समानतेचा काळ

कथा * प्राची भारद्वाज

गिरीश सायंकाळी ऑफिसातून घरी आला, तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. पण आता त्याला या गोष्टीची सवय झाली होती. अशावेळी त्याला चेतन भगतचं वाक्य आठवायचं, ‘‘घरच्या पुरूषानं गरम पोळीचा हट्ट धरला नाही तर त्या घरातली स्त्री घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसह स्वत:चं करियरही उत्तम सांभाळू शकेल,’’ या वाक्यामुळे तो शांत चित्ताने वावरू शकायचा. सुमोनाच्या अन् त्याच्या पहिल्या भेटीत तिनं ऐकवलं होतं, ‘‘माझा स्वत:चा मेंदू आहे तो स्वत:चा विचार करतो अन् त्याप्रमाणेच चालतो.’’

तिचा तडकफडक स्वभाव, तिचा फटकळपणा वगैरे लक्षात आल्यावरही तिच्यावर भाळलेल्या गिरीशनं तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. अन् एकदा लग्न झाल्यावर त्यानं कायम सहकार्यही केलं.

घरकामात तो तिला जमेल तेवढी मदत करायचा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो वॉशिंगमशीनमधून कपडे धुवून वाळत घालायचा. तेवढ्या वेळात सुमोना दोघांचे डबे अन् ब्रेकफास्ट बनवायची. बाई नाही आली तर सुमोना केरफरशी करायची, तोवर तो भांडी धुवून ठेवायचा. पण त्याला स्वयंपाकघरात मात्र काही करता येत नव्हतं. एकटा कधीच राहिला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर स्वयंपाक करायची वेळच आली नव्हती. आधी आईच्या हातचं जेवायचा. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, तेव्हा अॅफिसच्या कॅन्टीनचं जेवण जेवू लागला. तेवढ्यात घरच्यांनी लग्न करून दिलं अन् सुमोनानं स्वयंपाकघर सांभाळलं.

घरात आल्यावर एक ग्लास गार पाणी पिऊन गिरीश घर आवरू लागला. अजून सुमोना घरी आली नव्हती. आज बाईनं दांडी मारली. त्यामुळे सकाळी अगदी गरजेचं तेवढंच घरातलं आटोपून दोघंही ऑफिसला गेली होती.

‘‘अरे, तू कधी आलास? मला यायला जरा उशिरच झाला.’’ घरात येता येता सुमोनानं म्हटलं.

हॉलमधलाला पसारा आवरत गिरीश म्हणाला, ‘‘हा काय एवढ्यातच आलोय, जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील.’’

‘‘आज आमच्या टीममध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला. त्यामुळेच थोडा उशीर झाला. त्या संचितला ओळखतास ना?’’

तो म्हणाला, ‘‘बायकांना प्रमोशन सहज मिळतं…बस्स, बॉसकडे हसून बघायचं की मिळालं प्रमोशन…’’ हे काय बोलणं झालं? मला रागच आला…मीही ऐकवलं त्याला, ‘‘आम्ही ही अभ्यास करतो, मेहनतीनं चांगले मार्क मिळवून डिग्री घेतो अन् कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीनं राबून नोकरीतलं प्रमोशन मिळवतो. खरं तर आम्हालाच उलट घर, मुलं अन् नोकरी सांभाळताना जास्त श्रम करावे लागतात. ग्लास सीलिंगबद्दल ऐकलं नाहीए बहुतेक.’’

‘‘तू मानतेस ग्लास सीलिंग? तुला तर कधीच कुठल्या भेदभावाला सामोरं जावं लागलं नाहीए?’’

‘‘मला सामोरं जावं लागलं नाही कारण मी एक समर्थ, सशक्त स्त्री आहे. मी अबला नाही. कुणा पुरूषानं माझ्याशी स्पर्धेत जिंकून दाखवावं…’’

‘‘बरं बाई, पण आता या पुरूषावर कृपा करून अत्याचार करू नकोस. जरा लवकर जेवायवा घाल.’’ गिरीशला भयंकर भूक लागली होती.

‘‘आता? एवढयात ग्लास सीलिंगबद्दल बोललो ना आपण? मी ही एवढ्यातच ऑफिसातून आले आहे. मी ही दमले आहे अन् तुला…’’

‘‘काय करू? जेवायखायच्या बाबतीत तुझ्यावरच आश्रित आहे मी…एरवी मदत करतंच असतो ना? आता तुझ्यावर अत्याचार करतो असा चेहरा करू नकोस, फक्त खिचडी केलीस तरी चालेल.’’

सुमोनानं नाइलाजानं स्वयंपाक केला, कारण मागे दोन तीनदा तिनं उशीर झाल्यामुळे बाहेरून जेवण मागवलं होतं. तेव्हा गिरीशचं पोट बिघडलं हातं. गिरीश स्वच्छताप्रिय होता तर सुमोनाला घरातली घाण किंवा पसारा त्रासदायक वाटत नसे. जेवायच्या टेबलावरचा पसारा ती मजेत सोफ्यावर ढवळून जेवण मांडायची, अन् हॉलमध्ये बसायच्यावेळी सोफ्यावरचा पसारा पुन्हा डायनिंग टेबलवर ठेवायची.

गिरीशनं काही म्हटलंच तर उलटून म्हणायची, ‘‘इतकं खटकतंय तर तूच ठेवा ना उचलून… मीही तुझ्यासारखीच नोकरी करतेय. ऑफिस सांभाळतेय. ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. स्त्री-पुरूष समान आहेत.’’

एकदा गिरीशची आई आली होती. दोघांमधलं हे असं संभाषण ऐकून तिला राहवलं नाही. ती म्हणाली, ‘‘बरोबरीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. समानता असायला हवीच. पण एकूणच घर, संसार, समाज नीट चालण्यासाठी काही कामं स्त्रीपुरूषांमध्ये विभागली गेली आहेत. दोघांनी मिळून कामं करावीत हे बरोबर आहे. पण तरीही काही क्षेत्र ही स्त्रियांची अन् काही पुरूषांची असतात.’’

त्यांचं बोलणं तिनं एका कानानं ऐकलं अन् दुसऱ्यानं सोडून दिलं.

सुमोनाचा हेकेखोरपणाही गिरीश सहन करत होता. त्यांच्या खोलीत त्यानं सुमोनाला मिठीत घेतलं तरी ती त्याला झिकारायची, ‘‘मी पुढाकार घेईन याची वाट का बघत नाहीस तू? प्रत्येक वेळी तुझीच मर्जी का म्हणून?’’

‘‘मी तुझ्यावर बळजबरी करत नाहीए सुमोना, तुझीइच्छा नसेल तर राहील…’’

‘‘माझ्यावर बळजबरी कुणीच करू शकणार नाही…तूसुद्धा!’’

‘‘अगं मीही तेच म्हणतोय ना? मी बळजबरी करत नाहीए…यात भांडायचं कशाला?’’ सुमोनाच्या अशा आठमुठ्या अन् आखडू वागण्यानं गिरीश त्रस्त होता.

काही महिन्यांनंतर सुमोनाची आई त्यांच्याकडे आली. मुलीचा संसार बघून तिला बरं वाटलं. पण त्यांच्यासमोर बरेचदा गिरीश सुमोनाची बरोबरीची, समानतेची वादावादी झाली. गिरीशला अचानक ऑफिसच्या टूरवर जावं लागलं. त्यानं ऑफिसातून सुमोनाला फोन केला, ‘‘जरा माझी बॅग भरून ठेव ना, प्लीज…’’

‘‘अरे व्वा? सरळ हुकूम करतोय बॅग भरून दे म्हणून. मला माझी कामं नाहीत का? स्वत:च काम स्वत: करायला काय झालं? त्याला टूरवर जायचंय तर त्यानं लवकर घरी येऊन आपली बॅग भरून घ्यावी. लग्नाच्या आधीही करतच होता ना स्वत:चं काम? ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. बरोबरीचे हक्क आहेत.’’

सुमोनाच्या आईला तिचं हे वागणं खटकलं, ‘‘हे काय सुमोना? तू त्याची बायको आहेस, त्याचं काम तूच नको का करायला? घर, संसार मिळावा म्हणून पुरूष लग्न करतो. एकटं राहायचं तर लग्नाची गरजच काय? उद्या तू म्हणशील मुलं मीच का जन्माला घालायची? गिरीशनं घालावीत.’’

‘‘तू तर माझ्या सासूसारखीच बोलते आहेत,’’ आईचं बोलणं सुमोनाला आवडलं नाही.

आई प्रेमाने म्हणाली, ‘‘अगं, आई असो की सासू, तुला सांगतील ते चांगलंच सांगतील. त्यांच्याकडे अनुभव असतो जगाचा, संसाराचा. म्हणून त्यांचं म्हणणं ऐकावं.’’

‘‘पण आई, मी ही त्याच्यासारखीच शिकलेली आहे. गिरीशसारखीच माझीही नोकरी आहे, त्याच्या एवढंच कमावते आहे, मग मी एकटीनंच का संसार ओढायचा? तुला ठाऊक आहे की मी नेहमीच स्त्री मुक्तीची अन् स्त्रीपुरूष समानतेची समर्थक होते अन् आहे.’’

‘‘तू थोडा अतिरेक करते आहेस सुमोना. अगं स्त्रीवाद म्हणजे पुरूषांशी वैर करणं किंवा सतत भांडण करणं नाही. संसार पतिपत्नीच्या समंजपणानं अन् सहकार, सहचार्याने चालतो. गिरीश तर तुला खूपच समजून घेतो. सहकार्य करतो, नुसती त्यानं बॅग भरून दे म्हटलं तर इतकं आकांडतांडव कशाला?’’

आईचं म्हणणंही सुमोनानं उडवूनच लावलं.

लग्नाला वर्ष होता होता गिरीशनं स्वत:ला सुमोनाच्या अपेक्षेनुरूप बदल घडवून आणला होता. त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं अन् बायकोला सुखात ठेवावं, तिनं सुखी रहावं अशी त्याची इच्छा होती. पण सुमोनाचा स्त्रीवाद काही थांबायला तयार नव्हता. गिरीशचे काही सहकारी घरी आले होते. त्यांच्या ऑफिसच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा त्यांच्या बॉसचा विषय निघाला. ‘‘बॉस मॅडम इतक्या आखडू का आहेत? तेच कळत नाही. सरळ शब्दात तर त्या बोलतच नाहीत.’’

गिरीशच्या एका मित्रानं एवढं म्हटलं अन् सुमोना अशी बिथरली…‘‘एका स्त्रीला बॉस म्हणून सहन करणं तुम्हा पुरूषांना कसं मानवेल? हाच बॉस पुरूष असता तर त्याला सहन केलंच असतं ना? पण इथं एक स्त्री आहे तर लागले तिची चेष्टा करायला, तिला नावं ठेवायला…तिच्याशी जमवून घ्यायला नको का तुम्ही हाताखालच्या लोकांनी?’’

‘‘अरेच्चा? वहिनींना एकाएकी काय झालं?’’ सगळेच चकित झाले.

तिच्या वागण्यानं गिरीशही वैतागला…‘‘सुमोना, तू आम्हा सर्वांना ओळखतेस, आमच्या बॉसला तू बघितलंही नाहीस अन् तिची कड घेते आहेस?’’ त्यानं म्हटलं.

एव्हाना गिरीशच्या लक्षात आलं होतं की सुमोनाच्या मनात पुरूषांविषयी विनाकारण राग आणि द्वेष आहे. ती पुरूषाला बाईचा शत्रूच मानते. स्वत:ला ती श्रेष्ठ स्त्री समजते अन् घरातल्या कामातही विनाकारण बरोबरी, समानता हे विषय आणत असते.

एका रात्री गिरीश, सुमोना जेवायला बाहेर गेली होती. सुमोनाच्या आवडत्या हॉटेलात, तिच्या आवडीचे पदार्थ होते. जेवण झाल्यावर दोघं त्यांच्या गाडीत बसून घरी यायला निघाली. तेवढ्यात तीन मोटरसायकलवर ८-९ जणांचं टोळकं त्यांच्या गाडीच्या मागे लागलं. मोठमोठ्यानं अचकट विचकट बोलत, आरोळ्या ठोकत ते शिट्याही वाजवत होते.

‘‘मी आधीच म्हटलं होतं. या रस्त्यानं नको जाऊयात. तुम्हाला हाच रस्ता नेमका का घ्यावासा वाटला? आता काय करायचं?’’ सुमोना खूपच घाबरली होती.

‘‘काय करणार? घाबरायचं नाही. ऑफ्टर ऑल हा समानतेचा काळ आहे?’’

गिरीशचं बोलणं ऐकून सुमोना गारच पडली. तिचं वाक्य आज गिरीशनं म्हटलं होतं.

घाबरलेल्या सुमोनानं गिरीशला म्हटलं, ‘‘गिरीश, तू माझा नवरा आहेस, मला सुरक्षित ठेवणं ही तुझीच जबाबदारी आहे. बरोबरी समानता आपल्या जागी अन् मला सुरक्षित ठेवणं, गुंडांपासून वाचवणं आपल्या जागी. तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल.’’

गिरीशनं काही उत्तर दिलं नाही. फक्त गाडीचा स्पीड एकदम वाढवला अन् काही मिनिटातच गाडी सरळ पोलीस चौकीत येऊन थांबली. तिथं पोहोचताच ते टोळकं त्यांच्या मोटरसायकलसह पळून गेलं. शांतपणे गिरीशनं गाडी मुख्य रस्त्यावर आणून सरळ घर गाठलं. दोघांनीही हुश्श केलं. कुणीच काहीही बोललं नाही. गिरीश गप्प होता कारण त्याला सुमोनाला विचार करायला वेळ द्यायचा होता. सुमोना गप्प होती. कारण आज तिला तिची चूक उमगली होती.

सकाळी दोघं उठून आपापलं आवरून ऑफिसला निघून गेली. संभाषण नव्हतंच, मात्र अबोला भांडणातून आलेला नसल्यानं तणाव जाणवत नव्हता. ऑफिसात काम करताना तिच्या कॉम्प्युटरवर गिरीशचा मेसेज दिसला.

‘‘सुमोना, तू हिंदीतल्या ख्यातनाम कवींचं नाव ऐकलं आहे? विनोदी कवी म्हणून काका हाथरसी ओळखले जातात. त्यांचीच ही कविता आहे :-’’

‘दुलहन के सिंदूर से शोभित हुआ ललाट, दूल्हेजी के तिलक को रोली हुई अलौट. रोली हुई अलौट, टौप्स, लौकेट, दस्ताने, छल्ला, बिछुआ, हार, नाम सब हैं मर्दाने. लालीजी के सामने लाला पकड़े कान, उन का घर पुर्लिंग है, स्त्रीलिंग दुकान. स्त्रीलिंग दुकान, नाम सब किस ने छांटे, काजल, पाउडर हैं पुर्लिंग नाक के कांटे. कह काका कवि धन्य विधाता भेद न जाना, मूंछ मर्दों की मिली किंतु है नाम जनाना…

अर्थात, स्त्री अन् पुरूषातला झगडा सनातन आहे. तरीही दोघं एकमेकांचे पुरक, सहाय्यक आहेत ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ज्यांना हे कळत नाही, त्यांचं सोड, पण नवरा बायकोनं एकमेकांशी भांडणं, सतत बरोबरी करणं यानं कोणताच संसार सुखी होत नाही. सुखी संसारातच वंशवेल विस्तारते. घरातल्या मुलांनाही चांगले संस्कार मिळतात. सुमोना, तुझ्या तकलादू स्त्री वादातून बाहेर पड. मी स्वत: स्त्रियांचा सन्मान करतो हे तू जाणतेस. माझं प्रेम ओळख,. त्यातला खरेपणा जाणून घे…’’

त्या सायंकाळी गिरीश घरी आला, तेव्हा टेबलवर गरमागरम जेवण तयार होतं. छानपैकी नटलेली सुमोना हसऱ्या चेहऱ्यानं त्याची वाट बघत होती. तो आत येताच तिनं त्याला मिठी मारली अन् ती म्हणाली, ‘‘माझॆ काम मी केलंय हं! आता तुझी पाळी.’’

जेवण झाल्यावर गिरीशनं सुमोनाला उचलून घेतलं अन् तो बेडरूमकडे निघाला. हसऱ्या चेहऱ्यानं सुमोना त्याला बिलगली.

वारसा

कथा * पल्लवी पुंडे

अलीकडे वारंवार माझ्या मनात येतं की माणसाला त्याच्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. म्हणजे मी टेलिव्हिजनवरच्या क्रिमिनल आणि अध्यात्मिक कार्यक्रमांनी भारावून गेलोय म्हणून असं म्हणतोय असं समजू नका. मी रोज धर्मग्रंथ वाचतो असंही समजू नका. मी कुणा बुवा बांबांचा भक्तही नाही अन् पश्चात्तापाचं महत्त्व मला कळलंय असंही नाही.

सध्या माझी मुलगी राशी हिची मैत्री, तिच्या रमण नामक सहकाऱ्याशी फारच वाढली आहे. रमण विवाहित आहे, हे माझ्या काळजीचं कारण आहे. राशी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे. रमण सीनिअर मॅनेजर आहे. राशी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं. पण रमणबरोबर तिची जवळीक वाढतेय हे मला खटकत होतं. खरंतर मला मनातून फार भीती वाटत होती. माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं न्यू जर्सीला यू.एस.ला गेली होती. तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं, जो निर्णय घ्यायचा होता, तो मलाच घ्यायचा होता. आज माझा भूतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता.

मुजफ्फरनगरला मी नव्यानंच बदलून गेलो होतो. बिऱ्हाड अजून दिल्लीतच होतं. शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं. पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता. इथं मी जेमतेम दोनच वर्षं काढणार होतो. त्यामुळे बिऱ्हाड मांडायचा विचार नव्हता.

बँकेला जवळ असं एक छोटसं घर भाड्यानं घेतलं होतं. शेजारी एक कुटुंब राहत होतं. एक तरूण स्त्री आणि तिची दोन मुलं, बहुधा जुळी असावीत. तिसरी-चौथीत शिकत असावीत. बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे. तिचा नवरा ही बँकेतच होता. काही वर्षांपूर्वी तो वारला होता. बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं. मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती, पण आता तिनं इथं स्वतंत्र बिऱ्हाड केलं होतं.

‘‘विनय सर, सांभाळून रहा हं! बाई एकदम चालू आहे.’’ रमेशनं मला सांगितलं होतं. रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं. तिनं त्याची डाळ शिजवू दिली नव्हती. म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता.

सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्कानं मिळाला आहे. शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा, त्यांना मदत करा, ही आम्ही लहानपणापासून ऐकलेली शिकवण आहे. शेजारी एखादी तरूण देखणी स्त्री असते, तेव्हा तर आम्ही पुरूष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो.

मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो, तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यांवर बसून होती.

‘‘तुम्ही इथं का बसला आहात?’’ मी विचारलं. ‘‘सर, काय झालं…म्हणजे, माझी किल्ली हरवलीए. मुलं येतीलच आता…त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली. तोवर इथं बसून वाट बघतेय त्यांची.’’ ती कशीबशी बोलली.

‘‘तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या.’’

‘‘अं?’’

‘‘म्हणजे, माझ्या घरात येऊन बसा. मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो.’’

‘‘मी इथंच थांबते…तुम्ही किल्लीचं बघा.’’

‘‘ठिक आहे.’’

थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलेलं होतं अन् मी आत सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो. दहा मिनिटातच तिची मुलंही आली. मुलं समजूतदार अन् गोड होती. थोड्याच वेळात माझी त्यांची छान बट्टी जमली.

माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज अन् मजेमजेत सुरू होतं. मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो. तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता. प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची. शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं, ते माझ्याच सल्ल्यावरून.

बँकेत दोन दिवसांचा स्ट्राइक होता. आम्ही घरीच होतो. नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे. पण आज मुलं घरी नव्हती. ती शाळेच्या पिकनिकला गेली होती.

दारात उभं राहून मी विचारलं, ‘‘आत येऊ शकतो का?’’

‘‘विनय सर? तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली?’’

आम्ही दोघं जेवलो. मला जाणवलं आज रचना जरा बेचैन वाटतेय. तिनं मागचं आवरलं, मग आम्ही दोघं टीव्ही बघत बसलो. रचनाला मी विचारलं, ‘‘बरं नाहीए का?’’

‘‘डोकं दुखतंय सकाळपासून.’’ ती उत्तरली.

मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो अन् हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो. कपाळ दाबता दाबता माझे हात तिच्या कानशिलांवरून खांद्यावर आले. तिनं डोळे मिटून घेतले होते. दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती. काही तरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले अन् मी ते माझ्या ओठांनी बंद केले.

त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत. आम्ही एकमेकांच्या जवळ जवळ येत गेलो. संकोच वाटत नव्हता, उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं. मनानं मनाची, देहानं देहाची भाषा समजून घेतली होती.

‘‘डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे.’’ मी तिच्या कानांत हळूवार बोललो.

किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक. तिच्यापासून दूर होत मी म्हटलं, ‘‘रागावली नाहीस ना माझ्यावर?’’

‘‘मला स्वत:चाच राग येतोय. तुम्ही विवाहित आहात…असं घडायला नको होतं.’’

‘‘रचना, शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे. आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं. तेच नातं कसंबसं निभावतोय मी. प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे.’’

‘‘पण, लग्न ते लग्नच ना?’’

‘‘रचना, सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का? लग्नानंतर नवराबायकोत सेक्स घडतोच. पण प्रेम नाही निर्माण होत. तुला पश्चात्ताप होतोय का?’’

‘‘विनय, तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे. प्रेम शक्ती देतं. वासना असेल तर पश्चात्ताप होतो. माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही. फक्त त्यानं माझं शरीर वापरलं. मनापर्यंत तो पोचलाच नाही. नंतर जे पुरूष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मीच जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना…त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा मला. तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलंत. माणूस म्हणून वागवलंत…अन् मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं. विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला. पण असे संबंध अनैतिकच ठरतात. मी आज चारित्र्यहीन ठरले आहे.’’

त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो. तिची मुलं झोपली की सकाळीच उठायची. आम्ही निर्धास्त होतो. अधूनमधून सिनेमा, शॉपिंग, पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं.

अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे. दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ, खेळणी घेऊन जायचो. शोभासाठीही साड्या, दागिने, तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो. बघता बघता दोन वर्षं झाली. आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती. इकडे रचना आमच्या संबंधांना काही तरी नाव, नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती. अन् मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो.

रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं. पण शोभा माझा कायदेशीर पत्नी होती. त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान, नैतिक आधार अन् माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती. शेवटी मी बदलीसाठी विनंती पत्र पाठवलं.

‘‘तुम्ही दिल्लीला जाताय?’’

मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता, पण तिला कळलंच.

‘‘हो…जावं लागणारच ना?’’

‘‘मला सांगावं असंही वाटलं नाही?’’

‘‘हे बघ रचना, हे नातं आता आपण संपवूयात.’’

‘‘पण तुम्ही तर माद्ब्रयावर प्रेम करत होता?’’

‘‘हो, करत होतो, आता नाही करत?’’

‘‘आता नाही करत?’’

‘‘तेव्हा मला भान नव्हतं, आता मी भानात आहे.’’

‘‘पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता, माझायाशी लग्न करणार होता…मग? आता काय झालं?’’

‘‘वेडी आहेस तू? दोन दोन बायका कशा करणार मी? अन् शोभाचा दोष काय? काय म्हणून मी घटस्फोट मागणार?’’

‘‘पण आता मी काय करू? कशी जगू? कुठं जाऊ?’’

‘‘उगीच तमाशे करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाहीए. जे घडत होतं, ते तुझ्या इच्छेनंच घडत होतं.’’

‘‘ठिक आहे. तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतलाय. तेही बरोबरच आहे. पत्नी, मुलं, यांचा तुमच्यावर हक्क आहे. वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाहीए तुमच्यात. मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात, त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी?’’

‘‘तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस.’’

‘‘केवढा दांभिकपणा! मला वापरून घेतलंत अन् आता चक्क फेकून देताहात?’’

‘‘हो, हो! वापरलं तुला. काय करून घेशील? अन् तुला ही सुख मिळालंच ना? पुरेपूर पैसे दिलेत मी. किती खर्च केलाय ते विसरलीस का?’’

मी खरंतर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो. रचनानं मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता. उलट मीच तिच्याकडे जेवत होतो. चहा फराळ करत होतो. तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो.

‘‘तुम्ही अन् तुमच्यासारख्या पुरूषांनी असहाय, एकटया स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. मला स्वत:चीच लाज वाटतेय, इतक्या हीन, हलकट माणासावर मी प्रेम केलं…देह अन् मन समर्पित केलं.’’

‘‘रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली. ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक, शोभा अन् तिच्या माहरेची मंडळी सगळीच मुजफ्फरनगरला आली. मी अक्षरश: रडून रडून शोभाची क्षमा मागितली.

‘‘मला एकच सांगा, जर तुम्ही तिथं नसताना, माझे एखाद्या पुरूषाशी असे संबंध झाले असते अन् मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही क्षमा केली असती?’’

मी काही बोलूच शकलो नाही.

‘‘उत्तर द्या विनय, गप्प बसू नका,’’ शोभा म्हणाली.

‘‘न…नाही…बहुधा.’’

‘‘बहुधा…अं? तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती. पुरूष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं. पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफैली, व्यभिचारी ठरवून समाज मोकळा होतो. खरंच, मला रचनाचा राग येत नाहीए, तिरस्कार वाटत नाहीए, मला तिचं कौतुक वाटतंय अन् दयाही येतेय. तिला केवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येतेय अन् तिनं दांभिक पुरूषी अहंकाराला आव्हान दिलंय म्हणून कौतुक वाटतंय.’’

मी घायकुतीला आलो, ‘‘तू मला क्षमा करणार नाहीस.’’

‘‘मी तिच्यासारखी धाडसी नाहीए. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे. एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही. तुम्ही कायम अपराधीच राहाल.’’

सगळ्या आळीतले लोक रचनालाच दोष देत होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या सर्वगुण संपन्न असण्यावर जळणाऱ्या बायका अन् ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरूष अशावेळी मागे कसे राहणार? एकटी, देखणी विधवा स्त्री…तिला कोण आधार देणार?

रचना कोर्टात केस हरली. मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला. पाण्यासारखा पैसा खर्च केला. माझी समाजात पत होती अन् सामाजिक पाठिंबा होता.

रचनाला कुणाचाच आधार नव्हता. आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं. मुलांनाही फार त्रास झाला होता. तिनं एका रात्रीत शहर सोडलं. त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती.

‘‘माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे. माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला. पण मी त्यांना खूप शिकवेन, मोठं करेन. त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन. पण एकच सांगते, तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. कुणा भोळ्याभाबड्या जिवाचा विश्वासघात करू नका, मुलांनाही करू देऊ नका.’’

ती निघून गेली…मीही दिल्लीला आलो. नव्यानं संसार, नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं. पण माझ्या अन् शोभात जो दुरावा निर्माण झाला होता, तो कधीच भरून आला नाही. तिनं म्हटलंच होतं, एक स्त्री, एक पत्नी, एक बदफैली पुरूषाला चारित्र्यहिन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती. खरं तर मी तरी स्वत:ला कुठं क्षमा करू शकलो होतो? अन् रचनाला तरी कुठं विसरू शकलो होतो?

मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं. माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडतंय का याची मला भीती वाटत होती. माझा भूतकाळ, त्यातील घटना जणू याक्षणी माझ्यापुढे उभ्या राहून खदाखदा हसत होत्या.

मी ताडकन् उठलो…नाही, राशीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही? मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो, माझा मुलगी आहे ती, माझं नक्की ऐकेल. तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमणला जाऊन भेटेन. त्याच्या बायकोला भेटेन. पण खरं तर अशी वेळ येणारच नाही. राशीलाच सांगून काम भागेल.

मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो. हळूच बघितलं तर ती तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती. बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथच थबकलो अन् आडूनच ऐकू लागलो.

‘‘तुझ्यात अन् रमण सरांमध्ये काय चाललंय?’’

‘‘या वयात जे चाललं तेच!’’ जोरात हसून राशीनं म्हटलं.

‘‘तुला ठाऊक आहे ना. ते विवाहित आहेत.’’

‘‘ठाऊक आहे मला.’’

‘‘तरीही तू?’’

‘‘राशी, तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय, जो माणूस स्वत:च्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही, तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही…तुला केव्हाही डच्चू देतील ते…’’

खदाखदा हसली राशी. ‘‘पुरुष मला सोडणार नाही, मीच सोडते पुरूषांना.’’ दंभ होता तिच्या बोलण्यात.

‘‘अरे, आता तो कोंबडा स्वत: मरायला तयार आहे. तर त्यात माझी काय चूक? अं? त्याला बावळ्याला वाटतंय, मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून. पण त्या मूर्खाला हे कळतच नाहीए की मी त्याचा वापर करते आहे. त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे. ज्या दिवशी तो मी अन् माझा स्वप्नं, माझी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल, त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन. तुला ठाऊक आहे, सध्या कोर्टात स्त्रियानांच न्याय मिळतो.’’

माझ्या छातीत जोरदार कळ उठली अन् मी खाली कोसळलो. माझ्या कानात रचनाचे शब्द घुमत होते. ‘‘तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका…’’

पण वारसा मुलांना मिळाला होता…

कितीतरी हृदय

कथा * पूनम पांडे

‘‘कोणीतरी किती खरे सांगितले आहे की, जे नाते निर्माण व्हायचे असते ते जन्माला येतेच. नियतीमागे दडलेले रहस्य कोण समजून घेऊ शकले आहे? ती असा काही खेळ खेळते की, दोन अनोळखी व्यक्तींची एखाद्या वळणावर अगदी सहज भेट घडते.’’

ते दोघेही जवळपास महिनाभरापासून एकमेकांना ओळखत होते. रोज संध्याकाळी आपापल्या घरातून फिरण्यासाठी बाहेर पडत आणि पार्कमध्ये बसून गप्पा मारत.

आजही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसतच एकमेकांना नमस्कार केला.

‘‘काय मग, आज सकाळपासूनच सर्व व्यवस्थित घडले ना?’’

रमाजींनी विचारले असता रमणजींनी होकारार्थी उत्तर दिले.

आणि त्यानंतर दोघांमध्ये त्या विषयाला धरून गप्पा सुरू झाल्या.

रमा त्यांच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान होत्या. तरीही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून स्वत:चे मत मांडत असत.

रमणजींनी त्यांना सांगितले होते की, ते कुटुंबात खुश नाहीत. कारण सर्व स्वत:चाच विचार करतात. प्रत्येकाचे स्वत:चे असे वेगळे जग आहे आणि ते त्या जगामध्येच रमतात.

रमणजींचा स्वभावच असा होता की, जेव्हा ते गप्पा मारू लागत तेव्हा बाबा-बुवांसारखे बोलत. ते विचारत, रमाजी, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा त्या लगेचच म्हणत, ‘नाही माहीत… नाही,’ जर माहीत आहे असे म्हटले तरी ते न हसता धीरगंभीरपणे स्वत:ला जे वाटत असे तेच बोलत, ‘‘या जगात पुण्याची दोनच फळे आहेत – एक म्हणजे तुम्हाला जे हवे असेल ते न मिळणे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळणे.’’

हे ऐकून रमाजी भरपूर हसायच्या. ते पाहून रमणजी आपल्या बोलण्याचा अर्थ अधिक स्पष्ट करीत सांगायचे की, ‘‘देवाच्या चरणी लीन होताच लाखमोलाचे समाधान मिळते. परमात्म्यात रमणाऱ्या मनाला आणि तीर्थक्षेत्री दान करणाऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्याचे उत्तर मिळतेच.’’

‘‘आणि हो, रमाजी नीट ऐका, हे जे आयुष्य आहे ते कितीही मोठे असले तरी नास्तिक झाल्यास आणि त्या परमात्म्याला विसरल्यास छोटेही होऊ शकते.’’

हे सर्व ऐकल्यावर रमाजी आपले हसणे लपवत विचारायच्या, ‘‘हो का? मग तुमचा आश्रम कुठे आहे, जेथे दीक्षा घेता येईल?’’

हे ऐकल्यावर रमणजी बरेच गंभीर आणि उदास होत. त्यावेळी त्यांचे मन बदलण्यासाठी त्या म्हणत की, ‘‘गुरुजी, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेंगे…‘‘

वरील गाण्यात नायकाला नायिकेला काय सांगायचे आहे? थोडक्यात भावार्थ सांगा रमणजी…

रमणजी हे ऐकून गोंधळून जात. ते खूप विचार करीत असत, पण त्यांना काय उत्तर द्यायचे तेच समजत नसे.

काही वेळानंतर रमाजी स्वत:हून सांगत, ‘‘रमणजी, या गाण्यात नायक हा नायिकेला सांगत आहे की, ठीक आहे. तू म्हणशील तसे. तुझ्या पुढे कोण डोकेफोड करेल?’’

त्यानंतर दोघेही जोरजोरात हसत.

बऱ्याचदा रमणजी उपदेशाचे डोस देत. ते सांगत, माझ्या मनात दैवी प्रेम ठासून भरले आहे आणि मी तुम्हाला हा सल्ला यासाठी देत नाही की, मी खूप समजूतदार आहे, तर यासाठी देतोय की, मी तुमच्यापेक्षा जास्त चुका केल्या आहेत. शिवाय हा मार्ग निवडल्यामुळेच मला शांतता लाभली आहे.

अशा वेळी रमाजीही एखाद्या पुरोगामी विचारवंताच्या प्रतिनिधी असल्याप्रमाणे सांगत की, ‘‘रमणजी, आपला स्वत:वरचा विश्वास ३ गोष्टींवर आधारित असतो. आपली सारासार विवेकबुद्धी, आपल्यावरील सामाजिक दडपण आणि स्वत:वरील नियंत्रणाचा अभाव.’’

‘‘आता यापैकी मला जी गोष्ट महत्त्वाची वाटत होती ती मी निवडली आहे आणि त्यामुळेच आनंदी आहे. आता ती गोष्ट कोणती,’’ हे समजूतदार व्यक्ती समजून गेली असेल. एवढे सांगूनही रमाजींना नेमके काय सांगायचे आहे, हे रमणजींना समजत नसे.

रमणजींचे असे उपदेशपर बोलणे ऐकून सुरुवातीला रमाजींना असे वाटायचे की, कुठल्यातरी मोठया सनातनी समाजाचे ओझे ते वाहत आहेत. जीवनात खूप काही सहन करावे लागले असेल, त्यामुळे आता निराशेने त्यांना घेरले आहे.

त्यानंतर एके दिवशी रमा यांनी मोकळेपणाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, नेमके प्रकरण काय आहे? रमा त्यांना म्हणाल्या, मी वयाची ६० वर्षे पूर्ण करणार आहे. हो का? मी ६५, असे म्हणून रमणजी हसले.

‘‘मला असे सांगायचे आहे की, माझा मुलगा, सून मला तरुण म्हातारी म्हणतात,’’ असे रमाजींनी हसत सांगितले.

‘‘बरं… बरं…,’’ रमणजींनी मान डोलावत म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.

‘‘मला हे जाणून घ्यायचे आहे की, तुम्हाला कोण त्रास देत आहे, ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी असता?’’ रमाजींनी गंभीर होत विचारले.

रमाजींमध्ये खूपच आपुलकी होती. त्या रमणजींसोबत नेहमी आपलेपणाच्या भावनेतूनच बोलत.

हेच कारण होते ज्यामुळे रमणजींनी कुठलाही संकोच न बाळगता त्यांना सर्व काही सांगितले. बस कंडक्टर म्हणून मी सेवानिवृत्त झालो. एकुलत्या एका मुलाला तो ५ वर्षांच्या असल्यापासून एकटयाने सांभाळले. सिगारेट, दारू, सुपारी, पान, तंबाखू यापैकी कसलेच व्यसन कधीही केले नाही.

मागच्या वर्षीच मुलाचे लग्न झाले. आज परिस्थिती अशी आहे की, तो आणि त्याची पत्नी स्वत:च्या संसारात मग्न आहेत. सून एका स्टोअर्सचे काम सांभाळते तर मुलाचे बूट, चपलांचे दुकान आहे. दोघांचे स्वत:चे असे काम आहे आणि ते अगदी व्यवस्थित सुरू आहे.

‘‘बरं, असे आहे तर. आपल्याला कुणीच विचारत नाही, असे तुम्हाला वाटतेय ना?’’ रमाजींनी विचारले.

‘‘आता तर तुम्हीही माझी जास्त विचारपूस करणार नाही, कारण मी बस कंडक्टर होतो, हे तुम्हाला समजले आहे,’’ रमणजी पुन्हा निराश झाले.

त्यांच्या अशा बोलण्यावर रमाजी हसल्या आणि म्हणाल्या, कुठलेच काम छोटे नसते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी निराशेला आमंत्रण देऊ नका. तिच्यामुळे माणूस थकून जातो आणि हाच थकवा तुमची इच्छा नसतानाही अनेक आजारांचा शिरकाव तुमच्या शरीरात सहजपणे करतो.

‘‘तुम्हाला माहीत नाही, पण मीही तुमच्यासारखीच आहे. तरीही अशा प्रकारे आपुलकीने, निर्मळ मनाने वागते की त्यामुळेच माझा मुलगा, सून माझ्यावर खूप प्रेम करतात.’’

‘‘मी वयाच्या २०व्या वर्षी प्रेम विवाह केला होता. वयाच्या २२व्या वर्षी पतीला त्याच्या प्रेयसीकडे सोडून मी माझ्या मुलाला घेऊन ते घर सोडले. त्यानंतर त्या धोकेबाज नवऱ्याच्या आयुष्याचे काय झाले? त्याच्या किती प्रेमिका होत्या? त्याने किती जणींचे आयुष्य खराब केले? या सर्वांचा मी कधीच मागे वळून विचार केला नाही.

‘‘मी आईवडिलांकडे राहू लागले. वयाच्या २२व्या वर्षापासून मुलाच्या संगोपनासह काटकसर करून पैसे जमा करण्यावर मी माझे लक्ष केंद्रित केले.

‘‘माझा मुलगा सरकारी शाळा आणि महाविद्यालयात शिकला. आता तो एक शिक्षक आहे आणि खूपच सुखी आहे.

‘‘हा, तर मी सांगत होते की, माझ्या आईच्या बागेत आंब्याची ५० झाडे आहेत. ५० फणसाची आणि तितकीच जाम आणि आवळयाची झाडे आहेत. मी त्यांची राखण करायची आणि त्या कामसाठी माझे वडील मला दरमहा पैसे द्यायचे.

‘‘माझा मुलगा दहावीत गेला तेव्हा माझ्याकडे २० लाख रुपये जमले होते. माझा भाऊ, वहिनीने मला कधीच कुठे जाऊ दिले नाही.

‘‘माझ्या प्रेमळ, जुळवून घेण्याच्या स्वभावामुळे माझे त्यांच्याशी कधीच भांडण झाले नाही. शिवाय त्यांच्या मुलांना माझ्या मुलाच्या रुपात एक चांगला मार्गदर्शक लाभला होता. काटकसरीमुळे माझ्याकडील जमा केलेले पैसेही वाढतच गेले.’’

‘‘दरम्यान मुलगा नोकरीत कायम झाला आणि त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही येथे या सोसायटीत राहायला आलो. गेल्या वर्षीच माझ्या मुलाचे लग्न झाले.

‘‘साठवलेले पैसे आणि त्यासाठी केलेली काटकसर यामुळेच आज मी करोडपती आहे. तरी अजूनही साधेपणाने राहते. माझी सर्व कामे मी स्वत:च करते आणि कधीच उदासपणे राहत नाही.

‘‘पण तुम्ही छोटयाशा गोष्टींमुळेही उदास होता. इतक्या दिवसांपासून तुमची व्यथा ऐकल्यानंतर मला असे वाटते की, तुमच्यावर खूपच अत्याचार होत आहे. तुम्ही जर असेच सतत दु:खी राहिलात तर लवकरच जगाचा कायमचा निरोप घ्याल.

‘‘तुम्ही काहीही घडले तरी स्वत:ला त्रास करून घेता, ते पाहून मला खूपच वाईट वाटते. हे पहा, मला एक छान कल्पना सुचली आहे…

‘‘तुम्ही एक काम करा… मी काही दिवसांसाठी तुमच्या घरी येते. तेथील वातावरण बदलण्याचा प्रयत्न करते. मी कुठेही गेले तरी तेथे सामंजस्याचे वातावरण निर्माण करते. लग्नानंतरची तब्बल २० वर्षे मी आईच्या घरी दिवस काढले आहेत.

‘‘पण, असे कसे तुम्हाला माझ्या घरी नेऊ..? काहीतरी कारण सांगावे लागेल ना? मी त्यांना काय सांगू?’’ रमणजींनी विचारले.

‘‘अहो, फारच सोपे आहे. मी काय सांगतेय ते नीट ऐका. आज तुम्ही मनगटावर पट्टी बांधून घरी जा. अचानक हात सून्न झाला आहे. कोणीतरी आधार देणारा हवा आहे, जो माझ्या हाताची काळजी घेईल, असे घरच्यांना सांगा.’’

‘‘त्यानंतर मी तुमच्या मित्राची नातेवाईक आहे, म्हातारी आहे, पण प्रामाणिक आहे. माझी काळजी घेईल, असे त्यांना पटवून द्या. तेही विचार करतील की, बरे झाले फुकट कोणीतरी काम करायला मिळाले.’’

‘‘प्रयत्न करून पाहतो,‘‘ रमणजींनी सांगितले आणि जवळच्या मेडिकलमधून हाताला बांधण्यासाठी पट्टी घेतली. त्यानंतर घरी जायच्या गल्लीत वळाले.

रमणजींचे बोलणे घरच्यांना पटले. आठवडाभराची तयारी करून रमाजी त्यांच्या घरी आल्या.

रमाजी येण्यापूर्वी रमनजींच्या मुलगा, सुनेला वाटत होते की, एखादी सर्वसामान्य बाई असेल. प्रत्यक्षात मात्र रमाजींचे आदरणीय, भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून दोघांनीही त्यांना वाकून नमस्कार केला.

रमाजींनीही त्यांना अगदी मनापासून आशीर्वाद दिला. त्यांना पहिल्या भेटीतच रमणजींचा मुलगा, सून चांगले वाटले.

असो, प्रत्येकाचे आपले मत असते, असा विचार करून रमाजींनी कुठलाच निष्कर्ष काढला नाही. सर्व काही येणाऱ्या वेळेवर सोडून दिले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाजींनी घराचा ताबा घेतला. हात खूपच दुखत असल्याचा अभिनय रमणजी चांगल्या प्रकारे करीत होते.

रमाजींना सकाळी लवकर उठायची सवय होती. त्यामुळेच सर्व उठण्याआधीच त्यांची अंघोळ झाली होती. त्यांनी दोनदा चहा घेतला होता. रमणजींनाही दोनदा चहा दिला होता. सोबतच त्यांनी हलवा आणि पोह्याचा नाश्ता बनवून तयार ठेवला होता.

हे पाहून रमनजींच्या मुलगा, सुनेला आश्चर्य वाटले. इतका स्वादिष्ट नाश्ता मिळाल्याने ते खुश झाले. दोघेही कामावर जाताच रमणजी स्वयंपाकघरात रमाजींच्या मदतीसाठी भांडी धुवायला गेले. रमाजी नको म्हणत असतानाही त्यांनी हट्टाने काम केले, कारण त्यांना माहीत होते की, कामवाली बाई ३ दिवस सुट्टीवर आहे. रात्री येताना पावभाजी घेऊन येऊ, असे रमणजींच्या मुलगा, सुनेने सांगितले होते. त्यामुळे रमाजी निश्चिंतपणे इतर कामे करू लागल्या. त्यांनी बटाटयाचे वेफर्स तयार केले. साबुदाण्याचे पापड बनविले आणि झाडाच्या कुंडयांची साफसफाई केली.

एकाच दिवसात रमाजींनी इतकी सर्व कामे केलेली पाहून रमणजींचे कुटुंब आश्चर्यचकित झाले. रात्री सर्वांनी मिळून आंनदाने पावभाजी खाल्ली.

रमणजी आणि रमाजी रोज संध्याकाळी फेरफटका मारायला लांबपर्यंत जात. काही ओळखीच्या लोकांनी त्यांच्याकडे संशयी नजरेने पाहिले, पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

अशा प्रकारे आठवडा कधी झाला, हे समजलेदेखील नाही.

रमणजी आणि त्यांच्या मुलगा, सुनेला रमाजींचे खूपच कौतुक वाटत होते. रमाजींनी आणखी काही दिवस रहावे असे मुलगा, सुनेला वाटत होते. ते ऐकून रमणजींचा चेहरा खुलला. त्यांच्या चेहऱ्यावरील उदासपणा दूर कुठेतरी पळून गेला होता. आता मुलगा, सून त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागले होते. घरातील वातावरण आनंदी झाले होते.

रमाजींचा हेतू साध्य झाला होता. निघताना त्यांना भेट म्हणून काही सिल्कच्या साडया मिळाल्या, कारण त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला होता.

रमाजी तेथून निघाल्या. संध्याकाळी फेरफटका मारायला या, असे निघताना त्यांनी रमणजींना सांगितले. मात्र संध्याकाळी त्या येऊ शकल्या नाहीत.

रमणजींना त्यांनी निरोप पाठवला की, २ दिवसांसाठी त्या सहकुटुंब बाहेर जात आहेत.

रमणजींनी कशीबशी स्वत:च्या मनाची समजूत काढली. त्यानंतर आठवडा उलटला तरी रमाजी आल्या नाहीत. त्यांनी रमणजींच्या एकाही निरोपाला उत्तर दिले नाही.

फोन करणे रमणजींना योग्य वाटत नव्हते. ते मनातल्या मनात विचार करीत होते. महिना उलटला होता. रमणजी वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागले होते. रमाजींनी बनवलेले वेफर्स आणि साबुदाण्याचे पापड खाताना त्यांना असे वाटायचे की, रमाजी येथेच आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारत आहेत.

एका संध्याकाळी निराश होऊन ते फेरफटका मारायला गेले नाहीत. पाहतात तर काय, रमाजी त्यांच्या दरवाजावर उभ्या होत्या. त्यांना आश्चर्य वाटले. तितक्याच त्यांचा मुलगा व सूनही आले. हे पाहून रमणजींना धक्काच बसला. ते ताडकन उठून उभे राहिले.

सुनेने सांगितले की, रमाजी येथे महिनाभर राहतील आणि आम्ही त्यांच्या हाताखालची माणसे बनून राहू.

रमणजींनी कारण विचारले असता सुनेने सांगितले की, तिची छोटी बहीण होम सायन्स शिकत आहे. तिला महाविद्यालयातील अंतिम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका अनुभवी महिलेसोबत रहायचे आहे. आपल्याकडे राहून प्रकल्प पुस्तिका तयार करायची आहे…

‘‘हो का? फारच छान… सूनबाई खूपच चांगला निर्णय,’’ असे बोलताना रमणजींचा चेहरा खुलला होता. पण रमाजींच्या कुटुंबाला याची कल्पना दिलीत ना?

त्यांनी अचानक विचारले. ‘‘त्यांचे कुटुंब नाही म्हणूच शकणार नाही, कारण माझी बहीण आणि रमा मावशी फेसबुकवरील मैत्रिणी आहेत. शिवाय रमाजींच्या कुटुंबाला समाजसेवेची आवड आहे. हो ना, रमा मावशी?

रमणजींच्या सुनेने विचारले. रमाजींनी चांगल्या वागणुकीमुळे आपल्या जीवनात अशी कितीतरी हृदये, कितीतरी मने जिंकली होती.

समाधान

कथा * ऋचा गुप्ते

शेजारच्या खोलीतून मघापासून बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते. संभाषण साधच असावं पण दोघंही इतकी हसत होती की सांगता सोय नाही. काय करताहेत दोघं? रमणच्या छातीत शूळ उठला होता. रमणच्या मनात आलं की उठून त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन दार लावून मोठ्या आवाजात संगीत सुरू करावं. नकोच ते हसण्या बोलण्याचे आवाज. तरीही मनात एक किडा वळवळत होता. तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

काजल गात होती :

‘‘काल पाहिले मी स्वप्न गडे

नयनी मोहरली गं आशा

बाळ चिमुकले खुदकन् हसले

काल पाहिले मी स्वप्न गडे.’’ काजल गात होती अन् रोहन शिटीवर तिला साथ देत होता. सोफ्यावर पडल्या पडल्या रमणनं मनातच त्याला शिवी दिली ‘निर्लज्ज कुठला.’ कुणास ठाऊक आता काय सांगतोय काजलला…इतकी का हसतेय ती…आता मात्र रमणचा संयम संपला. संतापून उठला अन् पाय आपटत काजलच्या खोलीत पोहोचला.

‘‘काय चाललंय मघापासून खिदळणं? इतकं काय घडलंय? अरे, मला स्वत:च्या घरातही काही वेळ शांतता लाभू नये का?’’

रोहननं ‘‘सॉरी-सॉरी’’ म्हणत तिथून काढता पाय घेतला. काजल मात्र अजूनही गुणगुणत होती.

‘‘इवली जिवणी, इवले डोळे,

भुरूभुरू उडती केसही कुरळे,

रूणुझुणु रूणुझुणु वाजती वाळे,

रंग सावळा, तो कृष्ण रडे,

काल पाहिले मी स्वप्न गडे…’’

रोहन तिथं नसल्याने आता रमणला तिचं गुणगुणणं आवडू लागलं. त्याने डोळे भरून काजलकडे बघितलं. सातवा महिना लागला होता. किती सुंदर दिसत होती ती. सर्वांगावर तेज आलं होतं. पूर्वीची एकेरी अंगलट आता गोलाईत बदलली होती. मातृत्त्वाच्या तेजानं झळाळत होती काजल.

गरोदरपणी स्त्री सर्वात छान दिसते. मातृत्त्वामुळे आयुष्याला येणाऱ्या परिपूर्णतेचं समाधान तिला वेगळंच सौंदर्य देतं. रमण अगदी भान हरवून काजलकडे बघत होता, तेवढ्यात रोहननं खोलीत प्रवेश केला. त्याच्याकडे बघताच रमणचं मन कडू झालं. तो झटक्यात वळला. रोहननं वहिनीसाठी काही फळं कापून आणली होती. त्यानं ती प्लेट रमणच्या पुढे केली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रमण खोलीतून बाहेर पडला.

रमणनं सरळ कोपऱ्यातली खोली गाठली अन् कर्कश्श आवाज संगीत लावून खोलीचं दार बंद करून घेतलं. पलंगावर पडून डोळे मिटले तरी कानात रोहन आणि काजलचं हसणंच घुमत होतं. पुन्हा:पुन्हा त्या दोघांचं बोलणं त्याला ऐकायला येत होतं. एकूणच त्याच्या देहमनावर काजल आणि रोहननं असा काही कब्जा केला होता की त्याला इतर काही सुचतंच नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ होतं, बेचैन झाला होता तो.

त्यातच जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्यामुळे तर तो अजूनच वैतागला होता. आपण चक्क नरकात राहतोय असं त्याला वाटायला लागलं. आपण एखाद्या धगधगत्या अग्नीकुंडात उभे आहोत असाही भास झाला. पिता होण्याचं जे सुख त्याला हवं होतं, त्याचा मार्ग असा अग्नीपथाचा असेल असं त्याला वाटलंच नव्हतं.

काही महिन्यांपूर्वी सगळंच किती छान होतं. रमणच्या मनात आलं…पण खरंच छान होतं की त्यावेळीही मनात काही बोच होतीच? आठवणींचे धागे उसवायला लागले.

लग्नाला सात वर्षं उलटली होती. सुरूवातीची वर्षं, करीअर, प्रमोशन्स, घर, घरातल्या इतर जबाबदाऱ्या यातच खर्ची पडली होती. त्यामुळे रमण व काजलनं मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. दोघांची जोडी फारच छान होती. अगदी अनुरूप अशी. दोघांवरही दोन्ही घरातून खूपच दबाव येत होता. आता घरात पाळणा हलायला हवा. दोघांचे आईवडिल, इतर वडिलधारी, नातलग मंडळी एवढंच काय मित्रमंजळीही आता विचारू लागली होती. रमणच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाला त्याचे सासूसासरे आले होते.

समारंभ छान झाला. काजलचे वडील म्हणाले, ‘‘सुरेख समारंभ केलात तुम्ही. एवढ्या वर्षात प्रथमच लग्नाचा वाढदिवस साजरा करताय. खरंच, खूप आनंद वाटला.’’

यावर काजलनं उत्तर दिलं, ‘‘होय बाबा, यावेळी खासच प्रसंग आहे. माझ्या धाकट्या दिराचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालंय. यापुढील शिक्षण तो स्वत:च्या स्कॉलरशिपवर पूर्ण करणार आहे. आमचा रोहन डॉक्टर झाला ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. जणू आमची तपश्चर्या फळाला आली. तो आनंद साजरा करायला आम्ही हा समारंभ आयोजित केलाय.’’

रमणच्या आईनं काजलच्या आईला म्हटलं, ‘‘ताई, आता तुम्हीच या दोघांना समजवा. घरात नातवंडं बघायला आम्हीही आतुरलो आहोत. आता अधिक उशीर करायला नको.’’

‘‘खरंय तुमचं म्हणणं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळच्यावेळी सर्व होणं जरूरी आहे. आमचंही वय होतंय ना आता…’’

आता रमण आणि काजललाही आपल्या बाळाचे वेध लागले होते. पण काही महिन्यातच काजलच्या लक्षात आलं की काही तरी चुकतंय. दोघांनीही आपली पूर्ण तपासणी करून घेतली. इतकी वर्षं मुलाचा विचारच केला नव्हता. आता मूल हवंय अन् होत नाही म्हटल्यावर दोघंही काळजीत पडली. तपासणीत रमणमध्ये दोष आढळला. असा देखणा, निरोगी, हुशार तरूण पण मूल जन्माला घालणं त्याला शक्य नव्हतं.

‘‘रमण हताश झाला. पण काजलनं त्याला धीर दिला. पूर्ण विचारांती स्पर्मबँकेतून स्पर्म घेऊन काजलच्या स्त्री बीजांशी त्यांचा संयोग घडवून काजलच्या गर्भाशयात ते सोडणं आणि मग गर्भाशयात गर्भ वाढवणं असा निर्णय घेतला गेला.

काजलला वाटत होतं की ही बातमी गुप्त ठेवावी. पण रमणचं म्हणण पडलं की आपण ही गोष्ट लपवूया नको.’’

मग सगळ्या कुटुंबीयांसमोर रमणचा हात हातात घेऊन काजलनं त्यांचा प्लॅन सांगितला.

रोहननं म्हटलं, ‘‘छोटी आई, तुम्ही इतर कुठंही जाऊ नका. मी जिथं काम करतो, तिथं या गोष्टीची उत्तम व्यवस्था आहे. मी त्या विभागाच्या मुख्य डॉक्टरांशी बोलतो.’’

दोघांच्या आईवडिलांनी एकमेकांशी चर्चा केली, तेव्हा रमण अन् काजल आपल्या बालकनीत बसून समोर बागेत खेळणाऱ्या मुलांकडे बघत आपलं मूल कसं असेल याचं स्वप्न विणत होते.

काजल सतत रमणबरोबर होती. त्याच्या दोषाबद्दल ती चकार शब्द बोलत नव्हती. उलट जणू तिच्यात दोष आहे असंच वागत होती.

काजलची सासू म्हणजे रमणच्या आईनं म्हटलं, ‘‘असं घडतं का?’’

‘‘अशा पद्धतीनं जन्माला आलेलं मूल निरोगी असतं का?’’ रमणच्या वडिलांनी विचारलं.

काजलच्या आईनं म्हटलं, ‘‘पण मूल कुठल्या वंशाचं, घराण्याचं असेल हे कसं कळावं?’’ काजलच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘जर हाच पर्याय असेल तर आपल्याच कुटुंबातील कुणाचे स्पर्म मिळवता येतील का? निदान कुळ, घराणं याबाबतीत संशय उरणार नाही.’’

बराच वेळ सगळे गप्प होते. शेवटी रमणनंच म्हटलं, ‘‘आम्ही गुपचुप हे करू शकलो असतो, पण तुम्हाला विश्वासात घेतलंय ते तुमच्याकडून आधार मिळेल या आशेवर.’’

‘‘तुम्ही सर्व नि:शंक राहा. ही पद्धत आज सर्वमान्य आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण झाला आहे. मी स्वत: यात जातीनं लक्ष घालतोय ना?’’ रोहननं सर्वांना आश्वस्त केलं.

शेवटी एकदाचं डॉक्टरांनी सांगितलं की काजल गरोदर आहे. काजलनं ऑफिसकडून दिर्घ रजा घेतली. घरात बाळ येणार म्हटल्यावर सगळेच हर्षविभोर झाले होते. प्रत्येकजण नव्या बाळाची आपल्या परीनं कल्पना करत होता. आनंद व्यक्त करत होता. काजलला तर कुठं ठेवू अन् कुठे नको असं तिच्या सासूला अन् आईला वाटत होतं.

सध्या सासूनं काजलचा ताबा घेतला होता. त्यामुळे रमणच्या वाट्याला ती कमी येत होती. रमणलाही खूप आनंद झाला होता. त्यांचं स्टेटस बदलणार होतं. तो बाबा व्हायचा होता. तो बाळाच्या जन्माची वाट बघत होता.

सगळं काही सुरळीत चालू होतं. दर चेकअपनंतर डॉक्टर समाधान व्यक्त करत होते. याच काळात रमणला जाणवलं की रोहनच्या फेऱ्या हल्ली वाढल्या आहेत. त्यातून तो डॉक्टर. आईवडिलांना सतत तब्येतीसाठी त्याचीच गरज पडत होती. पण रोहन आला की काजलची जास्त काळजी घेतो असं रमणला वाटे. हल्ली त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. हे वीर्यदान रोहननंच केलेलं असेल का?

खरंतर असं नसेल. पण रमणला वाटत होतं. त्याच्याकडे पुरावा काहीच नव्हता. पण त्याच्यात असलेल्या दोषामुळेच त्याला असं वाटत होतं.

रोहनला बघितलं की त्याला आपण मूल जन्माला घालायला असमर्थ आहोत ही बोच फराच टोचायची. रोहनचं काजलकडे येणं त्याला मुळीच सहन होत नव्हतं. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की जे त्याला काजलसाठी करावंसं वाटतं, ते त्यानं करण्याआधीच रोहननं करून टाकलेले असतं. रोहनसकट घरातील सर्व मंडळी जेव्हा गप्पा, हास्य विनोद करत असतात, तेव्हा रमण त्यात सामील होत नाही, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. काही न काही कारण सांगून तो तिथून निघून जात असे. हळूहळू स्वत:च्या नकळत रमण मिटत गेला. ज्या उत्साहानं बाळाच्या स्वागतासाठी तो आपल्या पापण्यांच्या पायघड्या घालून बसला होता, तो उत्साह ओसरू लागला. एक विचित्र विरक्ती त्याच्या मनात घर करू लागली होती. रमणला वाटे या घरात त्याच्या संसारात तोच ‘नकोसा’ आहे. काजल त्याला बोलावून घ्यायची. जवळ बैस म्हणायची. पण तो तिच्याजवळ जातच नसे.

रोहन अन् काजल एकमेकांशी बोलायची तेही त्याला आवडत नव्हतं. आता तर त्याच्या मनात यायचं की रोहनच जर या बाळाचा पिता असेल तर मी कशाला मधेमधे लुडबुड करू?

या विचारानं मनात मूळ धरलं अन् मग सगळंच बदललं. आता तर तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसातच घालवू लागला. वरचेवर टूरवर जाऊ लागला. काजलला त्याचं दूरदरू राहणं खटकत होतं. गरोदरपणाचे शेवटचे दिवस तर काजलसाठी फारच अवघड होते. तिला उठताबसताना मदत लागायची. सासू मदत करायची. रोहन मदत करायचा पण रमण जवळ येत नव्हता. नवरा बायकोत एक अदृश्य भिंत उभी होती. खरं तर रमणचं लग्न झालं, तेव्हा रोहन लहानच होता. काजलला तो छोटी आई किंवा वहिनी आई म्हणायचा. काजलही त्याचं खूप कौतुक करायची. त्यानं डॉक्टर व्हावं ही तिचीच इच्छा होती. ‘‘शी! हे काहीच्या काहीच झालंय सगळं. यापेक्षा आम्हाला मूल नसतं झालं तरी चाललं असतं.’’ संतापून तो स्वत:शीच पुटपुटला. नको नको ते विचार त्याची बुद्धी भ्रष्ट करत होते. तो धुमसत होता. काय करावं ते सुचत नव्हतं.

तेवढ्यात रोहनची हाक ऐकू आली, ‘‘दादा, लवकर ये वहिनीआईला त्रास होतोय, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल.’’

‘‘तूच घेऊन जा. मी जाऊन काय करणार? मी काही डॉक्टर नाही, मला आज हैदराबादच्या टूरवर जायचंय…मी निघालो आहे…पंधरा दिवसांनी येईन…’’ रमण अगदी अलिप्तपणे म्हणाला.

काजलचा चेहरा वेदनेनं पिळवटला होता. तरी तिनं स्वत:च्या मनाची समजूत घातली की हा अलिप्तपणा रमणच्या मनातील न्यूनगंडातून आलेला आहे. होणाऱ्या बाळाचा तो जैविक पिता नाही, हे शल्य त्याला बोचतंय. हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला, तेव्हाच काऊंसिलिंग करणाऱ्या सायकोलॉजिस्ट डॉक्टरनं तिला याबाबतीत सांगून सावध केलं होतं. त्यामुळे तिनं रमणला काहीच म्हटलं नाही.

अकराव्या दिवशी काजल भरल्या ओटीनं परत आली. या अवधीत रमणनं एकदाही, फोनवरसुद्धा तिची चौकशी केली नव्हती. तो पंधराव्या दिवशी परत आला. आईनं म्हटलं, ‘‘तू बाबा झालास…अभिनंदन! काजलला भेट ना, ती वाट बघतेय.’’

तो खोलीत गेला. पाळण्याकडे बघितलंही नाही. काजलला त्याची मन:स्थिती समजत होती. तिनंही त्याच्या वागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो आपल्या नेहमीच्या त्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत गेला आणि त्यानं म्युझिक सुरू केलं. त्याचवेळी त्याच्या कानांवर संगीतापेक्षाही मधुर असा सूर आला…अरे? हा तर बाळाच्या रडण्याचाच आवाज…मुलगा आहे की मुलगी? कुणी त्याला सांगत का नाहीए? अन् बाळाला कुणी गप्प का करत नाहीए? त्याला काहीच समजेना…संगीत बंद केलं अन् बाळाच्या रडण्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला.

बाळ रडतंय…रमण खोलीत फेऱ्या घालतो आहे. कुणीच नाहीए का बाळापाशी? त्याची आई? आजी? दुसरी आजी? बाळाचा आवाज आता दमल्यासारखा वाटतोय.

तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजू लागला. नंबर नवा वाटला. त्यानं फोन कानाला लावला. ‘‘दादा, मी रोहन बोलतोय, प्लीज सगळं ऐकून घे. फोन बंद करू नकोस. मी ऑस्ट्रेलियात, सिडनीला आलोय. मला इथं एक कोर्स करायचाय. शिवाय जॉबही मिळाला आहे. दादा, तू आणि छोट्या आईनं माझ्यासाठी खूप खूप केलंय. पण दादा, गेले काही महिने छोट्या आईनं खूप मानसिक ताण सोसलाय. तुझा अलिप्तपणा तिला किती छळत होता, त्याची कल्पनाही तुला नाहीए. दादा, तू रागवू नकोस, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण जेव्हा छोट्या आईला तुझी सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हाच तू तिच्यापासून दूर राहिलास,’’ बोलता बोलता रोहन रडायला लागला. रमणच्या मनात आलं किती मोठा झालाय रोहन, केवढी समजूत आहे त्याला. मीच मूर्ख स्वत:च्या कल्पनेतल्या विकृतीत अडकलो.

रमण काही बोलणार, तेवढ्यात रोहन म्हणाला, ‘‘दादा, बाळं रडताहेत का? मला फोनवर त्याच्या रडण्याचा आवाज येतोय…’’

बाळं? म्हणजे जुळी आहेत का? फोन तसाच घेऊन रमण खोलीत धावला. पाळण्यात दोन छोटी छोटी बाळं सर्व शक्ती एकटवून रडत होती.

‘‘रोहन, बाळा, धन्यवाद! फोन करत राहा…अन् लवकर घरी ये…’’ त्यानं फोन बंद केला अन् त्या लहानग्यांना दोन्ही हातांनी उचलून कवटाळून धरलं. त्याच्या मनात आलं, अगदी रोहनच्या स्पर्मपासून जरी ही बाळं झाली असली तरी काय फरक पडतो? आता ही बाळं त्याची आहेत. तो या बाळांचा पिता आहे. मनातून एक समाधान डोकावत होतं…जर रोहन या मुलांचा बाप असता तर तो त्यांना सोडून गेलाच नसता. म्हणजे ही बाळं रोहनची नाहीत. केवळ मोठं समाधान…!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें