कथा * सुनीता माहेश्वरी
रूपा मॅडम, तुम्ही खूप छान आहात. तुमचे मन फार सुंदर आहे. तुमच्यासारखीच हिंमत आम्हा सर्वांमध्ये असती तर किती बरे झाले असते ना?’’ रूपाची मोलकरीण नीना मोठया आदराने म्हणाली आणि कॉफीचा कप रूपाला देऊन आपल्या घरी निघून गेली.
रूपाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. मागील २ वर्षांपासून ती व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घेत होती. या क्षेत्रात तिने अभूतपूर्व यश मिळवले होते. तिच्या केंद्राची कीर्ती दूरवर पसरली होती. २ वर्षांतच तिने आपल्या वागण्यातून, मेहनतीतून, कौशल्यातून, आत्मविश्वासाने आणि आत्मीयतेने समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त केले होते. तिचे गुण आणि मनाच्या सौंदर्यापुढे तिची कुरूपता खुजी ठरली होती. अनेक विषम परिस्थितीत तपश्चर्या करून तिने आपल्या व्यक्तिमत्त्वाला सोन्यासारखी झळाळी दिली होती, कारण तिच्यासोबत प्रेमाची अफाट शक्ती होती.
त्या दिवशी नीना गेल्यावर रूपा घरात एकटीच होती. तिचा पती विशाल आणि वकील असलेले सासरे प्रमोद खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. हातात कॉफीचा कप घेऊन सोफ्यावर बसलेल्या रूपाला तिच्या आयुष्यातील तो काळोखा काळ आठवला. तो १-१ क्षण तिच्या डोळयांसमोर उभा राहिला.
तारुण्यातील ते दिवस रूपाला आठवले जेव्हा अचानक एके दिवशी सामसूम रस्त्यावर रोहित तिचा रस्ता अडवत म्हणाला, ‘‘माझ्या प्रिये, तू दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाहीस, तू फक्त माझा आहेस.’’
रोहितचा वाईट हेतू पाहून रूपा भीतीने थरथर कापू लागली. कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत पळतच घरी पोहोचली. तिला धाप लागली होती. तिची आई गीताने तिला जवळ घेतले. रूपा थोडी शांत झाल्यावर आईने विचारले, ‘‘काय झाले बाळा?’’
रूपाने रोहितबद्दल सर्व सांगितले. रोहितच्या वागण्यामुळे ती इतकी घाबरली होती की, आता तिला महाविद्यालयात जायचीही इच्छा होत नव्हती. जेव्हा ती एकटी बसायची तेव्हा रोहितचे उतावीळपणे पाहाणारे डोळे आणि अश्लील कृत्य तिला घाबरवायचे.
काही दिवसांनी रूपा कसाबसा धीर एकवटून महाविद्यालयात जाऊ लागली, पण रोहित रोज काहीतरी बोलून तिला त्रास द्यायचा. रूपाने त्याला पोलिसांची धमकी दिली तेव्हा तो म्हणाला, ‘‘पोलीस माझे काहीच बिघडवू शकणार नाहीत. तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला जगू देणार नाही.’’