‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेचं शीर्षकगीत देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात!

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनीशीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’ १२ जुलैपासून,  सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

होणार मनोरंजनाची बरसात, ‘अजूनही बरसात आहे.’

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी ती दोघं एकत्र काम करणार आहेत.

सध्याच्या वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका  आणली आहे.  प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद केले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’! १२ जुलैपासून सोम.-शनि. रात्री ८ वा.
सोनी मराठी वाहिनीवर.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टिमचे कौतुक

* सोमा घोष

‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्यावेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे आज येथे कौतुक केले.

अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, नॉन फिक्शन हेड अमित फाळके, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते. यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माझ्यासाठी रोज आनंदी राहणे गरजेचे आहे – रूचा इनामदार

* सोमा घोष

मॉडेलिंग आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री रुचा इनामदार हिने मराठी कमर्शियल चित्रपट ‘भिकारी’मधून मराठी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, ज्यात तिचा को-स्टार स्वप्नील जोशी होता. याशिवाय तिने पंजाबी आणि कित्येक वेब सिरीजमध्येही काम केले आहे. पंजाबी लघुचित्रपट ‘मोह दिया तंधा’ यासाठी तिला २०१७ मध्ये ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल’मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरास्कारसुद्धा मिळाला. स्वभावाने शांत आणि स्पष्टवक्त्या रुचाला सगळया प्रकारच्या भूमिका करणे आवडते. भाषा कोणतीही असो, पण ती भूमिकेला जास्त महत्व देते. हेच कारण आहे की तिचा मराठी चित्रपट ‘वेडींगचा सिनेमा’ रिलीज झाला आहे, ज्यात तिच्या भूमिकेला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. रुचा प्रत्येक नव्या चित्रपटाला एक आव्हान समजते आणि या प्रक्रियेला एन्जॉय करते. तिच्याशी झालेल्या बातचितातील काही भाग अशाप्रकारे आहे :

चित्रपटात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? कुटुंबाचे सहकार्य कसे होते?

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. मी ३ वर्षांची असताना अभिनय करायला सुरूवात केली. स्टेज परफॉर्मन्सची माझ्यात आवड उत्पन्न झाली. मी गाणे, डान्स आणि पेंटिंग सगळे शिकत मोठी झाले आहे. माझा अकॅडमिक परफॉर्मन्ससुद्धा खूप चांगला होता. घरच्यांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावे आणि मी तसेच केले. पण त्यांना माहीत होते की मी यात खुश नाहीए. मग एक दिवस आईनेच मला आपल्या आवडीला पुढे न्यायचा सल्ला दिला आणि मी अभिनय क्षेत्रात आले.

आईचे सहकार्य होते, म्हणून काम करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. माझे कुटुंब आणि माझे मित्र हेच माझ्यासाठी सगळे काही आहेत.

पहिला ब्रेक कसा मिळाला?

इंडस्ट्रीत माझी काही ओळख नव्हती, म्हणून आधी मी एका दिग्दर्शकाला असिस्ट करायचे काम सुरु केले. तिथेच अभिनेता आनंद अभ्यंकर यांनी एका मॉडेल कोऑर्डीनेटरचा नंबर दिला आणि फोटो काढून ऑडिशन द्यायला सांगितले. मी तेच केले आणि कित्येक ऑडिशन दिल्यानंतर मला दिग्दर्शक सुजित सरकारसोबत एक जाहिरात करायची संधी मिळाली. यानंतर तर जाहिरातीची रांगच लागली. मी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, जॉन अब्राहम वगैरे कित्येक मोठया अभिनेत्यांसोबत जाहिराती केल्या आहेत. यामुळे माझी ओळख निर्माण झाली आणि मला पहिला हिंदी चित्रपट ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ मिळाला, ज्यात मी एका बांगलादेशी मुलीची भूमिका निभावली होती. समीक्षकांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. यानंतर आणखी एक हिंदी चित्रपट ‘अंडर द सेम’मध्ये काम करायची संधी मिळाली. यात मी एका राजस्थानी मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसुद्धा गेला होता. यामुळे लोक मला ओळखू लागले आणि गणेश आचार्य यांनी मला मराठी चित्रपट ‘भिकारी’ मध्ये लीड रोल दिला.

संघर्ष किती होता?

संघर्ष फार नव्हता, कारण चित्रपटात काम करणे ही माझी मानसिकता होती. जगण्याची पद्धत माझ्यासाठी वेगळी आहे. रोज काही चांगले व्हावे हे गरजेचे नाही. मी एक जर्नी ठरवली आहे. ज्याद्वारे मी वाढले आहे. सध्या मी कथ्थक शिकत आहे. कॉलेजमध्ये मी एक ग्रेसफुल डान्सर होते. मी मराठी चित्रपट ‘वेडिंगचा सिनेमा’मध्ये गोंधळ स्टाईलमध्ये डान्स केला आहे, जो करणे खूप कठीण होते. मी सेटवर हा डान्स शिकले. आनंदाची गोष्ट ही आहे की प्रेक्षकांना हा डान्स खूप आवडला. माझ्यासाठी संघर्ष काहीच नाहीए, कारण प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी संघर्ष असतोच.

मराठी आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीच्या काम करण्याच्या पद्धतीत काय फरक वाटतो?

दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळया आहेत, कारण दोघांच्या प्रोडक्शन व्हॅल्यूजही वेगळया असतात. भावनात्मक रूपात पाहिले तर दोन्ही सारखेच आहेत. याशिवाय मराठीत कुटूंबासारखे वातावरण असते, ज्यात तुम्ही अगदी आरामात काम करू शकता. मला हिंदीतही काही त्रास झाला नाही, कारण मला सगळे चांगले लोक भेटले, जे माझ्याश चांगले वागले आणि अभिनय करणे खूप सोपे गेले.

एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का?

कलाकाराच्या रूपात मी ज्या भूमिका जगले नाही, त्या करण्याची इच्छा आहे, पण जर चित्रपट निर्माता ऋषिकेश मुखर्जीच्या कथेसारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तर मजा येईल. त्यांच्या कथा आजही प्रत्येक घरात असतात. त्यांच्या चित्रपटातील भूमिका, प्रत्येक व्यक्तिच्या हृदयाशी जोडलेल्या असतात.

जीवनात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना दूर कशी करतेस?

मी खूप सकारात्मक आहे आणि नकारात्मक गोष्टीही सकारात्मकतेने घेते. कित्येकदा जेव्हा ऑडिशनमध्ये मला नकाराचा सामना करावा लागायचा, तेव्हा अतिशय वाईट वाटायचे, पण नंतर मी विचार करायचे की यातून मला काय शिकायला मिळाले आणि यापेक्षा अजून चांगले करण्यासाठी काय करायला हवे? माझ्यासाठी रोज आनंदी राहणे खूप गरजेचे आहे.

तुम्हाला कधी स्त्री असण्याचे दु:ख झालेले आहे का?

मी मुंबईत वाढले आहे, म्हणून माझ्या घरात स्त्री आणि पुरुष यात काही फरक नाही. मी माझ्या इच्छेनुसार ग्रो झाले. कोणीही मला टोकले नाही. मला प्रवास करणे खूप आवडते आणि मी खूप भटकंती करते.

वेळ मिळाला तर काय करायला आवडते?

अभिनयाव्यतिरिक्त माझे कितीतरी छंद आहेत, म्हणजे लिहिणे, चित्रपट दिग्दर्शित करणे वगैरे जे मी कामाच्या अधेमधे करत असते.

आवडता पोशाख –    साडी

डिझायनर –     विक्रम फडणीस

आवडता रंग – ब्ल्यू, ब्लॅक, व्हाईट

आदर्श    – माझी आजी

जीवनातील सफलता – प्रामाणिकपणा आणि मेहनत

आवडते पुस्तक – लव्ह अँड बेली

आवडते परफ्युम – बर्साची, ह्युगोबॉस

आवडते पर्यटन स्थळ – भारतात वाराणसी, केरळ आणि परदेशात क्रबि.

 ‘कोण होणार करोडपती’

*सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ पाहताना घरबसल्या लखपती होण्याची सधी- प्ले अलॉंगवर ‘कोण होणार करोडपती’ खेळा, १२ जुलैपासून…

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम  नक्कीच जिंकली असती.

आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या  प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. १२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम  सोम.शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

हा कार्यक्रम पाहताना  प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. ‘कोण होणार करोडपती’

पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू  शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते  म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक  या खेळात निवांत सहभागी  होऊन, लखपती होऊ शकतात.

या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ’ आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ  शकता!

पाहा, ‘कोण होणार करोडपती’,

सोम.-शनि., १२ जुलैपासून  रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले

*सोमा घोष

तनुज गर्ग आणि सोनी पिक्चर्ससह लूप लपेटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काल मुंबई मध्ये फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले आणि हा त्यांच्या कारकीर्दीमधील 200 वा चित्रपट आहे ज्याच्या पब्लिसिटी कँपैनचा शूट त्यांनी केलं. विशेष बाब म्हणजे ह्या चित्रपटाचे ते प्रोडूसरही आहेत आणि आपल्याच चित्रपटाच्या पोस्टर शूटने त्यांनी 2 शतक पूर्ण केले.

फॅशनच्या दुनियेत नामांकित असूनही चित्रपटाचे पोस्टर शूटिंग करणे हा त्याचा दुसरा छंद आहे.

अतुल कसबेकर म्हणतात, “कॅमेरा हे माझं पहिलं प्रेम आहे आणि चित्रपटाच्या निर्माता या नात्याने मला ह्या चित्रपटाच्या पब्लिसिटी कँपैनमध्येदेखील तो विजन शेप देण्याची परवानगी मिळाली. मी 3 दशकांहून अधिक काळ चित्रपटांच्या मोहिमेचे शूटिंग करत आहे आणि हा चित्रपट खरोखरच विशेष आहे.

२०२२ मधील ‘लूप लपेटा’ हा बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. टीझरच्या घोषणेच्या वेळी बरीच चर्चा रंगली होती आणि आता पोस्टर पाहण्याची उत्सुकता आहे ज्याचे रविवारी मुंबई मध्ये एका फिल्म स्टुडिओमध्ये शूट झाले.

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट आणि आयुष माहेश्वरी निर्मित ‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

शीतल-अभिजीतचं लव्ह साँग ‘लंडनचा राजा…’

*सोमा घोष

अलीकडच्या काळात सिंगल व्हिडीओ साँग्ज रसिकांना मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहेत. नवी कोरी गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर सहजपणे रुळतही आहेत. असंच एक नवं कोरं लव्ह साँग रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी सज्ज झालं आहे. प्राजक्ता फिल्म प्रोडक्शनची आणि पिकल म्यूजिक ची निर्मिती असलेलं ‘लंडनचा राजा’ हे प्रेमगीत बऱ्याच कारणांनी आपलं वेगळेपण जपणारं आहे. सध्या लाइमलाईटमध्ये असलेली शीतल अहिरराव आणि अभिजीत श्वेतचंद्र या कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

रेखा सुरेंद्र जगताप, नितीन माने आणि संजय शिंदे यांची निर्मिती आणि पिकल म्यूजिक प्रस्तुत असलेल्या ‘लंडनचा राजा.. या गाण्याच्या निमित्तानं रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शीतल आणि अभिजीत या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. नैतिक खरस आणि प्रफुल्ल कांबळे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. नैतिक आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आलं आहे. कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, अलिबागमधील निसर्गरम्य परिसरात हे गाणं शूट करण्यात आलं आहे. या गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.
एका राजा आणि राणीची गोष्ट यात दडली आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून ती हळूहळू उलगडत जाते आणि या गीतासोबत ऐकणाराही समरसून जातो हा ‘लंडनचा राजा.. या गीताचा प्लस पॅाइंट आहे. केवळ एक गाणं करण्याच्या भावनेतून नव्हे, तर गाण्याच्या माध्यमातूनही मनात उद्भवणाऱ्या काही तरल भावना रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे गाणं बनवण्यात आल्याचं दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांचं म्हणणं आहे.

‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘एचटूओ’ या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शीतल अहिररावची मराठी प्रेक्षकांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. शीतलनं आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर मराठी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिजीतनं यापूर्वी ‘व्वा पैलवान’, ‘तालीम’, ‘संजना’ या चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं असून, सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आपापल्या परीनं स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शीतल-अभिजीत यांनी ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’ या गाण्यातही कमाल केली आहे. या रोमँटिक गाण्यात दोघांनी आपल्या परीनं एक वेगळाच रंग भरला आहे. त्यामुळं रसिकांनाही हे गाणं पहायला आणि ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये ही या गाण्याची आणखी एक जमेची बाजू आहे. या निमित्तानं रसिकांना अलिबागमधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी दिली आहे.

पहिल्या पावसात मी भिजतेच भिजते – गौरी  नलावडे

* सोमा घोषलहानपणापासून अभिनयाची आवड असलेली मराठी अभिनेत्री गौरी नलावडे मुंबईची आहे. तिला नेहमीच वेगळया आणि चांगल्या कथांवर भूमिका साकारायला आवडते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली आणि एकामागून एक चित्रपट करत आहे. तिची पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’मधील तिच्या कामाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि तिच्या कारकीर्दीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. गौरीच्या या प्रवासात तिची आई अरुणा नलावडे यांनी तिला मोलाची मदत केली. कारण, लहान वयातच तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. तिच्या मुख्याध्यापक आईने तिचे पालनपोषण केले. तिचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नम्रपणे वागणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गौरीशी तिच्या प्रवासाबाबत गप्पा मारता आल्या. याच गप्पांमधील हा काही खास भाग :

सध्या तू काय करत आहेस? कोविडदरम्यान काय काय केलेस?

जे चित्रपट बाकी होते ते पूर्ण केले आणि जे पूर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. ३० एप्रिलला मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. सर्व ठीक झाल्यावर लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. एक चित्रपट ‘द डिसाईपल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्यांचे एडिटिंग सुरू आहे. कोविड महामारीमुळे खूप कमी चित्रपटांची निर्मिती होत आहे. जाहिराती आणि शूटिंगमध्ये उरलेली कामे केली जात आहेत. सध्या चित्रपटांची शूटिंग बंद आहे. या काळात घरात राहून पुस्तके वाचणे, घरातल्यांसोबत वेळ घालवणे, जेवण बनवणे, वर्कआऊट, झोप पूर्ण करुन घेणे इत्यादी कामे करत आहे. कोविडदरम्यान मी एक शॉर्ट फिल्म शूट केली होती, ज्यात माझ्यासोबत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी काम केले आहे. कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन खबरदारी घेऊनच आम्ही शूटिंग पूर्ण केले.

अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

जेव्ही मी टीव्ही सुरू करायचे तेव्हा माधुरी दीक्षित, श्रीदेवी अशा सर्व अभिनेत्रींचा डान्स बघत असे. मला हे माध्यम खूपच प्रभावी वाटायचे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या सर्व भावना व्यक्त करू शकतो. मला तासन्तास टीव्हीसमोर बसून रहायला आवडत असे. शाळेतही अभ्यासाव्यतिरिक्तच्या इतर सर्व कार्यक्रमात मी सक्रिय सहभागी होत असे. मला कलेची आवड आहे, हे घरच्यांना माहीत होते. अभिनयाची इच्छा मी आईकडे बोलून दाखवली, कारण मला नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करायचा होता. आईने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला, कारण या क्षेत्रात काम मिळेलच अशी खात्री नसते. सोबतच मला कोणीही गॉडफादर नाही, म्हणूनच मला माझ्या मेहनतीवर यश मिळवावे लागेल.

तुला कुटुंबाचे कितपत सहकार्य मिळाले?

कुटुंबाने नेहमीच सहकार्य केले. आईने माझ्या कामाचे भरभरुन कौतुक केले. फार्मसीची पदवी घेतल्यानंतर मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच मला पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मिळाली आणि वैदेहीच्या रुपात मी घराघरात लोकप्रिय झाले. माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी चित्रपटात काम करू लागले. या मालिकेने मला ओळख मिळवून दिली.

तू तुझ्या प्रवासाकडे कशी बघतेस? हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का?

माझ्या प्रवासाबाबत मी खूपच आनंदी आहे, पण कलाकार कधीच आपल्या कामात समाधानी नसतो. त्याची इच्छा वाढतच जाते. चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. जिथे मला नजरेसमोर ठेवून कथानक लिहिलेले असेल. यामुळेच मला योग्य काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, पण कथानक चांगले असायला हवे, जे मला समोर ठेवून लिहिलेले असेल. हिंदी आणि मराठी चित्रपटातील फरक हा केवळ भाषेचा असतो.

तुला कधी नेपोटिमचा सामना करावा लागला आहे का?

चित्रपट निवडताना मला एखाद्या तज्ज्ञाची कमतरता सतत भासते, ज्याचा सल्ला घेऊन मी योग्य निर्णय घेऊ शकेन. मला इंडस्ट्रीत खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. नेपोटिझमचा सामना कधीच करावा लागला नाही.

तू नकाराचा सामना कशी करतेस?

सुरुवातीला मला नकार मिळायचा तेव्हा स्वत:वरच संशय यायचा. खूपच वाईट वाटायचे. काळानुरुप लक्षात आले की, काही भूमिकांसाठी विशिष्ट चेहऱ्यांची गरज असते. निवडही सर्वांच्या मतानुसारच होते, कारण हा एक व्यवसाय आहे, ज्यात खूप पैसे लावले जातात. खरंतर माणूस नकारातून खूप काही शिकतो. म्हणूनच प्रत्येक नकारानंतर मी माझ्यातील कमतरतेवर मात करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता मला नकाराची भीती वाटत नाही.

तूला आईच्या हातचे काय खायला आवडते?

माझी आई पुरणपोळी खूपच छान बनवते. आईच्या हातच्या पुरणपोळीची चव खूपच वेगळी असते. मी चिकन चांगले बनवू शकते.

तू पावसाळयात स्वत:ची काळजी कशी घेतेस?

मला पावसाळा खूपच आवडतो. पहिल्या पावसात मी आवर्जून भिजते. पावसात गरम पाणी पिणे, वाफ घेणे, लवंगाचे पाणी पिणे, स्वत:ला स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष देते. जेवणात तूपाचा वापर अवश्य करते. पावसाचे दिवस आहेत, हे लक्षात ठेवूनच प्रत्येक काम करायला हवे. मान्सूनमध्ये मी जास्त नॉनवेज खात नाही. अशा वातावरणात शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवणे फारच अवघड असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे, चेहऱ्याला मॉईश्चराईज करणे गरजेचे असते. मला तूप खूप आवडते. जेवणात सकाळ, संध्याकाळ मी प्रत्येकी एक चमचा तूप घेते. तूप एखाद्या पदार्थात टाकून खाल्ल्यास वजन वाढत नाही.

एखादा मेसेज, जो तू देऊ इच्छितेस?

प्रत्येक दिवस सारखा नसतो. जीवनात कोणतीच गोष्ट कायम टिकून राहत नाही. म्हणूनच वर्तमानकाळात जे आनंदाचे क्षण मिळतात ते कुटुंबासोबत साजरे करा. परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि याला सर्वांनाच सामोरे जावे लागते. सध्या योग्य प्रकारे श्वास घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्राणवायू मिळू न शकल्याने लोक मरत आहेत आणि ही खूपच  दु:खद गोष्ट आहे.

आवडता रंग – गुलाबी.

आवडता पेहराव – जीन्स, टी शर्ट.

आवडते पुस्तक – द फोर्टी रुल्स ऑफ लव, लेखक एलिक शफाक.

वेळ मिळाल्यास – चित्रपट पाहणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, चेहऱ्यासाठी वेगवेगळया प्रकारचे मास्क बनवणे, डायरी लिहिणे.

आवडता परफ्यूम – अरमानी.

आवडते पर्यटनस्थळ – देशात हिमाचल प्रदेश, परदेशात अमेरिका.

जीवनातील आदर्श – करुणा, माणुसकी.

सामाजिक कार्य – गरजवंतांना मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – जो माझ्या मनासारखा असेल.

स्वप्न – कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये काम करणे.

हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करते – ऋता दुर्गुळे

* नमिता धुरी

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आणि छोट्या पडद्यावर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सांगतेय तिच्या कलाविश्वातील आयुष्याबद्दल.

अभिनयाची सुरुवात कशी झाली?

माझं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालेलं असलं तरीही मी कधी एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. कारण मी अकरावी-बारावी सायन्सला होते. त्यानंतर मी मास मिडिया शिकत होते. त्यामुळे आम्हाला इंटर्नशिप्स कराव्या लागतात. मी ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत होते. तिथे मला रसिका देवधर भेटल्या. त्या ‘दुर्वा’ मालिकेच्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली आणि मला ‘दुर्वा’ मालिकेत दुर्वाची मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून माझं या क्षेत्रात पदार्पण झालं.

सुरुवातीला एक प्यादं म्हणून वापरली जाणारी दुर्वा शेवटी स्वत:च राजकारणात उतरते. तुला काय वाटतं महिला जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा खरंच काही बदल घडतो?

खरंतर या विषयावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण मालिकेतल्या गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी यांमध्ये खूप फरक असतो. पण तरीही मला असं वाटतं की बदल हा कोणीही घडवू शकतो. त्यासाठी तुम्ही महिलाच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात राहिलं पाहिजे.

सध्या सुरु असलेल्या फुलपाखरुमालिकेत मानस तुला म्हणजे वैदेहीला त्याच्या कविता ऐकवून प्रपोज करतो. तू स्वत: कॉलेजमध्ये असताना असं काही तुझ्यासोबत घडलं का?

नाही, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. पण हेच फुलपाखरु मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेतली प्रेमकथा जरी आजच्या काळातली असली तरीही प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम खूप वेगळं आहे. आजकाल सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी खुलेपणाने बोलत असतो. पण तरीही मानस मात्र स्वत:च्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो. त्यामुळेच ‘फुलपाखरु’ मालिका प्रेक्षकांना जास्त भावते. पण माझ्याबाबत असं कधीच झालं नाही.

कॉलेजचे दिवस हे मजामस्तीचे तर असतातच, पण या काळात मुलांचं करिअरही घडत असतं. अशावेळी पेपर फुटणे, निकाल वेळेत न लागणे अशा गोष्टींमुळे कॉलेज लाइफवर काय परिणाम होतो?

खरंतर आमची पहिली बॅच होती, जेव्हा क्रेडिट सिस्टीम आली. पण त्यावेळेला आम्हाला फार काही अडचणी जाणवल्या नाहीत. पिढीनुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आताचे विद्यापीठाचे घोळ वगैरे या गोष्टी बघितल्या की मला प्रश्न पडतो की आताचे विद्यार्थी कसे एन्जॉय करत असतील? माझ्या कॉलेज लाइफमध्ये तर मी शूटींगच करत असायचे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळाला नाही.

प्रसारमाध्यमं, सोशल मिडिया यामुळे कलाकारांना प्रसिद्धी तर मिळते. पण याचे काही दुष्परिणामही असतात का?

मला असं वाटतं की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत असते, तेव्हा ती चांगली असते. एखाद्या गोष्टीचे अधिकार तुमच्याकडे येतात, तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारीही तुमच्याकडेच येते. तुम्ही जर पब्लिक फिगर असाल तर तुमच्यावर तेवढीच जबाबदारीही असते की समाजात कसं वागावं, सोशल मिडियावर काय पोस्ट करावं, कधीकधी यामुळे प्रायव्हसीला धक्का लागतो. पण तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता हे तुमच्यावर आहे. माझी प्रायव्हसी हरवली आहे असे अजूनतरी मला वाटत नाही.

तु ज्या मालिका पाहात मोठी झालीस त्या मालिका आणि आताच्या मालिका यात काही फरक जाणवतो का?

हो, खरंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मलाही असंच वाटायचं की मला किचन पॉलिटिक्स नाही बघायचंय. पण आज ‘तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून मालिका सुरू केल्या आहेत. तरुण जे देशाचं भविष्य असतात, त्यांच्यासाठी मालिका सुरु करणं हा एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं.

महिला या सुरुवातीपासूनच मालिकांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पण या सगळ्याचा महिलांच्या आयुष्यावर काही परिणाम होताना दिसतो का?

मला असं वाटतं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. गृहिणी मालिकांमधल्या नायिकांशी स्वत:ला रिलेट करत असतात. त्या नायिकांचा महिलांवर काही प्रभाव पडतो का माहीत नाही, पण त्या निमित्ताने त्यांना एक कंपनी मिळत असते.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेविरोधात आजपर्यंत कोणत्याच मालिका सिनेमातून भाष्य केलं गेलेलं नाही. याविषयी तुला काय वाटतं?

मला असं वाटतं की मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. ती काही वाईट गोष्ट नाही. त्यातून आपण नवा जीव घडवतो. जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे ती वाईट असूच शकत नाही. त्यामुळे पाच दिवस मंदिरात जायचं नाही हे मला तरी पटत नाही. माझे आईवडीलही अशा गोष्टी मानत नाहीत. मालिकेतल्या नायिकांच्या तोंडून जर याविषयी बोललं गेलं तर बरं होईल. शिवाय या गोष्टीचा खूप आनंद होतोय की या विषयावरचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा लवकरच येतोय. बाकी कोणी याविषयी काही बोलत नसेल तर आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे.

तुझ्या करिअरची सुरुवात तर झाली आहे. पण मग पुढे काय?

मला केणत्याही गोष्टीची घाई नाहीए. मला स्वत:ला आणखी ग्रूम करायचंय. मी नाटक आणि सिनेमामध्ये अजून काम केलेलं नाहीए. त्यामुळे त्या माध्यमांतही मला काम करायचंय. मी प्रत्येकवेळी असा प्रयत्न करेन की मी नेहमी वेगळ्या रुपात सगळ्यांसमोर येईन आणि प्रेक्षकांना खूप आवडेन.

गृहशोभिकेच्या वाचकांना काय सांगशील?

वाचकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जे काही करायचंय ते आत्मविश्वासाने करा. टोकणारे खूप असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे करायचंय त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करा.

अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*सोमा घोष

भारतात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले असल्यामुळे बऱ्याच सिनेमांचे-मालिकांचे चित्रीकरण थांबले. त्यामुळे या क्षेत्रात स्पॉटबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या लोकांना अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा या दोघांनी मिळून मदतीचा हात दिला आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी मीडिया बझ या मीडिया कंपनीच्या साहाय्याने सिनेक्षेत्रात स्पॉटबॉयचे काम करणाऱ्या लोकांना शंभरहून अधिक रेशन किटचे वाटप केले आहे. मॉरिस नरोन्हा यांनी कोरोना काळात उत्तर मुंबईतील झोपडपट्टी भागातील गरजू लोकांना गॅस सिलिंडर, रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mauris Noronha (@maurisbhai)

मॉरिस यांनी कोरोना काळात आतापर्यंत केलेल्या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी एक योजना आखून बोरिवली आणि दहिसर विभागातील झोपडपट्ट्यांमध्येही गरजूंना रेशन किटचे वाटप केले. कोरोना काळात गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना केले आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें