कथा * अर्चना पाटील
पीएसआय देवांश पाटील पुण्यात नवीनच जॉइनींग झाला होता. मागच्याच आठवड्यात एका रेव पार्टीत त्याने २६९ तरुणतरूणींना पकडले होते. गणेशोत्सवात डीजे वाजवणे बंद केले होते. अनेक स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये तो मार्गदर्शन करत असे. पीएसआय देवांशचे व्हिडिओ अनेक तरूण युट्यूबवर पाहत असत. त्याच्या सेमिनारमध्ये तरूणांच्या गर्दीचा लोट उसळत असे. पण करीअरसोबतच पाटील कुटुंबीय त्याच्य विवाहाची तयारी करत होते.
पुढच्याच आठवड्यात एका ठिकाणी मुलगी पाहायला देवांश त्याच्या कुटुंबीयांसोबत गावाकडे जाणार होता. देवांशने हो म्हणताच साखरपुडा होणार होता. पटवर्धनांची ज्येष्ठ कन्या जिज्ञासा पाटील कुटुंबाने पसंत केलेली होती. जिज्ञासा एमबीए झालेली होती. चार वर्षांपासून पुण्यातच होस्टेलला राहून शिकत होती. पटवर्धन गावाकडे सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यामुळे पाटील कुटुंबाला बक्कळ हुंडा मिळणार होता. दोन्हीही प्रतिष्ठित घराणी होती. वधुवर उच्चशिक्षित, देखणे एकमेकांना साजेसे होते. केवळ देवांशची पसंती बाकी होती.
‘‘एवढी सुंदर, उच्चशिक्षित शिवाय परिचित कुटुंबातील मुलगी अजून कुठे भेटणार आहे? मनासारखे स्थळ आहे,’’ मामा बोलत होता.
आता कधी जिज्ञासाला पाहतो असं झालं होतं देवांशला. थोड्याच वेळात पाटील कुटुंब पटवर्धनांच्या अंगणात पोहोचले. पटवर्धनांनी यथोचित पाहुणेमंडळींचे स्वागत केले. चहा-पोह्यांचा कार्यक्रम झाला. नंतर वधूकन्या जिज्ञासा चहाच्या कपाचा ट्रे हातात घेऊन डोक्यावर पदर घेऊन हॉलमध्ये दाखल झाली. पण नियोजित वधूचा चेहरा पाहताच देवांशचा चेहरा खाडकन् उतरला. देवांशला कप देताना जिज्ञासा आणि देवांशची नजरानजर झाली आणि जिज्ञासालाही आता मी माझा चेहरा कोठे लपवू असे झाले. पुण्यात धाड टाकलेल्या रेव पार्टीत देवांशने जिज्ञासाला पकडले होते. कोणत्यातरी प्रतिष्ठित व्यक्तिच्या फोनमुळे तिला आणि तिच्या मैत्रिणीला पकडूनही सोडून देण्यात आले होते.
‘‘जावईबापू, आमची जिज्ञासा सर्वगुणसंपन्न आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता?’’
‘‘अहो पटवर्धन, आपल्यासमोर ते काय बोलणार? आतल्या खोलीत जाऊ द्या त्यांना,’’ देवांशचा मामा बोलला.
‘‘हो हो, नक्कीच. जिज्ञासा जावईबापूंना आतल्या खोलीत घेऊन जा.’’
देवांश जिज्ञासाच्या मागे खोलीत शिरला. जिज्ञासा खूप घाबरलेली होती आणि तिला स्वत:चीच लाजदेखील वाटत होती. देवांश पलंगावर बसला. जिज्ञासाने पटकन् खोलीचा दरवाजा बंद केला आणि दरवाज्याजवळच उभी राहिली.
‘‘मला असं वाटतं, बोलण्यासारखं काहीच नाहीए मिस जिज्ञासा. विनाकारण एकमेकांचा वेळ वाय घालवण्यात काहीही अर्थ नाही.’’
जिज्ञासा काहीही न बोलता गुपचूप उभी होती. देवांश दरवाजा उघडून हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये शिरताच देवांशच्या होकारासाठी सर्वजण आतुर झाले होते.
‘‘पुढे काय करायचं देवांश?’’ पाटलीण बाई म्हणाल्या.
‘‘आई, घरी जाऊन पाहू, आता आपण निघूया.’’
‘‘ठिक आहे, काही घाई नाही.? शांततेत विचार करून निर्णय घ्या. आम्ही तुमच्या फोनची वाट पाहू.’’
देवांशच्या उत्तराने सगळ्यांचीच निराशा झाली. पटवर्धन तर एवढे चांगले स्थळ हातातून गेले म्हणून खचूनच गेले. ‘आपण पार्टीत जाऊन एक चूक केली. पण जर आता मी माझी बाजू देवांशसमोर मांडली नाही तर मी आयुष्यात दुसरी चूक करेन.’ जिज्ञासा मनोमन विचार करत होती. शेवटी जिज्ञासानेच स्वत:हून देवांशला भेटायचे ठरवले. एक दिवस त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ती जाऊन पोहोचली. देवांश त्यांच्या खुर्चीवर फाईल चाळत होता. जिज्ञासा घाबरतच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली.
‘‘मला बोलायचं होतं तुमच्याशी.’’
‘‘बोला.’’
जिज्ञासाला पोलीस स्टेशनमध्ये इतक्या माणसांमध्ये कसं बोलावं हे समजत नव्हतं. ती दोन मिनिटं शांतच उभी राहिली. देवांशही फाईलमध्येच डोके घालून बसला.
‘‘आपण बाहेर बोलूया का, प्लीज.’’
‘‘ठिक आहे.’’
दोघेही एका झाडाखाली आले.
‘‘मी चार वर्षांपासून पुण्यात शिकते आहे. माझी रूममेट सतत रेवपार्टीत जात असे. उत्सुकता म्हणून मलाही केवळ पाहायचं होतं, रेवपार्टी काय असते. त्यादिवशी मी माझ्या रूममेटसोबत पार्टीत गेले होते. पण आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारचे ड्रिंक घेतलेले नाही. तुम्ही हवं तर माझी ब्लडटेस्ट करू शकता. तुम्ही तर पोलीस खात्यात आहात. माझ्याबद्दल सर्वत्र तुम्ही चौकशी करू शकता. आयुष्यात प्रथमच माझा तोल गेला. माझ्याकडून चूक झाली. मी मान्य करते. मुळात मी वाईट मुलगी नाहीए, एवढंच मला सांगायचं होतं. त्याशिवाय तुम्ही माझ्या कुटुंबीयांना माझ्याबाबत काहीही सांगितलं नाही, त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे होते. बस्स एवढंच. येते मी.’’
जिज्ञासाला अपेक्षा होती की देवांश तिला थांबवेल. पण तंस काहीही घडलं नाही. देवांशचे कुटुंबीय सतत त्याला नकाराचे कारण विचारत होते, पण त्याला एकही कारण सापडत नव्हते. जिज्ञासा एवढं चांगलं स्थळ आपल्या मुर्खपणाने गेलं म्हणून हमसून हमसून हॉस्टेलच्या खोलीत रडत बसे. तिची ती अवस्था पाहून एके दिवशी तिची दुसरी रूममेट तनया थेट देवांशच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भिडली.
‘‘नमस्कार सर, मी जिज्ञासाची मैत्रीण. तुम्ही लग्नाला नकार का देत आहात यांचं मला कारण जाणून घ्यायचंय. माझं बोलणं उद्धटपणाचं आहे, पण गरजेचं आहे. कारण तुमचा निर्णय चुकतो आहे. दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी संबंध जोडले. याचा अर्थ वधुवर एकमेकांना साजेसे होते म्हणूनच ना. राहिला जिज्ञासाच्या पार्टीचा प्रश्न. तर ती त्यातली मुलगी नाहीए. आमची एक रूममेट रोज पार्ट्यांना बाहेर जाते. जिज्ञासा एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. तिला सहजच वाटलं की एक रात्र आपणही जाऊन पाहावं की तेथे नेमकं काय होतं. त्याबाबत तिला आजही प्रश्चात्ताप होतो आहे. आपल्या चुकीमुळे तुमच्यासारखा वर गमावून बसली म्हणून निराश झाली आहे. तिच्या डोळ्यांतले पाणी थांबत नाहीए. एक सुन म्हणून तिच तुमच्या कुटुंबाला शोभून दिसेल. पुन्हा एकदा शांत डोक्याने नीट विचार करा. येते मी.’’
हे संभाषण पोलीस स्टेशनमध्ये सर्वजण ऐकत होते. एक सिनिअर येऊन बसला.
‘‘काय भानगड आहे?’’
‘‘काही नाही सर, एक मुलगी आहे.’’
‘‘मला ओझरतं माहिती आहे. तुझ्या वडिलांशी मी बोललो आहे. आयुष्यात प्रत्येकाकडून चुका होतात. शिवाय तुझ्या कुटुंबीयांनी त्या मुलीबद्दल सर्व माहिती काढलेली आहे. तू विनाकारण जास्त ताणतो आहेस, असं मला वाटतं.’’
आता मात्र देवांशने पुन्हा एकदा जिज्ञासाचा विचार करायला सुरूवात केली. सर्व लोकांकडून माहिती काढली आणि त्याचाही विश्वास बसला की जिज्ञासा एक सुसंस्कारित मुलगी आहे. दुसऱ्याच दिवशी तो जिज्ञासाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. जिज्ञासा टेबलवर डोके टेकवून खाली मान घालून बसली होती.
‘‘नको ना यार, काही वेळ फक्त एकटीलाच बसू दे ना.’’
देवांशला पाहाताच तनयाने तिथून काढता पाय घेतला.
‘‘भैय्या, दोन चहा,’’ देवांश टेबलवर जाऊन बसला.
देवांशचा आवाज ऐकताच जिज्ञासाने वर मान केली.
‘‘पहिली गोष्ट मी पोलीस आहे. त्यामुळे रडणारी बायको तर मला मुळीच नको. दुसरी गोष्ट मला दोन्ही वेळ घरचेच जेवण लागते. त्यामुळे कधीही माझ्यासाठी डबा बनवावा लागेल. तिसरी गोष्ट मला माझी बायको साडीतच पाहायला आवडते. चौथी गोष्ट माझ्या आईबाबांचं कधीही मन दुखवायचं नाही. पाचवी गोष्ट माझ्या आयुष्यात देशसेवेला पहिलं स्थान आहे नंतर कुटुंब, मान्य आहेत का या गोष्टी तुला?’’
जिज्ञासाला आनंदाश्रुंच्या गदारोळात काय बोलावं तेच सुचत नव्हतं. जिज्ञासा लाजतही होती आणि गालातल्या गालात स्मितहास्य पण करीत होती.
‘‘येतो मग, रविवारी साखरपुड्याला,’’ चहा पिऊन देवांश पतरला.