गाथा नवनाथांची

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी ‘गाथा नवनाथांची’ ही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नागनाथांचा  प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर एकीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला  मिळताहेत. पण आता मालिकेत दिसणार आहे अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखा. अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे. अक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत येणार आहे. गाथा नवनाथांची मालिकेतून अक्काबाई हे पात्र ती साकारणार आहे. तिच्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की अनुभवता येतील.

अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेत. अक्काबाई ही अघोरी स्त्री आहे. ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे. त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतील. नाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणे आणि नाथ परंपरा कायम ठेवणे हे आहे. पण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतील. नाथ तिला कसे सामोरे जाणार, हे प्रेक्षकांना आता मालिकेत नक्कीच पाहायला मिळेल.

पाहायला विसरू नका, ‘गाथा नवनाथांची’ सोम. ते शनि. संध्याकाळी ६.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

‘‘शाळेत असल्यापासूनच अभिनयाची इच्छा’’ – विजया बाबर

* सोमा घोष

मृदू स्वभाव आणि सुंदर बांधा असलेली २३ वर्षीय विजया बाबर ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे. तिने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. मुंबईतील विजयाने अभिनयासोबतच म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. ती एक अतिशय आकर्षक तरुणी आहे आणि तिने ‘मिस मुंबई’ चा किताबही जिंकला आहे. ‘शिकस्त ए इश्क’ हे तिचे मराठी नाटक होते, ज्यात तिने खूप सुंदर अभिनय केला होता. त्यानंतर तिने ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत चंदाची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली, पण कोविड काळातील लॉकडाऊनमुळे मालिका बंद झाली.   विजयाच्या यशात तिच्या भावा-बहिणींचा मोठा वाटा आहे, दोघेही इंजिनीअर आहेत, पण सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते नेहमीच एकत्र असतात. विजयाच्या आईचे नाव नीलम बाबर तर वडिलांचे नाव आनंदा बाबर आहे. सध्या विजया सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मध्ये बयोची मुख्य भूमिका साकारत आहे. तिने खास ‘गृहशोभिका’सोबत गप्पा मारल्या. त्यातीलच हा काही मनोरंजक भाग…

ही भूमिका करण्यामागचे काही विशेष कारण आहे का?

यात मी बयोची भूमिका साकारत आहे, जी मूळची कोकणातील एका छोटया गावातली आहे. गावात रुग्णालय नसल्याने तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या आईचे स्वप्न आहे की, तिच्या मुलीने डॉक्टर व्हावे. मी मोठया बयोची भूमिका साकारत आहे. बयो एकटीच मुंबईत येते आणि वैद्यकीय महाविद्यायात प्रवेश     घेते, इथे आल्यानंतर तिला सावत्र आई-वडील भेटतात, जे आजारी आहेत आणि         त्यांच्या उपचाराची जबाबदारी तिने स्वीकारली आहे.

ही भूमिका तुझ्या वास्तव जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

ही भूमिका माझ्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी लहानपणापासून अभिनयाचे स्वप्न पाहिले आहे. आज त्याच स्वप्नाच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला आहे. शाळेत असल्यापासूनच मला अभिनय करण्याची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यायात असल्यापासूनच मी रंगभूमीवर काम करू लागले. मी प्रायोगिक, मोनो अभिनय, स्किड्स इत्यादी सर्व प्रकारचा अभिनय केला आहे. प्रायोगिक नाटकातूनच मला अभिनयाची पहिली संधी मिळाली. मी स्वामी समर्थचे ७५० भाग पूर्ण केले. त्यानंतर मला ही मालिका मिळाली.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही. टीव्ही पाहताना आणि शाळेत स्किड्स करताना अभिनय करण्याची इच्छा माझ्यात निर्माण झाली.

तुला कुटुंबाचा पाठिंबा किती मिळाला?

मी अभिनय करायचं ठरवलं तेव्हा सगळयांना एकत्र बसवून वर्षभराचा वेळ मागून घेतला. मला या क्षेत्रात ऑडिशन देऊन अभिनयाचा प्रयत्न करता यावा म्हणून मी हा वेळ मागितला होता. सर्वांनी ते मान्य केले, पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी मी नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. मला माझी पहिली मालिका मिळाली, ती मी पूर्ण मेहनतीने केली, कारण अभिनय हेच माझो सर्वस्व आहे, मी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

तुला किती संघर्ष करावा लागला? पहिला ब्रेक कसा मिळाला?

मी स्वत:ला भाग्यवान समजते, कारण जेव्हा मी रंगभूमीवर काम करत होते त्यादरम्यान इंडस्ट्रीमधील कोणीतरी माझ्या अभिनयाची दखल घेत मला अभिनयाची संधी दिली आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मला चांगला ब्रेक मिळवून देणारी पहिली मालिका ठरली. या मालिकेतील माझे काम सर्वांना आवडले. त्यानंतर माझ्याकडे कामं येऊ लागली आणि मी बयोची भूमिका स्वीकारली. मला जास्त संघर्ष करावा लागला नाही, पण योग्य कथानक निवडणे हे माझ्यासाठी संघर्षाचे होते. पहिल्या मालिकेनंतर अनेक ऑफर्स आल्या, पण मी बयोची भूमिका निवडली, कारण ही भूमिका पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवर आधारित कथा आहे.

तुला डॉक्टरच्या भूमिकेसाठी किती तयारी करावी लागली?

या मालिकेत मला मालवणी भाषा बोलायची आहे, ज्याचा मला काहीही अनुभव नाही. ही खूप अवघड भाषा आहे, मी अजूनही ती शिकत आहे. यात संवादानुसार काना – मात्रा बदलाव्या लागतात. मात्र सर्वजण यासाठी मला मदत करतात.

तुला कोणत्याही पात्रातून बाहेर पडून दैनंदिन जीवनात जगणे किती आवघड वाटते?

हे फार अवघड नाही, कारण मी रंगभूमीवर खूप काम केले आहे. मी सर्व नवीन कलाकारांना नाटकात काम करण्याचा सल्ला देते, जेणेकरून त्याद्वारे त्यांना अभिनयाचे पूर्ण ज्ञान मिळेल.

या भूमिकेमुळे तुझ्यात किती बदल झाले असे तुला वाटते?

या भूमिकेत खूप सहनशीलता आणि विश्वास आहे, ज्यामुळे मला खूप प्रेरणा मिळत आहे.

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची तुद्ब्रा इच्छा आहे का?

मला हिंदीत काम करण्याची खूप इच्छा आहे. रणवीर सिंग आणि रणवीर कपूरसोबत सहकलाकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

लहानपणापासूनच मला फॅशन करायला आणि सगळयांसमोर नीटनेटके राहायला आवडते. मी कोणत्याही डिझायनरला फॉलो करत नाही, कारण आजकाल सोशल मीडियाचे जग खूप चांगले आहे, ज्यामध्ये खूप काही पाहायला मिळते. ट्रेंड फॉलो करण्याव्यतिरिक्त, मला आरामदायक कपडे घालायला आवडतात. माझे वॉर्डरोब रंगीत कपडयांनी भरले आहे.

मी खूप खवय्यी आहे, पण मी दोन वर्षांपासून घराबाहेर राहून अभिनय करत आहे. आता माझा सेट घराजवळ आहे, त्यामुळे मला रोज घरून जेवण येते, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मला आईच्या हातचे वरण, भात आणि वरून तुपाची धार असे जेवण खूप आवडते.

नवीन वर्षासाठीचा तुझा नवीन संकल्प कोणता?

वेगवेगळया भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न आहे. नवीन वर्षात मला माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे गुंतून जायचे आहे. मानसिकदृष्टया मला स्वत:ला समजावून सांगायचे आहे की, फक्त पैशांच्या मागे धावायचे नसते, आरोग्याला प्राधान्य देऊनच काम केले पाहिजे, कारण एखादी व्यक्ती कामात व्यस्त असते आणि स्वत:ची काळजी घेत नाही, जे योग्य नाही. याशिवाय मी बाहेरचे कमी खाते आणि वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करते. कामासोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा ठाम निर्धारही मनामध्ये करावा लागतो आणि एकदा का निर्धार केला की मग त्यासाठी वेळ आपसूकच मिळतो.

आवडता रंग – मूड असेल त्यानुसार.

आवडता पोशाख – भारतीय आणि पाश्चात्य.

आवडता परफ्यूम – बाथ आणि बॉडी वर्कस्.
आवडते पर्यटन स्थळ – केदारनाथ, ग्रीस.

वेळ मिळाल्यास – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

जीवनातील आदर्श – कुटुंबाची काळजी घेणे.

सामाजिक कार्य – सुदूर गावात चांगल्या रुग्णालयाची व्यवस्था करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – स्वत:वर विश्वास ठेवा.

सत्ता मिळाल्यास – शिक्षणातील भेदभाव दूर करणे.

‘लग्नकल्लोळ’ चे दुसरे गाणे प्रदर्शित

* नम्रता पवार

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या लग्नाचा कल्लोळ प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटातील ‘झणझणल्या काळजा वरती’ हे झणझणीत गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे धमाकेदार गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. तर जय अत्रे यांचे जबरदस्त बोल लाभलेल्या या गाण्याला प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=9UP8xOZSyF8

सिद्धार्थ जाधवचा एक वेगळाच लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या गाण्यातून याच्या काळजातील मयुरीविषयीची भावना, प्रेम तो व्यक्त करत आहे. हे जबरदस्त गीत ऐकायला जितके मस्त वाटते तितकेच पाहायलाही कमाल आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या गाण्याबद्दल डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ‘’ अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे आहे. सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यात या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने अधिकच भर टाकली आहे. सिद्घार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे. मला आशा आहे, पहिल्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

स्त्रियांबद्दलच्या अनोख्या दृष्टीकोनात भूमिका साकारणारी अभिनेत्री !

* सोमा घोष

मनोरंजन उद्योग वेगवेगळ्या कथांना न्याय देऊन त्या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री म्हणजे रिताभरी ! तिच्या चित्रपटांमधील सशक्त भूमिकासाठी ती नेहमीच चर्चेत असते. स्वतंत्र महिलांच्या सशक्त चित्रणातून स्टिरियोटाइप मोडतात. तिच्या आकर्षक कामगिरीने तिने केवळ प्रेक्षकांनाच भुरळ घातली नाही तर अनोख्या भूमिका साकारून नेहमीच सगळ्यांना प्रेरित केल.

रिताभरी चक्रवर्ती हिने साकारलेली फुलोरा भादुरी ही कथा सगळ्यांच्या पसंतीस पडली. फुलोराची फॅशन आवड आणि अपवादात्मक डिझाइनिंग कौशल्ये तिच्या स्वप्नांना चालना देतात.

तिने नंदिनी नावाचा तिचा आणखी एक प्रोजेक्ट नुकताच पूर्ण केला. सायंतानी पुतटुंडाच्या पुस्तकातून रुपांतरित केलेल्या “नंदिनी” या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा, आपल्या मुलीला वाचवण्याचा आईचा अविचल दृढनिश्चय दर्शवते. ही मालिका स्त्री भ्रूणहत्येसारख्या पितृसत्ताक नियमांना आव्हान देते, चक्रवर्तीच्या सशक्त स्त्री पात्रांच्या प्रभावशाली चित्रणात भर घालते.

रिताभरी हिने नेहमीच सशक्त स्त्री पात्रांचे प्रभावी चित्रण करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

“ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय

* सोमा घोष

अलीकडे लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमानच्या अंगात उत्साह सळसळललेला दिसतो.

त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात.

याविषयी बोलताना आयुषमान खुराना सांगतो, “ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं.”

तो पुढे सांगतो, “ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतो, भरपूर हशा आणि पोटदुखेपर्यंत मनोरंजन करते. आम्ही वचन देतो की लोकांना एक अद्वितीय अनुभव मिळेल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. हे खूप फायद्याचे आहे. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.”

दिनांक 25 ऑगस्ट रोजी ड्रीम गर्ल 2 चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल आणि नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल!

‘‘कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले’’ – अंजली तुषार नान्नजकर

* सोमा घोष

मराठी अभिनेत्री अंजली तुषार नान्नजकर, महाराष्ट्रातील सोलापूरमधील अक्कलकोट या गावातील रहिवासी आहे. तिने नेहमीच आपल्या कुटुंबासह काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. यात पती तुषार नान्नजकर यांनीही तिला साथ दिली. गाव सोडून मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे तिच्यासाठी सोपे नव्हते, पण तिने धीर धरला आणि प्रयत्न करत राहिली. तिने छोटया भूमिकांपासून सुरुवात केली आणि नंतर तिला मुख्य भूमिका मिळाली. आता अंजली पुढील मराठी चित्रपट आणि अल्बममध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. ती काय म्हणाली, हे तिच्याच शब्दात जाणून घेऊया.

तुझ्याबद्दल काय सांगशील?

मी अनेक अल्बम केले आहेत आणि आता मराठी चित्रपटात काम करत आहे. मी अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. माझे वडील सरकारी नोकरी करतात. आई सरपंच आहे. दोघांनी नेहमीच लोककल्याणाची कामे केली. त्यामुळेच मलाही कुणाला तरी मदत करावी असे सतत वाटायचे. सोबतच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायचे होते. मी रंगभूमीवर काम करण्यासाठी मुंबईत आले, कारण माझ्या कुटुंबातील बरेच लोक मराठी इंडस्ट्रीत काम करतात. त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. मी सोलापूरच्या अक्कलकोट गावची आहे. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमध्येच झाले. त्यानंतर मी मुंबईत फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले आणि येथेच राहिले. रंगभूमीवर काम केले आणि माझे हिंदी सुधारून घेतले. सुरुवातीला मी हिंदीतून अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मिळून प्रोडक्शन हाऊस सुरू केले, ज्यामध्ये मी अनेक अल्बम बनवले आहेत आणि पुढे एक मराठी चित्रपटही करत आहे.

तुला कुटुंबाचा किती पाठिंबा मिळाला?

सुरुवातीला कुटुंबाने मला अभिनय करण्यास नकार दिला. फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वांच्याच मनात भीती असते आणि इथे काम मिळणे सोपे नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, पण माझी मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती त्यांनी पाहिली. याशिवाय माझ्या गावातील एक व्यक्ती अभिनेता आहे. तिला पाहूनच मी अभिनय करू लागले, पण माझ्या आईवडिलांना मी अभिनय करावा असे वाटत नव्हते. मी अॅथलीट किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण मला रंगभूमीवर काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी विरोध केला नाही. टीव्हीवरचे माझे काम पाहून लोक माझ्या आईवडिलांकडे माझी स्तुती करू लागले, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. आईवडिलांनी मला खूप मानसिक सहकार्य केले. कधीच हार मानू नकोस, असा सल्ला ते नेहमी देतात. त्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचू शकले.

तू या क्षेत्रात पुढे कशी आलीस?

फॅशन डिझायनर असल्यामुळे हळूहळू मालिकांमधील कपडे डिझाईन करण्याचे काम मी करू लागले. त्यानंतर मी ‘ट्रूकल्चर’ हा माझा ब्रँड सुरू केला, ज्यामध्ये गरीब आणि अपंग स्त्रियांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकून मी त्यांना रोजगार उपलब्ध करून देते. दूरदर्शनवरील ‘कहीं देर ना हो जाए’ ही माझी पहिली मालिका होती. त्यानंतर मी मराठी चित्रपट आणि हिंदी मालिका केल्या. ‘फुलवा’, ‘माता की चौकी’, ‘अगले जनम मोहे बिटिया ना किजो’ इत्यादी अनेक मालिकांमध्ये मी बहीण आणि पत्नीची भूमिका साकारली आहे.

तुला ओळखीमुळे काम मिळणे सोपे झाले का?

हो, थोडे सोपे झाले, कारण मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. यामुळे माझ्यावरही चांगले काम करण्याचा दबाव असतो आणि ही माझ्या कारकिर्दीसाठी चांगली गोष्ट ठरली.

तुला किती संघर्ष करावा लागला?

सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला, कारण इंडस्ट्रीबद्दल प्रत्येकाचा चुकीचा समज आहे. ही इंडस्ट्री चांगली आहे, हे आईवडिलांना मला समजावून सांगावे लागले. मी खूप ऑडिशन दिले. बरेच लोक म्हणायचे की, मी अभिनय करू शकत नाही. मला तेवढी समज नाही, असे सांगून ते मला ही इंडस्ट्री सोडून जायला सांगायचे किंवा मराठी मुलगी असल्यामुळे तुझे हिंदीचे उच्चार चांगले नाहीत इत्यादी अनेक गोष्टी मला ऐकायला मिळायच्या. काही जण मला माझ्यातील उणिवा सुधारण्याचा सल्ला द्यायचे. गावातील लोकही माझ्या आईवडिलांना सांगत की, त्यांनी मला चुकीच्या ठिकाणी पाठवले. मुलगी आहे, तिला नोकरीला पाठवा, तिचे लग्न करा इत्यादी अनेक सल्ले ऐकत मी इथपर्यंत पोहोचले. ३ वर्षे प्रचंड संघर्ष केला. मुलींसोबत रूम शेअर करायचे, दिवसातून एकदाच खायचे. या सगळया गोष्टी मी माझ्या आईवडिलांना कधीच सांगितल्या नाहीत किंवा मी त्यांच्याकडून पैसेही मागितले नाहीत, कारण यामुळे त्यांना माझी काळजी वाटली असती. अनेकदा मला सोलापूरला परत जावेसे वाटायचे, पण नेमके तेव्हाच कामही मिळत होते.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

पहिला ब्रेक मिळताच मला खूप आनंद झाला, कारण मला काम मिळाले होते. कॅमेऱ्यासमोर काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले होते. मला अभिनेत्री नव्हे तर एक उत्तम कलाकार बनायचे होते. कॅमेऱ्यासमोर गेल्यावर मी खूप घाबरले, कारण माझ्यासमोर प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्र्रन होत्या. पहिली मालिका आणि माझे ते पहिलेच दृश्य होते. त्यांना समजले होते की, मी घाबरले आहे. त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावले आणि कॅमेऱ्याला मित्र मानण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी मला अभिनय नव्हे तर सहजपणे कसे बोलायचे ते सांगितले. यामुळे अभिनय करणे माझ्यासाठी सोपे झाले. लॉकडाऊनच्या काळात लोक काम करायला घाबरत होते, पण त्या काळात मला एका मराठी मालिकेमध्ये मोठे काम करण्याची संधी मिळाली आणि मी घराघरात नावारूपास आले. मी नेहमी अशीच भूमिका निवडली जी छोटी असूनही परिणामकारक ठरेल. नवीन कलाकारांमधील गुण ओळखूनच मी प्रोडक्शन हाऊस सुरू केले, जेणेकरून मी त्यांना संधी देऊ शकेन.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी मालिकांपेक्षा वेब सीरिज बघायला आवडतात आणि त्यात काम करण्याची माझी इच्छा आहे, पण मी अंतर्गत दृश्य करायला तयार नाही. आजकाल कौटुंबिक मालिकाही खूप आवडीने बघितल्या जातात आणि मला त्यात काम करायचे आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत काम करण्याची तसेच रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनय करण्याची इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी इंडस्ट्री आणि ट्रेंड पाहूनच फॅशन करते. मला विशेष करून जुनी अर्थात रेट्रो फॅशन आवडते. मी शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करते, पण घरी बनवलेलेच पदार्थ खायला मला जास्त आवडतात. प्रवासादरम्यान मी त्या ठिकाणचे पदार्थ नक्की खाऊन बघते.

महाशक्ती मिळाल्यास तुला देशात कोणते बदल घडवून आणायचे आहेत?

स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपले मत सांगण्याचे आणि ते सर्वांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, ही गोष्ट पुढेही कायम ठेवू इच्छिते.

आवडता रंग – लाल.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – द सिक्रेट.

आवडते परफ्यूम – डिओर.

आवडते पर्यटन स्थळ – दुबई, माझे गाव अक्कलकोट.

वेळ मिळाल्यास – गरीब आणि अपंग स्त्रियांना रोजगार मिळवून देणे.

जीवनातील आदर्श – गरजूंना मदत करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – इतरांना आनंद देणे.

‘‘गावात महिलांसाठी शिक्षण, जनजागृती गरजेची’’ – पायल मेमाणे

* सोमा घोष

२३ वर्षीय अभिनेत्री पायल मेमाणेने अनेक मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची इच्छा होती. त्यासाठी तिला घरच्यांचाही खूप पाठिंबा मिळाला. हसतमुख आणि विनम्र पायल लावणी आणि कथ्थक नृत्यांगना आहे. तिने मराठी इंडस्ट्रीत रियालिटी शो ‘अप्सरा आली’मधून पदार्पण केले, ज्यात तिच्या नृत्याचे खूपच कौतुक झाले आणि तिला अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सध्या सोनी मराठीवरील ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ या मालिकेत ती एका ट्रान्सजेंडरची दत्तक मुलगी दिशाची भूमिका साकारत आहे. ही तिची सर्वात मोठी आणि मुख्य भूमिका आहे, जी साकारताना ती खूपच आनंदी आहे. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान तिच्याशी गप्पा मारता आल्या. त्या खूपच मनोरंजक झाल्या. त्याच गप्पांमधील हा काही खास भाग.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाली. मी एक नृत्यांगना आहे आणि लहानपणापासूनच माझ्या आईलाही नृत्याची खूप आवड होती. म्हणूनच तिने मला लहान वयातच नृत्याची शिकवणी लावली. हळूहळू शाळा आणि महाविद्यालयात मी माझ्या या कलेचे सादरीकरण करू लागले.

तुला कुटुंबाचा कितपत पाठिंबा मिळाला?

माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. माझे वडील पुण्यात नोकरी करतात. माझ्या यशामुळे त्यांना अत्यानंद होतो. माझ्या चित्रिकरणात काही अडचण आल्यास दोघेही तिथे येऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहातात. सुरुवातीला पुण्यातून ऑडिशनसाठी मुंबईला आईसोबत ६ वाजता जायचे आणि संध्याकाळी पुण्याला परत यायचे. वडिलांनी माझ्यावर कधीच कुठले निर्बंध लादले नाहीत, उलट मला खूप प्रोत्साहन दिले, कारण मुंबईत राहाणे महागडे असते. आता या मालिकेमुळे मला एकटीलाच राहावे लागत आहे, पण माझे आई-वडील रोज फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी करतात. चांगले काम मिळवण्यासाठी माझी सतत धडपड सुरू असते. कसदार अभिनय करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली, कारण मी एक नृत्यांगणा आहे, अभिनेत्री नाही.

तू या क्षेत्रात कशी आलीस?

मी २०१८ मध्ये एका डान्स शोमध्ये भाग घेतला होता. तो माझा पहिला शो होता, नंतर टीव्हीवरील मालिकांसाठी मी ऑडिशन दिले आणि हळूहळू अभिनयात उतरले. नृत्यातून मी या क्षेत्रात प्रवेश केला. मला टीव्हीवरील मालिकांमधील अभिनयाबद्दल फारशी कल्पना नव्हती. कॅमेऱ्यासमोर कसे उभे राहायचे तेच कळत नव्हते. सुरुवातीच्या काळात मी अनेक मालिकांमध्ये अतिशय छोटया भूमिका साकारल्या. त्यामुळे मला हळूहळू अभिनय समजू लागला आणि त्यानंतर आता ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ ही मालिका माझी मुख्य भूमिका असलेली प्रमुख आणि मोठी मालिका आहे.

लावणी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे, तुला त्यातून काय     शिकायला मिळते?

लावणी हा महाराष्ट्राचा जुना नृत्य प्रकार आहे. मराठीत त्याला ‘तमाशाचा फड’ म्हटले जाते. पूर्वी लावणी गावोगावी सादर केली जात असे, परंतु आज ती मनोरंजनाचे माध्यम झाली आहे. यात अदांना नजाकतीने सादर केले जाते आणि ही कला सादर करणारे खूप मोठमोठे कलाकार आहेत. मलाही लावणी करायला खूप आवडते. लावणीकडे आनंदी राहण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते.

या मालिकेमधील तुझा अनुभव कसा आहे?

मला ही मालिका करताना खूप छान वाटते, कारण यात माझी भूमिका खूप भावनिक आहे. यामध्ये माझी आई ट्रान्सजेंडर आहे आणि जग तिच्यासोबत खूप वाईट वागते. आईवर होणारा अन्याय दूर करून तिला न्याय मिळवून देण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा आहे. आईची कोणतीही समस्या मी माझी समस्या मानते. यात माझ्यासोबत सर्व अनुभवी आणि दिगग्ज कलाकार आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. आमची टीम खूप चांगली आहे.

ही भूमिका तुझ्या वास्तविक जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

खूप जास्त मिळतीजुळती आहे, कारण माझी आई कविता मेमाणे माझ्यासाठी खूप खास आहे. सध्या मी चित्रिकरणासाठी घरापासून दूर राहात असल्यामुळे मला माझ्या आईची खूप आठवण येते. ज्याप्रमाणे मालिकेमधील दिशा आईचे रक्षण करणारी, तिची काळजी घेणारी आहे, तशीच मी माझ्या आईची खूप काळजी करते. तिला कोणी काही बोलले किंवा तिला काही झाले तर त्याचा माझ्यावर खूप परिणाम होतो.

हिंदी चित्रपट आणि वेबमध्ये काम करण्याची तुझी इच्छा आहे का?

संधी मिळाली तर मला नक्कीच तिथे काम करायला आवडेल. हिंदी चित्रपट आणि वेबमध्ये काम करण्याची माझी खूप इच्छा आहे.

हिंदी वेब सीरिजमध्ये खूप अंतर्गत दृश्य असतात. तू ती किती सहजतेने करू शकतेस?

अंतर्गत दृश्य करण्यासाठी एखाद्याचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक असते. तुमची सादरीकरणाची पद्धतही योग्य असायला हवी. कथेची गरज असेल तर अशी दृश्ये करायला काही हरकत नाही, पण चित्रपटाला मसालेदार फोडणी देण्यासाठी अंतर्गत दृश्य करायची असतील तर ते मला मान्य नाही.

हिंदी चित्रपटात काम करायचे झाल्यास कोणत्या सहकलाकार किंवा दिग्दर्शकासोबत तुला काम करायला आवडेल?

अभिनेता विकी कौशल हा माझा बालपणीचा क्रश आहे. मी त्याची खूप मोठी चाहती आहे. चित्रपट कुठलाही असो, तो माझा सहकलाकार असेल तर मला खूप आवडेल. याशिवाय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मी फॅशनेबल आणि खवय्यी दोन्ही आहे. आईने बनवलेले मांसाहारी पदार्थ मला खूप आवडतात. मी जंक फूड फार खात नाही. गोड पदार्थांमध्ये मला रसगुल्ले किंवा गुलाबजाम खूप आवडतात.

मला फॅशन आवडते. मी स्वप्निल शिंदे आणि मनीष मल्होत्रा यांना फॉलोअप करते. माझ्या लग्नात मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घालायला मला आवडेल.

महिला दिननिमित्त तुझा संदेश काय आहे?

अजूनही मुलींना मुलांइतके स्वातंत्र्य मिळालेले नाही. गावाकडच्या मुलींना अजूनही संपूर्ण शिक्षण मिळत नाही. दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी, असा विचार करून आईवडील तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करायला बघत नाहीत. त्यामुळे मुलीचे घर ना तिचे माहेर असते ना सासर, कारण माहेरी तिला दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी तर सासरी दुसऱ्याच्या घरून आलेली मुलगी समजले जाते. मुलीचे खरे घर नेमके आहे तरी कुठे? मला सर्वांकडूनच या प्रश्नाचे उत्तर खरोखर हवे आहे. शहरात नाही, पण गावात महिलांसाठी शिक्षण आणि जनजागृती गरजेची आहे.

आवडता रंग – काळा, लाल, पांढरा.

आवडता पोशाख – वन पीस, जीन्स-टी शर्ट.

आवडते पुस्तक – चेतन भगतचे ‘द गर्ल इन रूम 105’.

आवडते पर्यटन स्थळ – काश्मीर, पॅरिस.

वेळ मिळाल्यास – नृत्याचा सराव, कुटुंबासह वेळ घालवणे.

आवडते परफ्यूम – जाराचे आर्किड.

स्वप्नातील राजकुमार – सहकार्य करणारा, चांगली व्यक्ती आणि प्रेमळ.

जीवनातले आदर्श – जीवनात चांगली व्यक्ती बनणे.

सामाजिक कार्य – अनाथ मुलांसाठी काम.

स्वप्न – खूप मोठी आणि चांगली अभिनेत्री बनणे.

हरीहरन आणि साधना जेजुरीकरांची ‘दूरीयां…’ गझल रसिकांच्या भेटीला

* सोमा घोष

मखमली आवाजाचे धनी असलेले गायक अशी ओळख असणारे हरिहरन यांनी जगभरात आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. काळानुरूप संगीतामध्ये होणारे बदल आत्मसात करून आजही ते संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हरिहरन यांनी गायिका साधना जेजुरीकर यांच्या साथीनं गायलेली एक सुमधूर गझल नुकतीच रसिक दरबारी सादर करण्यात आलं आहे. प्रकाशनानंतर अल्पावधीतीच या गझलला संगीतप्रेमींची पसंती मिळत असून संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर या गाण्यावर प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे.

साधना जेजुरीकर यांची निर्मिती असलेली ‘दूरीयां…’ हि गझल नुकतीच समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकच्या बॅनरखाली अंधेरीतील रेड बल्ब स्टुडिओमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. हरीहरन यांच्या साथीने साधना जेजुरीकर यांनी आपल्या सुमधूर गायकीच्या आधारे गझलमधील शब्दरचनांना अचूक न्याय दिला आहे. ‘दूरीयां…’बाबत हरीहरन म्हणाले की, आजवर मी बऱ्याच गझल्स गायल्या आहेत, पण ‘दूरीयां…’ गाताना एका वेगळ्या प्रकारचं आत्मीक समाधान लाभलं. या गीतातील शब्दरचना आणि त्याला अनुरूप अशी संगीतरचना यांचा अद्भूत संगम संगीतप्रेमींच्या मनाला भिडणारा असून, मला स्वत:ला आनंदाची अनुभूती देणारा ठरला आहे. ही गझल ऐकताना आणि पाहताना रसिकांनाही याची प्रचिती येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘दूरीयां…’ ही गझल खऱ्या अर्थानं आजच्या काळातील संगीतप्रेमींना भावणारी असल्याचं सांगत साधना जेजुरीकर म्हणाल्या की, रसिकांची आवड लक्षात घेऊन ‘दूरीयां…’ची निर्मिती करण्यात आली आहे. कर्णमधूर संगीतरचनेला दर्जेदार निर्मितीमूल्यांची जोड देऊन सादर करण्यात आलेली ‘दूरीयां…’ ही गझल हरिहरन यांनी आपल्या गायकीनं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. या गझलच्या निमित्तानं त्यांच्यासारख्या आघाडीच्या गायकासोबत गाण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी आहे. संगीतप्रेमींही ‘दूरीयां…’वर नक्कीच भरभरून प्रेम करतील याची खात्रीही त्यांनी दिली.

मदन पाल यांनी लिहिलेली ‘दूरीयां…’ गझल संगीतकार कैलाश गंधर्व यांनी संगीतबद्ध केली आहे. या गझलचा व्हिडिओ कैलाश पवार यांनी दिग्दर्शित केला असून, प्रमोदकुमार बारी यांनी कोरिओग्राफी केली आहे. हरीहरन, साधना जेजुरीकर, हरीश वांगीकर आणि ऐश्वर्या माने यांच्यावर या गझलचा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. पिकल म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध असणाऱ्या ‘दूरीयां…’ची सिनेमॅटोग्राफी प्रतीक बडगुजर यांनी केली असून अक्षय हरीहरन संगीत निर्माते आहेत. दिग्दर्शक कैलाश पवार यांनीच ‘दूरीयां…’चं एडिटींगही केलं आहे.

‘‘कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही’’  अदिती सारंगधर

* सोमा घोष

अदिती सारंगधर ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने मागील २० वर्षांमध्ये अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अदितीला अभिनयाची आवड नव्हती. मात्र, काळाच्या ओघात तिचे आयुष्य आणि करिअर बदलत गेले आणि शेवटी अभिनयालाच तिने आपले सर्वस्व मानले. तिचे वडील दीपक सारंगधर हे डॉक्टर होते आणि आई शैला सारंगधर बँकेत अधिकारी पदावर काम करत  होत्या.

अदिती मराठी इंडस्ट्रीतली सर्वात प्रसिद्ध आणि जास्त मानधन मिळणारी अभिनेत्री आहे. तिला डेली सोपची राणी म्हटले जाते, कारण तिची कुठलीही मालिका कमीत कमी ४ वर्षे चालते. कसदार अभिनयासाठी ती खूप मेहनत घेते आणि स्वत:ला एक ब्रँड मानते, जो तिला स्वस्तात विकायचा नाही.

अभिनयाव्यतिरिक्त तिला कथ्थक आणि सालसा नृत्यही येते. करिअरच्या या यशस्वी प्रवासात काही मित्र-मैत्रिणींमुळे ती सुहासला भेटली, जो  इंजिनीअर होता. ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केले. त्यांचा मुलगा अरिन ६ वर्षांचा आहे. सामाजिक विषयावरील तिचे ‘चर्चा तर होणारच’ हे विनोदी अंग असलेले सामाजिक विषयावरील नाटक खूपच प्रसिद्ध आहे. याचे प्रयोग ती मुंबईत करत आहे. यात ती एका सामाजिक कार्यकर्तीच्या भूमिकेत आहे. याशिवाय अदिती मराठी मालिका आणि चित्रपटही करत आहे.

अदितीला ‘गृहशोभिका’ खूप आवडते, कारण हे मासिक महिलांच्या समस्यांना ठामपणे मांडून त्यावर निर्भयपणे आपले विचार मांडते. ती सांगते की, तिची आईही हे मासिक वाचायची.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याचा मी कधीच विचार केला नव्हता, कारण वयाच्या प्रत्येक टप्प्याबर माझे विचार बदलत गेले. लहान असताना वडिलांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जायचे, तेव्हा वडील वेटरला टीप्स देताना बघून मला वेटरचे काम करायचे होते. थोडी मोठी झाल्यावर आणि विमानाने प्रवास करू लागल्यावर मला एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरीचे काम आवडू लागले आणि मला तेच करायचे होते. महाविद्यालयात गेल्यावर जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास करू लागले तेव्हा माझी बाल मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. महाविद्यालयात असताना रंगभूमीशी जोडले गेले आणि नाटकांमध्ये अभिनय करू लागले.

त्यामुळे एकपात्री प्रयोगाशी जोडले गेले. त्यावेळी माझ्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले. यातूनच मला अभिनयची गोडी लागली. माझ्या कुटुंबातील कोणीही  अभिनयाच्या क्षेत्रातील नाही. सर्व डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स आहेत. मी सुट्टीत वैद्यकीय किंवा विज्ञानाच्या सहलीला जायचे.

तुम्हाला संघर्ष किती करावा लागला?

मला कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही. गेले एक वर्ष मी माझ्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता, पण त्यानंतरही मला चांगले काम मिळाले. प्रत्यक्षात कामासाठी संघर्ष करावा लागला नाही, पण मी ज्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यासाठी योग्य माणसे आजूबाजूला असणे आवश्यक असते, जेणेकरून मी योग्य काम निवडू शकेन. माझ्या आयुष्यात मी अनेकदा चुकीचे निर्णयही घेतले आहेत, मात्र ते चुकीचे असूनही मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही आणि माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. मी पैशांच्या मागे धावत नाही, पण पैसे नसल्यास दु:खी होत नाही, जीवन जसे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही कलाकाराने सातत्याने अभिनय करू नये. यामुळे त्याला स्वत:ला समजून घ्यायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत एखादा ब्रेक घेण्याची गरज असते, कारण डेली सोपमध्ये काम केल्याने कलाकाराच्या प्रतिभेत नावीन्य शिल्लक राहात नाही. कोणत्याही कलाकाराला डेली सोप नाईलाजाने करावी लागते. कोणाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तर कोणाला अन्य काही कारणामुळे डेली सोप हा उत्तम पर्याय वाटत असतो. मी स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी शिकले आहे, पण पूर्ण करायला मला वेळ मिळत नाही. १० महिन्यांत मी माझी सर्व अर्धवट कामे पूर्ण केली आहेत.

तुम्हाला कौटुंबिक आधार कितपत मिळाला?

माझ्या कुटुंबातील सर्वजण शिक्षण क्षेत्रातील आहेत, त्यामुळे माझी अभिनयाची आवड पाहून त्यांना धक्काच बसला. तरीही जे काही काम करशील त्यात तुझे सर्वोत्तम द्यायला विसरू नकोस, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझ्या कामाचे कौतुक होताना पाहून त्यांना अभिमान वाटू लागला. अभिनेत्यापेक्षाही एक चांगली व्यक्ती बनणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये मला चांगली झोप लागणे आवश्यक आहे, ज्यामुळे मी सुखाने झोपू शकेन. सुरुवातीला माझ्या वडिलांना माझे काम आवडत नव्हते, पण नंतर माझे काम झाल्यावर ते मला न्यायला गाडी घेऊन स्टेशनपर्यंत यायचे. माझ्या कुटुंबीयांनी मला घराबद्दल कधीच कोणताही तणाव येऊ दिला नाही. म्हणूनच मी प्रत्येक कामात दिलेला शब्द पाळून माझे १०० टक्के देऊ शकले. मी इथपर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांपासून ते माझ्या सासरच्या सर्वांना देते. माझ्या मुलाला माझे काम माहीत आहे, पण त्याने ते खूपच कमी पाहिले आहे. त्याला बाल रंगभूमी खूप आवडते. मी त्याला तिथे घेऊन जाते.

तुमचे आयुष्य बदलून टाकणारी मालिका कोणती?

‘वादळवाट’ ही मालिका, ज्यात मी प्रमुख भूमिकेत होते आणि ती मालिका साडेचार वर्षे चालली. या मालिकेमुळेच मी घराघरात ओळखले जाऊ लागले. यातील माझ्या कामाचे सर्वांनी कौतुक केले, त्यामुळे मला पुढे जाण्यास मदत झाली.

डिजिटल इंडियामुळे आजकाल मालिकांची रेलचेल वाढली आहे, त्याचा जरा अतिरेकच होत नाही का? तूम्ही त्याकडे कशा पाहतात?

इंडिस्ट्रीची प्रगती होत असून ती मोठी होत असल्याचे पाहून बरे वाटते, मात्र प्रगतीसोबतच काही चुकीच्या गोष्टीही येतात. त्यातून सावरत पुढे जाणे गरजेचे असते. हे खरे आहे की, सध्या कलाकारांना काम करण्याची जास्त संधी मिळत आहे.

तुम्ही कामासोबतच कुटुंबाची काळजी कशी घेता?

आम्ही दोघांनीही आमची जबाबदारी समान वाटून घेतली आहे. गरज पडल्यास तो घरात झाडूही मारतो आणि मी भांडी घासते. मी घराबाहेर अभिनेत्री असले तरी सकाळचा नाश्ता आणि चहा बनवून द्यायला मला आवडते. गरज भासल्यास सुहास मुलाला शाळेत पाठवतो आणि नाश्ताही बनवतो. बघायला गेल्यास हे नाते पती-पत्नीसोबतच एका चांगल्या जोडीदाराचेही आहे. हे नाते शेअर मार्केटसारखे असते जे कधी वर तर कधी खाली जाते.

तुमची प्रेमाची संकल्पना किती बदलली आहे?

प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आज पूर्णपणे बदलला आहे. तो वस्तूनिष्ठ झाला आहे. आजकाल लैंगिक आकर्षण जास्त वाढत आहे आणि प्रत्येकाला जास्त पैसे हवे आहेत. त्यामुळेच सध्या दिखाऊपणा वाढला आहे. कुठेही कोणाच्याही परवानगीची गरज भासत नाही. पूर्वी लपूनछपून भेटण्यात जी मजा यायची ती आता उरलेली नाही. ‘हम आपके है कौन’, ‘हम है राही प्यार के’ यासारखे चित्रपट जास्त आवडीचे झाले आहेत. पूर्वी प्रेमात एक ठेहराव असायचा आता तो दिसत नाही. याशिवाय आज लोकांमध्ये बांधिलकी आणि सहिष्णुता कमी होत चालली आहे.

नवी मालिका – ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘प्रतिशोध’ या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल  बावडेकरबरोबरच पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा पाहायला मिळणार आहे. ती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.

प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. येत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता.

‘प्रतिशोध’ – झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे. या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी आहे आणि त्यांच्या  संघर्षाची कहाणीही या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नव्या मालिकेतील अमोलची तृतीयपंथीची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. अशा धाटणीची भूमिका प्रथमच साकारण्याची संधी मिळाल्याने तो या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेचा पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे आगळंवेगळं कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचं स्वागत केलं आणि अमोलच्या भूमिकेला पसंतीही दर्शवली. अरुण नलावडे आणि अक्षय वाघमारे हे कलाकारही या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. त्यातच आता ही थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने रंगेल यात काही शंका नाही.  भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा. पाहायला विसरू नका ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची.

१६ जानेवारी पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें