- सोमा घोष
विनम्र, हसतमुख, सुंदर अभिनेत्री शिवानी सोनार हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर स्वत:ची छाप पाडली आहे. तिने मराठी लघुपट, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज इत्यादींमध्ये काम केले आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ ही तिची मालिका खूपच गाजली, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सिंधुताई माझी माई’ इत्यादी मालिकाही चांगल्याच चर्चेत राहिल्या. कामादरम्यान शिवानीची ओळख अभिनेता अंबर गणपुलेशी झाली. दोघेही लग्न करणार आहेत. अंबरचा शांत आणि काळजी घेणारा स्वभाव तिला प्रचंड आवडला आणि त्यामुळेच तिने लग्नाला होकार दिला. सध्या शिवानी सोनी टीव्ही मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत आहे, तिच्याशी मारलेल्या गप्पांमधील हा काही खास भाग...
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करण्याचे काही खास कारण आहे का?
या मालिकेची कथा खूप वेगळी आणि अनोखी आहे, त्यात माझ्या दोन भूमिका आहेत, एक गौरी आणि दुसरी तन्वी. गौरी ही आधुनिक विचारांची मुलगी आहे, जी शिक्षणासोबतच नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडते. तिची अनेक स्वप्नं आहेत, ती पूर्ण करण्यासाठी ती कठोर परिश्रम करते आणि कधीही हार मानत नाही. तन्वी हा तिचा भूतकाळ आहे, जी खूप शांत होती. ही दोन्ही पात्रं साकारताना मला एक वेगळंच आव्हान वाटतं आणि त्यामुळेच अभिनय करताना खूप छान वाटते.
मालिकेतील कोणते पात्र तुझ्या वास्तविक जीवनाशी मिळतेजुळते आहे?
गौरी हे पात्र मला माझ्यासारखे वाटते. तन्वीसारखी मी अजिबातच नाही, माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझ्यावर कधीही कोणत्याही प्रकारची बंधने लादली नाहीत, पण घराची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते.
तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
मी पुण्याची आहे, शाळेत असताना मला सर्जनशील गोष्टी करायला आवडायच्या. तेव्हापासूनच मी नृत्य आणि नाटकांमध्ये भाग घेत असे. चांगली गोष्ट म्हणजे मला पुण्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच मी वयाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये मला माझी पहिली मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मिळाली. त्यात मी छोटी भूमिका साकारली, पण सर्वांनी माझे कौतुक केले, त्यानंतर मला मोठी कामं मिळू लागली.