* प्रतिनिधी
चेरापुंजी भारताचे उत्तर-पूर्व राज्य मेघालयातील एक छोटेसे शहर आहे, जे शिलाँगपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. जगात हे ठिकाण पावसासाठी ओळखले जाते. येथील स्थानिक लोक याला ‘सोहरा’ या नावाने ओळखतात. हे शहर बांगलादेशाच्या सीमेपासून खूप जवळ आहे, त्यामुळे येथून बांगलादेशाचे दृश्यही पाहता येऊ शकते. पावसाळयाच्या दिवसांत पर्यटक दूरवरून येथे पर्यटनासाठी येतात. तुम्ही म्हणाल की, पावसाव्यतिरिक्त इथे असे काय आहे की, पर्यटक इथे फिरायला येतात. खरे तर चेरापुंजीमध्ये पावसाबरोबरच नैसर्गिक सौंदर्य, झरे आणि गुहा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
शिलाँगपासून चेरापुंजीकडे जाताना, मार्गात थोडा चढाव, दोन्ही बाजूला डोंगर, दोन डोंगरांच्या मधून घाटरस्ते, अननसाची झाडे, सुंदर पाने असलेली इतर झाडे आणि अनेक प्रकारच्या वनस्पती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनतात. चेरापुंजीपासून थोडे पुढे जाताच, ६ किलोमीटर अंतरावर मास्माई गुहा आहे. ही गुहा पर्यटक कोणत्याही तयारी किंवा गाइडशिवाय सहजपणे फिरू शकतात. १५० मीटर लांब असलेली ही गुहा बाहेरून पाहताना थोडीशी भीती जरूर वाटते. मात्र, तुम्ही याच्या आत प्रवेश करता, तेव्हा तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे जवळून दर्शन होते. गुहेच्या आतील भागांत अनेक प्रकारचे जीवजंतू आणि झाडांचे वास्तव्य आहे. गुहेत अनेक वळणे व घुमावदार मार्ग आहेत, ज्यामुळे रोमांचक अनुभव घेता येतो. गुहेमध्ये प्रवेश करताच, आपणास जराही घाण दिसणार नाही. गुहेमध्ये लाइटची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण आपल्यासोबत टॉर्च जरूर घेऊन जा. जेणेकरून गुहेतील सौंदर्य व्यवस्थित पाहता येईल.
सतत पाणी टपकत असल्यामुळे येथील रस्ता बुळबुळीत झालेला आहे, त्यामुळे गुहेमध्ये चालताना सांभाळून चाला. गुहेत ४-५ रस्ते असेही आहेत, जे उंचावर आहेत. तिथे आपल्याला चढूनच जावे लागेल. इथे उंच असलेल्या लोकांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यांना गुहेमध्ये काही ठिकाणी वाकून जावे लागेल. गुहेमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यावे लागेल. इथे १० वर्षांपर्यंतच्या मुलांना प्रवेश नि:शुल्क आहे, तर १० वर्षांवरील पर्यटकांना २० रुपये तिकीट घेणे अनिवार्य आहे. जर कॅमेरा आत घेऊन जायचा असेल, तर तुम्हाला २५ रुपयांचे वेगळे तिकीट घ्यावे लागेल. ही गुहा सकाळी ९ वाजता पर्यटकांसाठी खुली होते. ज्या लोकांना पाय, गुडघे आणि पाठीचे दुखणे आहे, त्यांनी या ठिकाणी जाणे टाळावे. कारण त्यांना चढण्या-उतरण्यात त्रास होऊ शकतो. इथे जाताना आरामदायक कपडे वापरा. उदा. ट्रॅक पँट किंवा लोअर वगैरे. त्याचप्रमाणे, इथे कधीही चप्पल किंवा हाय हिल घालून जाऊ नका. इथे स्पोर्ट्स शूज वापरणेच योग्य ठरेल.