* सुरेखा सावे
ऑफिसातून घरी परतताना रात्रीचे आठ वाजून गेले होते. घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला. कारण एरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती. दिवसभरातल्या आळीतल्या, घरातल्या सर्व वितंबातम्या आल्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला लागायची. पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कप पुढ्यात ठेवला.
तिची क्षमा मागत श्रवणनं म्हटलं, ‘‘सॉरी, मी तुला फोन करू शकलो नाही…अगं महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना, काम जरा जास्तच असतं…’’
‘‘तुमच्या कामाची कल्पना आहे मला…पण मला दुसरीच काळजी सतावते आहे…’’ प्रतिमा म्हणाली.
‘‘अरे? आम्हालाही कळू देत काय दु:ख आहे माझ्या चंद्रमुखीला.’’ श्रवणनं म्हटलं.
‘‘दुपारी मोठ्या वहिनींचा फोन आला होता अमेरिकेहून, उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोचताहेत…’’
‘‘हात्तिच्या! एवढंच ना? मग त्यात काळजीचं काय कारण आहे? आईचं घर आहे ती केव्हाही येऊ शकते ना?’’ श्रवणनं विचारलं.
‘‘तुम्हाला समजत नाहीए. अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या. आता त्या इथंच राहायचं म्हणताहेत…’’ प्रतिमा अजूनही काळजीत होती.
‘‘तर मग छानच झालं की! घरात चैतन्य वाढेल. भांडी जास्त आवाज करतील. एकता कपूरच्या सीरियल्सबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल. सासवासुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल…हा…हा…हा…’’
‘‘तुम्हाला सगळी चेष्टाच वाटतेय. माझ्या जिवाला घोर लागलाय.’’ प्रतिमानं म्हटलं.
‘‘अगं राणी, घोर तर माझ्या जिवाला लागायला हवा. तुम्हा सासूसुनेच्या शीतयुद्धात मीच हुतात्मा होतो. जात्यातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी. तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही…’’
प्रतिमा गप्पच होती. थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं, ‘‘तुला एक सुचवू का? पटलं तर बघ, काही टीप्स देतोय…मला वाटतं तुझं टेंशन त्यामुळे संपेल.’’
प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मागच्या वेळी सासूबाई क्षुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या. ती कडू आठवण मनांत ताजी होती.
‘‘हे बघ प्रतिमा, जोपर्यंत बाबा हयात होते तोवर मला आईची काळजी नव्हती. पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा तिला पेलवंत नाहीए. तिला खूप असुरक्षित, एकाकी वाटतं. तूच विचार कर, ज्या घरात तिचं एकछत्री साम्राज्य होतं, ते घर आता नाही. लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला. जे घर तिनं काडी काडी जोडून तयार केलं होतं, ते बाबांच्या मृत्युनंतर बंद करावं लागलं…
‘‘आईला एकटं ठेवायचं नाही म्हणून मग ती इथं अन् दादाकडे अमेरिकेला राहते…म्हणजे तिला राहावं लागतं. इथं तिला मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे तिची चिडचिड होते. गावातल्या घरात असलेला मोकळेपणा, तिची सत्ता इथं तिला मिळत नाही. मनांतला असंतोष संधी साधून उफाळून येतो…’’
प्रतिमाला श्रवणचं बोलणं पटत होतं. ती लक्षपूर्वक ऐकत होती.
‘‘एक लक्षात घे, आईला आपल्याकडून पैसा अडका नकोए. बाबांची पेन्शन तिला पुरून उरते. तिला थोडी विचारपूस, थोडा मानसन्मान हवा असतो. तेवढं मिळालं की ती खुष होते. थोडी तडजोड तुला करावी लागेल. करशील का?’’
‘‘करेन, प्रयत्न तरी नक्कीच करेन.’’
‘‘असं बघ,’’ श्रवण पुढे बोलू लागला. ‘‘अगं या वयस्कर लोकांमध्ये ‘अहं’ फार असतो. तसा तो आपल्यातही असतोच. पण दोघांचे अहंकार एकमेकांना भिडले की प्रचंड स्फोट होतो. कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं, मनं दुभंगतात अन् अगदी कारण नसताना माणसं एकमेकांची वैरी होतात. आपण फक्त एवढीच काळजी घ्यायची की आईचा अहंकार दुखावला जाणार नाही, आई तशी प्रेमळ आहे गं! अजून तुला तिचा फारसा सहवासच मिळाला नाहीए. पण तुझ्या सेवेनं, तुझ्या नम्र वागण्यानं, तुझ्या गोड बोलण्यानं तू तिला जिंकून घेशील याची मला खात्री आहे.’’
‘‘म्हणजे मी नेमकं काय करायचं?’’
‘‘अगदी सोप्पं आहे. आईसमोर दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन वावरायचं, तिला वाकून नमस्कार करायचा. तिला काय हवं नको याकडे जातीनं लक्ष द्यायचं. रात्री झोपण्यापूर्वी तिचे दुखरे पाय चेपायचे, बघ ती कशी हुरळून जातेय ती.’’
‘‘करेन की! लक्षात ठेवून सर्व करेन.’’ प्रतिमा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती.
‘‘आणि एक गोष्ट…प्रत्येक काम करण्याआधी आईला विचारून घेत जा. घरात घडणार तेच आहे जे तुला अन् मला हवंय, पण तिचा विचार घेतला, तेवढा मोठेपणे तिला मिळाला की तिचं प्रेमळ मन सुखावतं. तिच्या म्हणण्याला मान दिलास की बघ ती तुझे कसे लाड करेल…’’
‘‘तुम्ही बघाल, यावेळी मी त्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही.’’
रात्रीची जेवणं आटोपल्यावर प्रतिमानं थोडा वेळ बसून पुढील काही दिवसांच्या कामाचं वेळापत्रक आखून घेतलं. रात्री अगदी शांत झोप लागली तिला.
सकाळी लवकर उठून तिनं सासूबाईची खोली अगदी झकास स्वच्छ करून घेतली. त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू आवर्जून तिथं मांडल्या. त्यांना आवडणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये विराजमान झाल्या.
वेळेवारी प्रतिमा आणि श्रवण एयरपोर्टवर पोहोचले. मुलगा सून दिसताच आईचे डोळे आनंदानं चमकले. त्यांची ट्रॉली स्वत:कडे घेत प्रतिमानं वाकून नमस्कार केला. आईला कृतार्थ वाटलं. तिनं तोंडभरून आशिर्वाद दिला.
नातू दिसला नाही तेव्हा आजीनं विचारलं, ‘‘सुनबाई नातू दिसत नाहीए गं?’’
‘‘आई, तो झोपला होता…म्हणून कामवाल्या काकूंना घरी बसवून तुम्हाला घ्यायला आले.’’
‘‘अगं, मुलांना असं गडीमाणसांवर सोपवू नये. हल्ली काय न् काय ऐकायला येतं ना?’’ आई म्हणाल्या.
‘‘खरंय आई, यापुढे लक्षात ठेवेन.’’ प्रतिमानं आश्वासन दिलं.
घरी पोहोचताच पाच वर्षांचा नातू धावत आला अन् त्यानं आजीला मिठी मारली. आजीला त्यानं आजीची खोली दाखवली. स्वच्छ नीटनेटकी मांडलेली खोली व आकर्षकरित्या मांडलेलं सामान बघून आई सुखावल्या.
‘‘आई तुम्ही स्नान करणार आहात की आत्ता फक्त हातपाय तोंड धुताय?’’
गरम चहाचा कप सासूच्या हातात देत सुनेनं विचारलं.
‘‘मला वाटतं मी स्नान केलं की माझं आखडलेलं अंग मोकळं होईल. विमानात बसून दमले गं बाई!’’ सासूबाई चहा घेता घेता बोलत होत्या.
स्नानगृहात दोन बादल्या सणसणीत गरम पाणी स्वच्छ पंचा, सुगंधी साबण सगळी जय्यत तयारी होती.
रात्रीची भाजी आईंना विचारून केली होती. स्वयंपाक छान होता. सासूबाई मनापासून जेवत होत्या. नातू शेजारीच जेवायला बसला होता. सून गरम फुलके करून वाढत होती.
जेवताना मुद्दामच श्रवणनं म्हटलं, ‘‘प्रतिमा, उद्या नाश्त्याला भाजणीचं थालीपीठ कर ना. पण आईला नीट विचारून घे. छान खुसखुशीत व्हायला हवं.’’
‘‘आई, उद्या मला जरा सांगाल हं…’’ प्रतिमानं म्हटलं. आई सुखावल्या.
आईंच्या खोलीची स्वच्छता मोलकरणीकडून न करवता प्रतिमा स्वत:च करायची. कारण आईंना प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ, व्यवस्थित व जागच्या जागी हवी असायची. मोलकरीण इतक्या निगुतीनं सगळं करेल हे शक्यच नव्हतं.
एक दोन दिवसांनंतर प्रतिमा आईंच्या खोलीत काहीतरी काम करत असताना एक फाइल सापडत नाही यावरून श्रवणनं घर डोक्यावर घेतलं. प्रतिमा त्यावेळी आईंचे वाळलेले कपडे घड्या घालून ठेवत होती. आई म्हणाल्या, ‘‘अगं, ते सोड ते काम. तो बघ काय म्हणतोय, सगळं घर डोक्यावर घेतलंय.’’
अंघोळीच्या आधी डोक्याला व अंगाला तेल लावायची सवय होती आईंना. त्यांच्यासाठी खास लाकडी घाण्यावरचं तेल प्रतिमानं आणून ठेवलं होतं. आईंना तेलाची बाटली हातात घेताच प्रतिमा म्हणाली, ‘‘आई, मी लावून देते तेल…बघा माझ्या हाताची कमाल. खूप बरं वाटेल तुम्हाला.’’
‘‘राहू दे गं! तशीच घरातली, बाहेरची बरीच कामं असतात तुला…’’
‘‘कामं होतील हो,’’ म्हणत प्रतिमानं बाटली उघडून त्यांच्या डोक्याला तेल लावायला सुरूवात केली.
‘‘आई, अजूनही तुमचे केस किती छान आहेत. तरूण वयात तर तुम्ही ब्युटी क्वीनच असाल ना?’’
‘‘अगं, आमच्या वेळी अशी काही प्रस्थं नव्हतीच ना? पण श्रवणचे बाबा मला अधूनमधून चिडवायचे, तुझ्या कॉलेजातली किती मुलं तुझ्यावर मरत होती सांग बरं! बोलता बोलता या वयातही त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली.’’
प्रतिमाला गंमत वाटली. तिनं मुद्दाम त्यांना छेडलं.
‘‘हे म्हणत होते की त्यांचे बाबा तुम्हाला माहेरीही जाऊ देत नसत. एक दिवसही तुम्ही नसलात तर त्यांना करमत नसे…खरं आहे का हे?’’
आता मात्र आई चक्क लाजल्या. प्रेमानं तिला एक चापटी मारून म्हणाल्या, ‘‘चल, फाजिल कुठली, माझी चेष्टा करतेस काय? चल, निघ इथून…’’
हलक्या हातानं प्रतिमानं त्यांचं अंग रगडून दिलं. गरम पाण्याच्या अंघोळीनं त्या खूपच सुखावल्या. मनापासून सेवा करण्याचा आनंद प्रतिमालाही सुखावून गेला.
एक दिवस श्रवणनं ऑफिसातून येताना सिनेमाची दोन तिकिटं आणली. आईंना सिनेमा आवडत नसे. त्यांना नाटक बघायला आवडायचं. प्रतिमानं विचारलं, ‘‘आई सिनेमाला जायचंय आपल्याला…आवरून घ्या. तसा वेळ आहे अजून.’’
‘‘नाही गं! मुळात मला ना, सिनेमाची आवड नाही…असं कर, तुम्ही दोघं जा. बाळाला मी बघते.’’
प्रतिमा काही क्षण तिथेच घुटमळली. ‘‘खरंच, जा तू तेवढंच तुम्हा दोघांना एकत्र राहता येईल.’’ आई म्हणाल्या.
व्वा! आंधळा मागतो एक डोळा…तसं झालं. दोघं पिक्चर बघून आली तेव्हा आईंनी स्वयंपाक तयार ठेवला होता. प्रतिमाला आवडणारे भोपळ्याचे काप अन् श्रवणच्या आवडीची फणसाची भाजी! व्वा!! प्रतिमानं पटकन् गस पेटवला अन् तयार असलेल्या कणकेच्या फुलक्या लाटायला घेतल्या.
‘‘प्रतिमा, तू बैस श्रवणबरोबर, मी देते गरम फुलके.’’ आईंनी म्हटलं.
‘‘नको आई, सगळा स्वयंपाक एकटीनं केलात तुम्ही. तुम्हीच बसा. आता होताहेत फुलके.’’ प्रतिमानं म्हटलं.
श्रवणनं तोडगा काढला. ‘‘प्रतिमा तू पटापट फुलके कर. आपण सगळे एकत्रच जेवूयात.’’
एकाच टेबलवर सगळे एकत्र जेवायला बसले. आईंना खूपच छान वाटलं. त्यांचे डोळे पाणावले. ‘‘आई काय झालं?’’ श्रवणनं विचारलं.
‘‘तुझ्या बाबांची आठवण आली. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’’ आई म्हणाल्या.
‘‘खरंय आई, पण आज हा आनंद ते तुमच्या डोळ्यांनी बघताहेत.’’ प्रतिमानं मृदु आवाजात म्हटलं.
मग ती श्रवणला म्हणाली, ‘‘अशी भाजी फक्त आईच बनवू शकतात. आई, तुमच्या हातची चव माझ्या हाताला आली पाहिजे.’’
‘‘तू ही छान करतेस गं स्वंयपाक,’’ आई म्हणाल्या.
‘‘मी तुमच्यासारखीच सुगरण होण्याचा प्रयत्न करतेय आई.’’ प्रतिमानं म्हटलं. श्रवण सासूसुनेचं सख्य बघून सुखावला होता. एकमेकांना मान देण्यानं घरात केवढं सुख भरभरून वाहत होतं.
दिवाळीचा बोनस घेऊन श्रवण घरी आला अन् त्यानं ते पाकीट प्रतिमाला दिलं. प्रतिमा म्हणाली, ‘‘आपण आईंना देऊयात. त्यांना बरं वाटेल.’’
आईंनी पाकीट बघितलं, ‘‘तुझे बाबा असाच बोनस आणून माझ्या हातात ठेवायचे. आता तू बोनसचे पैसे माझ्या सुनेला देत जा.’’ आई मनापासून म्हणाल्या.
आता प्रतिमालाही समजलं होतं की तिची सासू अत्यंत साधी, नीटनेटकेपणाची आवड असणारी, सुगरण अन् प्रेमळ बाई आहे. तिला पैसा, अडका, कपडा, लत्ता काहीच नकोय. सुर्देवानं तिचं आरोग्य चांगलं असल्यामुळे औषधांचाही खर्च नसतो. फक्त थोडी विचारपूस, थोडा मोठेपणा मिळाला की त्यांना सुरक्षित वाटतं. मुलाच्या बरोबरीनं त्या सुनेवर प्रेम करतात. नातू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे.
दिवाळीची साफसफाई करताना प्रतिमा स्टुलावरून पडली. पाय मुरगळला. आईंनी तिला पलंगावर बसवलं. पायाला आयोडेक्स चोळलं. व्यवस्थित क्रेप बँडेज बांधलं.
‘‘वा, वा! सुनेनं सासूची सेवा करायची तर सूनच सेवा करवून घेतेय.’’ श्रवणनं म्हटलं.
‘‘गप्प रे!’’ आई त्याच्यावर डाफरल्या. ‘‘ही माझ्या मुलीसारखी आहे. मी तिची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची?’’
‘‘आई, मुलीसारखी का म्हणता? मी मुलगीच आहे तुमची.’’ प्रतिमानं म्हटलं. आईंना भरून आलं. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, ‘‘खरंच म्हणतेस पोरी, मला मुलगी नव्हती. तुझ्या रूपानं मुलगी मिळाली.’’
आंबेहळदीचा लेप व भरपूर विश्रांती यामुळे लवकरच प्रतिमाचा पाय बरा झाला. दिवाळीचा उत्साह सगळ्यांनाच होता. सासूसुनेनं मिळून घराची सजावट बदलली. फराळाचे पदार्थही नेहमीपेक्षा जास्त केले. कारण एकमेकींची मदत होती. प्रतिमाला चिरोटे अन् अनरसे खूप छान जमत नसत. यावेळी तिनं आईंकडून त्यातले सर्व बारकावे समजून घेतले होते. दोन्ही पदार्थ छान जमले होते. आईंच्या संमतीनं तिनं यंदा तिच्या मैत्रिणींना फराळाला बोलावलं होतं. एक दिवस सोसायटीतल्या समस्त सासवाही फराळाला येणार होत्या.
‘‘माझा नंबर लागणार आहे की नाही?’’ श्रवणनं विचारलं.
‘‘नाही!’’ सासूसून एकदमच बोलल्या अन् सगळे हसायला लागले.
तेवढ्यात अमेरिकेहून दादाचा फोन आला. नंदिनीनं काही तरी म्हटल्यावर आई दुखावल्या होत्या. नाराज होऊन इथं आल्या होत्या. नंदिनीला अन् दादाला फार पश्चात्ताप होत होता. आईची क्षमा मागायला ती दोघं दिवाळीतच येणार होती. दादा अन् नंदिनीवहिनीला आईला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून दादानं बजावलं होतं. श्रवणला खूप आनंद झाला. कितीतरी वर्षांनी सगळे असे एकत्र दिवाळी साजरी करणार होते.
आपला आनंद आणि उत्साह लपवताना श्रवणला खूपच सायास पडत होते. प्रतिमानं विचारलंसुद्धा, ‘‘तुम्ही खूपच आनंदात आहात…काय विशेष घडलंय?’’
‘‘छे: कुठं काय? तुम्हा सासवासुनांचा आनंद, उत्साह अन् प्रेम बघून मलाही आनंद होतोय.’’ श्रवणनं म्हटलं.
‘‘दृष्ट नका लावू हं आमच्या प्रेमाला.’’ प्रतिमानं दटावलं.
नर्कचतुर्दशीची पहाटेची अभ्यंग स्नानं, फटाके, फराळ वगैरे आटोपले. सायंकाळी लक्ष्मीपूजन होतं. आईनं आपल्या सूटकेसची किल्ली प्रतिमाला दिली अन् त्यातून लाल रंगाचा मखमली बॉक्स काढून आणायला सांगितलं. प्रतिमानं डबा आईच्या हातात दिला. तसा तो उघडून आईनं त्यातून सोन्याचा भक्कम नेकलेस काढून प्रतिमाला दिला. ‘‘सूनबाई, हा हार तुझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी खास घडवून आणला होता. आता यावर तुझा हक्क आहे. रात्री पुजेच्यावेळी नक्की घाल.’’ आईंचे डोळे भरून आले.
प्रतिमानं तो हार हातात घेऊन कपाळाला लावला आणि आईला नमस्कार केला. आईनं मनापासून आशिर्वाद दिले.
सायंकाळी पुजेची तयारी मांडून झाली दिवे पणत्यांनी घरदार, अंगण परिसर उजळला. तेवढ्यात बाहेर टॅक्सी थांबली.
आई पूजेसमोर येऊन बसली तेवढ्यात दादावहिनी येऊन आईच्या पाया पडले. आईला वाटलं आम्ही दोघं आहोत, ‘‘चला, पूजा सुरू करूयात,’’ ती म्हणतेय तोवर तिच्या लक्षात आलं की आम्ही दोघं बाजूला होतो. तिच्या पायाशी दादावहिनी आहेत. ती चकित झाली. तिला अजिबात कल्पना नसताना अमेरिकेतून नातवंड, मुलगा, सुनेनं येऊन आनंदाचा, आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
‘‘आई मला क्षमा करा,’’ नंदिनीवहिनीच्या डोळ्यांत अश्रू होते. आईनं तिला आवेगानं जवळ घेतली. तिचेही डोळे वाहत होते. पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद होता. बाहेर दिवे लखलखत होते. इथे घरातही सर्वांच्या मनांत दीप उजळले होते.