मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टिमचे कौतुक

* सोमा घोष

‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्यावेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे आज येथे कौतुक केले.

अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते.

सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, नॉन फिक्शन हेड अमित फाळके, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते. यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्य जत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 ‘कोण होणार करोडपती’

*सोमा घोष

‘कोण होणार करोडपती’ पाहताना घरबसल्या लखपती होण्याची सधी- प्ले अलॉंगवर ‘कोण होणार करोडपती’ खेळा, १२ जुलैपासून…

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम  नक्कीच जिंकली असती.

आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या  प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. १२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम  सोम.शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

हा कार्यक्रम पाहताना  प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. ‘कोण होणार करोडपती’

पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू  शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते  म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक  या खेळात निवांत सहभागी  होऊन, लखपती होऊ शकतात.

या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ’ आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ  शकता!

पाहा, ‘कोण होणार करोडपती’,

सोम.-शनि., १२ जुलैपासून  रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*सोमा घोष

भारतात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले असल्यामुळे बऱ्याच सिनेमांचे-मालिकांचे चित्रीकरण थांबले. त्यामुळे या क्षेत्रात स्पॉटबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या लोकांना अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा या दोघांनी मिळून मदतीचा हात दिला आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी मीडिया बझ या मीडिया कंपनीच्या साहाय्याने सिनेक्षेत्रात स्पॉटबॉयचे काम करणाऱ्या लोकांना शंभरहून अधिक रेशन किटचे वाटप केले आहे. मॉरिस नरोन्हा यांनी कोरोना काळात उत्तर मुंबईतील झोपडपट्टी भागातील गरजू लोकांना गॅस सिलिंडर, रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mauris Noronha (@maurisbhai)

मॉरिस यांनी कोरोना काळात आतापर्यंत केलेल्या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे. स्वप्नील व मॉरिस यांनी एक योजना आखून बोरिवली आणि दहिसर विभागातील झोपडपट्ट्यांमध्येही गरजूंना रेशन किटचे वाटप केले. कोरोना काळात गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना केले आहे.

माझ्या आईचा शॉटकट कामास कायमच विरोध होता – मोनालिसा बागल

* सोमा घोष

लहानपणापासूनच क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करायचं स्वप्न पाहणारी मराठी अभिनेत्री मोनालिसा बागल ‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रसिद्ध झाली. लहान वयातच तिचे वडील आणि आता वर्षभरापूर्वीच तिची आई मीनाक्षी राजेश बागल यांचं निधन झालं. मोनालिसा आता तिची मोठी बहीण अश्विनी बागलसोबत मुंबईत राहते, तिची बहीणदेखील मराठी चित्रपटात अभिनय करते. अभिनयाव्यतिरिक्त मोनालीसाची एक सिनेवितरक कंपनीदेखील आहे, हा सर्व  डोलारा ती स्वत: सांभाळते. तिच्याशी तिच्या एकूण प्रवासाबद्दल बोलणं झालं. सादर आहेत याचे खास अंश :

अभिनयाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती या क्षेत्रात नाहीए. मात्र, माझ्या आईला अगदी लहानपणापासून अभिनयाची आवड होती, मात्र कुटुंबियांच्या दबावामुळे तिला काम करता आलं नाही. तिची ही आवडच मला या क्षेत्रात घेऊन आली आणि आज मी जी काही आहे ती तिच्यामुळेच होऊ शकले.

कुटुंबीयांचं किती सहकार्य मिळालं?

माझा पहिला चित्रपट आल्यानंतरदेखील मी या क्षेत्रात येण्याबद्दल काही ठरवलं नव्हतं. मी माझं शिक्षण लोणावळामध्ये पूर्ण केलं आणि मी अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे मला चार्टड अकाउंटंट व्हायचं होतं. बारावीला असताना एके दिवशी मला चैतन्य देशमुख भेटले आणि त्यांनी माझा फोन नंबर घेऊन ठेवला. काही दिवसानंतर त्यांनी मला मराठी चित्रपटात अभिनयाची ऑफर दिली. मी अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना ऑडिशन दिली. त्यात  मला सई ताम्हणकरच्या लहानपणीची भूमिका करायची होती. त्यावेळी मी १७ वर्षाची होती. माझी निवड झाली आणि माझ्या कामाचं कौतुकदेखील झालं. त्यानंतर मी अनेक चित्रपट केले, परंतु चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत.

अभिनयाचा प्रवास पुढे कसा सुरू झाला?

यादरम्यान अनेक मोठया चित्रपटातून मला नकार मिळाला. कारण म्हणजे माझी गावाकडची भाषा आणि माझी शारीरिक सुदृढता. यामुळे मला खूपच नैराश्य आलं होतं. असं वाटू लागलं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाहीच आहे. परंतु माझी आई आणि मोठया बहिणीने मला समजावलं आणि अधिक प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मी पुन्हा अभ्यासात मन रमवलं. मात्र काही दिवसातच मला दिग्दर्शक प्रदीप जगदाळेंचा फोन आला. एक टिनएजर मुलीची भूमिका होती. मी ऑडिशन दिली आणि निवड झाली. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी सगळयांच्या नजरेत आली. हळूहळू मी पुढे जात राहिले.

