* पूनम पांडे
बऱ्याचदा जागा कमी असल्यामुळे आपली आवड जोपासण्यासाठी घराच्या छतावरच बागकाम केले जाते. याद्वारे निसर्गावरील आपले प्रेमही जोपासले जाते. कुंड्यांमध्ये आवडीची फुलझाडे किंवा भाज्यांची लागवड करण्यासोबतच इतरही अनेक रोपटी लावली जातात. अशाच प्रकारे एका महिलेने आवड जोपासत आपल्या घराचे संपूर्ण छत हिरव्यागार नर्सरीत रुपांतरीत केले. मीना नावाच्या या महिलेला तेव्हा आश्चर्य वाटले जेव्हा छतावर लावलेल्या कुंड्या त्यांच्या कमाईचे साधन ठरल्या. प्रत्यक्षात घडले असे की, एके दिवशी दुपारी शेजारी राहणाऱ्या तरुणाने त्यांच्याकडे येऊन कडिपत्ता मागितला.
उदार मनाच्या असल्यामुळे छतावर जाऊन हवा तेवढा कडिपत्ता तोडून घे, असे त्यांनी तरुणाला सांगितले. छतावर गेल्यानंतर त्याने पाहिले की, तेथील काही कुंड्यांमध्ये कडिपत्ता लावला आहे. योग्य किंमत देऊन ती छोटी छोटी रोपटी विकत घेण्याची तयारी त्याने दाखवली. त्याच्या तोंडून रोपटयांसाठीची चांगली किंमत ऐकून महिलेला आश्चर्य वाटले. तरुणाने सांगितले की, कडिपत्त्याचा वापर विविध पदार्थ तसेच औषधींच्या रुपातही केला जातो. याची पाने खूपच सुवासिक असतात.
म्हणूनच पोहे, डाळ, भाज्या तसेच अन्य अनेक पदार्थांमध्ये कडिपत्ता वापरला जातो. त्याच दिवसापासून महिलेने छतावर जास्तीत जास्त रोपटी लावण्यास सुरुवात केली आणि फक्त २ महिन्यांमध्येच आश्चर्य घडले. विविध प्रकारच्या रोपटी, झाडांनी त्यांचे छत बहरले.
याची माहिती सर्वत्र पसरताच काही जण फोटोग्राफी कार्यशाळेसाठी काही तासांसाठी छत भाडयावर घेऊ लागले. त्या महिलेवर निसर्गाच्या रुपात जणू लक्ष्मी प्रसन्न झाली, कारण आता त्यांचे छत त्यांना उत्पन्न मिळवून देऊ लागले होते.
रोपटयांची लागवड
काही झाडे अशीही असतात ज्यांची अतिशय कमी खर्चात लागवड करून त्यांना कमाईचे माध्यम बनवता येते. काही शोभेची रोपे वरचेवर आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनांमध्ये मोठया प्रमाणावर विकली जातात. त्यांची लागवड करणे खूपच स्वस्त असते. मातीत रोवताच काही दिवसांतच ती बहरतात.
नर्सरीचा व्यवसाय कोणीही करू शकतो. तसे तर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पैसे आणि योग्य नियोजनाची गरज असते. पण यासाठी लागणार पैसा आणि मेहनत ही इतर व्यवसायांच्या तुलनेत तशी कमीच असते.