं होती. अधूनमधून लोकांची घरं होती. कुणाची दुमजली, कुणी तिमजली घराचा मालक. एकूण वातावरण जुनाट अन् मुस्लिम वस्तीत असतं तसंच. स्त्रिया मुली बुरखा घालूनच बाहेर पडायच्या. लोक आर्थिकदृष्ट्या सधन होते पण राहाणी अन् विचारसरणी जुनीच होती. मुलींना फारसं शिकवत नसत. त्यांची लग्न लवकर केली जात. मुलं मात्र शिक्षण पूर्ण करून बऱ्यापैकी नोकरी करत होती.
शौकत अली अन् आयेशा बेगमना तीन मुली होत्या. सना, रूबी अन् हिबा. तिघींमध्ये दोन दोन वर्षांचं अंतर होतं. धाकटा हसन हिबाहून पाच वर्षं लहान होता. आयेशाला तर लेकाला कुठे ठेवू अन् कुठे नको असं व्हायचं. तो वंशाचा दिवा म्हणून त्याचे लाडच लाड व्हायचे. हसनची काळजी एखाद्या राजपुत्राप्रमाणे घेतली जायची.
रूबी थोडी विकलांग मतिमंद अशी होती. तिला शाळेत घातलीच नव्हती. पण सना अन् हिबाला दहावीपर्यंत शिकवून त्यांची शाळा बंद केली होती. वडिलांची म्हणजे शौकत अलींची इच्छा होती, मुलींना पुढे शिकवावं पण आईने सक्त विरोध केला. ‘‘त्यांची लग्नं करण्याचं बघा, पैसा हसनच्या शिक्षणावर खर्च करायचा. हसन म्हणजे म्हातारपणीची काठी आहे. त्याची काळजी घ्यायला हवी,’’ या फाजील लाडामुळे खरं तर हसन बिघडला होता. शौकत एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करत होते. कुटुंबाचा खर्च अगदी आरामात भागेल एवढं त्यांना उत्पन्न होतंच. रूबीला उपचारांमुळेही फारसा फायदा झाला नव्हता. मुळात तिला बोलता येत नसे. उठणं, बसणं, चालणं, झोपणं या क्रियाही करताना मदत लागायची. खुणा करून ती थोडंफार सांगू शकायची. पण एकंदरीतच तिची परिस्थिती अवघड होती. हसन तिला फार त्रास देत असे.