‘‘महिलांनी नेहमीच विचारांवर ठाम राहावे’’ – अश्विनी कासार

* सोमा घोष द्य

सावळया रंगाची, रेखीव आणि कमनीय बांध्याची ३१ वर्षीय मराठी अभिनेत्री अश्विनी कासार मुंबईची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. वकिलीची इंटर्नशिप करत असताना तिला अभिनयाची संधी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांचा तिला नेहमीच पाठिंबा मिळाला. अश्विनीने २०१४ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. तिची पहिली मराठी मालिका ‘कमला’ होती, ज्यामध्ये तिने कमलाची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली आणि तिने अनेक पुरस्कारही मिळवले. त्यांनतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. अश्विनी ‘गृहशोभिका’ वाचते आणि यात प्रसिद्ध झालेले लेख तसेच कथा तिला मोठया प्रमाणावर प्रेरित करतात.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासूनच अश्विनी सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय होती, तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती भरतनाट्यम् नृत्यांगनाही आहे. सोनी टीव्ही मराठीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत ती एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जी तिला तिच्या प्रत्यक्ष आयुष्याशी खूपच मिळतीजुळती वाटते. चला, तिच्या या प्रवासाबद्दल तिच्याकडूनच जाणून घेऊया.

या मालिकेत तुझी भूमिका काय आहे? ही मालिका तुझ्या वास्तविक आयुष्याशी किती मिळतीजुळती आहे?

मी अनुजा हवालदारच्या भूमिकेशी शारीरिक बनावटीच्या रूपात खूपच मिळतीजुळती आहे. जेव्हा मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पाहाते तेव्हा त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्टया सुदृढ राहाण्यासोबतच एक ठराविक ध्येय असल्याचेही पाहाते. त्यांचे ध्येय त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते नेहमीच काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या सुदृढ शरीरातून त्यांची चपळता झळकते. मला वाचायला आणि लोकांसाठी काहीतरी करायला आवडते. याशिवाय, मी फिटनेस प्रेमी आहे आणि नेहमीच स्वत:ला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करते. दररोज व्यायामासाठी वेळ काढते, कारण दैनंदिन जीवनात व्यायाम गरजेचा असतो. माझी प्रशिक्षक सिद्धी ढगे नसेल तर मी धावायला किंवा चालायला जाते.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही, मी वकील आहे आणि ६ महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होते. तेव्हा मला वाटले की, मी या क्षेत्रासाठी बनलेले नाही, कारण मी महाविद्यालयात असताना नृत्य आणि नाटक करायचे. मी भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. माझी एकंदरीत आवड अभिनयात होती, माझे करिअर काय असेल हे मला माहीत नव्हते. याबद्दल मी माझ्या आईवडिलांशी बोलले, त्यांनी खूपच पाठिंबा दिला. मी माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर करावे, असा सल्ला दिला. मी पुन्हा पुन्हा ऑडिशनला जाऊनही मला काम मिळत नव्हते आणि तरीही त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून आणि शिक्षणातून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळाली.

तुला कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले?

माझे कुटुंब उच्च शिक्षित आहे, मी १५ सदस्यांसह एकत्र कुटुंबात राहाते. माझे आईवडील तसेच कुटुंबातील इतर मला नेहमीच पाठिंबा देतात. मला कधी, कोणीही रोखले नाही. माझ्या मते कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, कारण यश मिळाले, पण कुटुंब नाराज असेल तर त्या यशाला अर्थ उरत नाही. हे क्षेत्र अतिशय अनिश्चित असल्याने ते माझ्यासाठी थोडे चिंतेत असायचे. माझे वडील डॉ. उल्हास कासार शास्त्रज्ञ होते. आईचे नाव सीमा कासार असून बहीण डॉ. शरयू कासार शास्त्रज्ञ तर भाऊ मानस कासार दंतवैद्य आहे.

तुला पहिला ब्रेक कसा आणि कधी मिळाला?

मी उच्च न्यायालयात एका खटल्यासाठी काम करत होते. त्याचवेळी मला ‘कमला’ या मालिकेसाठी एका प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला. मी मुख्य भूमिकेत होते. ही मालिका विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध नाटकावर आधारित होती. फेसबुकवर माझा फोटो पाहिल्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते, पण तेव्हा मी माझ्या वकिलीच्या कामात व्यस्त होते आणि मला ऑडिशनला जायची इच्छा नव्हती. त्यांनी मला दुसऱ्यांदा  बोलावल्यावर मी गेले आणि माझी निवडही झाली. अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर मला काम मिळाले. या क्षेत्रातील घराणेशाही मला कधीच समजली नाही आणि मी मराठी इंडस्ट्रीत माझ्यासमोर ती कधी पाहिलीही नाही, कारण मी नेहमीच स्वत:साठी स्वत: संघर्ष केला आहे.

तू संघर्ष किती केला?

मी माझ्या कुटुंबासह महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये राहाते आणि तेथूनच मला कामासाठी दूरवरचा प्रवास करावा लागतो. केवळ एक मालिका मिळून फारसा फरक पडणार नव्हता, कारण मला सिद्ध करून दाखवायचे होते की, मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि त्यासाठी मला आणखी कामाची गरज होती. खरंतर कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळया भूमिका साकारण्यासाठीचा संघर्ष मोठा असतो. मी पहिल्या मालिकेत ‘कमला’ या आदिवासी मुलीची भूमिका साकारली. एका सत्य घटनेवर आधारित ही मालिका होती. अशा प्रकारे पहिल्या मालिकेत मी एक अशिक्षित मुलगी दुसऱ्यामध्ये शिक्षण घेतलेली पहिली मुलगी आणि आता आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. पहिली मालिका ‘कमला’मधूनच मला ओळख मिळाली.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे आणि ऑडिशनही द्यायचे आहे. हिंदी चित्रपटांमध्ये अंतर्गत दृश्यांची मागणी असेल तर त्यासाठी माझी काहीच हरकत नाही.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

औचित्य पाहून मी फॅशन करते. याशिवाय मी काहीही छान घालू शकते. मी खवय्यी आहे आणि माझी आई खूप छान स्वयंपाक करते. मी साधे जेवण बनवू शकते.

उन्हाळयात तुझ्या त्वचेची काळजी तू कशी घेतेस?

मी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावते. केसांच्या संरक्षणासाठी स्कार्फ घालते, त्यामुळे उन्हाळयात केसांचे उन्हापासून संरक्षण होते. उन्हाळयात हायड्रेट राहाणे आवश्यक असते, त्यासाठी मी लिंबू पाणी, कोकम सरबत इ. पीत राहाते.

सत्ता हाती आल्यास तू काय बदलू इच्छितेस?

मला सर्वांची विचारसरणी बदलायची आहे. होय, कारण ती कुटुंब, समाज आणि देश बदलू शकते आणि त्यामुळेच देश पुढे जातो.

तुला काही संदेश द्यायचा आहे का?

माझा संदेश असा आहे की, महिलांनी नेहमी त्यांच्या विचारांवर ठाम राहावे. जे काही काम त्यांना स्वत:साठी करायचे असेल ते त्यांनी करावे आणि त्यातूनच पुढे जावे.

आवडता रंग – जांभळा.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

आवडता परफ्युम – वर्सासे.

आवडते पर्यटनस्थळ – जपान, केरळ.

वेळ मिळाल्यास – झोप, खाणे, वाचन.

जीवनातील आदर्श – स्वत:शी प्रामाणिक राहाणे.

सामाजिक कार्य – अनाथ मुलींसाठी काहीतरी करायचंय.

स्वप्नातील राजकुमार – वाचन, फिरण्याची आवड आणि महिलांचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – काम करा आणि समाधानी राहा.

निखिल भांबरीचा फिटनेस फंडा !

* सोमा घोष

निखिल भांबरी हा भारतीय मनोरंजन उद्योगातील एक अनोखा अभिनेता आहे. नामवंत कलाकारांसोबत त्यांनी अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे आणि स्वतःचे नाव कमावले आहे. पण एवढ्या व्यस्त वेळापत्रकात तो फिटनेस कसा राखतो? त्याने अलीकडेच स्क्रिप्ट हातात घेतलेला एक फोटो पोस्ट केला आहे आणि यातून तो लवकरच काहीतरी नवीन करणार असल्याच कळतंय. निखिल भांबरी एक हटके वर्कआउट रूटीन करतो तो घरामध्ये किंवा जिममध्ये करता फिटनेस रूटीन फॉलो करतो. त्याला खाण्याची आवड असूनही तो तळलेले पदार्थ जास्त मीठ साखर लोणी किंवा तेल टाळून जागरूक आहार ठेवतो. निखिल त्याच्या फिटनेसबद्दल जागरूक राहून नेहमीच फिटनेस फंडा जपतो.

‘सन मराठी’ घेऊन येत आहे नवीन मालिका कथा ‘सावली होईन सुखाची’

* सोमा घोष

कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा.

‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळीदेखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या माध्यमातून येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे.

प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. ‘सन मराठी’ वाहिनी ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन मालिका घेऊन येत आहे, ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.

ही गोष्ट आहे श्रीमंत कुटुंबाची, कुटुंब आर्थिकदृष्ट्या कितीही परिपूर्ण असलं तरी घरातील सदस्यांना एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, माया काही वाटत नाही. जणू त्या घराने कधी प्रेम हे पाहिलंच नसावं. तसेच त्या श्रीमंत घराण्यातील एक सदस्य जो भूतकाळातील एका घटनेमुळे वाईट सवयींच्या आहारी गेला आहे, त्याच्यामुळे घरात सकारात्मक असं वातावरण नाही. पण त्याच घरात एक मोलकरीण आणि एक अनाथ मुलगी यांचा प्रेमळ स्वभाव देखील वावरतोय. कदाचित त्या दोघींच्या मनमिळावू स्वभावामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकतीच या मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला

मिळाली आणि प्रोमोमध्ये मालिकेचा नायक रोनक शिंदे ज्याला वाईट सवयी लागल्या आहेत आणि घरातील सर्वजण त्याच्या विरोधात आहेत आणि मालिकेची नायिका सीमा कुलकर्णी जी मोलकरणीच्या भूमिकेत दिसली आहे, त्यांच्यातील अबोल भावना पाहायला मिळाल्या. एखाद्यावर ठरवून प्रेम केलं जात नाही, ते आपसूक होतं, असंच काहीसं त्यांचं नातं आहे. त्या दोघांना एकमेकांची सोबत मिळेल का, हे लवकरच कळेल.

नुकताच, ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा, मालिकेचे प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडला. मालिकेला मोठं करणारे हे मायबाप रसिक प्रेक्षकच असतात म्हणून खास त्यांच्यासाठी मालिकेच्या टीमने मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाहिला आणि प्रेक्षकांनी देखील त्याचा आनंद लुटला आणि मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत. मालिकेची झलक पाहिल्यावर प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडला असेल की घरची मोलकरीण, होईल का साता जन्माची सोबतीण? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा नवी मालिका ‘सावली होईन सुखाची’ १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

स्त्रियांबद्दलच्या अनोख्या दृष्टीकोनात भूमिका साकारणारी अभिनेत्री !

* सोमा घोष

मनोरंजन उद्योग वेगवेगळ्या कथांना न्याय देऊन त्या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री म्हणजे रिताभरी ! तिच्या चित्रपटांमधील सशक्त भूमिकासाठी ती नेहमीच चर्चेत असते. स्वतंत्र महिलांच्या सशक्त चित्रणातून स्टिरियोटाइप मोडतात. तिच्या आकर्षक कामगिरीने तिने केवळ प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही तर अनोख्या भूमिका साकारून नेहमीच सगळ्यांना प्रेरित केल.

रिताभरी चक्रवर्ती हिने साकारलेली फुलोरा भादुरी ही कथा सगळ्यांच्या पसंतीस पडली. फुलोराची फॅशन आवड आणि अपवादात्मक डिझाइनिंग कौशल्ये तिच्या स्वप्नांना चालना देतात.

तिने नंदिनी नावाचा तिचा आणखी एक प्रोजेक्ट नुकताच पूर्ण केला. सायंतानी पुतटुंडाच्या पुस्तकातून रुपांतरित केलेल्या “नंदिनी” या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा, आपल्या मुलीला वाचवण्याचा आईचा अविचल दृढनिश्चय दर्शवते. ही मालिका स्त्री भ्रूणहत्येसारख्या पितृसत्ताक नियमांना आव्हान देते, चक्रवर्तीच्या सशक्त स्त्री पात्रांच्या प्रभावशाली चित्रणात भर घालते.

रिताभरी हिने नेहमीच सशक्त स्त्री पात्रांचे प्रभावी चित्रण करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

“ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय

* सोमा घोष

अलीकडे लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमानच्या अंगात उत्साह सळसळललेला दिसतो.

त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात.

याविषयी बोलताना आयुषमान खुराना सांगतो, “ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं.”

तो पुढे सांगतो, “ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतो, भरपूर हशा आणि पोटदुखेपर्यंत मनोरंजन करते. आम्ही वचन देतो की लोकांना एक अद्वितीय अनुभव मिळेल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. हे खूप फायद्याचे आहे. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.”

दिनांक 25 ऑगस्ट रोजी ड्रीम गर्ल 2 चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल आणि नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल!

बिग बॉस OTT 2 च्या ओपनिंग एपिसोडमध्ये दिसणार सनी लिओनी !

* सोमा घोष

बहुचर्चित असलेला शो म्हणजे बिग बॉस ! लवकरच बिग बॉस बिग ओटीटी सीझन 2 येणार असून सगळेच यासाठी उत्सुक आहेत. यात एक हटके ट्विस्ट म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये 2 मध्ये सनी लिओनी दिसणार असल्याचा चर्चा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि आता प्रेक्षकांना नेमका प्रश्न पडला की ती स्पर्धक आहे की सनी फक्त लाँच एपिसोडमध्ये दिसणार ?

या मोठ्या बातमीबद्दल सनी लिओनीच्या जवळच्या एका स्रोताने खुलासा केला आहे “सनी लिओन बिग बॉस ओटीटी सेटवर आहे कारण ती लॉन्च एपिसोडला उपस्थित राहणार आहे. ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून लाँचसाठी सनी खास पाहुणी असणार आहे. ”

सनी लिओनी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशामुळे चर्चेत आहे. तिच्या चार्ली या पात्राला जागतिक प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम उल्लेखनीय आहे. सनी अनेक नवे प्रोजेक्टदेखील करणार असल्याचा चर्चा आहेत.

‘‘कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले’’ – अंजली तुषार नान्नजकर

* सोमा घोष

मराठी अभिनेत्री अंजली तुषार नान्नजकर, महाराष्ट्रातील सोलापूरमधील अक्कलकोट या गावातील रहिवासी आहे. तिने नेहमीच आपल्या कुटुंबासह काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. यात पती तुषार नान्नजकर यांनीही तिला साथ दिली. गाव सोडून मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे तिच्यासाठी सोपे नव्हते, पण तिने धीर धरला आणि प्रयत्न करत राहिली. तिने छोटया भूमिकांपासून सुरुवात केली आणि नंतर तिला मुख्य भूमिका मिळाली. आता अंजली पुढील मराठी चित्रपट आणि अल्बममध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. ती काय म्हणाली, हे तिच्याच शब्दात जाणून घेऊया.

तुझ्याबद्दल काय सांगशील?

मी अनेक अल्बम केले आहेत आणि आता मराठी चित्रपटात काम करत आहे. मी अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. माझे वडील सरकारी नोकरी करतात. आई सरपंच आहे. दोघांनी नेहमीच लोककल्याणाची कामे केली. त्यामुळेच मलाही कुणाला तरी मदत करावी असे सतत वाटायचे. सोबतच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायचे होते. मी रंगभूमीवर काम करण्यासाठी मुंबईत आले, कारण माझ्या कुटुंबातील बरेच लोक मराठी इंडस्ट्रीत काम करतात. त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. मी सोलापूरच्या अक्कलकोट गावची आहे. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमध्येच झाले. त्यानंतर मी मुंबईत फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले आणि येथेच राहिले. रंगभूमीवर काम केले आणि माझे हिंदी सुधारून घेतले. सुरुवातीला मी हिंदीतून अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मिळून प्रोडक्शन हाऊस सुरू केले, ज्यामध्ये मी अनेक अल्बम बनवले आहेत आणि पुढे एक मराठी चित्रपटही करत आहे.

तुला कुटुंबाचा किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला कुटुंबाने मला अभिनय करण्यास नकार दिला. फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वांच्याच मनात भीती असते आणि इथे काम मिळणे सोपे नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, पण माझी मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती त्यांनी पाहिली. याशिवाय माझ्या गावातील एक व्यक्ती अभिनेता आहे. तिला पाहूनच मी अभिनय करू लागले, पण माझ्या आईवडिलांना मी अभिनय करावा असे वाटत नव्हते. मी अॅथलीट किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण मला रंगभूमीवर काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी विरोध केला नाही. टीव्हीवरचे माझे काम पाहून लोक माझ्या आईवडिलांकडे माझी स्तुती करू लागले, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. आईवडिलांनी मला खूप मानसिक सहकार्य केले. कधीच हार मानू नकोस, असा सल्ला ते नेहमी देतात. त्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचू शकले.

तू या क्षेत्रात पुढे कशी आलीस?

फॅशन डिझायनर असल्यामुळे हळूहळू मालिकांमधील कपडे डिझाईन करण्याचे काम मी करू लागले. त्यानंतर मी ‘ट्रूकल्चर’ हा माझा ब्रँड सुरू केला, ज्यामध्ये गरीब आणि अपंग स्त्रियांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकून मी त्यांना रोजगार उपलब्ध करून देते. दूरदर्शनवरील ‘कहीं देर ना हो जाए’ ही माझी पहिली मालिका होती. त्यानंतर मी मराठी चित्रपट आणि हिंदी मालिका केल्या. ‘फुलवा’, ‘माता की चौकी’, ‘अगले जनम मोहे बिटिया ना किजो’ इत्यादी अनेक मालिकांमध्ये मी बहीण आणि पत्नीची भूमिका साकारली आहे.

तुला ओळखीमुळे काम मिळणे सोपे झाले का?

हो, थोडे सोपे झाले, कारण मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. यामुळे माझ्यावरही चांगले काम करण्याचा दबाव असतो आणि ही माझ्या कारकिर्दीसाठी चांगली गोष्ट ठरली.

तुला किती संघर्ष करावा लागला?

सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला, कारण इंडस्ट्रीबद्दल प्रत्येकाचा चुकीचा समज आहे. ही इंडस्ट्री चांगली आहे, हे आईवडिलांना मला समजावून सांगावे लागले. मी खूप ऑडिशन दिले. बरेच लोक म्हणायचे की, मी अभिनय करू शकत नाही. मला तेवढी समज नाही, असे सांगून ते मला ही इंडस्ट्री सोडून जायला सांगायचे किंवा मराठी मुलगी असल्यामुळे तुझे हिंदीचे उच्चार चांगले नाहीत इत्यादी अनेक गोष्टी मला ऐकायला मिळायच्या. काही जण मला माझ्यातील उणिवा सुधारण्याचा सल्ला द्यायचे. गावातील लोकही माझ्या आईवडिलांना सांगत की, त्यांनी मला चुकीच्या ठिकाणी पाठवले. मुलगी आहे, तिला नोकरीला पाठवा, तिचे लग्न करा इत्यादी अनेक सल्ले ऐकत मी इथपर्यंत पोहोचले. ३ वर्षे प्रचंड संघर्ष केला. मुलींसोबत रूम शेअर करायचे, दिवसातून एकदाच खायचे. या सगळया गोष्टी मी माझ्या आईवडिलांना कधीच सांगितल्या नाहीत किंवा मी त्यांच्याकडून पैसेही मागितले नाहीत, कारण यामुळे त्यांना माझी काळजी वाटली असती. अनेकदा मला सोलापूरला परत जावेसे वाटायचे, पण नेमके तेव्हाच कामही मिळत होते.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

पहिला ब्रेक मिळताच मला खूप आनंद झाला, कारण मला काम मिळाले होते. कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले होते. मला अभिनेत्री नव्हे तर एक उत्तम कलाकार बनायचे होते. कॅमेऱ्यासमोर गेल्यावर मी खूप घाबरले, कारण माझ्यासमोर प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्र्रन होत्या. पहिली मालिका आणि माझे ते पहिलेच दृश्य होते. त्यांना समजले होते की, मी घाबरले आहे. त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावले आणि कॅमेऱ्याला मित्र मानण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी मला अभिनय नव्हे तर सहजपणे कसे बोलायचे ते सांगितले. यामुळे अभिनय करणे माझ्यासाठी सोपे झाले. लॉकडाऊनच्या काळात लोक काम करायला घाबरत होते, पण त्या काळात मला एका मराठी मालिकेमध्ये मोठे काम करण्याची संधी मिळाली आणि मी घराघरात नावारूपास आले. मी नेहमी अशीच भूमिका निवडली जी छोटी असूनही परिणामकारक ठरेल. नवीन कलाकारांमधील गुण ओळखूनच मी प्रोडक्शन हाऊस सुरू केले, जेणेकरून मी त्यांना संधी देऊ शकेन.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी मालिकांपेक्षा वेब सीरिज बघायला आवडतात आणि त्यात काम करण्याची माझी इच्छा आहे, पण मी अंतर्गत दृश्य करायला तयार नाही. आजकाल कौटुंबिक मालिकाही खूप आवडीने बघितल्या जातात आणि मला त्यात काम करायचे आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत काम करण्याची तसेच रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करण्याची इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी इंडस्ट्री आणि ट्रेंड पाहूनच फॅशन करते. मला विशेष करून जुनी अर्थात रेट्रो फॅशन आवडते. मी शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करते, पण घरी बनवलेलेच पदार्थ खायला मला जास्त आवडतात. प्रवासादरम्यान मी त्या ठिकाणचे पदार्थ नक्की खाऊन बघते.

महाशक्ती मिळाल्यास तुला देशात कोणते बदल घडवून आणायचे आहेत?

स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपले मत सांगण्याचे आणि ते सर्वांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, ही गोष्ट पुढेही कायम ठेवू इच्छिते.

आवडता रंग – लाल.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – द सिक्रेट.

आवडते परफ्यूम – डिओर.

आवडते पर्यटन स्थळ – दुबई, माझे गाव अक्कलकोट.

वेळ मिळाल्यास – गरीब आणि अपंग स्त्रियांना रोजगार मिळवून देणे.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – इतरांना आनंद देणे.

‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून कुस्तीपटूंची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच निरनिराळे विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘तुजं माजं सपान’ ही दैनंदिन मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दोघेही आपल्याला कुस्ती करताना दिसताहेत.

प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल. मालिकेत दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत आणि एखाद्या मालिकेत कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कुस्ती या दोघांना कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांना कशा प्रकारे पाहायला मिळेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे. मालिका १९ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेची मूळ कहाणी ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे. आजवर तिने कुस्तीच्या विश्वात चांगले नाव कमविले आहे. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मालिकेतील व्यक्तिरेखेबरोबरच कुस्ती जोपासणारी प्राजक्ता पाहायला मिळणार आहे. वीरूच्या भूमिकेत आपल्याला संकेत चिकटगावकर हा गुणी अभिनेता पाहायला मिळणार आहे. संकेत हा मूळच्या औरंगाबादजवळील वैजापूर इथला आहे. हे दोन्ही नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड या निर्मिती संस्थेने ह्या मालिकेची निर्मिती केली जात आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिली दैनंदिन मालिका असणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेचं चित्रीकरण नाशिक येथे करण्यात येते आहे.

सोनी मराठी वाहिनी नेहमी आशयघन विषय घेऊन येते ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे  होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळेल. वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशा प्रकारे होते आहे, हे आपल्याला १९ जूनपासून पाहता येणार आहे, आपल्या आवडत्या सोनी मराठी वाहिनीवर. नवी मालिका – ‘तुजं माजं सपान’. १९ जूनपासून, सोम. ते शनि., संध्या. ७ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.

 

परेश रावल यांची पहिल्यांदा एका मराठी कार्यक्रमात हजेरी

* सोमा घोष

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ परेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेत. ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. मागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती. या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे. नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेल. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल

‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका.

‘कोण होणार करोडपती’ विशेष, १० जून, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

“स्कूप” मधून अभिनेत्री करिश्मा तन्नाने घातली प्रेक्षकांना भुरळ ! 

* प्रतिनिधी

सोशल मीडियावर सध्या एका वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे ” स्कूप ” ! या हिट वेब सिरीजने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. उत्कंठावर्धक अभिनय असलेल्या करिश्माची ही सीरिज चर्चेचा विषय ठरते आहे. करिश्मा तन्नाने पत्रकार म्हणून साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घरात करून गेली. प्रतिभावान दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेब सीरिज उत्तम प्रकारे दिग्दर्शित केली आहे. ही मालिका पत्रकारितेच्या गुंतागुंतीचा शोध घेते असताना यातली सगळी पात्र कथा खिळवून ठेवतात. करिश्माने साकारलेलं पात्र जागृती पाठक हा एक चर्चचा विषय ठरला आहे. ” स्कूप” पत्रकारितेच्या प्रवासावर अनोखा प्रकाश टाकतो.

एका प्रतिष्ठित पुरुष पत्रकाराच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांनी तिला गुन्हेगार ठरवले आणि इथून गोष्ट सुरू होते. ” स्कूप” मध्ये असलेली महिला पत्रकार तिच्या वैयक्तिक आयुष्यातले चढ उतार आणि पत्रकारिता मधला आव्हानात्मक प्रवास अश्या अनेक गोष्टी यातून बघायला मिळतात.

“स्कूप” मध्ये करिश्माच्या तन्ना हिच्या आकर्षक कामगिरीच जगभरात कौतुक झालं. उत्कृष्ट कथा असलेली स्कूप सध्या सगळ्यांची मन जिंकत आहे.

“स्कूप” नंतर करिश्मा तन्ना मनोरंजन इंडस्ट्रीत आता नवीन काय करणार आहे याचा चर्चांना उधाण आलं आहे. अलीकडेच ती धर्मा प्रॉडक्शनमध्ये दिसल्याने आता करिश्मा नक्की काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें