* गरिमा
सुंदर आणि मोठ्या घराचे स्वप्न प्रत्येकालाच असते. पण मोठ मोठ्या शहरांत अशा घरांचे स्वप्न मात्र पूर्ण होणे कठीण आहे. लहान घरात राहण्यावाचून काही पर्यायच नसतो. पण जर काही टीप्स आणि सजावटीच्या प्रकारांवर लक्ष दिले तर लहान घरात राहूनही मोठ्या आणि हवेशीर घरात राहण्याचा अनुभव घेऊ शकाल.
घर ठेवा व्यवस्थित : तुम्ही तुमचे घर जितके व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवाल, तितकी खोलीत जास्त जागा दिसेल. सर्व सामान कोपऱ्या कोपऱ्याने ठेवून, निरूपयोगी सामान काढून टाकले तर भरपूर जागा रिकामी होऊ शकते.
पांढऱ्या आणि फिकट रंगाचा वापर करा : गडद रंग मोठ्या जागेचा प्रभाव कमी करतात. म्हणूनच घराच्या भिंतीना पांढरा रंग द्या. फर्निचरदेखील फिकट रंगाचे निवडा. जर भिंतीवरील पांढरा रंग आवडत नसेल तर फिकट हिरवा, गुलाबी, निळा, पिवळा इत्यादी रंगांची निवड करा. एकच रंग लावा. मग बघा खोली किती मोठी दिसते.
घरातील दिवे योग्य निवडा : घरात अधिकाधिक प्रकाश येऊ द्या. कारण घरातील प्रकाश घर उजळलेले आणि मोठे दाखवण्यासाठी मदत करते. आपल्या घरात रंगांचा प्रभाव दाखवण्यासाठी मदत करते. लॅम्पस लावू शकता. यामुळे घर आकर्षक दिसेल.
मल्टिपर्पज फर्निचरचा वापर करा : असं फर्निचर विकत घ्या, जे बहुउद्देशीय असेल. अशाप्रकारचे फर्निचर तुमच्या खोलीत व्यवस्थित दिसेल आणि जागाही जास्त दिसेल. उदाहरणार्थ, स्वयंपाक घरात अशा बहुउद्देशीय मेजचा वापर करू शकता. ज्यात बरेचसे रकाने असतील. यात स्वयंपाकघरातील सामानासह, दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवू शकता. म्हणजे सामान अधिक जागा व्यापून घेणार नाही.
घरात आरशांचा उपयोग करा : आरशाच्या वापराने तुम्ही खोलीला मोठे असण्याचा आभास देऊ शकता. फोकल पॉईंटचा उपयोग करून आरसा अशा ठिकाणी बसवा ज्यामुळे घराची खोली अधिक दिसेल. घराच्या खिडकी समोरील भिंतीवर आरसा लावा. प्रकाशाच्या प्रतिबिंबामुळे तुमच्या खोलीचे क्षेत्र मोठे दिसेल.
स्ट्राइप्सचा वापर करा : घराच्या डेकोरेशनमध्ये काही फेरबदल करून घराचे रूप बदलू शकता. उदाहरणार्थ, स्ट्राइप्स कारपेटमुळे खोली लांब असल्याचा आभास होतो. अशाप्रकारे घराचे पडदेदेखील स्ट्राइप्स डिझाइनचे निवडून घर मोठे दाखवू शकता.