वाऱ्याची झुळूक

कथा * अर्चना पाटील

‘‘सौ मित्र, मजा आहे यार तुझी.’’

‘‘का रे निनाद, काय झालं?’’

‘‘सोन्यासारखी दोन मुले आहेत. स्वत:चं घरसुद्धा घेतलंस, चारचाकी गाडी आहे, कस्तुरीसारखी समजुतदार बायको आहे, अजून काय पाहिजे यार आयुष्यात.’’

गाडी ऑफीसच्याच दिशेने जात होती. सौमित्र ड्रायव्हिंग करत होता. तेवढयात ऑफिसमधीलच दोन मुली बसस्टॉपवर दिसल्या.

‘‘निनाद, सोडायचं का यांना ऑफिसला?’’

सौमित्रने निनादला बोलण्याची वेळच येऊ दिली नाही, मुलींजवळच गाडी नेऊन थांबवली.

‘‘शाल्मली मॅडम, सोडू का ऑफिसला?’’

‘‘हो ,हो सोडा की,’’ मनवा पटकन बोलली आणि दरवाजा उघडून गाडीत बसली. त्यामुळे शाल्मलीही बसली.

‘‘तुम्ही रोजच इथून बसमधे चढता ना.’’

‘‘हो,’’ मनवानेच उत्तर दिलं

‘‘आम्हीही रोज इकडूनच जातो. सोडत जाऊ तुम्हालाही, काय रे निनाद.’’

‘‘हो ना, काय हरकत आहे. संध्याकाळी थांबा. आपण सोबतच येऊ. वीस पंचवीस मिनीटांचा रस्ता आहे.’’

सौमित्रला सावळया रंगाची शाल्मली त्याच्या गाडीत हवी होती. त्याचा उद्देश सफल झाला. सौमित्र दिसायला हँडसम होता. ऑफिसमध्ये त्याची पोस्टिंगही चांगली होती. ऑफिसच्या सर्वच लेडीज त्याच्या मागेपुढे करायच्या. शाल्मलीलाही तो आवडू लागला होता. सतत सगळयांना हसवायचा. पार्टी अरेंज करायचा. नवनवीन कलरचे शर्ट्स आणि जिन्स, एकदमच भारी पर्सनॅलिटी होती त्याची. त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर तर काळा गॉगल शोभून दिसायचा. हळूहळू सौमित्र शाल्मलीशी जवळीक वाढवू लागला.

‘‘खुपच कमी वयात नोकरी करत आहेस तू, सॉरी हं… मी पटकन एकेरीवर येतो. अजून कॉलेज शिकायला हवं होतं.’’

‘‘वडील आजारी असतात माझे, म्हणून शिक्षण सोडलं. घरी पैशांची चणचण असते.’’

‘‘तुला एक सांगु का? तुझा रंग जरी सावळा असला तरी तू माझ्या दृष्टीने खुप सुंदर आहेस. या ऑफिसमध्ये तुझ्याइतकं हुशार कोणीच नाहीए.’’

‘‘धन्यवाद सर.’’

‘‘धन्यवाद काय, चल कॉफी घेऊ बाहेर. थोडं मोकळं बोलता येईल.’’

‘‘नाही नको, हे जरा जास्तच होईल.’’

‘‘काय जास्त होईल? मी सांगतो आहे ना. चल गुपचूप.’’

शाल्मलीही निमुटपणे निघून गेली. ऑफिसमध्ये दोघांची चर्चा चांगलीच रंगली.

‘‘सौमित्र, काय सध्या शाल्मलीच्या मागेमागे फिरतो? ‘दोघंही आज मँचिंग…’ अशीच चर्चा ऑफिसमध्ये सुरू असे. शाल्मलीला सगळे समजत होते पण तिच्यासाठी सौमित्र म्हणजे सुखाची सर. त्यामुळे नाव जरी खराब होत होतं तरी ती बिनधास्त सौमित्रसोबत फिरत असे. शाल्मली आणि सौमित्रच्या संबंधांना आता सहा महिने झाले होते. सौमित्र सतत शाल्मलीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असे. तिच्यासाठी, तिच्या कुटुंबातील लोकांसाठी सतत काहीतरी नवीन वस्तु घेत असे. एक दिवस सौमित्र तिला घेऊन गावाबाहेरच्या हॉटेलवर आला. दुपारचे बारा वाजले होते. शाल्मलीला वाटतं होतं हा नेहमीसारखाच कुठेतरी बाहेर जेवण करायला घेऊन आला. त्यामुळे ती बिनधास्तपणे बोलत होती, हसत होती. सौमित्रने बुक केलेल्या रूममध्ये ते दोघे आले.

‘‘काय गं, काय जेवशील माझी शामू.’’

‘‘काहीही मागवा. नेहमी तुम्हीच ऑर्डर देता ना.’’

‘‘शाल्मली, मला तू खुप आवडतेस. मी सतत तुझं निरीक्षण करत असतो. फक्त एकदा माझ्या मिठीत ये.‘‘

‘‘काहीतरीच काय सौमित्र, आपण केवळ चांगले मित्र आहोत.’’

‘‘काहीतरीच काय, माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर. म्हणुनच तर मी सतत तुझ्यासोबत फिरत असतो. त्यामुळेच मला तुला स्पर्शही करावासा वाटतो.‘‘

‘‘सौमित्र, एक मिनीट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तुम्ही विवाहीत आहात. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाहीए.’’

‘‘काहीच नाही म्हणजे, मग का हसतेस, बोलतेस माझ्याशी.’’

‘‘एक स्त्री आणि पुरूषात कधीच निकोप मैत्री होऊ शकत नाही हेच खरं. माझ्या अडचणी तुम्ही समजून घेता. कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आयुष्य एन्जॉय करायला तुम्ही मला शिकवलं. धन्यवाद सर. पण कदाचित त्यामुळे तुम्ही मला वेगळंच समजलात. माझी चुक झाली. येते मी,’’ शाल्मली खोलीतून बाहेर निघायला लागली. तेवढयात सौमित्रने दरवाजा बंद करून तिचा रस्ता अडवला.

‘‘थांब, शाल्मली, कशाला एवढा भाव खातेस? सावळया रंगाची तर आहेस तू. तुझ्यापेक्षा सुंदर मुली मी सहज पटवू शकतो.’’

‘‘सर, माझा तर रंगच काळा आहे. तुमचं तर मन काळं आहे. तुम्ही विवाहीत आहात. तुम्हाला दोन मुलं आहेत. तरीही तुम्ही माझ्यासारख्या अविवाहीत मुलीकडून शरीरसुखाची अपेक्षा करतात? निघते मी. कदाचित मी तुमच्यासोबत सहा महिने ऑफिसच्या बाहेर फिरले नसते, तर आज हा दिवस आला नसता. म्हणून मीच तुमची माफी मागते. सर, तुम्ही मनाने खुप चांगले आहात. कशाला एका क्षणाच्या मोहासाठी स्वत:च्या चारित्र्यावर कलंक लावून घेताय? तुमची बायको कस्तुरी, ती आयुष्यभर तुमच्याशी एकनिष्ठ राहणार आहे. कमीत कमी तिचा तरी विचार करा. माझंही उद्या कोणाशीतरी लग्न होईल. त्यावेळी मी नववधुच असले पाहिजे. जाऊ द्या मला.’’

सौमित्र दरवाजातून बाजुला सरकला. शाल्मलीही रडतरडतच हॉटेलमधून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली.

‘‘सौमित्र, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही एक वाऱ्याची झुळुक बनुन माझ्या आयुष्यात आलात. खुप खूप प्रेमाचा वर्षाव केलात. पण यापुढे परत कोणत्याच स्त्रिच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करू नका. कारण स्त्रिया खूप भावनिक असतात. एखाद्या पुरूषाकडून जेव्हा त्यांचा अपमान होतो, तेव्हा तो क्षण त्यांना असह्य असतो. मी तुम्हाला आवडते. मलाही तुमचा सहवास आवडतो. पण त्यासाठी आपण नैतिकतेचे नियम तर धुळीला मिळवू शकत नाही ना.’’

‘‘शाल्मली, मी चुकलो. मला माफ कर. मला नव्या नजरेने तुझ्याशी मैत्रीची सुरूवात करायची आहे.’’

‘‘सॉरी सर, आता मला उभ्या आयुष्यात पुन्हा कोणत्याच पुरूषासोबत मैत्री करायची नाहीए. मला माझी चुक सुधारायची आहे. या सहा महिन्यात तुम्ही मला जो मानसिक आधार दिलात, त्याबद्दल मी तुमची आयुष्यभर ऋणी राहिन.’’

योग्य अयोग्य

कथा * अर्चना पाटील

रावसाहेब हे गावातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. लक्ष्मी ही त्यांची एकूलती एक कन्या. लक्ष्मी एकदम देखणी होती. कोणालाही ती आपल्या सुंदरतेचा आणि गोड गोड बोलण्याचा वापर करून सहज आपल्या जाळयात ओढून घ्यायची व कोणाकडूनही आपले काम बरोबर काढून घ्यायची. तशी लक्ष्मी एक सद्गुणी व संस्कारी मुलगी होती. रावसाहेबही आपल्या कन्येसाठी सलग दोन वर्षापासून वरसंशोधन करत होते. लक्ष्मीच्या सुंदरतेमुळे व रावसाहेबांच्या श्रीमंतीमुळे स्थळांची काही कमी नव्हती. काही मुले लक्ष्मीला आवडायची नाहीत तर काही रावसाहेबांना. त्यामुळे लक्ष्मीच्या लग्नाचे घोडे पेंड खात पडले होते.

काही दिवसांपूर्वी गावात एक तरुण डॉक्टर आला होता. रावसाहेब नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात गेले असता दोघांची गाठभेट झाली. पहिल्या भेटीतच तो तरुण डॉक्टर सुरेश रावसाहेबांच्या मनात भरला. मग काय विचारता रावसाहेबांनी सुरेशची पूर्ण कुंडलीच काढायला सुरूवात केली. शक्य होईल तिकडून त्याच्याबद्दल माहिती मिळवली आणि एक दिवस आपल्या मुलीसाठी ते थेट सुरेशच्या गावी जाऊन पोहोचले. सुरेशच्या आईचा उषाताईंचा या स्थळाला विरोध होता. श्रीमंतांच्या घरची मुलगी होती, आपल्या कुटुंबाशी जुळवून घेईल की नाही ही शंका उषाताईंना येत होती. सुरेशला रावसाहेबांचा गावातील नावलौकीक माहिती असल्याने त्याने लक्ष्मीला न पाहताच मी लग्न करेन तर याच मुलीशी करेन असे घरातील जेष्ठ मंडळींना सांगून टाकले.

अखेरीस एका चांगल्या मुहूर्तावर गावातच रावसाहेबांनी आपल्या कन्येचा विवाह थाटामाटात पार पाडला. विवाहानंतर सुरेश आपल्या व्यवसायाला आधिक वेळ देऊ लागला. सुरेशने रावसाहेबांची मदत घेऊन त्याच गावात एक मोठा दवाखाना उघडला. दवाखान्याची सुरूवात असल्याने सुरेशचा अधिकाधिक वेळ दवाखान्यातच जाऊ लागला. लक्ष्मी दिवसभर घरी एकटीच राहत असे. सुरेशचा पाहिजे तितका वेळ तिला उपलब्ध होत नसे. अगदी रात्री दोघे झोपणार तेवढयात सुरेशचा फोन खणखणायचा. ताबडतोब सुरेश बेडरूममधून बाहेर जाऊन नर्सला फोनवर सुचना द्यायचा. पंधरा वीस मिनीटांनी त्याच्या सुचना संपल्या की तो बेडरूममध्ये शिरायचा. पुन्हा लक्ष्मीशी गुलूगुलू गप्पा मारायला सुरुवात करायचा. पण त्या पंधरा वीस मिनीटात लक्ष्मीचा मुड ऑफ होऊन जायचा.

लक्ष्मीला कितीही राग आला तरी तो व्यक्त करण्याची संधीदेखील तिला उपलब्ध नव्हती. कारण तिने वेळीअवेळी येणाऱ्या फोनबाबत तक्रार केल्यास सुरेशचे  उत्तर तयार असे. ‘आता फोनवरही तुला विचारूनच बोलत जाऊ का?’ लक्ष्मीला संताप का येतो याचा जराही विचार न करता उलट रात्रभर तिच्याशी वादविवाद करायचा. सकाळ झाली की पुन्हा नव्याने सुरुवात करून स्वत: कामावर निघून जायचा. लक्ष्मी मात्र रात्रभर त्याने बोललेल्या वाक्याचाच विचार करत राहायची.

सुरेश कधीकधी प्रॅक्टीससाठी परगावीही जात असे. त्याचे जाणे निश्चित नसे. कधीही फोन आला की त्याला त्वरित निघावे लागे. सुरेश परगावी गेला की कामात इतका गुंग होऊन जायचा की त्याला लक्ष्मीला फोन करायलाही वेळ नसायचा. लक्ष्मीने स्वत:हून फोन केला की तिकडून उत्तर यायचे, ‘मी कामात आहे. नंतर फोन कर. मी बाहेर आहे. नंतर फोन कर.’ तो संतापात असेल तर, ‘काय आहे? कशाला फोन केलास?’ फोनवर आलेल्या या प्रत्युत्तरांमुळे लक्ष्मीने सुरेशला फोन करणेच सोडून दिले. सुरेशला फोन करायचा म्हणजे लक्ष्मीला संकटच वाटे. त्याचा मुड तर चांगला असेल ना, तो नीट तर बोलेल ना हेच प्रश्न तिला सारखे भंडावून सोडत. लक्ष्मीने फोनच केलेला नसेल आणि तशातच एखाद्या केसमुळे सुरेश त्रस्त असेल तर तो स्वत:चे नैराश्य झटकण्यासाठी लक्ष्मीलाच फोन करीत असे. ‘कशी बायको आहेस तू? साधा एक फोनसुद्धा करत नाही. तुला माझी चिंताच नाहीए.’ संतापात अशी चारपाच वाक्ये ताडताड लक्ष्मीला बोलून तो फोन ठेवून देत असे. त्याच्या त्या आक्रमक स्वभावामुळे लक्ष्मीची बोलतीच बंद होत असे.

लग्नाअगोदर कोणालाही एक शब्दही न बोलू देणारी लक्ष्मी केव्हा गुंगी गुडीया झाली हे तिचे तिलाही समजले नाही. सुरेश कामासाठी सकाळी आठला निघाला की रात्री आठलाच परत येई. घरी आल्यानंतरही त्याचे फोनवरच बोलणे चालू असे. लक्ष्मीला आपण त्याच्यासोबत का राहतो आहे हेच समजत नव्हते. सुरेश रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मीशी खूप गोड बोलत असे. रात्र संपताच सुर्योदयाबरोबर त्याचे विचारचक्र नवीनच फिरत असे. एके दिवशी सकाळीच लक्ष्मीने भांडणाला सुरूवात केली.

‘‘तुम्ही माझ्यासोबत अजिबात वेळ व्यतीत करत नाही. मला आता कंटाळा आला आहे या घरात एकटे राहण्याचा.’’

‘‘माझा नाईलाज आहे. हे बघ, एकतर तू पुस्तक वाचत बस किंवा माहेरी जाऊन ये. तुला थोडे बरे वाटेल.’’

अशावेळी लक्ष्मीकडे मुळूमुळू रडण्याशिवाय पर्यायच राहत नसे. सुरेश नेहमीच प्रँक्टीससाठी परगावी गेला की लक्ष्मीला माहेरी सोडून देत असे. लक्ष्मी तिच्या वडिलांच्या घरी आहे म्हणजे आनंदातच असणार असा विचार करून तो तिला चार पाच दिवस फोनच करायचा नाही. इकडे लक्ष्मीचा जीव त्याचा आवाज ऐकण्यासाठी व्याकूळ व्हायचा. पण तो नीट बोलेल की नाही या भीतिने लक्ष्मी फोनच करत नसे. सुरेशच्या कामाच्या व्यापात व लक्ष्मीच्या मुकेपणात संसाराची तीन वर्षे पार पडली तरी लक्ष्मीला मुलबाळ होण्याची चिन्हे दिसत नव्हती. मूलबाळ होत नसल्याने सासूबाई लक्ष्मीला पाण्यात पाहत होत्या. सासुबाईंच्या रागीट स्वभावामुळे लक्ष्मीला सुरेशच्या मुळ गावी जाणे नकोसे वाटायचे. सासरी जायचे म्हणजे तिला आठ दिवस अगोदरच टेन्शन यायचे. सासरी घरात पाय पडल्यापासून ते उंबरठा ओलांडेपर्यंत उषाताईंचा तोंडाचा पट्टा बंद होत नसे. माहेरी लाडात वाढलेली लक्ष्मी सासरी बैलाप्रमाणे कामाला जुंपलेली असे. सकाळी पाचला उठणे, सडा टाकणे, पाणी भरणे, फरश्या पुसणे, घर झाडणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे अशी अनेक कामे करता करता लक्ष्मीच्या नाकी नऊ येत असत.

माहेरी आणि स्वत:च्या घरी कामाला नोकर असल्याने लक्ष्मीला घरकामाची सवय नव्हतीच. पण सासूबाईंच्या पुढे तिचे काहीच चालत नसे. सासरी तर सुरेश लक्ष्मीला आईच्या धाकामुळे पाहतच नसे. त्याचा घरात पायच टिकत नसे. सासरी या दाम्पत्याचे बोलणेदेखील दुरापास्त होत असे.

‘‘हे बघ सुरेश, तू लवकरात लवकर दुसरी बायको कर. मला माझ्या घराला वंशाचा दिवा पाहिजे.’’ आईचा तगादा सुरू असे.

‘‘बघू. आता आम्हाला जाऊ दे.’’

आता तर सुरेश लक्ष्मीपासून अधिकच दूरदूर राहू लागला. लक्ष्मीची सहनशीलताही आता संपली. सुरेशच्या जीवनात स्वत:ला गुंतवून घेतांना तिचे स्वत:चे अस्तित्वच नष्ट झाले. एकेदिवशी लक्ष्मीचा वाढदिवस होता. ती माहेरी होती. सकाळपासून वाट पाहून थकली आणि तिने सुरेशला फोन केला.

‘‘आज आम्ही केक आणला होता.’’

‘‘कशासाठी?’’

हे उत्तर ऐकून लक्ष्मी रागाने लाल झाली. काही मिनीटांनी त्वरित त्याने कारणांची यादी सुरू केली. मी सकाळी इथे होतो. दुपारी मित्रांसोबत होतो. त्यामुळे फोन करायची आठवणच राहीली नाही. सुरेशच्या मनात लक्ष्मीविषयी प्रेम तर होते पण तो कधी व्यक्तच करत नसे. नेहमीची कारणे ऐकून लक्ष्मी संतापात बडबड करू लागली.

‘‘हे बघ लक्ष्मी तुसुद्धा माझा वाढदिवस लक्षात ठेवू नको. पण कटकट करू नको.’’

