* नीरा कुमार
बर्गर, पिझा, हॉट-डॉग, नूडल्स, पास्ता, चिप्ससारखे खाद्यपदार्थ मुलांना खूपच आवडतात. मात्र याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, उलट जंक फूडमध्ये फॅटचं प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढतं, या पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे मुलं लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदय व यकृताशी संबंधित आजारांना बळी पडतात.
चला तर मग जाणून घेऊया की कशाप्रकारे प्रत्येक आई आपल्या मुलांना घरातच त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला घालू शकते.
* मुलांना चाउमिन, पास्ता, नूडल्स वगैरे खूपच आवडतात. त्यासाठी आटा नूडल्स वा मल्टीग्रेन इत्यादी विकत घ्या. यामध्ये रंगीबेरंगी भरपूर भाज्या उदाहरणार्थ ब्रोकली, गाजर, मटार, हिरवी, लाल, पिवळी सिमला मिरची, टोमॅटो इत्यादी हॅण्ड चॉपरने बारीक कापून टाका. कारण मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या त्यांना कळूनदेखील येणार नाहीत. नूडल्स, पास्ताचं प्रमाण कमी ठेवा आणि भाज्यांचं अधिक. पास्तामध्ये टोमॅटोसोबत काही भाज्यांची पेस्ट करून घ्या, नंतर शिजवा. बघा मुलं आवडीने खातील.
* २-३ फळं एकत्रित करून त्यांचा रस काढून मुलांना प्यायला द्या. मुलं अनेकदा पालक खायला कंटाळतात. जर पालकाच्या प्यूरीत जलजीरा पावडर, मीठ, जिरे व लिंबाचा रस टाकून कुलकुल ड्रिंक मुलांना दिलं तर ते मजेत पितील. आंबा, केळं, चीकू मुलांची आवडती फळं आहेत. ती दुधासोबत एकत्रित करून शेक बनवून मुलांना द्यावीत.
* उन्हाळ्यात मुलांना आइस्क्रीम, कुल्फी खायला खूप आवडतात. त्यासाठी भरपूर फळं सुरीने बारीक कापून घ्या. दुधामध्ये केळं वा आंबा टाकून शेक बनवा. त्यामध्ये सर्व फळं व सुका मेवा टाकून आइस्क्रीम वा कुल्फी बनवा आणि मुलांना द्या.
* सॅण्डविचेसदेखील मुलांना खूप आवडतात. खासकरून बटाटा आणि पनीरची. यामध्ये तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची बारीक कापून एकत्रित करा व परतून घ्या. यामुळे पौष्टिकता वाढेल.
* मुलांना जी पोळी खायला देता त्या कणकेमध्ये भाज्यांची प्युरी एकत्रित करा. इतर पीठं उदाहरणार्थ, मूगडाळीचं पीठ, जवाचं पीठ, नाचणीचं पीठ इत्यादी एकत्रित करा. यापासून बनविलेल्या पोळ्या खूपच रुचकर व पौष्टिक होतील आणि मुलंदेखील आवडीने खातील.