पहिला ब्रेक केव्हा मिळाला?

मराठी चित्रपट ‘झाला बोभाटा’साठी मला पहिला ब्रेक मिळाला. यानंतर तर माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. अलीकडेच मी एक वेब सिरीज आणि चित्रपट केलाय, जो प्रदर्शनासाठी तयार आहे. करंट चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरु आहे.

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनय करण्याची इच्छा आहे का?

हिंदी चित्रपटासाठी मी स्वत:ला तयार करतेय. एखादी चांगली कथा मिळाली तर मी नक्कीच काम करेन. हिंदीमध्ये धर्मा प्रोडक्शन आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आहे.

कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतील?

सध्या माझ्याकडे अनेक चांगल्या स्क्रिप्ट येत आहेत आणि मला निवडक काम करायचं आहे, कारण लोकांनी मला लक्षात ठेवायला हवंय. याव्यतिरिक्त मला चांगल्या लोकांसोबत काम करायचंय, यामुळे बरंचसं शिकायची संधी मिळते.

अभिनयात यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं आहे?

अभिनयाच्या जगतात धैर्य आणि संयम यांची खूप गरज आहे. कोणतीही व्यक्ती सर्वगुण संपन्न नसते, परंतु जी प्रतिभा तुमच्यामध्ये आहे, ती जाणून घेऊन पुढे गेल्यास कधीच मागे पडणार नाही.

नेपोटीज्मचा कधी सामना करावा लागला का?

मला नाही अनुभव आला असा कधी. परंतु मी अनेकदा ऐकलंय की चित्रपट निर्माते त्यांच्या मुलांना अभिनय येत नसतानादेखील प्रमुख भूमिका देतात आणि चांगल्या कलाकाराला दुय्यम भूमिका करावी लागते. अशावेळी कलाकाराने तो या भूमिकेसाठी तयार आहे की नाही याचा स्वत: निर्णय घ्यायला हवा.

कोरोनाकाळात चित्रीकरण करणं किती कठीण आहे?

कोरोनाकाळात चित्रीकरण करणं खूपच कठीण होऊन राहिलंय. सर्व नियम आणि टेस्ट नंतरच काम करावं लागतंय. मलादेखील सर्वांना सांगायचंय की तुम्ही सर्वांनी मास्क घाला आणि गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी.

इंटिमेट सीन करताना तू किती सहज असतेस?

अजिबात सहज नसते, मी दोन चित्रपटात अधिक इंटिमेट सीन होते म्हणून सोडले आहेत. एका चित्रपटात मात्र मी इंटिमेट सीन मोठया मुष्किलीने दिला होता कारण मी त्यातील अभिनेत्याला ओळखत होती. आपण सहज नसू तर ते मोठया पडद्यावर दिसून येतं.

तू किती फॅशनबल आणि फुडी आहेस?

सुरुवातीला मी फक्त सलवार सूट घालायची, परंतु हळूहळू मला बदलावं लागलं. आता मी प्रसंगानुरुप पेहराव करते.

मी खूपच खाण्याची खूपच शौकीन आहे, परंतु महाराष्ट्रीयन पदार्थ अधिक आवडतात.

तुझ्या स्वप्नातील राजकुमार कसा असायला हवा?

मला आईवडिल नाहीएत आणि जबाबदाऱ्यादेखील अधिक आहेत. कोणावर फारसा विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे माझं काम माझ्यासाठी सर्वकाही आहे.

उन्हाळयात तुझ्या त्वचेची निगा कशी राखतेस?

मी दररोज फेसवॉश वापरते. याव्यतिरिक्त त्वचा निरोगी असावी यासाठी घरी असल्यावरदेखील सनस्क्रीन लोशन लावते. खाण्यात द्रवपदार्थांचा अधिक समावेश करते, यामध्ये टरबूज खास आहे. व्हिटॅमिन सीदेखील घेते.

चाहत्यांना काय सांगशील?

माझी आई कायम सांगायची की आपल्याला एकच आयुष्य मिळतं, त्यामुळे जे काही ठरवलंय ते कर, परंतु कोणतंही काम शॉर्टकटने करू नकोस. हेच मला सगळया तरुणाईला सांगावंसं वाटतंय.

आवडता रंग – काळा आणि लाल.

आवडता पेहराव – सिल्क आणि कांजीवरम साडी.

आवडतं पुस्तक – छावा

(कादंबरी) लेखक – शिवाजी सावंत.

फावला वेळ मिळतो तेव्हा – गाणं, नृत्य आणि प्रवास.

आवडता परफ्यूम – धाराचे सर्व परफ्यूम्स.

लेट्सअप आणि लेट्सफ्लिक्सच्या यशानंतर प्रसिद्ध उद्योजक आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया यांचे यूट्यूबच्या विश्वात पदार्पण !

*प्रतिनिधी

गेल्यावर्षी जगभर पसरलेल्या व अजूनही तळ ठोकून बसलेल्या महामारीमुळे डिजिटल माध्यमांचा फायदा झाला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी युट्युबसोबत हातमिळवणी केल्यामुळे दर्शकांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिजिटल माध्यमांची वाढत चालेली लोकप्रियता लक्षात घेऊन उद्योजक व निर्माते नरेंद्र फिरोदिया यांनी लेट्सअपच्या माध्यमातून खास रे युट्युब वाहिनीमधील प्रमुख भागभांडवल विकत घेतले आहेत. लेटसअप हे हायपर लोकल वर्नाक्युलर इंफोटेननमेंट एप्लिकेशन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, मनोरंजन व क्रीडाविषयक बातम्या पुरवण्याचे काम करते.

हे ऍप वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. ह्या एप्लिकेशनला तीन दशलक्ष ग्राहकांनी सबस्क्राईब केले आहे. खास रे ही डिजिटल एंटरटेनमेंट कंपनी असून विविध विनोदी व्हिडीओ, गाणी त्यांच्या वाहिनीवरून प्रसिद्ध केली जातात. ट्रम्पतात्या, मुळशी पॅटर्न सिनेमाचा विडंबनात्मक ट्रेलर, जो बायडनवर आधारित मजेशीर व्हिडीओ हे या वाहिनीचे प्रसिद्ध व्हिडीओ आहेत.

या वाहिनीवर नुकतेच प्रदर्शित झालेले उसाचा रस या गाण्याला पाच लाख तर ब्राऊन मुंडे या पंजाबी गाण्यावर आधारित गावरान मुंडे गाण्याला आतापर्यंत तीस लाख लोकांनी पहिले आहे. त्यासोबतच ही वाहिनी बॉक्स ऑफिसवर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मराठी सिनेमांचे प्रमोशनही करते.

सोलापूरमधील बार्शीच्या संजय श्रीधरने खास रे टीव्ही ची स्थापना केली. पुण्याला शिक्षण घेत असतानाच संजय वेडिंग फोटोग्राफी करण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी त्याची या माध्यमातील रुची वाढत गेली. त्यानंतर त्याने व्हिडीओ प्रॉडक्शनमध्ये संपूर्ण लक्ष घातले व महेश महामुनी, कृष्णा जानू या मित्रांसोबत मिळून खास रे टीव्हीची स्थापना केली.

या काळात संजय व त्याच्या टीमने खास रे टीव्हीची लोकप्रियता वाढवली. पाबलो शेठ थेट भेट व्हायरल नावाची वेब सीरिज हे त्यांचे काही ट्रेंडिग व्हिडीओ आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अनोखे विषय त्यांनी हाताळल्यामुळे अनेक मराठी कलाकार त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. एप्रिल २०१७ मध्ये सुरु झालेल्या खास रे टीव्हीने २०२१ मध्ये चार वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली.

काळानुसार युट्युब वाहिन्यांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे आणि की, खास रे टीव्हीला इतर युट्युब वाहिन्यांप्रमाणे लोकप्रियता मिळवण्याची क्षमता आहे. प्रेक्षकांना चांगल्या दर्जाचे कंटेन्ट देण्याचा माझा मानस आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कंन्टेट निर्माण करण्यासाठी मी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देईन असे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.

नरेंद्र फिरोदिया हे निरनिराळ्या क्षेत्रातील उपक्रमांचे संस्थापक असून त्यांना मनोरंजन क्षेत्र हे त्यांचे आवडीचे क्षेत्र आहे.

डबल्यूवायएन यांसारख्या संस्था स्टार्टअप ब्रँडसाठी काम करते तर द ब्रिज ही संस्था स्पोर्ट्सशी निगडित कन्टेन्ट बनवते. नरेंद्र फिरोदिया यांनी काही महिन्यांपूर्वीच लेटफ्लिक्स मराठी ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रदर्शनाची घोषणा केली. ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन प्रादेशिक सिनेमे, लघुपट, माहितीपट इत्यादी प्रदर्शित होणार आहेत. त्यांच्या ह्या नव्या उपक्रमातून त्यांचे मनोरंजन क्षेत्राविषयीचे प्रेम दिसून येते. फिरोदिया यांनी २०१२ साली अहमदनगर महाकरंडकच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. सद्यस्थितीत अहमदनगर महाकरंडक ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ठरली आहे.

खास रे टिव्ही ह्या पुढे वेब सिरीज, चित्रपट आणि अजून चांगले दर्जेदार कन्टेन्ट देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नरेंद्र फिरोदिया यांचे मनोरंजन विश्वातील हे उपक्रम कोणते असतील हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात अनु मलिक यांची हजेरी!

* सोमा घोष

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रीकरण थांबले आहे, पण प्रेक्षकांचे मनोरंजन मात्र अबाधित राहिले आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी मिळतच होती आणि आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. ती सुरुवात संगीत कलाविश्वात  मोठं नाव असलेले गायकगीतकार अनु मलिक यांच्या कार्यक्रमातल्या हजेरीने! ३आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे अनु मलिक प्रेक्षकांनापाहायला मिळतील. यावेळी अनु मलिकने सेटवर धमाल केली आणि प्रसाद ओक याच्याबरोबर ‘आम्ही ढोलकर’ हे मराठी गाणंही  गायलं. ‘आग लगा दी’ असं म्हणून स्पर्धकांचं कौतुक करणाऱ्या अनु मलिकने  हास्यजत्रेच्या स्पर्धकांचं मराठमोळं कौतुक केलं आहे.

हा भाग म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे, हे नक्की. पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ३ आणि ४ मे, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवाहिनीवर.

महिला स्वावलंबी होण्यासाठी पुढे येत आहेत – शिवानी बावकर

* सोमा घोष

मराठी टीव्ही शो ‘लागिरं झालं जी’मध्ये शीतलची भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शिवानी बावकर हिने अभिनय करण्यापूर्वी एका आयटी फॉर्ममध्ये जर्मन भाषेची तज्ज्ञ म्हणून काम केले आहे. स्वभावाने नम्र आणि हसतमुख असलेल्या शिवानीने मराठी टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपट तसेच अनेक हिंदी टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. तिच्या येथेपर्यंत पोहोचण्यात तिची आई शिल्पा बावकर आणि वडील नितीन बावकर यांचा नेहमीच पाठींबा राहिला आहे. शिवानी नेहमी आव्हानात्मक कामे करणे पसंत करते आणि त्यानुसार विषय निवडते. शिवानी तिच्या प्रवासाविषयी बोलली आहे, सादर आहे हा त्यातील काही अंश…

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कोठून मिळाली?

मला लहानपणापासून एक्स्ट्रा करिकुलर खूप आवडत असे. शाळा ते कॉलेजपर्यंत मी त्यात नेहमीच सक्रिय असे. अभ्यासामुळे मी एक्स्ट्रा करिकुलरवर जास्त वेळ घालवू शकत नव्हते, म्हणून सर्व काही सोडून मी नृत्यावर लक्ष केंद्रित केले आणि भरतनाट्यममध्ये विशारद केले. यानंतर मी महाविद्यालयात गेले आणि तेथील नाटक विभागात सहभागी झाले, तेथे शिक्षकांनी आम्हाला गर्दीत उभे राहण्यास सांगितले आणि जर त्यांना वाटले की मी काही बोलू शकते तेव्हा मला नाटकात सामील केले जाईल, परंतु पहिल्याच वेळेस मला एक वाक्य नाटकात बोलण्यासाठी मिळालं, मग ते माझ्यासाठी प्रेरणा बनले, कारण मला बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संधी मिळाली होती आणि मी अभिनय क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला जेव्हा मी कुटुंबातील सदस्यांसह अभिनयाबद्दल बोलले तेव्हा त्यांनी मला माझे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला, कारण हे क्षेत्र अनिश्चिततेचे आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर आवड असेल तर मी अभिनयाच्या क्षेत्रात जाऊ शकते. यानंतर मी अभ्यासाबरोबरच अभिनयासाठी ऑडिशनदेखील देत राहिले आणि ‘लागिरं झालं जी’ या पहिल्या मराठी कार्यक्रमात मला मुख्य भूमिका मिळाली. माझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट राहिला आहे.

आपण बऱ्याच शैली शिकल्या आहात, परंतु तुम्ही अभिनयात आहात, तुम्ही त्या मिस करतात काय?

मिस नाही करत, कारण मी नेहमीच एक्स्ट्रा करिकुलरमध्ये भाग घेत होते आणि अजूनही मी नृत्य क्लासला जाते. जर्मनीचे बरेच जर्मन मित्र आहेत, त्यांच्याशी जर्मन भाषेत गप्पा होत राहतात, यामुळे मी ती भाषाही बोलू शकते. हे खरं आहे की काही वेळा कामामुळे काही गोष्टी गमावल्या जातात, परंतु मी वेळ व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.

तुला पहिला ब्रेक कोणत्या वयात मिळाला?

मी शिक्षणादरम्यान एका छोटया बजेटच्या चित्रपटात काम करत होते तेव्हा तिथे मला कळले की ऑडिशन एका टीव्ही शोसाठी घेण्यात येत आहे आणि योगायोगाने माझी तिथे निवड झाली. पण त्याची भाषा सामान्य मराठीपेक्षा वेगळी खेडयातली मराठी होती. प्रथम मी विचार केला की मी हे करू शकणार नाही, परंतु सर्वांच्या पाठिंब्याने मी भाषा शिकले आणि शो हिट झाला.

तुला कधी नेपोटिज्मचा सामना करावा लागला आहे का?

मी त्या विषयाकडे कधी लक्ष दिले नाही, कारण जर मला अभिनयात यश मिळवता आले नसते तर मी जर्मन शिकवले असते किंवा मग पुढे शिकण्यासाठी जर्मनला गेले असते. अशा प्रकारे माझ्याकडे नेहमीच दुसरा पर्याय असतो. जर हा पर्याय नसता तर कदाचित मीही नेपोटिज्मचा परिणाम पाहिला असता.

तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे?

खूप संघर्ष करावा लागला कारण मला मुंबईसारखे शहर सोडून सातारा जावे लागले होते आणि तेथे अडीच वर्षे मुक्काम करावा लागला होता. तिथले हवामान, खाणे व राहणे हे सर्वच वेगळे होते, ज्यामुळे माझे आरोग्य बिघडायचे. परंतु निर्मात्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि मी काम पूर्ण करू शकले. या व्यतिरिक्त मला अभ्यास करणे आणि ऑडिशन देणे जड जात होते. मी अभिनयासाठी प्रयत्न करणे सोडणार होते, परंतु वडिलांनी नकार दिला आणि योगायोगाने मला कामही मिळाले.

असा कोणता कार्यक्रम, ज्याने तुझे आयुष्य बदलले?

टीव्ही सीरियल ‘लागिरं झालं जी’ माझ्यासाठी सर्वात मोठा ब्रेक होता, त्यानंतर मी घरोघरी ओळखले जाऊ लागले.

तुला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यास आवडते का?

मी याची प्रतीक्षा करीत आहे कारण कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे त्याची वाढ झाली आहे. हे खरं आहे की वेब सीरिजमध्ये बरेच प्रखर दृश्ये असतात, जे मला करायचे नाहीत. सेन्सर बोर्डही येत आहे. कदाचित त्यात काही बदल होतील, अशा परिस्थितीत स्क्रिप्टनुसार इंटिमेंट सीन करण्यात काही हानी होणार नाही, पण मला मसाला अभिनय करण्याची इच्छा नाही.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मी खूप फूडी आहे आणि मला माझ्या फिगरबद्दल विचार करण्याची गरज नसते, कारण मी जाड होत नाही, मला हे वरदान कुटुंबाकडून मिळाले आहे. मला फॅशनमध्ये प्रयोग करायला आवडते. मी बऱ्याच डिझाइनर्सचे अनुसरण करते पण मला अभिनेत्री सोनम कपूर आणि तिची बहीण रिया कपूर यांच्या फॅशन सेन्स आवडतात. याशिवाय मी केसांवर बरेच प्रयोग करते कारण माझे केस मुख्य फिचरमध्ये येतात. खाण्यात नॉन-व्हेजची आवड आहे आणि महाराष्ट्रीयन वेज फूड काहीही असले तरी आवडते. तिखट-मसालेदार खाऊ शकत नाही. मी मूडमध्ये असताना स्वयंपाकही बनवते.

महिला दिनच्या निमित्ताने कुठला संदेश देऊ इच्छिता का?

जसजसा वेळ व्यतीत होत आहे, महिला स्वावलंबी होण्यासाठी पुढे येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पूर्वी त्यांना घराच्या चार भिंतींमध्ये राहावे लागत होते. मुली आज प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत याचा मला आनंद आहे. मुलांशी स्वत:ची तुलना करू नका, तर स्वत:शीच तुलना करा. तसेच महिलांनी स्त्रियांना पाठिंबा देणे आवश्यक आहे.

आवडता रंग – पांढरा.

आवडते पोशाख – भारतीय.

पर्यटन स्थळे – परदेशात जर्मनी, देशातील जम्मू-काश्मीर आणि दार्जिलिंग.

आवडते पुस्तक – टू किल ए मोकिंग बर्ड.

स्वप्नांचा प्रिन्स – शाहरुख खानसारखा.

सवड मिळाल्यावर – व्यंगचित्र, वेब मालिका पहाणे.

आवडता परफ्यूम – डेव्हिडॉफ कूल वॉटर.

कुणास आदर्श मानता – वडिलांना.

सामाजिक कार्य – अनाथ मुलींना मदत आणि रक्तदान.

लोकप्रियतेसाठी मी काहीही बोलत नाही – सैयामी खेर (अभिनेत्री)

– सोमा घोष

हिंदी चित्रपट ‘मिर्जिया’पासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री सैयामी खेर खेळाडूही आहे. सैयामी खेरने हिंदीबरोबरच तेलुगू चित्रपटही केला आहे. अर्थात, तिचा पहिला हिंदी चित्रपट काही फारसा यशस्वी ठरला नाही, पण टीकाकारांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले. ती कोणत्याही गोष्टीवरून दु:खी होत नाही. ती प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात समजून जगते आणि प्रत्येक चित्रपट तिच्यासाठी आव्हान असतो.

कलेच्या वातावरणात जन्मलेल्या सैयामी खेरला लहानपणापासून चित्रपटात अभिनय करण्याची फारशी इच्छा नव्हती, परंतु शाळा-कॉलेजमध्ये ती नाटकांमध्ये अभिनय करत असे. मात्र, त्यावेळी जेव्हा चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, तेव्हा तिने यालाच आपले प्रोफेशन बनवले. आता ती तिचा एक मराठी चित्रपट ‘माउली’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिच्याशी भेटून बोलणे रोमांचक अनुभव होता. सादर आहे त्यातील काही भाग.

प्र. मराठी चित्रपट माउलीकरण्याचे खास कारण काय आहे?

खरे तर अभिनेता रितेश देशमुखचा हा दुसरा चित्रपट आहे, यापूर्वी त्याने ‘लय भारी’ चित्रपट केला होता. जो हिट तर झालाच, पण सर्वांसाठी मनोरंजक होता. त्यानंतर, ‘माउली’ येतोय, तो भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट आहे. माझ्यासाठी ‘मिर्जिया’ थोडा सीरियस चित्रपट होता आणि मला एक कमर्शियल चित्रपट करायचा होता. अशा वेळी मला हा मराठी चित्रपट मिळाला, जो मला करायचा होता.

प्र. चित्रपटात तुझी भूमिका काय आहे?

मी रितेशची को-स्टार आहे. जी शहर नव्हे, तर गावातील आहे. म्हणून मला मराठी भाषेवर थोडे काम करावे लागले. मी मराठी येते, पण शहर आणि गावाकडील भाषेत थोडा फरक असतो. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करावी लागली.

प्र. रितेश देशमुखसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

आधी मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते. कारण ते एक मोठे कलाकार आहेत आणि त्यांनी खूप काम केले आहे. नंतर तेवढे काही वाटले नाही. कारण ते खूप विनोदी स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडून मी खूप गोष्टी शिकले.

प्र. या भूमिकेत आणि तुझ्यात काही साम्य आहे का?

या भूमिकेचे चरित्र माझ्याशी खूप जास्त मिळतेजुळते आहे. कारण चित्रपटात माझी भूमिका अशी आहे की मला जे चुकीचे वाटते, ते मी बोलून टाकते. प्रत्यक्ष जीवनातही मी अशीच आहे.

प्र. या भूमिकेसाठी वर्कशॉप केलेस का?

तशी मी मुंबईला राहणारी नाही, तर नाशिकला राहणारी आहे. मी तिथेच लहानाची मोठी झाले आहे. मी मोठ्या शहरात राहणारी नाहीए, त्यामुळे या भूमिकेसाठी खूप जास्त असे काम करावे लागले नाही.

प्र. चित्रपटात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याच्यातच मला पुढे जायचे होते, पण शाळेच्या काळातच मी थिएटर करायला सुरुवात केली. थिएटरनंतर चित्रपट आणि जाहिरातींच्या ऑफर येऊ लागल्या. मी त्याच फ्लोमध्ये पुढे जात राहिले. मी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला, असे काहीही नव्हते. पण मी माझी आजी उषा किरण आणि आत्या तन्वी आझमीला काम करताना पाहिले होते. ऑडिशनच्या वेळी जेव्हा ‘मिर्जिया’ चित्रपट मिळाला, तेव्हा मी माझे गुरू आदिल हुसैन यांना भेटले आणि त्यांनी मला योग्य दिशा दाखवली आणि मला अभिनयाची आवड निर्माण झाली.

प्र. तुझा पहिला चित्रपट जास्त चालला नाही, चित्रपटाच्या यश-अपयशाने तुझ्या कारकिर्दीवर कोणता प्रभाव पडला? मराठी चित्रपटातही यायला एवढा उशीर का झाला?

हे खरे आहे की पहिला चित्रपट चालला नाही. त्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी जेव्हा ‘मिर्जिया’ चित्रपट करत होते, तेव्हा खूप ऑफर्स येत होत्या. चित्रपट न चालल्यामुळे मला त्या ऑफर्स मिळाल्या नाहीत. पण मी धीर सोडला नाही आणि याचे फळ समोर आहे. यादरम्यान मी अनेक स्क्रिप्ट ऐकल्या, पण मला ज्याची प्रतीक्षा होती, तशी एकही मिळाली नाही. अशा प्रकारे उशीर होत गेला, पण आता मी पुन्हा एकदा मोठा चित्रपट करत आहे. तशी हिंदी आणि मराठीमध्ये कोणतीही बॉर्डर आता राहिलेली नाही.

प्र. तू तुझी आजी उषा किरण आणि आत्या तन्वी आमीची कोणती शिकवण आपल्या जीवनात पाळतेस?

जेव्हा आजीचा मृत्यू झाला, तेव्हा मी अवघी १० वर्षांची होते. मला खंत आहे की मी तिला अभिनय करताना पाहू शकले नाही, पण तिचे चित्रपट जरूर पाहते. त्या काळच्या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटात जी ग्रेस आणि सौंदर्य होते, ते आजच्या काळातील चित्रपटांमधून पूर्णपणे गायब झाले आहे. त्या काळचे चित्रपट आणि अभिनेत्रींचा अभिनय कोणत्याही तंत्राशिवाय होता, त्यांची बरोबरी आजची कोणतीही अभिनेत्री करू शकत नाही. त्यामध्ये वहीदा रेहमान, आशा पारेख, मधुबाला इ. आहेत. अभिनयाबाबत जाणून घेण्यासाठी मला माझ्या आत्याची मदत नेहमीच झाली आहे.

प्र. तुझे कुटुंब तुला किती सहकार्य करते?

कुटुंबाचे सहकार्य खूप आवश्यक असते. त्याशिवाय अभिनय करणे कठीण आहे. कारण हे एक असे क्षेत्र आहे, जिथे चांगल्या चित्रपटासाठी खूप वाट पाहावी लागते. अशा वेळी कुटुंबच आपल्याला त्या तणावापासून दूर नेते.

प्र. तू चित्रपट क्षेत्रात आलीस, त्यामुळे स्पोर्टस्ला मिस करतेस का?

शाळेत क्रिकेट खेळत असे आणि भारतासाठी खेळणार होते. त्याबरोबरच मी सायना नेहवालसोबत बॅडमिंटनही खेळले आहे. अर्थात, हरले, पण योग्य खेळाबाबत कळले. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर मी मॅरेथॉन रनिंग सुरू केले आहे. यामध्ये फुल मॅरेथॉननंतर मी जर्मनीमध्ये हाफ मॅरेथॉन केले होते. पुढच्या वर्षी मी ट्राईलाथन करणार आहे. माझी इच्छा आहे की अभिनयासोबत माझी रनिंगही चालू राहावी.

प्र. आपल्या स्पष्ट बोलण्याचा प्रभाव तुझ्या करिअरवर पडला का?

मी अशा वातावरणात मोठी झालेय की, जिथे काही चुकीचे होत असेल, तर ते पाहू शकत नाही आणि बोलून टाकते. याचा माझ्या करिअरवर कोणताही परिणाम अजूनपर्यंत तरी झालेला नाहीए. पब्लिसिटीसाठी मी काहीही बोलत नाही, जे योग्य आहे, तेच बोलायला आवडते.

प्र. आता तुझा संघर्ष कशाप्रकारचा आहे?

आव्हानात्मक चित्रपट मिळणेच माझा संघर्ष आहे. ज्यांना मी माझे गुरू मानते, ते माझे गुरू अभिनेते आदिल हुसैन सांगतात की एखाद्या चित्रपटात दोन सीनही चांगले असतात, जर काही आव्हान असेल. असेच चित्रपट साकारण्याची इच्छा आहे.

प्र. एखादी ड्रीम प्रोजेक्ट आहे का?

अर्थात, मी असलेला राकेश ओम मेहरांचा चित्रपट चालला नाही, पण मी त्या चित्रपटाच्या प्रोसेसिंगमध्ये खूप काही शिकले. त्यांनी खूप प्रकारचे चित्रपट साकारले आहेत. जर पुन्हा मला संधी मिळाली, तर मी त्यांचे चित्रपट करणे पसंत करेन. याबरोबरच इम्तियाज अली, विशाल भारद्वाज, जोया अख्तर इ. सर्वांसोबत काम करण्याची इच्छा आहे. लहानपणापासूनच मला खेळाची आवड होती. त्यामुळे तशा प्रकारचे चित्रपट करण्याचे माझे स्वप्न आहे.

प्र. मीटूअभियानाबाबत तुझे मत काय आहे?

मी याबाबत खूप लकी राहिले आहे की माझ्यासोबत असे काही घडले नाही, पण ज्यांच्यासोबत असे वाईट घडले आहे आणि त्या बाहेर येऊन सांगण्याची हिंमत दाखवतात, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मी तर छोट्या-छोट्या गोष्टी पुढे येऊन सांगितल्या, पण ही मोठी गोष्ट आहे. ज्यांनीही या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी त्यांची कारकीर्द आणि सोशल लाइफवरही प्रभाव पडतो माझे मत असे आहे की, ही समस्या मुळासकट काढून टाकली पाहिजे. ही मोहीम मधेच थांबता कामा नये. हे अभियान केवळ भारतातच नव्हे, संपूर्ण विश्वात चालू आहे आणि ही चांगली गोष्ट आहे.

प्र. तुझी कोणाबरोबर स्पर्धा आहे का?

नाही, अजून खूप सारे प्लॅटफॉर्मस अभिनयासाठी आहेत आणि प्रत्येकाला काम मिळते. मी नेहमी चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करते. पुढे मी एक वेब सीरिज करतेय.

प्र. आजीच्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनय करायला आवडेल?

तिने खूप छान-छान चित्रपट केले आहेत. मराठी चित्रपट ‘शिकलेली बायको’ आणि हिंदी चित्रपट ‘दाग’ आणि ‘पतिता’च्या रिमेकमध्ये मला अभिनय करण्याची संधी मिळाली, तर तो करणे पसंत करेन.

प्र. तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मला खूप साधारण, आरामदायक व पिवळे आणि सफेद रंगाचे कपडे वापरायला आवडतात. मी खूप फूडी आहे. सर्वकाही खाते. वजन न वाढण्याचे कारण म्हणजे माझे स्पोर्टस् आहे.

प्र. तणाव आला तर काय करतेस?

तशी मी जास्त तणाव घेत नाही आणि आलाच, तर माझ्या रनिंगचा मला उपयोग होतो.

प्र. काही सोशल वर्क करतेस का?

गेल्या दोन वर्षांपासून मी एका ब्रँडसोबत ‘क्लीनिंग द ओशन’च्या मोहिमेसोबत काम करत आहे. या कॅम्पेनमध्ये मी सर्वांसोबत समुद्राच्या साफसफाईकडे लक्ष देते. याबरोबरच नाशिकमध्ये रस्ते रुंद करण्यासाठी खूप झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे तेथील प्रदूषणाची पातळी खूप वाढली आहे. म्हणूनच मान्सूनच्या काळात जास्तीतजास्त झाडे लावण्याचा मी प्रयत्न करते.

प्र. गृहशोभिकाच्या वाचकांसाठी काही संदेश देणार का?

– त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की महिला चांगले काम करतात. गृहिणी असो किंवा नोकरदार त्या कुटुंबाला आकार देतात. त्यांनी स्वत:ला कधीही कमी समजू नये आणि नेहमी खूश राहण्याचा प्रयत्न करावा.

आकाश ठोसरची सिरीज ‘१९६२ : दि वॉर इन दि हिल्स’साठी निवड

सोमा घोष

वास्तविक घटनांमधून प्रेरित सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ फक्त डिस्ने+हॉटस्टार व हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रिमिअमच्या सबस्क्रायबर्ससाठी २६ फेब्रुवारी  २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपट ‘सैराट’च्या या यशानंतर भारतभरात त्वरित प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता आगामी वॉरएपिक सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्समध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अभय देओल व सुमीत व्यास यांच्यासह इतरप्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्यात येतील.

हॉटस्टार स्पेशल सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ वास्तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज शौर्य व पराक्रमाची ऐकण्यात न आलेली कथा सादर करण्यासोबत कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले, त्या कथेला देखील दाखवते

शूरवीरांपैकी एकाच भूमिकेत दिसण्यात येणाया आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, त्याचे लष्करामध्ये जाण्याचे बालपणापासून स्वप्न होते. तो म्हणाला, ”सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ माझ्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. बालपणापासून माझे भारतीय सेनेमध्ये जाण्याचे स्वप्न होते आणि मी चित्रपटसृष्टीमध्ये येण्या पूर्वी लष्करामध्ये निवड होण्यासाठी दोनदा परीक्षादेखील दिली होती. फक्त सैन्य अधिकारीच नव्हे तर मी पोलिस सेवेमध्येदेखील दाखल होण्याचा प्रयत्न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्या देशाच्या या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्यामध्ये असते.”

तो पुढे म्‍हणाला, ”पहिल्यांदाच मला सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला वास्तविक जीवनात मिळाली नाही तरी रील जीवनामध्ये सैन्याचा पोशाख परिधान करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. मला अत्यत खास वाटले. असे वाटले की, मी सैन्याचाच भाग आहे आणि मी स्वत:कडे त्यच दृष्टिने पाहीन.”

आकाश ठोसर किशनची भूमिका साकारेल, जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्वित बटालियनचा भाग आहे. हॉटस्टार स्पेशल्स प्रस्तूत ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ प्रदर्शित होत आहे २६ फेब्रुवारी २०२१ रोजी फक्त डिस्ने+ हॉटस्टार व व व्हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रिमिअमवर.

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला!

सोमा घोष

मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यजत्रेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत.

ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.

हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा.

कधी विनोदी तर कधी मार्मिक पद्धतीने प्रेक्षकांना आपले वाटणारे विषय हास्याचे महारथी सादर करतात. विनोदाची पातळी राखून, चिकाटीने इतर कोणावरही व्यंग न करता विनोद करणं आणि प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं शिवधनुष्य हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने लीलया पेललं आहे.

या कार्यक्रमातील काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आणि प्रसिद्धही झाल्या. प्राजक्ता माळीच्या खुसखुशीत आणि प्रसन्न निवेदनासोबतच तिची वा दादा वा ही दिलखुलास दादही लोकप्रिय झाली. सईताम्हणकरनं कलाकारांच्या केलेल्या निखळ कौतूकासोबत तिची जुजबी दाद पण चर्चेत आली आणि अत्यंत सुंदर शब्दांचा फुलोरा रचत प्रसाद ओकने केलेल्या मार्मिक टिपणीसोबत त्याने न दिलेली पार्टीही लोकप्रिय झाली.

  • नाबाद भागांचा एक सुंदर सोहळा प्रेक्षकांना १७-१८ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे आणि या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.
  • मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें