चांगले चित्रपट मिळणे आव्हानात्मक – स्मिता गोंदकर

* सोमा घोष

मराठी व्हिडिओ साँग ‘पप्पी दे पारूला’ मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिला नेहमी काहीतरी वेगळे काम करायला आवडते. याच कारणास्तव आजही तिला आव्हानात्मक भूमिका करायला आवडते. अभिनयाशिवाय तिला अॅडव्हेंचर खूप आवडते आणि ती स्टंट बायकरसुद्धा आहे. तिने जुडो आणि मार्शल आर्टचे व्यावसायिक प्रशिक्षणसुद्धा घेतले आहे. इतकेच नाही तर ती ‘बिग बॉस मराठी’ची ती सेकंड रनअपही होती. पुण्याच्या स्पष्टवक्त्या स्मिताशी बोलणे अतिशय मनोरंजक होते.

सादर आहे त्यातील थोडा भाग.

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

लहानपणापासून मला अभिनय करायला आवडायचे. ज्यात मी अनेकदा कॉलेजमध्ये मॉडेलिंगसुद्धा केले होते.

मला ब्युटी पेजेंट बनायचीसुद्धा इच्छा होती, पण मी हे कुणालाच सांगितले नव्हते, कारण कोणी याकडे गांभीर्याने पाहिले नसते. शिक्षण पूर्ण केल्यावर मी काही वर्ष अमेरिकेत नोकरी केली. मी थोडे दिवस सुट्टी घेऊन मुंबईला आले होते. यादरम्यान मला जे काम मिळाले, ते मी करत गेले. काही चित्रपटांमध्ये अभिनय आणि मॉडेलिंग केले आणि मी पुन्हा नोकरीवर रुजू व्हायची तयारी करू लागले. त्याच वेळी माझ्या वडीलांचे निधन झाले. मला आता घराबाहेर राहणे योग्य वाटत नव्हते आणि मग मी अभिनयालाच माझे करिअर बनवले.

इथवर पोहोचायला कुटुंबाकडून किती सहयोग मिळाला?

कुटुंबाने खूप पाठिंबा दिला. त्यांनी मला कधीच विरोध केला नाही, कारण मी आधी नोकरी केली होती आणि त्यांचा माझ्या निर्णयावर विश्वास होता. मी कुटुंबाविरोधात काहीही केले नाही. अभिनयसुद्धा मी माझ्या वडिलांच्या मर्जीनुसारच केला.

मराठी चित्रपटात प्रवेश कसा झाला?

मी हिंदी चित्रपटात चांगले काम करत होते. मला मराठी नाटक पाहायला आवडायचे, पण चित्रपट करावा अशी इच्छा नव्हती. मराठी दिग्दर्शकांचे नेहमी फोन येत असत पण मला असे वाटायचे की मराठी चित्रपट गावातील असेल, पण असे नव्हते. मी अनेक चित्रपट केले, ज्यात ‘मुंबईचा डबेवाला’ हा यशस्वी चित्रपट होता, जो लोकांना खूप आवडला, कारण हा मुंबईची हार्टलाईन डबेवाल्यांच्या जीवनावर बनवला गेला होता.

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काय फरक जाणवतो?

मराठीमध्ये ठराविक बजेटमध्ये काम करावे लागते. म्हणून चित्रपटाचा होमवर्क खूप चांगल्या प्रकारे केला जातो. मराठी टीव्हीतसुद्धा काम चांगले असते, पण मराठी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करायला जास्त मजा येते. म्हणून मला ते आवडतात. हिंदीत बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीपासून माहीत नसतात, पण मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये माहीत असते. अनेकदा तर पेच पडतो की हिंदी मालिका करू की मराठी चित्रपट मराठी चित्रपटांनी मला खूप व्यस्त ठेवले आहे आणि त्यामुळे हिंदी करायची संधी मिळत नाही.

संघर्ष कसा होता?

मी बॅग पॅकसह मुंबईच्या संस्कृतीचा अनुभव घ्यायला अमेरिकेतून आले. मी अनेक प्रोडक्शन हाऊसमध्ये जाऊन ऑडिशन दिले आणि काम येऊ लागले. हळूहळू काम इतके वाढले की ३ महिन्याहून अधिककाळ लोटला आणि समजलेच नाही. सागर आर्ट्ससोबत मी खूप सारे काम एपिसोडिक केले आहे आणि तिथे मला टिव्हीविषयी खूप काही शिकायला मिळाले. याशिवाय ऑडिशन करतच अनेक गोष्टी शिकले. आता चांगले चित्रपट मिळणे आव्हानात्मक आहे. वर्कशॉपमधूनही खूप काही शिकायला मिळते.

असा चित्रपट ज्याने तुझे जीवन बदलले?

मी अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत आणि तेच मला मिळायचे. मी मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय ग्लॅमरस दिसायचे. म्हणून तशा भूमिकाही केल्या, पण मला एक गंभीर चित्रपट करायचा होता आणि तो मला ‘मिसेज अँड मिस्टर अनवॉन्टेड’ मिळाला. यात मला काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट अनेक फेस्टिवल्समध्ये गेला आणि बेस्ट अॅक्ट्रेसचे अनेक पुरस्कारसुद्धा मला मिळाले. हेच माझे यश होते.

किती फॅशनेबल आणि फूडी आहात?

स्टाईलिस्ट्सशी माझे बोलणे होत असते आणि इव्हेंटनुसार मी कपडे घालते. मला मेकअप करायला आवडत नाही. मला आरामदेय कपडे घालायला आवडते. कोणत्याही प्रकारचे कपडे मला चांगल्याप्रकारे कॅरी करणे माहीत आहे. मी संतुलित आहार घेते आणि आईच्या हातचे नॉनव्हेज मला खूप आवडते.

समरब्युटी तुमच्यासाठी काय आहे?

उन्हाळ्यात खूप पाणी पिणे आणि बाहेर जाताना सनस्क्त्रीन लावणे, ही दोन कामं मी नेहमी करते.

अभिनयाव्यतिरिक्त काय करायला आवडते?

मला स्टंट्सची खूप आवड आहे, म्हणून मी बाईक रायडींग करते. अलीकडे फॉर्म्युला ४ रेसिंगचा सराव करत आहे. वेळ मिळाला तर हेच करते. फिटनेससाठी योगा करते, कारण खूप प्रवास झाला तर जिमला जाणे शक्य होत नाही.

तुझा आनंदी राहण्याचा मंत्र काय आहे?

आतून शांत राहणे, जे आता फार कठीण होत चालले आहे. हे मिळवण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करते, कारण सकारात्मक मानसिकता आणि व्यायामामुळे हे सोपे होते.

आवडता रंग – आकाशी किंवा झाडांसारखा रंग.

आवडती वेशभूषा – भारतीय आणि वेस्टर्न दोन्ही, विशेषत: साडी.

आवडते पुस्तक – द अल्केमिस्ट.

नकारत्मकता दूर करण्याचा उपाय – आपले शरीर बळकट ठेवणे.

आवडते पर्यटन स्थळ – देशात केरळमधील बॅक वॉटर्स आणि विदेशात सेशल्स आणि मालदीव.

परफ्युम – डियोर.

जीवनातील आदर्श – कोणाला दु:ख न देणे, सगळ्याचा मान ठेवणे, नाटकी लोकांपासून दूर राहणे.

सामाजिक कार्य – वयस्क आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ मुलांची काळजी घेणे, मानसिक आरोग्यावर काम करणे

मला कोणत्याही रेसमध्ये धावायला आवडत नाही – रूपाली भोसले

* सोमा घोष 

‘‘जागो मोहन प्यारे’ या कमर्शियल नाटकापासून अभिनयाच्या क्षेत्रात पदापर्ण करणारी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले मुंबईची आहे. लहानपणापासून तिला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. ज्यात तिला तिच्या आईवडिलांनी सहयोग दिला. आरशासमोर वेगवेगळया अदाकारी करणे, डान्स करणे तिला खूप आवडायचे. स्वभावाने विनम्र आणि हसमुख रुपाली या दिवसात कोविड १९ मुळे आपल्या घरात लॉकडाऊन आहे. परंतु हा कालावधी ती आपल्या हॉबी पूर्ण करण्यात व्यतित करत आहे. तिने नाटकांशिवाय मराठी, हिंदी मालिकांमध्ये आणि फिल्ममधेही काम केले आहे. तिच्याशी तिच्या प्रवासाबद्दल चर्चा झाली, प्रस्तुत आहे त्यातील काही अंश :

या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

स्कूलच्या वेळेपासून वन एक्ट प्लेमध्ये मी काम केले आहे. मला डान्सची खूप आवड होती. कारण यासाठी दरवेळी नवीन कपडे घालून सजायला मला खूप आवडायचे. टिचरही कुठल्याही नृत्याच्या कार्यक्रमात माझे नाव सगळयात अगोदर लिहायची. तेव्हापासून मला यात आनंद यायला लागला. मोठे झाल्यावरही तिकडे जाण्याची इच्छा होती. परंतु कोणी गॉडफादर नव्हता, जो माझ्यासाठी सगळी कामे सोपे करून देईल.

थिएटर करता-करता हळू-हळू मी या फिल्डकडे वळले. ‘गांधी हत्या आणि मी’ माझे एक यशस्वी प्रोफेशनल नाटक आहे. या अगोदरही जवळपास १० अशी प्रोफेशनल नाटके असतील, ज्यांनी माझे नाव अभिनयात पुढे केले. या दरम्यान मला बऱ्याच मोठ-मोठया कलाकारांबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. येथूनच माझा प्रवास सुरु झाला. माझे मामा दीपक शिर्केही अभिनयाशी जोडलेले आहेत. त्यांच्या नावाचा आधार मी कधीही घेतला नाही. याशिवाय माझे आजोबाही तरुण वयात नाटक करायचे, अशाप्रकारे अभिनय माझ्या रक्तातच आहे, ज्याचे स्वरूप आज मी पाहते आहे.

कुटुंबाने तुला कसा पाठींबा दिला?

हे क्षेत्र अनिश्चिततेने भरलेले असते. कधी काम असते तर कधी नसते. अशास्थितीत कुटुंबाचा आधार खूप आवश्यक असतो. कुटुंबाने मला सगळया प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यांनी मला आपली जबाबदारी घेण्यास शिकवले आहे. जे माझ्यासाठी चांगले होते. मी कधी डिप्रेशनमध्ये गेली नाही. मराठी बिग बॉस २ च्या अगोदर मी सब टीव्हीवर ‘बडी दूर से आए हैं’ मालिका करत होती. ही संपल्यावर ४ ते ५ वर्षापर्यंत मी घरीच होते. काही काम नव्हते. इन्कमही नव्हते, परंतु प्रत्येक महिन्याचा खर्च होता. त्यावेळेस कुटुंब माझयाबरोबर खंबीरपणे उभे होते.

काम न मिळण्याचे कारण काय होते?

माझ्यासाठी बहुतेक हा ब्रेक होता. मी तो सकारात्मकतेने घेतला. त्यादरम्यान मी वर्कआउट, योगा इत्यादी करत राहिले. मी ५ वर्षांनंतरही फिट राहिले. हे टिकविणे माझ्यासाठी आव्हान होते.

आता पुढे काय आहे? कोणत्या कथेने तुझे जीवन बदलले?

माझे नाटक ‘गांधी हत्या आणि मी’ अजून चालू आहे. सिंधुताई गोडसेंची खूप वेगळी भूमिका आहे. जी नथुराम गोडसे आणि पती गोपाळ गोडसे हे दोघे जेलमध्ये गेल्यानंतर आपले जीवन कसे व्यतित करते, ते दाखवले आहे. माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक भूमिका आहे. ही एका खंभीर महिलेची कथा आहे. मी आतापर्यंत कॉमेडी आणि हल्की-फुलकी भूमिका निभावली होती. परंतु मी या व्यक्तित्वाने खूप प्रभावित आहे. याशिवाय मी काही वेब सिरीज करत आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये तू काय करत आहेस?

मी आपल्या आईला थोडा आराम देण्याचा विचार केला आहे. घरात आत्ता आम्ही चार लोक आहोत आणि सगळयांसाठी डयुटी ठरवलेली आहे. घरात लादी पुसणे, झाडू मारणे, जेवण बनवणे, वर्कआउट करणे इत्यादी मी करते. मला कुकिंगचा छंद आहे. म्हणून मी जिलेबी आणि रबडी घरीच बनवली आहे. काही नवीन ट्राय करत असते. यांशिवाय काही जुन्या स्क्रिप्ट्स ज्या शेल्फवर पडलेल्या आहेत, त्यांना वाचत आहे.

या लॉकडाऊनने इंडस्ट्रीवर काय प्रभाव पडेल?

अभिनय आपण घरी करू शकत नाही. इतर कामे आपण घरातून करू शकतात. सर्वकाही ब्लॉक झाले आहे. नंतरही फिल्म किंवा नाटकापर्यंत प्रेक्षक येतील कि नाही ही विचार करण्यायोग्य बाब आहे. थोडी अडचण येईल, पण नंतर सर्वकाही ठीक होईल. आशा आहे लोक सरकारचे म्हणणे ऐकून घरात राहतील आणि या समस्येपासून लवकरच मुक्त होतील.

आता कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो?

आता परिश्रमाचा योग्य मोबदला मिळावा यासाठीच सामना करावा लागतो. निर्माता, दिग्दर्शक एक चांगला आणि अनुभवी कलाकार आपल्या फिल्ममधे घेऊ इच्छितात, परंतु त्याला योग्य मोबदला देऊ इच्छित नाहीत आणि हीच एक मोठी समस्या आहे. मीही थोडी चुजी बनले आहे. कामाचे समाधान मला हवे. मला कुठल्या रेसमध्ये पळणे आवडत नाही.

तू किती फॅशनेबल आहेस?

मला नेहमी फॅशन करायला आवडते. मला सब्यसाची, मनीष मल्होत्रा इत्यादी डिझाइनर्सचे कपडे घालण्याची तीव्र इच्छा आहे.

अभिनयाव्यतिरिक्त काय करण्याची इच्छा आहे?

मला रेस्तराँ खोलण्याची इच्छा आहे. कारण पूर्वी दहिसर परिसरात राजश्री टॉकीजजवळ माझ्या कुटुंबाची एक हातगाडी होती, जेथे कोकणचे चिकन खूप प्रसिद्ध होते. मला तशीच डिश पुन्हा लोकांना खायला द्यायची आहे.

कुठले सामाजिक कार्य तू करू इच्छिते?

मी एक कॉलनी त्या तरुणांसाठी बनवू इच्छिते, जे अभिनयासाठी मुंबईत येतात आणि भटकत असतात. अशा सर्वांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये होवो आणि काम मिळाल्यानंतर ते निघून जावोत.

याशिवाय अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी काही करू इच्छिते.

गृहशोभिकेच्या महिलांसाठी काही संदेश देऊ इच्छिते?

महिलांनी इतरांची देखभाल करण्याबरोबरच स्वत:साठी काही वेळ काढावा आणि आपली काळजी घ्यावी. त्या जेवढया निरोगी राहतील, तेवढेच कुटुंबही निरोगी राहील.

आवडता रंग – काळा.

आवडता पोशाख – साडी.

वेळ मिळाल्यास – कुकिंग.

नकारात्मक विचार दूर करण्यासाठी – सकारात्मक आभा तयार करणे, एक दिवस स्वत:साठी व्यतित करणे.

आवडते पर्यटन स्थळ – निसर्गाच्या जवळ नेणारे.

मनास आवडणारा परफ्युम – ला वि ईस्ट वेले.

जीवनाचे आदर्श – आईवडिलांची काळजी घेणे.

स्वप्नांचा राजपुत्र उदारमतवादी, पुरोगामी, स्वतंत्र असणे आवश्यक आहे – पूर्वी भावे

– सोमा घोष

लहानपणापासून अभिनयाची इच्छा असलेली पूर्वी भावे अभिनेत्रीशिवाय एक अँकर आणि भरतनाट्यम नर्तिकादेखील आहे. कलेच्या वातावरणात जन्मलेली पूर्वीची आई वर्षादेखील एक शास्त्रीय गायिका आहे, परंतु पूर्वीने गायन स्वीकारले नाही तर नृत्य स्वीकारले आणि तिने गुरु डॉ. संध्या पुरेचाकडून भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. पूर्वीला नृत्य आणि अभिनय या दोन्ही गोष्टी आवडतात, कारण त्या दोघांतही परफॉर्मोंसची संधी मिळते. तिने आपल्या कारकीर्दीची सुरूवात अभिनय आणि अँकरिंगद्वारे केली. तिच्या यशामध्ये कुटुंबाचा आधार खूप होता. पूर्वी तिच्या प्रवासाबद्दल काय म्हणते, आपण तिच्याकडून जाणून घेऊया :

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझी आई एक अभिजात गायिका आहे. लहानपणापासूनच मी भरतनाट्यम शिकले आणि अजूनही नृत्य करते. परफॉर्मिंग आर्टस्मध्ये जाणे तर नक्की होते, पण हळू हळू मला वाटायला लागलं की मी अभिनयात जाऊ शकते. वास्तविक अभिनय हेदेखील चांगले प्रदर्शन करण्याचे माध्यम आहे, जिथे वेगवेगळया भूमिका साकारण्याची संधी मिळते.

तुला कुटुंबाने कशी मदत केली?

कुटुंबात प्रत्येकाचा आधार होता. दोन्ही पालकांचा पाठिंबा होता. माझे वडील केमिकल इंजिनिअर असले तरी त्यांना नेहमीच कला आवडते. कला आणि संस्कृती त्यांना खूप आकर्षित करते.

तुझा पहिला ब्रेक कधी आला?

प्रथम मी २०१२ मध्ये ‘पितृऋण’ चित्रपट केला. याआधी आणि नंतर मी अँकरिंग करत राहिले. यामुळे लोक मला ओळखू लागले होते. मग मी एक मराठी आणि प्रयोगात्मक नाटक केले. मी टीव्हीला टाळले. आता मी स्कूल, कॉलेज आणि लाइफ नावाचा एक मराठी चित्रपट केला आहे. हा हळू हळू होत राहिला, यादरम्यान, नृत्य शिकवण्याचे आणि अँकरिंग करण्याचे कामही चालूच राहिले.

अँकरिंग करणे, नृत्य करणे आणि अभिनय करणे हे सर्व एकत्र करणे तुझ्यासाठी किती अवघड आहे?

खूप कठीण आहे. कोणालाही नृत्य शिकवणे सोपे नाही. त्यांना सतत शिकवावं लागतं, पण माझ्याकडे काही सहाय्यक आहेत, जे हे काम सांभाळून घेतात आणि काम पूर्ण होते. योग्यरीतीने सर्व गोष्टी मॅनेज करणेदेखील कलाकारासाठी एक आव्हान आहे.

आजकाल लोक शास्त्रीय नृत्याकडे कमी लक्ष देतात, तू या गोष्टीशी किती सहमत आहे?

‘द हाऊस ऑफ नृत्य’ हे माझ्या संस्थेचे नाव आहे. जिथे मी नृत्य शिकवते. माझ्या मते, आजचे तरुण शास्त्रीय नृत्यात खूप रस घेतात. तसेच आज बरेच लोक हे शिकवतात. मला आठवतं की बालपणी एक चांगले शिक्षक मिळणे खूप अवघड होते, कारण त्यावेळी मोजकेच लोक नृत्य शिकवत असत, मुले आज पाश्चात्य नृत्याने अधिक परिचित आहेत, परंतु संस्कृती आणि कलेवर प्रेम करणारे जे पालक आहेत ते आपल्या मुलांना शास्त्रीय नृत्यदेखील शिकवतात. यावेळी, कोरोना संसर्गामुळे मी ऑनलाइन नृत्य शिकवित आहे, दूर-दूरवर राहणारी मुले आणि मोठी माणसे त्याचा लाभ घेत आहेत.

येथे पोहोचण्यासाठी तू किती संघर्ष केला?

मी स्वत:ला नशीबवान समजते, कारण मी परफॉर्मिंग आर्टच्या बऱ्याच शाखांशी जोडलेली आहे. चांगल्या कामासाठी थोडा विराम आणि संघर्ष आवश्यक आहे. इतर लोक जे करतात तसे काम करायला मला आवडत नाही.

लॉकडाऊनमध्ये तू काय करत होती?

मी माझे आईवडील आणि आजी यांच्यासमवेत चांगला वेळ घालवला आहे. मी सर्व खाद्यपदार्थांच्या वस्तू आणण्याची जबाबदारी घेतली होती, कारण मला प्रौढांना बाहेर जाऊ द्यायचे नव्हते. याशिवाय कधीकधी मी स्वयंपाकही करायचे. मुलांना ऑनलाईन नृत्य प्रशिक्षणही दिले, संपूर्ण वेळ खूप व्यस्त होता.

कोणत्या शोने तुझे जीवन बदलले?

मला आठवते की माझ्या लहानपणी मी अनेक असे धारावाईक पाहिले होते, जे खूप प्रेरणादायक होते आणि मला ते आवडायचे. ‘तारा’, ‘शांती’, ‘बनेगी अपनी बात’ वगैरे असे बरेच कार्यक्रम होते, जे प्रोग्रेसिव विचारांचे होते. आता तसे कंटेंटवाले कमी बनतात.

तुझ्या स्वप्नांचा राजपुत्र कसा आहे?

सर्जनशील असण्याबरोबरच उदारमतवादी, पुरोगामी, समर्थक व विचारात आत्मनिर्भर असण्याची गरज आहे.

तू कोणत्या प्रकारच्या विवाहावर विश्वास ठेवते, लव की अरेंज्ड?

लव्ह मॅरेजवर माझा जास्त विश्वास आहे, कारण यात जोडीदाराच्या सवयींविषयी तुम्हाला आधीच माहिती असते.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मला छान दिसायला आणि आरामदायक पोशाख घालायला आवडते. कामानुसार कपडे घालावे लागतात, परंतु मला जीन्स आणि टी-शर्ट आवडतात.

मी फूडी आहे, पण खाण्याबरोबरच मी मुडीदेखील आहे. लहानपणापासूनच भोजन करण्यात मी चांगले नव्हते. हॉटेल फूड, स्ट्रीट फूड आणि विशेषत: समुद्री खाद्य खूप आवडतात.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये येण्याची इच्छा आहे का?

जर संधी मिळाली तर मला नक्कीच यायला आवडेल.

एखादे कुठले स्वप्न आहे?

मला एक मोठया बजेटचे नृत्य नाटक करायचे आहे, ज्यामध्ये नृत्य आणि नाटक दोन्ही असतील, त्याचे दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे.

तू देऊ इच्छित असलेला एखादा संदेश?

२०२० हे वर्ष सर्वांसाठी खूप वाईट राहिले. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. जागरुक रहा. पुढील वर्ष सर्व काही ठीक होवो, यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

आवडता रंग – लाल आणि निळा.

आवडता ड्रेस – वेस्टर्न.

आवडते पुस्तक – सेपियन्स, १९८४.

सवड मिळाल्यास – चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे.

नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय – सकारात्मक विचारसरणी, योगा आणि ध्यान.

आवडते पर्यटन स्थळ – स्वदेशात – उत्तर पूर्व, परदेशात – युरोप.

परफ्यूम – डेव्हिड ऑफ कूल वॉटर फॉर वूमन.

जीवनाचे आदर्श – प्रामाणिकपणे काम करणे.

कुठले सामाजिक कार्य – गरजू लोकांना मदत करणे आणि संस्थेतील गरीब मुलांना शिष्यवृत्ती देणे.

कसे रूळावर येईल बेहाल बॉलीवूड

सीमा ठाकुर

चित्रपट सृष्टीवरही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. बॉलीवूड असो किंवा प्रादेशिक सिनेमा, सर्वांनाच कोरोनाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. इंड्रस्टीतील सर्व विभाग आणि प्रोडक्शनचे काम जसे की, कास्टिंग, लोकेशन शोधणे, टेक स्काऊटिंग, कॉस्च्युम फिटिंग, वॉर्डरोब, हेअर आणि मेकअप आर्ट, साऊंड आणि कॅमेरा, केटरिंग, एडिटिंग, साऊंड आणि व्हॉईस ओव्हरसारखी सर्व कामे ठप्प आहेत. ती करणाऱ्यांच्या हातात कोणतेही काम नाही आणि कमाईचे साधनही नाही.

तज्ज्ञांच्या मते, सिनेमागृह बंद पडणे, शूटिंग थांबणे, प्रमोशनल इव्हेंट न झाल्यामुळे  आणि मुलाखतीही मिळत नसल्याने टीव्ही आणि चित्रपटसृष्टीला आगामी काळात मोठा तोटा सहन करावा लागेल.

हे नुकसान किती मोठे असेल याची अचूक आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही, परंतु असा अंदाज आहे की, इंडस्ट्रीचे सुमारे १०० ते ३० कोटींचे नुकसान होऊ शकते.

बंद पडली आहेत सिनेमागृह

सुमारे ९,५०० सिनेमागृह बंद करण्यात आली आहेत आणि येत्या काही आठवडयात  ती सुरू होण्याची शक्यता नाही. दरवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत १,२०० चित्रपटांची निर्मिती होते. हे चित्रपट मल्टिप्लेक्सद्वारे कमाई करतात, जे लॉकडाऊनमध्ये बंद आहेत.

मार्चमध्ये सर्वप्रथम रिलायन्स एन्टरटेन्मेंटने रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर ‘संदीप और पिंकी फरार’, ‘हाथी मेरे साथी’सह ८३ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

‘बागी’ हा चित्रपट ३ मार्च रोजी प्रदर्शित झाला, पण त्याची तिकिटे विकली गेली नाहीत. यामागचे कारण भारतातील कोरोनाचा वाढता संसर्ग हे होते.

याचप्रमाणे इरफान खान आणि राधिका मदान यांचा ‘अंग्रेजी मीडियम’ बॉक्स ऑफिसऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला. प्रादेशिक चित्रपटही प्रदर्शित करण्यात आले नाहीत.

ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वोत्तम पर्याय नाही

चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने आणि चित्रपटगृहे बंद असल्यामुळे चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीजचे शूटिंग थांबविण्यात आले होते, जे लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद झाले. ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की, अमेझॅन प्राइम, नेटफ्लिक्सवर काही चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु ओटीटीपर्यंत पोहोचणे प्रत्येक चित्रपटाला शक्य नाही. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म प्रत्येक मोठा चित्रपट खरेदी करू शकत नाही.

लोकप्रिय तेलगू चित्रपटाचे निर्माता एस. के. एन यांनी सांगितले की, सुमारे एक हजार खुर्च्यांची क्षमता असणाऱ्या चित्रपटगृहांचे दरमहा दहा लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म मोठया शर्यतीत पळणाऱ्या घोडयांप्रमाणे उपयुक्त ठरतील की नाही, याबाबत एस. के. एन. यांना खात्री नाही. त्यांनी सांगितले, ‘‘मला वाटत नाही की ओटीटी प्लॅटफॉर्म असे चित्रपट विकत घेतील जे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले नाहीत. कारण चित्रपटगृहात कोणता चित्रपट हिट ठरेल आणि कोणता फ्लॉप होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, ओटीटी फक्त तेच चित्रपट विकत घेऊ इच्छितात जे आधीपासूनच हिट आहेत.’’

सध्या मनोरंजन क्षेत्रात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मच असे आहे जे फायद्यात आहे. लॉकडाऊनच्या काळात  लोकप्रिय शो आणि चित्रपट पुन्हा पाहणे बरेच जण पसंत करीत आहेत, यामुळे या प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांची संख्या वाढली आहे.

२०१९ मध्ये या इंडस्ट्रीने १७,३०० कोटींची कमाई केली. यावरून २०२० मध्ये हा प्लॅटफॉम कमाईची किती रेकॉर्ड मोडीत काढेल याचा अंदाज लावता येईल.

चित्रपटगृहात बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होणे आणि त्यांना लोकप्रियता मिळणे याला महत्त्व आहे, हे जगजाहीर आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे घडणे अवघड आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म पाच कोटींचा चित्रपट विकत घेऊ शकतील पण १०० कोटींचा चित्रपट विकत घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही. म्हणूनच बॉलिवूडचे चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

या चित्रपटांच्या कमाईचा मोठा हिस्सा दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह भारतातील १० महानगरांमधून येतो जी सध्या कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचे भविष्य  अंधकारमय आहे.

कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट

प्रसिद्ध तारेतारका सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या नजेसमोर राहत आहेत. कुणाला आपला एसी खराब झाल्याची काळजी वाटत आहे तर कुणी भांडी घासणे हेदेखील कामच आहे, असे दाखवून स्वत:ला वेगळया रुपात सादर करीत आहेत. पण, पडद्यामागे काम करणाऱ्यांसाठी हा बेरोजगारी आणि उपासमारीचा काळ आहे.

चित्रपटाचे शुटिंग आणि संबंधित सर्व कामे बंद असल्याचा तितकासा दुष्परिणाम मोठे बॅनर आणि कलाकारांवर जाणवत नसला तरी तो पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणात जाणवत आहे. क्रु मेंबर्स, रोजंदारी आणि छोटया प्रोजेक्टमधून पैसे कमावणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.

दोन वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, कोरोना संकटामुळे बॉलिवूडचे काम ठप्प झाल्यामुळे या इंडस्ट्रीशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या जोडल्या गेलेल्या सुमारे १० लाख लोकांचे नुकसान झाले. अनेकांच्या हाताला काम नाही. बॉलिवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ३५,००० कामगारांचे सर्वात जास्त हाल झाले.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीनटाने या कामगारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन बॉलीवूडच्या तारेतारकांना केले. त्याला प्रतिसाद देत रोहित शेट्टी, सलमान खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, विद्या बालन हे रेशन तसेच आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले.

नवीन कलाकार, फ्रीलान्सर फोटोग्राफरही असुरक्षित

मुंबई महानगरी आहे आणि येथे देशातील विविध भागातून तरुणाई आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. पण भाडयाच्या घरात राहणाऱ्या तरुणांनाही घरी परत जावे लागले आहे. ते सर्व छोटया-मोठया  प्रोजेक्टमध्ये काम करून कसेबसे उदरनिर्वाह करीत होते. पण कामच नसल्याने आईवडिलांवर विसंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

साधारणपणे दिवसाला ११,००० ते २०,००० रुपये कमावणाऱ्या या फ्रीलान्स फोटोग्राफर्सचे मिळकतीचे मार्ग बंद झाले आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी, अभिनेता हृतिक रोशन यांनी त्यांच्यासाठी आर्थिक मदत दिली आहे.

अशी सावरेल फिल्म इंडस्ट्री

लॉकडाउन उघडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीला व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणावी लागेल. पण हे तितकेसे सोपे नाही. चित्रपट निर्मात्यांना प्री-प्रोडक्शनचे काम खूपच काळजीपूर्वक पूर्ण करावे लागेल.

प्रोडक्शन सुरू करण्यासाठी प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने ‘बॅक टू अॅक्शन’ हा अहवाल जारी केला आहे. यात व आणि ऑफ स्टेज, प्री आणि पोस्ट प्रोडक्शन अशा सर्व विभागांसाठी निर्देश जारी केले आहेत. यातील काही प्रमुख सूचना पुढील प्रमाणे :

* लॉकडाऊन उघडल्यानंतर सुरुवातीचे ३ महिने सेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जाईल. त्याने सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असेल. शक्य असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’चे पालन करणे गरजेचे असेल. सोबतच मोजकेच स्टार कास्ट, क्रू मेंबर आणि शक्यतो बाहेरच्या लोकेशनवर शूटिंग कमी करण्यावर भर देणे आवश्यक असेल. सेटवर मेडिकल टीम असणे बंधनकारक असेल.

* सेटवर प्रत्येकाला दर थोडया वेळाने हात धुवावे लागतील. ट्रिपल लेयर मास्क लावूनच ठेवावा लागेल. प्रत्येकाला ३ मीटर अंतर ठेवणे या नियमाचे पालन करावे लागेल. हस्तांदोलन, गळाभेट, किसिंग टाळावे लागेल.

* सेटवरील प्रत्येक क्रू मेंबर आणि स्टाफला त्यांचे आरोग्य उत्तम असल्यासंदर्भातील अर्ज भरावा लागेल. कुठल्याही प्रोजेक्टवर स्वाक्षरी करण्यापूर्वी  आपल्या आरोग्याबबात सर्व माहिती द्यावी लागेल.

* शूटिंगच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीची उपस्थिती नोंदविली जाईल. शूटिंगच्या ४५ मिनिटे आधी सेटवर पोहोचावे लागेल, जेणेकरुन त्यांना कोरोना संसर्ग टाळण्याचे उपाय सांगितले जातील आणि हा नवीन  दिनक्रम त्यांच्यासाठी नेहमीची सवय बनेल.

* जे घरुन काम करु शकतात त्यांना घरुनच काम करावे लागेल. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा एखादा आजार असलेल्याने घरुनच काम करणे बंधनकारक असेल.

आता पहावे हे लागेल की, ही परिस्थिती आणखी किती काळ टिकणार आहे. सर्वांचा प्रयत्न हाच आहे की, काम लवकरात लवकर रुळावर यायाला हवे आणि त्याने वेग पकडला पाहिजे.

मराठी इंडस्ट्री प्रतिभेवर आधारित आहे – रूचिता जाधव

* सोमा घोष 

मॉडेलनंतर एक्ट्रेस बनलेल्या अभिनेत्री रूचिता जाधव या पुण्याच्या आहेत. व्यवसायिकांच्या कुटुंबात जन्मलेल्या रूचिताला नेहमीच काही आव्हानात्मक काम करण्याची इच्छा असायची, ज्यात तिची आई कल्पना ताई जाधव यांनी पाठिंबा दर्शविला. रूचिताने मराठी चित्रपट, मालिका तसेच हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. सौम्य आणि आनंदी स्वभाव असलेल्या रूचिताला प्रत्येक नवीन आणि वेगळी कहाणी प्रेरणा देते. ती तिच्या प्रवासाला डेस्टिनी मानते. त्यांच्याशी बोललो, या जाणून घेऊया, त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत :

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली?

कोणत्याही कलाकाराचे यश त्याच्या गंतव्यस्थानावर अवलंबून असते. सुरुवातीला जेव्हा मी फॅशन डिझायनिंगमध्ये बॅचलर करत होते. एका शो दरम्यान माझी मॉडेल पळून गेली आणि मार्ग नव्हता म्हणून मलाच माझे कपडे घालून रॅम्पवर जावे लागले. त्यावेळी अभिनेत्री अदिती गोवित्रीकर आणि बऱ्याच मोठ-मोठया सेलिब्रिटी तिथे आल्या होत्या, यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला आणि माझा प्रवास सुरू झाला. यानंतर मी कामासाठी बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिले. या कामात माझ्या आईने मला खूप सहकार्य केले. यानंतर माझी मेहनत फळास आली.

तू पालकांशी अभिनयाबद्दल प्रथमच बोलली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

मी अभिनेत्री होईन असा त्यांचा विचार नव्हता, कारण माझ्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नाही, मी एका राजकीय कुटुंबातून आले आहे, कारण माझी आई १५ वर्ष नगरसेविका होती, अशा परिस्थितीत माझे वडील विजय जाधव याविरोधात होते. त्यांनी मला अभिनय करण्यास नकार दिला, शिवाय माझ्या कुटुंबातील मुलीचे लग्न २२व्या वर्षी होते, त्यावेळी मी १८ वर्षांची होते, मी त्यांच्याकडे दोन वर्षांचा वेळ मागितला. माझ्या वडिलांनी सहकार्य केले नाही, परंतु माझ्या आईने मला गुप्तपणे साथ दिली. जेव्हा माझे सीरियल आणि चित्रपट येऊ लागले, मीडियात माझे नाव होऊ लागले, तेव्हा वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आईनी माझी स्वप्ने सत्यात उतरविली.

तू पुण्याहून मुंबईला कशी आली?

रॅम्प शो दरम्यान एका समन्वयकानं मला मुंबईत असलेल्या जाहिरातीची ऑफर दिली. यापूर्वी मी मिस फोटोजेनिकदेखील जिंकली होती, यामुळे आईचा विश्वास माझ्यावर जास्त होता, त्या महिलेने माझं ऑडिशन पुण्यामध्ये घेतलं. मला बुलेट चालवायची होती, जे मला येत होते. मी ऑडिशन दिली आणि निवड झाली. यानंतर मला मुंबईला यावे लागले. मी मुंबईला गेले आणि तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत आहे. त्या संयोजकांमुळेच मला ‘संयोगिता’ ही पहिली मराठी मालिका मिळाली. यानंतर बऱ्याच मराठी चित्रपटांतही काम केले.

फॅशन डिझायनरकडून अभिनेत्री होणे किती कठीण होते?

मला अभिनयाबद्दल काहीच माहित नव्हते, त्यामुळे अनेक अडचणी आल्या. शहर नवीन होते. कॅमेऱ्याचा एंगल समजत नव्हता. कुणाला विचारल्यावर ते थट्टा करायचे. एका दिग्दर्शकानेसुद्धा एकदा माझा अपमान केला, तेव्हा प्रत्येकजण मला पाहून हसले. मी तेव्हा खूप रडले. तेव्हापासून मी हार मानणार नाही अशी शपथ घेतली आणि आता सर्व काही व्यवस्थित चालू आहे. माझ्यासाठी तो दिवस ट्रिगर पॉईंट होता आणि तो महत्वाचा होता. यानंतर मी बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

तू बाहेरील व्यक्ति असल्याने काही संघर्ष होता का?

मी माझे नशीब आणि परिश्रमांना नेहमीच सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. म्हणून मला जे काही काम मिळाले ते मी खूप कष्टाने केले. याचा मला विश्वास आहे की बाहेरील व्यक्तिला खूप परिश्रम करावे लागतात कारण लॉबिंग सर्वत्र आहे. मराठी इंडस्ट्री प्रतिभेवर आधारित आहे हेही खरं आहे. प्रतिभा नसताना आपण इथे उभे राहू शकत नाही. येथे कोणाचा मुलगा किंवा मुलगी फारशी महत्त्वाची नसते. एखाद्याला एक-दोन चित्रपट मिळतीलही परंतु त्यानंतर मिळू शकणार नाही. मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला मी जिथे जात असे तिथे माझी आई माझ्याबरोबर जायची, कारण तिच्यासाठी ही इंडस्ट्री नवीन होती. नंतर एका मुलाला ठेवण्यात आले होते, कारण आईची राजकीय कारकीर्ददेखील असते. तथापि, बऱ्याच वर्षांपर्यंत तिने आपले काम सोडून माझी साथ दिली.

तुला हिंदी चित्रपटांमध्ये येण्याची इच्छा आहे का?

मी ३ हिंदी सीरियल केले आहेत. ‘वीर शिवाजी’, ‘लौट आओ तृषा’, ‘ये उन दिनों की बात है,’ बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे, पण एखादी कथा असेल तरच मी करेन. आत्ता मी कम्फर्ट झोनमध्ये आहे आणि आनंदी आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा आहे. मी अभिनेता शाहरुख खानची मोठी फॅन आहे. त्याच्याबरोबर अभिनय करण्याची इच्छा आहे.

कोरोनाच्या काळात काम कसे केले जात आहे आणि किती काळजी घेतली जात आहे?

काम आता अगदी सावधगिरीने सुरू झाले आहे,  सुरक्षेचा प्रत्येक मार्ग अवलंबला जात आहे. मी बऱ्याच जाहिरातींमध्ये काळजीपूर्वक काम केले आहे. मी अद्याप सीरियलमध्ये काम सुरू केलेले नाही. कुटुंबामुळे मी थोडी काळजी घेत आहे. मी सध्या मुंबईत राहत आहे.

अभिनयात आपले फॅशन डिझायनर असणे किती फायदेशीर आहे?

फॅशन डिझायनर असणे नेहमीच माझ्यासाठी फायदेशीर ठरते. कारण बऱ्याच वेळा सेटवरील डिझाइनर पात्रानुसार ड्रेस बनवतात, मी बहुतेक वेळा त्यांना ड्रेसविषयी सल्ला देते. अशाने त्यांनाही कल्पना मिळते आणि गोष्टी व्यवस्थित होतात. त्यांना माहित आहे की मी कोणतेही डिझाइन केलेले कपडे घालणार नाही, कारण मला माहित आहे की शरीराचा आकार आणि त्वचेला काय शोभेल.

तुला कोणत्या डिझाइनरचे कपडे आवडतात?

डिझायनर सब्यसांचीचे लहेंगे व श्यामल आणि भूमिकाचे ड्रेस खूप आवडतात.

तुझ्या स्वप्नांचा राजकुमार कसा आहे?

माझ्या स्वप्नांचा राजकुमार माझ्यावर खूप प्रेम करणारा असावा. माझी मूल्ये बदलणारा नसावा. माझ्या आईवडिलांनी जितके प्रेम केले त्यापेक्षा अधिक मला प्रेमाने आणि सुखाने ठेवणारा असावा, याशिवाय मी माझ्या पालकांचे प्रेम पाहिले आहे, जे प्रत्येक अडचणीत एकमेकांना साथ देतात. माझा भावी पतीही असाच असावा.

तुझे आयुष्य बदलणारे कोणते प्रसंग आहेत?

‘लव्ह लग्न लोचा’ या मराठी कार्यक्रमातील काव्याच्या व्यक्तिरेखेने मला लोकांकडून खूप प्रेम दिले. या व्यतिरिक्त मला मुंबईतील या शोच्या माध्यमातून मित्र मिळाले. त्या मालिकेत मी मुख्य भूमिका साकारत होते, त्यामुळे माझे जेवढेही कोस्टार होते, ते आता माझे कुटुंब बनले आहेत. ते कोणत्याही अडचणीत मला नक्कीच मदत करतील.

हिंदी चित्रपटांमधील अंतरंग दृश्य करणे तुझ्यासाठी सहज शक्य आहे का?

मला अधिक अंतरंग दृश्ये करण्याची इच्छा नाही, कारण माझे कुटुंब राजकीय पर्श्वभूमीचे आहे. सामान्य इंटिमेसी करण्यात कोणतीही अडचण नाही. मी मागणी आणि अभिव्यक्ति दर्शविण्यासाठी काहीसे अंतरंग दृश्य करू शकते, परंतु जास्त नाही.

तू वाचकांना गृहशोभिकेद्वारे काही संदेश देऊ इच्छितेस का?

मला युवकांना सांगायचे आहे की तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये आणि मुंबई येथे अभिनयासाठी येऊ नये. जर आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर आलात तर आपण अभिनयात फारसे यशस्वी झाला नसलात तरीही आपण आर्थिक समस्येतून जाणार नाहीत आणि आपल्याला अभिनयात स्वत:ला आजमावण्याचा वेळ मिळतो. जे असे करत नाहीत ते योग्य काम न मिळाल्यास औदासिन्यात जाऊन चुकीचे पाऊल उचलतात.

आवडता रंग – जांभळा.

आवडता ड्रेस – शॉर्टस आणि लूज ट्रेंडी टॉप्स.

भारतीय किंवा पाश्चात्य वेषभूषा – जसा देश, तसा परिधान.

आवडते पुस्तक – ए थाउजेंड स्प्लेंडिड संस (एक हजार भव्य सन्स).

आवडता परफ्यूम – डोल्से आणि गबाना हलका निळा.

सवड मिळाल्यावर – कुटुंबासमवेत वेळ घालवणे, पुस्तके वाचणे.

जेव्हा नकारात्मक विचार येतात – सकारात्मक विचार ठेवणे.

पर्यटन स्थळे – देशातील ऋषिकेश, परदेशात फ्रान्सची दक्षिण किनारपट्टी.

जीवनाचे आदर्श – समस्येवर चर्चा न करता त्याचे निराकरण करणे.

सामाजिक कार्य – गरजूंसाठी काम करणे.

उत्सव मी कुटुंबासह साजरा करते – मनिषा केळकर

* सोमा घोष

कलेच्या वातावरणात जन्मलेली मराठी अभिनेत्री मनिषा केळकर ही प्रसिद्ध पटकथा लेखक राम केळकर आणि शास्त्रीय नर्तक, अभिनेत्री जीवन कला यांची मुलगी आहे. तिने लहानपणापासूनच अभिनयाचा विचार केला नव्हता. मराठी चित्रपटांशिवाय हिंदी, तेलगू आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. स्पष्ट आणि मवाळभाषी मनिषाला नेहमीच प्रत्येक नवीन चित्रपट आणि त्याचे आव्हान आवडते. ती एक अॅडव्हेंचर लव्हर आणि खेळाडू व्यक्तिदेखील आहेत. हेच कारण आहे की तिने चित्रपट निर्मितीचाही अभ्यास केला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ती आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करत आहेत. तिच्या प्रवासाबद्दल आम्ही तिच्याशी बोललो, त्यातील काही भाग प्रस्तुत आहे :

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कोठून मिळाली?

मी अभिनयात थोडया उशिराने आले, मी तिसऱ्या पिढीची आहे. माझे कुटुंब मूक चित्रपटांच्या काळापासून चित्रपटांमध्ये काम करत आहे, परंतु मी अभ्यासात खूप चांगले होते आणि मला एअरफोर्समध्ये पायलट व्हायचे होते. तेव्हा मुलींना लढाऊ विमान चालविण्याची परवानगी नव्हती, त्यांच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला हे कळले. मग ते सोडून शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच मला नाटकांमध्ये सहभागी होण्याची आवड होती, परंतु महाविद्यालयात पोहोचल्यानंतर मला असे वाटले की मी अभिनयातदेखील काहीतरी करू शकते आणि मी माझ्या वडिलांशी चर्चा केली व आपले शिक्षण संपल्यानंतर अभिनय क्षेत्रात उतरले.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

मी आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत होते. माझा पहिला कार्यक्रम होता. व्ही शांताराम यांनी मला पाहिल्यानंतर मला मराठी चित्रपटाची ऑफर दिली, मी मान्य केली आणि माझा प्रवास सुरू झाला. चित्रपट यशस्वी झाला आणि मला मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही.

तुला येथपर्यंत पोहोचण्यासाठी पालकांनी किती सहकार्य केले?

मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते. मला जे काही करायचे होते त्यासाठी पूर्ण मोकळीक होती. पण त्यांची अट शिक्षण पूर्ण करण्याची होती आणि मी ती केली. मलाही अभ्यासाची खूप आवड होती. पालकांचे नेहमीच सहकार्य लाभले.

तुला अॅडव्हेंचरदेखील खूप आवडते, तू ते कसे केले?

मी बऱ्याच कार रेस केल्या आहेत,  मला ते सर्व खूप आवडते. जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी प्रशिक्षण घेतले. मी अजूनही रेसिंग करते. या क्षेत्रात खूप कमी मुली आहेत. यात मुलांबरोबर रेसिंग करावी लागते. अधिकाधिक मुली या क्षेत्रात याव्यात आणि सहभागी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. हे देखील एक करिअर बनू शकते. हे कमी वयापासूनच करावे लागते.

कोणत्या चित्रपटाने तुझे आयुष्य बदलले?

प्रत्येक चित्रपट निवडताना मी त्याच्या पटकथेची खूप काळजी घेते. मी वर्तमानात जगते. प्रत्येक चित्रपटातून काहीतरी शिकायला मिळते. ‘बंदूक’ चित्रपट आजही पाहिला जातो आणि माझ्या कार्याचे कौतुक केले जाते. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे.

वेगवेगळया माध्यमांचा अभिनयावर काही परिणाम होतो का?

अभिनयावर माध्यमांचा कोणताही परिणाम होत नाही. प्रोडक्शनचा परिणाम होतो. मराठी चित्रपट कमी बजेटमध्ये बनतात, तर इतर भाषांमधील चित्रपटांचे बजेट जास्त असते. भावना नेहमी सारखीच असते. शॉट सुरू होताच कोणत्याही प्रकारचा फरक जाणवत नाही, कारण तेव्हा आपण आपली भूमिका जगत असतो.

तुला बायोपिक करण्याची इच्छा आहे का? पुढच्या काय योजना आहेत?

मला बायोपिक करायला आवडते, कारण यामध्ये तुम्हाला कोणत्याही यशस्वी व्यक्तिला जवळून जाणून घेता येते आणि ते पात्र जगता येते. त्याची तयारीदेखील खूप करावी लागते. मला नवीन लोकांना भेटण्यास आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास आवडते.

पुढे मी वेब सीरिज, मराठी चित्रपट आणि एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प करणार आहे, पण कोरोनामुळे अजून सुरू झालेले नाही.

कोरोना संसर्गामुळे मराठी चित्रपटसृष्टीला बरीच हानी पोहोचली आहे, ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी कामात कोणत्या प्रकारचे बदल करण्याची आवश्यकता आहे?

तसे पाहता काम सुरू झाले आहे आणि खबरदारीदेखील पूर्ण घेतली जात आहे. आम्ही एका योद्धयाप्रमाणे काम करत आहोत आणि दररोज लढाई लढायला जात आहोत. आता स्वत:चे रक्षण करण्याची खूप आवश्यकता आहे. आता प्रत्येकासाठी करमणुकीची साधने अत्यंत आवश्यक बनली आहेत, जेणेकरून लोक घरातच राहून याचा आनंद घेऊ शकतील.

यावेळी उत्सव कसा साजरा करणार आहेस?

मी माझ्या कुटुंबासमवेत उत्सव साजरा करत आहे आणि आसपासचे जे लोक येऊ इच्छित आहेत, त्यांनाही नम्रतेने आमंत्रित करून त्यांच्याबरोबर आनंद साजरा करत आहे. गर्दी टाळून प्रत्येकजण उत्सव साजरा करू शकतो.

मनोरंजन विश्वात बरेच तणाव असतात, तू ते कसे हाताळतेस?

हे खरे आहे की लहान-मोठा तणाव प्रत्येकालाच असतो. माझी सर्वात मोठी चिंता निवारक माझी आई जीवन कला आहे, ती माझी बॅक बोनदेखील आहे. ती माझी गुरु आहे, तिने ५०० चित्रपट केले आहेत. तिचे प्रत्येक गाणे प्रसिद्ध आहे. आम्ही दोघीही तिच्या गाण्यांवर डान्स करून आनंदी होतो. माझे फ्रेंडसही बरेच आहेत, मी त्यांच्याबरोबरदेखील माझ्या गोष्टी शेअर करते.

तू वाचकांना काही संदेश देऊ इच्छितेस का?

स्वत:वर खूप प्रेम करा, तरच आपण इतरांना प्रेम देऊ शकता.

आवडता रंग – पांढऱ्यासह सर्व रंग.

आवडते खाद्य – प्रत्येक देशाच्या डिशेस ट्राय करणे आणि सुशी.

आवडता ड्रेस – कॅज्युअल ड्रेस, साडी.

आवडते पुस्तक – सीक्रेट.

वेळ मिळाल्यास – पुस्तके वाचणे, प्रवास करणे आणि अॅडव्हेंचर करणे.

आवडते पर्यटन स्थळ – सुंदर, हिरव्यागार दऱ्या-खोऱ्यांना भेट देणे.

परफ्यूम – सीएच (कॅरोलिना हेरेरा).

जीवनाचे आदर्श – आनंदी रहा आणि राहू द्या.

एखादे सामाजिक कार्य – ज्येष्ठांची काळजी घेणे आणि त्यांच्यासाठी काही ठोस कार्य.

नेपोटिज्म आणि गटबाजी प्रत्येक क्षेत्रात आहे – सुरभी हांडे

– सोमा घोष

अवघ्या १६ वर्षे वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मराठी अत्रिनेत्री सुरभी हांडे महाराष्ट्रातील जळगावची आहे. उद्यमशील वातावरणात जन्मलेल्या सुरभीने कलेचे सानिध्य अनुभवले आहे. तिची आई लेखिका आणि वडील संगीतकार आहेत. तिच्या यशाचे श्रेय ती आपल्या आईबाबांना देते. तिची बहुचर्चित मराठी मालिका ‘जय मल्हार’ आहे, ज्यामुळे ती घराघरात ओळखली जाऊ लागली. तिला नेहमीच नवीन व आव्हानात्मक कथांमध्ये काम करणे आवडते. हेच कारण आहे की तिने एक मराठी वेब मालिका ‘भुताटलेला’ केली आहे, जी आधीच प्रदर्शित झाली आहे व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. स्वभावाने नम्र अशा सुरभीशी बातचित झाली. सादर आहे त्यातील काही भाग :

ही कोणत्या प्रकारची वेब सिरीज आहे?

ही एक हॉरर व कॉमेडी वेब सिरीज आहे. मला कधीच वाटले नव्हते की मी अशाप्रकारे दोन्ही जॉनरना कव्हर करू शकेन. स्टोरी ऐकल्यावर छान वाटले, कारण याआधी ३ वर्ष मी मायथॉलॉजिकल मालिका करत होते. त्यात माझा लूक संपूर्ण वेगळा होता. या सिरिजमध्ये माझी भूमिका अतिशय वेगळी आणि छान आहे. मी काम केले आणि सर्वांना आवडले. याशिवाय वेब सिरीजमधील शूटिंगची प्रक्रियासुद्धा अतिशय वेगळी असते, ज्याचा मला अनुभव मिळाला.

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

लहानपणापासून मी रंगमंचावर काम केले आहे. माझी आई अंजली हांडे खूप उत्तम लेखिका आहे. माझे वडिल संजय हांडे ऑल इंडिया रेडिओमध्ये संगीतकार आहेत. घरात लहानपणापासूनच कलात्मक वातावरण अनुभवले. मंचावर जाऊन सादरीकरण करायला ते मला सांगायचे, यामुळेच माझ्यात त्यादिशेने रूची वाढली आणि या क्षेत्रात येणं योग्य वाटलं. मी जळगावला होते, तिथून नागपूर मग पुणे आणि नंतर मी मुंबईला आले.

मुंबईत कशी आलीस?

१०वीत शिकत असताना माझ्या बाबांचे मित्र मराठी दिग्दर्शक संजय सूरकर यांनी मला त्यांच्या चित्रपटात काम करायची ऑफर दिली. तेव्हा दोन-तीन दिवसांच्या शूटिंगसाठी मी मुंबईत आले होते. तेव्हा प्रथमच मी मुंबईत आले आणि तेव्हा मला कॅमेरासमोरच्या शूटिंग करण्याच्या वातावरणाबाबत कळले.

कुटुंबाचे सहकार्य कितपत मिळाले?

माझ्या परिवाराचा कलेशी संबंध असल्याने त्यांना कोणतीही तक्रार नव्हती. त्यांनीच मला या क्षेत्रात काम करायची प्रेरणा दिली.

पहिला ब्रेक कसा मिळाला?

शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ नावाच्या एका नाटकात मी काम केले होते, ज्याचे देशात अनेक ठिकाणी प्रयोग झाले. त्यानंतर मला एक शो ‘आंबट गोड’च्या ऑडिशनकरीता मुंबईत यावे लागले. या शोसाठी माझी निवड झाली. यात माझी भूमिका नकारात्मक होती, पण सगळयांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. मी अभिनयाची प्रक्रिया नेहमी एन्जॉय करते आणि कोणत्याही भूमिकेसाठी अतिशय मेहनत घेते, जेणेकरून भूमिका वास्तव वाटावी. संघर्ष फार नव्हता, कारण मी कामासह मुंबईत आले आणि स्थिरस्थावर झाले.

कोणत्या भूमिकेने तुझे आयुष्य बदलले?

‘जय मल्हार’ ही माझी लोकप्रिय भूमिका होती, ज्याद्वारे मी घराघरात पोहोचली. जेव्हा प्रथम मी ही भूमिका वाचली, तेव्हा वाटले नव्हते की या पात्राला लोक एवढे प्रेम देतील. पण यानंतरच मला ओळखू लागले.

मराठी इंडस्ट्रीसुद्धा लॉकडाऊनमुळे प्रभावित झाली आहे. ती परत रुळावर येण्यासाठी कोणती रणनीती अवलंबण्याची गरज आहे?

हे बरोबर आहे की प्रत्येकच क्षेत्राला लॉकडाऊनने प्रभावित केले आहे. सगळयांना जास्त काम करावे लागेल, पण काम सुरु होण्याआधी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आखून दिलेल्या गाईडलाईन्स पाळण्याची गरज आहे, जेणेकरून कोणतीही व्यक्ति संक्रमित होणार नाही. आता कमी माणसं घेऊन प्रोजेक्ट पूर्ण करावे लागतील, पण काम करणाऱ्यांवर सगळयाचा भार पडणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागेल.

नेपोटिज्म आणि गटबाजी मराठी इंडस्ट्रीतसुद्धा आहे का? तुला याचा सामना करावा लागला का?

हे तर प्रत्येकच इंडस्ट्रीत आहे, कारण कुटुंबातील लोकांना प्राथमिकता दिली जाते. हिंदी सिनेउद्योगातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात हे आहे. हिंदी सिनेमा जास्त दिसतो याचे कारण ग्लॅमर आहे, जे मिडिया जास्त कव्हर करते आणि लोकांना हे बघणे व ऐकणे आवडते. मराठी इंडस्ट्रीत फार नेपोटिज्म आणि गटबाजी नाही आणि मला याचा सामना करावा लागला नाही. मला नकारसुद्धा जास्त मिळाले नाही, कारण मला जे काम मिळाले ते करण्यात मला खूप आनंद मिळाला.

 

 लॉकडाऊनमध्ये वेळ कसा घालवला

लॉकडाऊनचे दोन महिने मी जळगावमध्ये घालवले, कारण माझे सासर व माहेर दोन्ही जळगावमध्येच आहे. आता मी मुंबईत आहे. इथे मी पदार्थ बाहेरून आणून खायचे. आता आम्ही सगळे मिळून घरी बनवतो. याशिवाय पेंटिंग करणे, चित्रपट बघणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. इथेसुद्धा आम्ही दोघे पतिपत्नी तशीच दिनचर्या पाळतो आहे. माझ्या कामात माझे पती दुर्गेश कुलकर्णी नेहमी सहकार्य करतात. त्याचे सहकार्य मला लहानपणापासून मिळाले आहे, कारण ते आमच्या फॅमिली फ्रेंडपैकी आहेत.

कामासोबत घराकडे कसे लक्ष देतेस?

माझ्या पतिचे काम वेगळे आहे, पण ते माझ्या कामाचे महत्व समजून घेतात. घराच्या दरवाज्याच्या आत आलोत की आमचे कौटुंबिक जीवन सुरु होते. तेव्हा कोणत्याही ऑफिसच्या गप्पा होत नाहीत आणि सगळे काम आटोपते.

फॅशन कितपत आवडते? किती फूडी आहेस?

आवड आहे, पण माझ्यासाठी फॅशन आरामदायक असणे आवश्यक आहे. मी फूडी आह, पण जंक फूड नाही खाऊ शकत. भाजी पोळी कोणत्याही अन्नासोबत मला हवे असते.

गृहशोभिकेद्वारे काय संदेश देऊ इच्छितेस?

सध्या लॉकडाऊनमुळे बराच आराम झाला आहे. लोकांनी आता बाहेर पडणे सुरु केले आहे. पण कोरोना अजून गेला नाही आहे. केसेस वाढत आहेत. म्हणून गरज असेल तरच घराबाहेर पडा. स्वत:चा नाही तर कुटुंबाचा विचार करा. वयस्कर व्यक्ति घरात असेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी घरात रहा. स्वत:च आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें