* सोमा घोष
मराठी अभिनेत्री अंजली तुषार नान्नजकर, महाराष्ट्रातील सोलापूरमधील अक्कलकोट या गावातील रहिवासी आहे. तिने नेहमीच आपल्या कुटुंबासह काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. यात पती तुषार नान्नजकर यांनीही तिला साथ दिली. गाव सोडून मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणे तिच्यासाठी सोपे नव्हते, पण तिने धीर धरला आणि प्रयत्न करत राहिली. तिने छोटया भूमिकांपासून सुरुवात केली आणि नंतर तिला मुख्य भूमिका मिळाली. आता अंजली पुढील मराठी चित्रपट आणि अल्बममध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितले. ती काय म्हणाली, हे तिच्याच शब्दात जाणून घेऊया.
तुझ्याबद्दल काय सांगशील?
मी अनेक अल्बम केले आहेत आणि आता मराठी चित्रपटात काम करत आहे. मी अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. माझे वडील सरकारी नोकरी करतात. आई सरपंच आहे. दोघांनी नेहमीच लोककल्याणाची कामे केली. त्यामुळेच मलाही कुणाला तरी मदत करावी असे सतत वाटायचे. सोबतच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायचे होते. मी रंगभूमीवर काम करण्यासाठी मुंबईत आले, कारण माझ्या कुटुंबातील बरेच लोक मराठी इंडस्ट्रीत काम करतात. त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली. मी सोलापूरच्या अक्कलकोट गावची आहे. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापूरमध्येच झाले. त्यानंतर मी मुंबईत फॅशन डिझाइनचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले आणि येथेच राहिले. रंगभूमीवर काम केले आणि माझे हिंदी सुधारून घेतले. सुरुवातीला मी हिंदीतून अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीसोबत मिळून प्रोडक्शन हाऊस सुरू केले, ज्यामध्ये मी अनेक अल्बम बनवले आहेत आणि पुढे एक मराठी चित्रपटही करत आहे.
तुला कुटुंबाचा किती पाठिंबा मिळाला?
सुरुवातीला कुटुंबाने मला अभिनय करण्यास नकार दिला. फिल्म इंडस्ट्रीबद्दल सर्वांच्याच मनात भीती असते आणि इथे काम मिळणे सोपे नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, पण माझी मेहनत आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती त्यांनी पाहिली. याशिवाय माझ्या गावातील एक व्यक्ती अभिनेता आहे. तिला पाहूनच मी अभिनय करू लागले, पण माझ्या आईवडिलांना मी अभिनय करावा असे वाटत नव्हते. मी अॅथलीट किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती, पण मला रंगभूमीवर काम मिळाले आणि त्यानंतर त्यांनी विरोध केला नाही. टीव्हीवरचे माझे काम पाहून लोक माझ्या आईवडिलांकडे माझी स्तुती करू लागले, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. आईवडिलांनी मला खूप मानसिक सहकार्य केले. कधीच हार मानू नकोस, असा सल्ला ते नेहमी देतात. त्यामुळेच तर मी इथपर्यंत पोहोचू शकले.