कथा * रुचि गोनटिया
‘‘हॅलो... हा ऐक.’’
‘‘हा बोल.’’
‘‘मिरवणूक मोठ्या थाटामाटात रवाना झाली आहे.’’
‘‘काय? जरा जोरात बोल, मला काहीचं ऐकू येत नाहीय.’’
‘‘अरे, मी म्हणतोय की लग्नाची मिरवणूक निघाली आहे.’’
‘‘अच्छा, इतक्या गोंगाटात तुझा आवाज नीट ऐकू येत नव्हता.’’
‘‘येथे प्रत्येकजण खूप मजा करत आहे. प्रत्येकजण बँडवाल्याना आपापल्या आवडीचं गाणं वाजवण्यासाठी आग्रह करत आहेत.’’
तेवढ्यातच घोड्यावर स्वार झालेल्या वरराजाचा फोन कोणीतरी हिसकावून घेतला.
‘‘हॅलो, मी सविता वहिनी बोलतेय. अगं जाऊबाई, आज तरी माझ्या दिराला सोड. मग उद्यापासून तो फक्त तुझाच असणार आहे. लवकरचं भेटू. बाय.’’
‘‘अरविंद दादा, हे घ्या सांभाळा तुमच्या खोडकर चिकूला आणि हा फोन आता तुमच्या भावाकडूनच परत घ्या. आम्हाला सगळ्यांना सेलेब्रेट करताना जरा बघा... त्यानंतर तर तुमचाच ढोल वाजणार आहे,’’ सविता वहिनी आज वेगळ्याच मूडमध्ये होती.
ती मनापासून खुश या कारणासाठी होती कि, तिने तिच्या लग्नात घातलेला ९ किलोग्रॅमचा लेहेंगा आजही अल्टर न करता तिला व्यवस्थित झाला होता. ती या सगळ्या जमावात पण आज एखाद्या नवरीपेक्षा कमी भासत नव्हती. ती आपल्या ४ वर्षाच्या मुलाला दीर स्वार असलेल्या घोड्यावर बसवून ठुमकत ठुमकत त्यांचा फोन घेऊन पसार झाली.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचं एकत्र उत्साह पाहून स्मितहास्य करत अरविंद सुखावला.
‘‘चिकू, तुला माहीत आहे का आज काय आहे?’’
‘‘आज माझे लग्न आहे,’’ चिकू आपल्या काकांना म्हणाला.
‘‘चिकू, आज माझं लग्न आहे, तुझं नाही.’’
‘‘नाही, माझं आहे... आईला विचारा...’’ असं म्हणत चिकू रडवेला झाला
‘‘ठीक आहे, ठीक आहे, तुझे लग्न आहे, बसं. आता हस बघू.’’
मोठ्या मुश्किलीने चिकूचा मूड ठीक झाला आणि बँडवाल्यांनी ‘आज मेरे यार कि शादी है...’ गाणं वाजवायला सुरवात केली.
हे गाणं ऐकून अरविंदचे सगळे मित्र जोरदार नाचू लागले आणि तोच व्हिडीओवाला त्या सगळ्यांचे हावभाव शूट करण्यात मनापासून व्यस्त झाला.
‘दीदी तेरा देवर दिवाना...’ या गाण्याच्या ठेक्यावर रोजच्या धकाधकीच्या जीवनात, सतत कामात व्यस्त आणि कंटाळलेल्या सगळ्या वहिनींनी आपापल्या सासवांना नजर अंदाज करत, साडी कमरेत खोचून ठुमक्यांवर ठुमके मारायला सुरवात केली. तसेच ‘मेहेंदी लगा के रखना...’ या गाण्यावर सर्व नवीजुनी जोडपी रोमँटिक अंदाजात थिरकू लागली.