या घटनेने लक्ष्मी सुन्न होऊन गेली. ती आता या पिंजऱ्यात राहू इच्छित नव्हती. दोन तीन दिवसानंतर सुरेश नेहमीप्रमाणे कामाला गेला. लक्ष्मीनेही घर सोडले. माहेरी तिला जायचे नव्हते. रात्र होईपर्यंत ती सरळ रस्त्याने चालतच राहिली. शेवटी रात्रीच्या अंधारात थकून एका बसस्थानकावर बसली. तेथे दोन स्त्रिया उभ्या होत्या. एक स्त्री गाडीत बसून निघून गेली. दुसरी रूबीना होती. तिला घेऊन जाणारे कोणीच आले नाही. रूबीनाचे लक्ष लक्ष्मीकडे गेले. ती लक्ष्मीला तिच्यासोबत खोलीवर घेऊन गेली. दोनच दिवसात लक्ष्मीही तिच्यासारखी बसस्थानकावर जाऊन उभी रहायला लागली.

रोज नवीन कस्टमर, नवे हॉटेल्स, नवनवीन गिफ्ट्स. काहीवेळा आठदहा दिवसांची टूरही होत असे. काही ग्राहकांशी तिचे आता ऋणानुबंधपण जोडले गेले. लक्ष्मीच्या आजारपणातदेखील कस्टमर लोक तिला मदत करीत. लक्ष्मी ज्या ग्राहकाकडे जायची त्याचे मन आपल्या वाणीने, नृत्याने जिंकून घ्यायची. नवीन आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होत होत्या पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सुरेशसाठी खुपच तिरस्कार होता.

सुरेशमुळे तिचे आयुष्य उद्धवस्त झाले. त्याचे काम आणि त्याच्या आईचे नेहमीच त्याला लक्ष्मीपासून दूर करण्याचे प्रयत्न या गोष्टींचा तिला उबग आला होता. सर्वच माणसे काही वेळा मन मारून जगत असतात. पण परिस्थिती काहीवेळा मनावर इतका दबाव टाकते की ते मन आपली नेहमीची जागा सोडून कुठेही उडते, कोणत्याही दिशेने, कितीही वेगाने. चांगले वाईट याचा विचार न करता. तसेच लक्ष्मीचे झाले होते.

सुरेश लक्ष्मी निघून गेली, त्यादिवशी संध्याकाळी घरी पोहोचला. घराचा दरवाजा उघडा होता. तो तसाच घरात शिरला. सोफ्यावर बसला. लक्ष्मी पाणी घेऊन येईल या विचाराने पाच मिनीटे तेथेच पहुडला. पण घरात लक्ष्मीचा बिलकूल आवाज येत नव्हता. सुरेशने सगळया घरात एक चक्कर टाकली. लक्ष्मी कुठेच दिसली नाही. गेली असेल कुठेतरी… येईल परत थोडयावेळाने… या विचाराने तो सोफ्यावरच झोपला.

पहाटे सहा वाजताच त्याचे डोळे उघडले. अजूनही लक्ष्मी आली नव्हती. त्याने लगेच रावसाहेबांना फोन केला. पण ती माहेरीही नव्हती. सुरेश सर्व गावात एक चक्कर टाकून आला. सुरेशला पोलीस स्टेशनमध्ये जायचे नव्हते, कारण सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न होता. सलग दोन महिने वैयक्तिक स्तरावर त्याने लक्ष्मीची शोधाशोध केली पण त्याचा नाईलाज झाला.

आता दवाखान्यातून घरी आल्यावर ते घर त्याला खायला उठू लागले. रात्री बिछान्यावर झोपताना तर त्याला तिची प्रकर्षाने आठवण यायची. कोणाशी फोनवर बोलून झाले की त्वरित तो बेडरूममध्ये लक्ष्मीला पहायला जायचा, पण तेथे कोणीच नसायचे.

लक्ष्मी कुठे गेली असेल, कोणासोबत पळून गेली असेल, छे! छे! लक्ष्मी असे   कधीच करणार नाही याबाबत त्याला ठाम विश्वास होता. पण त्याची आई मात्र   लक्ष्मीबाबत ती पळूनच गेली असेल अशी शंका व्यक्त करत होती. त्यामुळे सुरेश व आईत भांडण होऊ लागले. शेवटी सुरेशने कामाच्या ठिकाणी मन गुंतवायचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाचा जीवाला जीव देणारा जोडीदार पाहिला की त्याला लक्ष्मीची आठवण यायची.

सुरेश आता लक्ष्मीच्या आठवणीत रमू लागला. त्याचे कामात लक्ष नसे. गर्दीतही तो भ्रमिष्टासारखा बसून राहत असे. सारखी चिडचिड करत असे. दवाखान्यात जाणे तर बंदच झाले. घरातच एकाच जागेवर तो बसून राहत असे. कोणाशी बोलणे नाही. खाणे पिणे नाही. केवळ लक्ष्मी लक्ष्मी हा एकच शब्द तो बोलत असे. थोडया दिवसातच त्याची रवानगी मनोरूग्णांच्या आश्रमात झाली.

काही वर्षांनी लक्ष्मीने जेव्हा सुरेशच्या बाबतीत माहिती मिळवली, तिला खूप वाईट वाटले. ‘‘मी खूप घाई केली की त्याने खूप उशीर केला. कोणास ठाऊक. मी केले ते योग्य होते की अयोग्य. कोणास ठाऊक,’’ या विचारांनी आजही तिचे मन दु:खी होते.

मारा गया बेचारा !

कथा * माधव गवाणकर

निखिल ड्रयव्हर असला तरी स्मार्टबॉय होता. आधी ‘हेवी’ वाहन चालवत होता, पण गावाकडून शहराकडे जाताना घाटरस्ते लागायचे. जागरण घडायचं. बॉडी उतरू लागली. मग बिपीनकडे ते काम सोपवून तो रीनाकडे नोकरीला लागला. तिचा आधीचा ड्रायव्हर व्यसनी होता. रीनाला निर्व्यसनी ड्रायव्हर हवा झाला. निखिल शाळेत असल्यापासून जिम करायचा. त्यामुळे तंदुरूस्त दिसायचा. त्याच्या चालण्यातला, बोलण्यातला रूबाबही रीनाला आवडला. तिचा नवरा आता परदेशात सेटल झाला होता. रीनालाही तिकडेच बोलावलं होतं. मात्र, निखिल तिला ‘मित्रासारखा’ वाटू लागल्यावर तिने त्यालाही परदेशी येऊन त्यांच्याबरोबर राहण्याची गळ घातली. ती त्याला लाडाने ‘निक’ म्हणू लागली. निकला पैशांची फार गरज होती. त्यामुळे घरच्या माणसांचा तसा विरोध असतानाही त्याने ती नोकरी स्वीकारली. ‘मी तीन वर्षांनी परत आलो की लग्न करतो, नक्की!’ असं आश्वासन घरी देऊन टाकलं. ‘निक’ नशीब वगैरे मानत नव्हता. अशी संधी परत मिळणार नाही याची त्याला कल्पना होती.

परदेशी गेल्यावर तिथले काही रहदारीचे वेगळे नियम त्याने जाणून घेतले. तिकडच्या भाषेतले शब्द व्यवहारापुरते शिकू लागला. आपला मुलगा दुसऱ्या देशात भरपूर कमाई करतो याचा गर्व हळूहळू इकडे त्याच्या गावातील आईलाही वाटू लागला.

हळूहळू रीना निखिलला लाडेलाडे नको ती कामं सांगू लागली. त्याच्या भरदार शरीराचं कौतुक करू लागली. ‘माझा नवरा माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. शोभत नाही तो मला. कदाचित तो ‘गे’ असेल. कारण तरूण मुलांचे त्याला इंडियात असताना सारखे फोन यायचे. तू मला तो घरी नसताना ‘सुख’ दे, मला आता तूच नवऱ्यासारखा आहेस असं रीनाने स्पष्टच सांगितलं. निखिलच्या मनात अशी कोणतीही वाईट भावना नव्हती. शिवाय रीना त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. निखिलला आवडणारी एक मुलगी प्रथमी त्याच्या गावातच राहायची. तो भारतात आल्यावर तिलाच मागणी घालणार होता. तिचं कॉलेज शिक्षण सुरू होतं. रीनाला त्याने स्पष्ट नकार दिला. ती त्याच्याशी लगट करू लागताच तिला त्याने ‘मॅडम प्लीज असं करू नका. मी फक्त जॉबसाठी इथं आलोय,’ असं म्हणत मागे ढकळलं. त्यांची झटापट झाली. रीना त्याला बेडवर खेचत होती, पण तसा अत्याचार होण्यापूर्वीच निखिलने झटकन बेडरूमबाहेर पडून दाराला बाहेरून कडी घातली. रीना त्याला फार वाईट अपशब्द बोलत होती. ‘तू माझ्या नवऱ्याच्या लायकीचा आहेस. त्याच्याबरोबर झोप तू. तू पण गे आहेस. तुला लाज वाटत नाही…’ म्हणत रीना दारावर लाथा मारती होती. निखिलने झटपट मिळतील ते कपडे बॅगेत भरले. पगार नुकताच झाला होता म्हणून काही रक्कमच त्याच्याकडे होती. घर सोडून फोन स्विच ऑफ करून तो घराच्या बाहेर पडला, पण जाणार कुठे? आता त्याच्याकडे कार नव्हती. हॉटेलात जेवण तर मिळालं, पण रात्र कुठे काढणार? हॉटेलचे दर परवडणारे नव्हते.

निक रस्त्यावरच झोपला आणि त्या रीना मॅमची इच्छा आपण पुरवायला हवी होती का? नोकरी सोडावी लागली नसती असा विचार त्याच्या मनात आला. पहाटे पुन्हा रीनाकडे जायचं आणि माफी मागून तिची वासना भागवत ही दोन-तीन वर्षं काढायची असं त्यानं ठरवलं. आपण पिंजऱ्यातले पोपट झालो आहोत, आपले पंख छाटले गेले आहेत हे निखिलच्या लक्षात आलं.

 

मात्र, त्यानंतर रात्री उशिरा जे घडलं, ते दुस्वप्न असतं तर बरं झालं असतं असं निकला वाटलं. दारू प्यायलेलं एक टोळकं तिथे फिरत आलं. ते गुंड निखिलला लाथा मारून उठवू लागले. तो घाबरून उठून बसला. ‘तुम्ही परदेशी, परके लोक आमच्या देशात येता. त्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत,’ अशा अर्थाची भाषा व शिव्या त्यांनी सुरू केल्या. त्यांच्याकडे लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक्स होत्या. त्यांनी निकला इतकी बेदम व अमानुष माराहण केली की तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. कुणी त्याला पाणीही पाजलं नाही. गुंड निघून गेले. घायाळ अवस्थेत निखिलला पहाटेपूर्वीच मरण आलं.

आपल्या महान देशाबद्दल प्रचंड राग असलेले अनेक माथेफिरू जगात आहेत. त्यांच्यापैकी एका टोळीने काहीही गुन्हा नसलेल्या निकचा बळी घेतला. तो भारतीय होता हाच त्याचा गुन्हा.

रीनाच्या ‘सोन्याच्या पिंजऱ्यातून’ निसटलेला हा निखिल नावाचा पक्षी कावळ्यांनी बाहेरच्या आसमंतात घेरून मारावा तसा ठार मारला. अरेरे! ‘मारा गया बेचारा’ एवढंच आम्ही गावकरी म्हणालो. हळहळत राहिलो… निकच्या खिशातील आयकार्डवरील रीनाच्या पत्त्यावर त्याची डेड बॉडी आणण्यात आली. तेव्हा रीनालाही रडू कोसळलं. ‘तू माझं का ऐकलं नाहीस निक’ म्हणत ती अश्रू ढाळत राहिली…

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें