* गरिमा पंकज
काही दिवसांपूर्वी आमच्या घरी पाहुणे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा ६ वर्षांचा मुलगा नंदनही होता. त्याने हिवाळयाचे दिवस असतानादेखील आईस्क्रीम मागितले. मी नकार दिल्यावर त्याने रागाने डायनिंग टेबलवर ठेवलेल्या महागडया प्लेट्स तोडल्या आणि त्याच्या आईसमोर लोळण मारून आईस्क्रीमचा हट्ट करू लागला. त्याचे ते वागणे मला आवडले नाही. माझे मूल असते तर मी कधीच त्याला धोपटले असते, पण तो पाहुणा होता म्हणून मी गप्प बसले. मला आश्चर्य तर तेव्हा वाटले, जेव्हा त्याच्या या तोडफोडीला एक खोडसाळपणा समजून त्याची आई हसत राहिली.
अचानक माझ्या तोंडून निघाले की, मुलाला एवढी मोकळीक देऊ नये की, तो त्याच्या हट्टीपणामुळे तोडफोड करेल किंवा दुसऱ्यांसमोर लाजवेल.
तेव्हा माझे नातेवाईक प्रेमाने मुलाला कुशीत घेत म्हणाली, ‘‘काही हरकत नाही ताई, माझ्या एकुलत्या एक मुलाने काही तोडले तर काय झाले? आम्ही तुमच्या घरी या प्लेट्स पाठवून देऊ. त्याचे वडील त्यांच्या लाडक्या मुलासाठीच तर कमावतात.’’
तिचे बोलणे ऐकून मी समजून गेले की, मुलाच्या हट्टीपणाला जबाबदार मुलगा नाही तर त्याचे पालकच आहेत, ज्यांनी त्याला एवढे डोक्यावर बसवून ठेवले आहे. खरेतर आपल्या समाजात असेही आईवडील आहेत, ज्यांना त्यांच्या मुलांशिवाय कोणीही प्रिय नाही. चूक त्यांच्या मुलाची असली तरी त्यासाठी ते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कुटुंबीयांशीदेखील भांडण करतात. जेव्हा पालक त्यांच्या पाल्याची प्रत्येक योग्य-अयोग्य मागणी पूर्ण करतात, तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की ते मूल हट्टी बनते. मुलाला बिघडवण्यात आणि हट्टी बनवण्यात आईवडीलच जास्त जबाबदार असतात. खरेतर, हे एक प्रकारचे त्यांच्या संगोपणातील अपयशाचे निदर्शक आहे.
काळजी घ्या
येथे लक्ष देण्याजोगी बाब ही आहे की, लहानपणापासूनच हट्टी असणारी मुले भविष्यात त्यांचा स्वभाव बदलू शकत नाहीत. आईवडील लाडाकोडात त्यांचा हट्ट पूर्ण करतात, पण लोक त्यांना सहन करत नाहीत. अशी मुले मोठेपणी रागिष्ट आणि भांडखोर स्वभावाची होतात. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलाचे भविष्य आनंदी राहावे आणि आयुष्यभर त्याचे वर्तन चांगले राहावे, तर तुम्ही त्याला हट्टीपणापासून रोखले पाहिजे.