* पद्मा अग्रवाल

कुठल्याही महिलेचे रंगरुप कसेही असले तरी तिला सुंदर दिसण्याची इच्छा असते. किटी पार्टी असो किंवा अन्य एखादा कार्यक्रम, त्याचे आमंत्रण मिळताच ती आपला ड्रेस, दागिन्यांबाबत विचार करू लागते. हा तो क्षण असतो जिथे ती महागडा डिझायनर ड्रेस, मौल्यवान दागिने आणि सुंदर मेकअप करुन सर्वांवर आपला प्रभाव पाडते.

परंतु अशा वेळी स्वत:मधील साधेपणा, शालीनतेने आकर्षक ठरुन सर्वांना प्रभावित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

तुम्ही कशा दिसता, कशा राहता, कशा चालता, कशा उभ्या राहता, तुमची ड्रेसिंगची पद्धत कशी आहे, यासोबतच तुमची देहबोली तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकर्षक बनवते.

हे मान्य की, आज सुंदर दिसणे म्हणजेच खूप काही आहे, परंतु मनाचे सौंदर्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाचे मन जिंकू शकते. म्हणूनच स्वत:चा आत्मविश्वास गमावू नका. तुम्ही जशा आहात त्यालाच स्वत:चा अभिमान समजा.

सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी स्वत:मधील काही सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

असे दिसा सुंदर

एखादा कार्यक्रम किंवा पार्टीत, जिथे बहुतेक महिला डिझाइनर महागडे कपडे आणि मौल्यवान दागिने घालतात, मेकअपच्या थराने चेहरा रंगवतात, तिथे तुमच्यातील साधेपणा, शालीनतेने चमकणारा चेहरा नक्कीच सर्वांना आकर्षित करेल.

कार्यक्रमानुसार स्वत:साठी ड्रेस निवडा. वेळ आणि प्रसंगानुसारच तयार व्हा. तुम्ही नीटनेटकी नेसलेली साडी आणि त्यावरील मॅचिंग दागिने तुम्हाला सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनवेल. तुम्ही इतरांच्या तुलनेत फिट आणि आकर्षक दिसत असाल तर तुमच्यात आपोआपच आत्मविश्वास येईल. तुम्ही इतरांशी कशा प्रकारे मिळूनमिसळून वागता, त्यांच्याशी कसा संवाद साधता, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.

आजकाल लोक सर्वप्रथम तुम्ही परिधान केलेल्या कपडयांवरुन तुमचे मूल्यांकन करतात. पण महागडा डिझाइनर ड्रेस परिधान करण्यापेक्षा तुमची तयार होण्याची पद्धत कशी आहे, हे जास्त महत्त्वाचे असते. तुम्ही पार्टीत जो कोणता ड्रेस घालणार असाल, तो त्या प्रसंगाला साजेसा हवा आणि तुम्हाला शोभणारा हवा. सोबतच तुम्हाला त्या ड्रेसमध्ये चांगल्या प्रकारे वावरताही आले पाहिजे.

चेहरा व्यक्तिमत्त्वाचा आरसा

आजकाल फिल्मी तारका किंवा मॉडल्स बऱ्याचदा असा गाऊन किंवा ड्रेस घालून स्टेजवर किंवा पार्टीला येतात जो सावरणे त्यांच्यासाठी अवघड होते आणि मग सर्वांसमोर त्यांना अवघडल्यासारखे वाटते. म्हणूनच, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की, तुम्ही तुमचे रंगरूप, वय तसेच शरीराची ठेवण लक्षात घेऊन त्यानुसारच स्वत:साठी ड्रेस निवडावा.

शालीनतेला आकर्षक बनविण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. तुमचा चेहरा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो, म्हणूनच सर्वप्रथम स्वत:चा चेहरा चमकदार आणि आकर्षक बनविण्यासाठी त्वचेची स्वच्छता आवश्यक आहे.

चेहऱ्याची त्वचा खूपच मऊ असते. म्हणूनच, तुमचे क्लिंजर अल्कोहोलमुक्त असायला हवे. तुम्ही दूध, दही, हळद इत्यादी नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्वच्छ करत असाल तर या गोष्टी तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक सौंदर्य आणि चमक मिळूवन देतील.

दररोज ८-१० ग्लास पाणी प्यायल्यामुळेही त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. हातपाय आणि केसांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. भुवयांचा आकारही चांगला ठेवा. ओठदेखील मऊ असायला हवेत.

शालीनतेला आकर्षक बनविण्यासाठी काही टिप्स :

चेहऱ्यावर स्मितहास्य : नेहमीच चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य असायला हवे. आनंदी, हसणारा चेहरा सर्वांनाच आवडतो. चेहऱ्यावरील हास्य अनोळखी लोकांनाही हसण्यास भाग पाडते.

नमस्कार : जेव्हा आपण एखाद्याला भेटता तेव्हा त्याला नमस्कार करा. हाय हॅलो, शेकहँड करा. समवयस्क असाल तर गळाभेटही घेऊ शकता. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे नाव आठवत असेल तर, त्या नावाने हाक मारुन गप्पा मारा. यामुळे आपुलकी वाढते. स्वत:ला अपडेट ठेवा.

आदर द्या : जर एखादे मूल असेल तर, त्याच्याबरोबर मौजमजा करा. उगाचच मोठेपणाने वागू नका. मुलांशी प्रेमाने बोला. ‘किती गोड आहेस’, असे बोलून तुम्ही त्याची प्रशंसा करू शकता. समवयस्क असाल तर, ‘या ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस,’ असे बोलून प्रशंसा करा. समोरची व्यक्ती वयाने मोठी असल्यास आरोग्याबाबत नक्की विचारपूस करा.

मनोरंजन करा : लोकांशी गप्पा मारताना छोटेमोठे विनोद किंवा शायरी करुन तुम्ही त्यांच्यावर प्रभाव पाडू शकता. जर तुमच्याकडे एखादे खास कौशल्य जसे की, तुम्हाला गाणे गाता येत असेल तर स्टेजवर जाऊन गाणे गाऊन तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. ही संधी गमावू नका. तुमच्यातील सभ्यता, शालीनता आणि गाण्याने सर्वांना आकर्षित करा.

श्रोता व्हा : श्रोता व्हा आणि प्रत्येकाचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. काहीही बोलण्यापूर्वी समोरच्या माणसाला त्याचे बोलणे पूर्ण करू द्या. त्यानंतर गरजेनुसार तुमची प्रतिक्रिया, हास्य, सहानुभूती किंवा सल्ला द्या. तुम्ही जर त्याची समस्या सोडवू शकत असाल तर नक्कीच सल्ला देऊन त्याला मदत करा.

प्रशंसा करा : जगात असे लोक क्वचितच असतील की ज्यांना त्यांची स्तुती किंवा प्रशंसा केलेली आवडत नाही. हे लक्षात ठेवा की, तुम्हाला खरे कौतुक करायचे आहे, खोटे नाही, म्हणजे अतिशयोक्ती करायची नाही. समोरच्यामधील एखादा चांगला गुण किंवा त्याच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. कुठल्याही व्यक्तीला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडेल असे तुम्ही असायला हवे. तुम्ही त्याला याची जाणीव करुन द्या की, ती व्यक्ती तुमच्यासाठी खूपच खास आहे.

मदतीसाठी तयार रहा : जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्याची एखादी समस्या सांगितली आणि तुमच्यामुळे ती सोडवायला मदत होणार असेल तर त्याची नक्की मदत करा. जसे की, जर तुम्ही लेक्चरर असाल आणि एखाद्या व्यक्तीस त्याचा मुलगा किंवा मुलीच्या शैक्षणिक भवितव्यासाठी तुमचे मार्गदर्शन हवे असेल तर त्याला नक्कीच योग्य मार्गदर्शन करा. अॅडमिशन, हॉस्टेल, पुस्तके, शिष्यवृत्ती, कॉलेज इत्यादींबद्दल तुम्ही जी काही माहिती देऊ शकता ती अवश्य द्या. यामुळे तुमच्यातील शालीनतेचा त्याच्यावर कायमचा प्रभाव पडेल.

संपर्कात राहा : हल्ली व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या बऱ्याच साईट्स आहेत, ज्यावरुन तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू शकता. मित्राचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा एखादा मोठा सणसमारंभ, नवीन वर्ष, अशा प्रत्येकवेळी तुम्ही मेसेजद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहू शकता. यातूनही तुमच्यातील शालीनता, सभ्यता दिसते. शालीनतेला आकर्षक बनवण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की, तुम्ही निरोगी असायला हवे. योग्य डाएट घ्या. गरजेनुसार स्वत:च्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा. पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ खाऊ नका. व्यायाम आणि सकाळचा फेरफटका दोन्हीही आवश्यक आहे. निरोगी आणि सडपातळ शरीरयष्टीसाठी तुमचा आहार आणि वागणे यावर संयम ठेवा. तुमच्या शरीराची ठेवण कशी आहे, याकडेही अवश्य लक्ष द्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...