* नम्रता पवार
‘लाईक आणि सबस्क्राईब’चा वर्ल्ड प्रिमीयर नुकताच सिंगापूरमध्ये पार पडला. चित्रपटामधील कलाकार अमेय वाघ, जुई भागवत, राजसी भावे आणि दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी प्रीमियरला उपस्थिती दर्शवली होती. या खास शोला सिंगापूरमधील मराठमोळ्या प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात चित्रपटाचे कौतुक केले. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय, लेखन हे सगळेच भावले आहे.
‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा आताच्या काळाचा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक कथानकामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो, काहीतरी वेगळे पाहाण्याचा अनुभव आला, मराठीत असा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून सध्या येत आहेत.
सिंगापूरमधील प्रेक्षकांकडून आलेल्या या प्रतिक्रिया चित्रपटाच्या टीमला भारावणाऱ्या होत्या याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणाले, “चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर सिंगापूरमध्ये पार पडल्यानंतर मनाला थोडी धाकधूक होती की, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील? परंतु प्रत्यक्षात आपण दिग्दर्शन केलेल्या चित्रपटावर रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय, हे आनंददायी आहे. आता संपूर्ण जगात ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट चर्चेत येईल आणि शोज हाऊसफुल्ल जातील, याची मला नक्कीच खात्री वाटते.”
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.