* नमिता धुरी
आपल्या सहजसुंदर अभिनयाने तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आणि छोट्या पडद्यावर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सांगतेय तिच्या कलाविश्वातील आयुष्याबद्दल.
अभिनयाची सुरुवात कशी झाली?
माझं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालेलं असलं तरीही मी कधी एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. कारण मी अकरावी-बारावी सायन्सला होते. त्यानंतर मी मास मिडिया शिकत होते. त्यामुळे आम्हाला इंटर्नशिप्स कराव्या लागतात. मी ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत होते. तिथे मला रसिका देवधर भेटल्या. त्या ‘दुर्वा’ मालिकेच्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली आणि मला ‘दुर्वा’ मालिकेत दुर्वाची मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून माझं या क्षेत्रात पदार्पण झालं.
सुरुवातीला एक प्यादं म्हणून वापरली जाणारी दुर्वा शेवटी स्वत:च राजकारणात उतरते. तुला काय वाटतं महिला जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा खरंच काही बदल घडतो?
खरंतर या विषयावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण मालिकेतल्या गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी यांमध्ये खूप फरक असतो. पण तरीही मला असं वाटतं की बदल हा कोणीही घडवू शकतो. त्यासाठी तुम्ही महिलाच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात राहिलं पाहिजे.
सध्या सुरु असलेल्या ‘फुलपाखरु’ मालिकेत मानस तुला म्हणजे वैदेहीला त्याच्या कविता ऐकवून प्रपोज करतो. तू स्वत: कॉलेजमध्ये असताना असं काही तुझ्यासोबत घडलं का?
नाही, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. पण हेच फुलपाखरु मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेतली प्रेमकथा जरी आजच्या काळातली असली तरीही प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम खूप वेगळं आहे. आजकाल सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी खुलेपणाने बोलत असतो. पण तरीही मानस मात्र स्वत:च्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो. त्यामुळेच ‘फुलपाखरु’ मालिका प्रेक्षकांना जास्त भावते. पण माझ्याबाबत असं कधीच झालं नाही.
कॉलेजचे दिवस हे मजामस्तीचे तर असतातच, पण या काळात मुलांचं करिअरही घडत असतं. अशावेळी पेपर फुटणे, निकाल वेळेत न लागणे अशा गोष्टींमुळे कॉलेज लाइफवर काय परिणाम होतो?