- शैलेंद्र सिंह
गाव असो किंवा शहर, तेथील मुला-मुलींना सेक्स म्हणजे लैंगिक संबंधासंदर्भातील शिक्षणाबाबत फारच कमी माहिती असते. शिवाय जी काही माहिती असते ती खूपच वरवरची असते. यामागचे कारण म्हणजे अभ्यासाऐवजी सोशल मीडियातून ही माहिती त्यांना मिळते आणि ती दिशाभूल करणारी असते. सोशल मीडियाव्यतिरिक्त पॉर्न फिल्ममधून ही माहिती मिळते. ती चुकीची असते. अनेकदा मुलींना न समजल्यामुळे त्या गरोदर राहतात.
केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही लैंगिक संबंधांबाबत पूर्ण माहिती नसते. स्त्री रोगांबाबत माहिती असलेल्या डॉक्टर रमा श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘‘आपल्याकडे अशा अनेक घटना घडतात जिथे मुलींना हे माहितीही नसते की त्यांच्यासोबत काय घडले. म्हणूनच किशोर वयातच त्यांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. घरात आई आणि शाळेत शिक्षक असे दोघे मिळून हे काम सहजतेने करू शकतात. पण आई आणि शिक्षकांना हे माहीत हवे की, मुलांना किती आणि कोणते लैंगिक शिक्षण द्यायला हवे. त्यासाठी आईने स्वत:ही याबाबत व्यवस्थित माहिती करून घ्यायला हवी.’’
गर्भनिरोधकाची माहिती असायला हवी
डॉक्टर रमा श्रीवास्तव यांच्या मते, आजकाल ज्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत त्या पाहून असे लक्षात येते की, अल्पवयीन मुलींचे शारीरिक शोषण त्यांचे नातेवाईक किंवा जिवलग मित्राद्वारे केले जाते. म्हणूनच मुलीला तिच्या १० ते १२ वर्षांच्या वयादरम्यान लैंगिक किंवा शारीरिक संबंध म्हणजे काय, हे सांगून ते फसवणूक करून कसे ठेवले जाते, याची माहिती देणे गरजेचे आहे. मुलींना हे सांगायला हवे की, त्यांनी कोणासोबतच एकटीने एकांतात जाऊ नये. शिवाय अशा प्रकारची घटना घडलीच तरी आईला येऊन सांगावी, जेणेकरून आई मदत करू शकेल, असेही आईने आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सांगायला हवे.
याच प्रकारे शाळेतील शिक्षिकांनीही गर्भनिरोधक गोळया म्हणजे काय? त्याचा वापर कशासाठी केला जातो, याची माहिती मुलींना द्यायला हवी. अनेक मुली बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर आई बनतात किंवा आत्महत्या करतात. अशा मुलींना याची माहिती द्यायला हवी की, आता अशा प्रकारची गोळीही येते जी खाल्ल्यामुळे नको असलेल्या गर्भापासून सुटका मिळते. ‘मॉर्निंग आफ्टर पिल्स’ नावाने या गोळया मेडिकलच्या दुकानात मिळतात.