* सोमा घोषलहानपणापासून अभिनयाची आवड असलेली मराठी अभिनेत्री गौरी नलावडे मुंबईची आहे. तिला नेहमीच वेगळया आणि चांगल्या कथांवर भूमिका साकारायला आवडते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली आणि एकामागून एक चित्रपट करत आहे. तिची पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’मधील तिच्या कामाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि तिच्या कारकीर्दीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. गौरीच्या या प्रवासात तिची आई अरुणा नलावडे यांनी तिला मोलाची मदत केली. कारण, लहान वयातच तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. तिच्या मुख्याध्यापक आईने तिचे पालनपोषण केले. तिचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नम्रपणे वागणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गौरीशी तिच्या प्रवासाबाबत गप्पा मारता आल्या. याच गप्पांमधील हा काही खास भाग :
सध्या तू काय करत आहेस? कोविडदरम्यान काय काय केलेस?
जे चित्रपट बाकी होते ते पूर्ण केले आणि जे पूर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. ३० एप्रिलला मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. सर्व ठीक झाल्यावर लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. एक चित्रपट ‘द डिसाईपल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्यांचे एडिटिंग सुरू आहे. कोविड महामारीमुळे खूप कमी चित्रपटांची निर्मिती होत आहे. जाहिराती आणि शूटिंगमध्ये उरलेली कामे केली जात आहेत. सध्या चित्रपटांची शूटिंग बंद आहे. या काळात घरात राहून पुस्तके वाचणे, घरातल्यांसोबत वेळ घालवणे, जेवण बनवणे, वर्कआऊट, झोप पूर्ण करुन घेणे इत्यादी कामे करत आहे. कोविडदरम्यान मी एक शॉर्ट फिल्म शूट केली होती, ज्यात माझ्यासोबत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी काम केले आहे. कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन खबरदारी घेऊनच आम्ही शूटिंग पूर्ण केले.
अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली?