* पारूल भटनागर
कोविड-१९ ने आपल्याला बरेच काही शिकवले. विम्याचे महत्त्व आता पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे, कारण केव्हा, कधी आणि कोणावर संकट येईल, कुटुंबात कशाची गरज निर्माण होईल, हे सांगता येत नाही. अशावेळी आरोग्य आणि आयुष्याशी संबंधित कुठल्याही प्रकारचा विमा तुमच्यावर जास्त खर्चाचा भार पडू देत नाही, पण त्यासाठी तुम्ही वेळेवर विमा काढायला हवा, जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला वेळेवर त्याचा फायदा घेता येईल. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरबसल्याही विमा काढू शकता. तर चला, घरबसल्या विमा कसा काढायचा, हे जाणून घेऊया...
चांगला पर्याय
घरबसल्या तुम्हाला जो कोणता विमा काढायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. ही सर्व माहिती तुमच्याकडे आधीच असेल तर तुम्ही थेट विमा कंपनीच्या साईटवरून विमा घेऊ शकता, पण जर तुम्हाला वेगवेगळया विमा कंपन्यांच्या ऑफर्स पाहून आणि त्यांची तुलना करून विमा काढायचा असेल तर अॅग्रीगेटर वेबसाईटद्वारे विमा खरेदी करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. यामुळे तुम्ही वेगवेगळया विमा कंपन्यांच्या पॉलिसीतील अटी, फायदे आणि प्रीमियमची तुलना करू शकता. साहजिकच पॉलिसी समजून घेऊन खरेदी करणे सोपे होते.
प्राथमिक माहिती गरजेची
तुम्ही थेट विमा कंपनीच्या साईटवर किंवा अॅग्रीगेटर वेबसाईटवर जा, पण तुम्हाला कुठलाही प्लॅन बघण्यासाठी, तो खरेदी करण्यासाठी त्याची प्राथमिक माहिती असणे गरजेचे असते. जसे की, टर्म इन्शुरन्स खरेदीसाठी तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांकाची माहिती द्यावी लागते. सोबतच तुम्ही धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करता का? तुमचे वार्षिक उत्पन्न किती? इत्यादी माहिती नमूद करावी लागते. अशाच प्रकारे तुम्ही मार्केट लिंक्ड प्लॅन असणाऱ्या युलिप प्लॅनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला उत्पन्न आणि जीवन सुरक्षा दोन्ही मिळेल. या प्लॅनसाठी तुम्हाला कंपनीने विचारलेली प्राथमिक माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला सर्व विमा कंपन्यांचे प्लॅन दिसू लागतात. त्यातील सर्व माहिती व्यवस्थित वाचून तुम्ही तुमचे उत्पन्न आणि गरजेनुसार विमा खरेदी करू शकता.