* स्नेहा सिंह
आजकाल जिथे जावे तिथे हेच ऐकायला मिळते की हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. तुमच्याकडे जितकी जास्त माहिती असेल तितके अधिक यश तुम्ही कुठल्याही कामात अगदी सहज मिळवू शकता.
इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. सरळ सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आपल्या आजूबाजूच्या परिसरापासून ते अगदी शहर, राज्य आणि देश तसेच जगात काय सुरू आहे या सर्वांची माहिती करून घेणे. फॅशनपासून ते व्यसनांपर्यंत आणि नोकरी-व्यवसायापासून ते शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्राची माहिती करून घेणे.
या सर्व क्षेत्रांमध्ये काय नवीन सुरू आहे, याची दररोजची माहिती असणे आजच्या युगात अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे हे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश मिळवून देते, पण याव्यतिरिक्त जर तुम्हाला अवतीभवतीच्या जगाची संपूर्ण माहिती असेल तर सोन्याहून पिवळे.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या व्यतिरिक्त अन्य सर्व विषयांचे असलेले ज्ञान जीवनातील इतर आघाडयांवरही यश मिळवून देऊ शकते.
प्रत्येक विषयाची माहिती
नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, जर तुम्हाला जगभरात काय सुरू आहे याची माहिती असेल तर ती सक्षम निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
जीवनात छोटया-छोटया गोष्टींची माहिती तुम्हाला परिपूर्ण बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. आपल्या आवडीशिवायच्या अन्य क्षेत्रांची माहिती करून घेणे महिलांना विशेष आवडत नाही. पण आज जेव्हा माहिती हीच ताकद समजली जात आहे तेव्हा सर्व प्रकारच्या माहितीपासून दूर राहून चालणार नाही.
सर्व विषयांची माहिती असणाऱ्या महिलांना सर्वत्र आदर मिळतो. त्यांचे भरपूर कौतुक होते.
समजा एका कुटुंबात २ महिला आहेत. त्यातील एकीला फक्त खाणे, मजेत रहायला आवडते. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरच्या जगाशी तिला काही देणेघेणे नसते. कुटुंबाची चांगली काळजी घेत असल्याबद्दल तिला आदर मिळू शकतो, पण कुटुंबाबाहेरील एखादे काम असल्यास किंवा बाहेरच्या एखाद्या विषयावर बोलणे सुरू असल्यास तिला सहभागी करून घेतले जात नाही.
याउलट जी दुसरी महिला घरातील कामाव्यतिरिक्त बँक, औषधे, विमा यासह नवीन गॅझेट्स आणि तंत्रज्ञानाची माहिती करून घेते, संपूर्ण जगात घडणाऱ्या घटनांची जिला माहिती असते तिला जास्त महत्त्व मिळते. तिला सर्व विषयांची माहिती असल्यामुळे तिच्या पतीलही तिचे सर्व म्हणणे व्यवस्थित ऐकून घ्यावे लागते.