* नसीम अन्सारी
बरेचदा कुठल्या न कुठल्या महिलेला असे बोलतांना पाहिले जाते की लग्नाआधी ती सडपातळ, चपळ होती, पण लग्नानंतर ती लठ्ठ झाली. हे खरं आहे की बहुतेक स्त्रिया विवाहानंतर लठ्ठ होतात. एवढेच नाही तर एखाद्याशी नजरानजर झाली आणि प्रेमाचा रोग लागला तरीही वजन वाढू लागते. अशाप्रकारे एखाद्याच्या प्रेमात पडणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु जर प्रेम केल्याने वजन वाढण्यास सुरूवात झाली तर ते त्या मुलींसाठी चिंतेचे कारण बनते, ज्या त्यांच्या फिगरविषयी खूप सावधगिरी घेतात.
ऑस्ट्रेलियाच्या ‘सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी’च्या एका अभ्यासानुसार, जेव्हा लोक एखाद्यासोबत नात्यामध्ये असतात किंवा एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे वजन वाढू लागते. संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात १५ हजाराहून अधिक लोकांना समाविष्ट केले. यामध्ये त्यांनी वेगवेगळया जीवनशैलीचे एकेरी आणि जोडपी दोन्ही प्रकारचे लोक सामील केले आणि त्यानंतर पुरुष आणि स्त्रियांच्या बॉडी मास इंडेक्सची तुलना करुन निकाल जाहीर केला.
संशोधनादरम्यान असे दिसून आले की जेव्हा लोक नात्यामध्ये गुंततात तेव्हा त्यांचा लठ्ठपणा वाढू लागतो कारण त्यांच्यामध्ये जोडीदाराला प्रभावित करण्याची भावना जवळजवळ संपुष्टात येते आणि शरीराचा बांधा राखण्याकडे ते अधिक लक्ष देत नाहीत.
संशोधनात सामील झालेल्या बऱ्याच लोकांनी हे कबूल केले की लग्नानंतर किंवा नात्यात गुंतल्यानंतर ते व्यायाम करणे, जॉगिंग करणे किंवा इतर शारीरिक हालचालींवर कमी लक्ष देऊ लागले होते. त्यांचे अधिकतर लक्ष जोडीदारासह फिरणे, मौज-मजा करणे आणि वेगवेगळया प्रकारच्या पदार्थांचा आनंद लुटणे यात व्यतीत झाले, ज्यामुळे त्यांचे वजन वाढत गेले. वैवाहिक जीवनातून आनंदी, समाधानी आणि सुरक्षित वाटणाऱ्या जोडप्यांचे वजन वाढण्याची अधिक शक्यता असते, कारण त्यांच्या मनावर इतर कुणाला आकर्षित करण्याचा दबाव नसतो.
वजन वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे प्रेमसंबंधात असलेले लोक व्यायामासाठी जिममध्ये जाण्यापेक्षा आपल्या जोडीदारासमवेत घरी जास्त वेळ घालवणे पसंत करतात. ही बदललेली जीवनशैलीदेखील वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे.