कथा * रमणी माटेगावकर

आज सकाळीच दादाचा फोन आला, ‘‘छोटी, अगं राधा गेली…थोड्या वेळापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला.’’ दादाचा कंठ दाटून आला होता. डोळेही अश्रू गाळत असावेत.

मी एकदम स्तब्ध झाले. कधी ना कधी दादाकडून ही बातमी मला कळणार हे मी जाणून होते. वहिनीला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय हे दादाकडून कळल्यापासून मला धास्ती वाटत होती. मी मनोमन प्रार्थना करत होते की तिचा रोग बरा होऊन तिला काही वर्षांचं आयुष्य अजून मिळावं. पण तसं घडलं नाही. वहिनी जेमतेम चाळीशीची होती. हे वय काही मरायचं थोडीच असतं? अजून तिने आयुष्य उपभोगलंच कुठे होतं? मुलंही लहानच आहेत. हा विचार मनात येताच मला हुंदका फुटला.

मेंदू बधीर झाला होता. हातापायातली शक्ती जणू कुणी ओढून घेतली होती. पण दादाकडे जायला हवं. मी मुकाट्याने बॅग भरायला लागले. कपाटात मला पांढऱ्या मलमलच्या कापडात बांधलेला बनारसी शालू दिसला. शालू बघताच मला जुने दिवस आठवले.

वहिनीने किती हौसेने हा शालू विकत घेतला होता. एकदा दादाला ऑफिसच्या कामाने बनारसला जायचं होतं. त्याने वहिनीलाही बरोबर येण्याचा आग्रह केला. ‘‘अगं, इथून अंतर फार नाहीए. दोन दिवसांत तर आपण परतही येऊ. आई बघेल दोन दिवस मुलांना.’’

‘‘दादा, मीही येणार तुमच्याबरोबर,’’ मी हट्टाने म्हटलं.

‘‘चल, तूही चल,’’ दादाने हसून म्हटल.

आम्ही तिघंही बनारसला खूप भटकलो. वहिनी सतत माझी काळजी घेत होती. आम्ही एका खादीच्या दुकानात शिरलो. ‘‘बनारसला येऊन बनारसी शालू घ्यायचा नाही, असं कसं होईल? बघ राधा, काय आवडतंय तुला…’’ दादा म्हणाला.

वहिनीने बऱ्याच साड्या बघितल्या. तेवढ्यात तिला तो गुलाबी रंगाचा शालू दिसला. तिला तो फारच आवडला. पण त्यावरची किमतीचं लेबल बघून तिने तो पटकन् बाजूला सरकवला.

‘‘का गं? काय झालं? आवडलाय ना तो शालू? मग घे ना?’’ दादाने म्हटलं.

‘‘नको, फार महाग आहे तो…एखादी कमी किमतीची साडी बघते,’’ वहिनी म्हणाली.

‘‘किमतीची काळजी तू कशाला करतेस? पैसे मी देणार आहे,’’ म्हणत दादाने दुकानदाराला तो शालू पॅक करून द्यायला सांगितलं.

‘‘शशीसाठीही काहीतरी घेऊयात ना?’’ वहिनीने म्हटलं.

‘‘शशी अजून साड्या कुठे नेसते? तिच्यासाठी सलवार कुडत्याचं कापड घेऊयात. लग्नाला शशीलाही बनारसी शालू घ्यायचा आहे,’’ दादा म्हणाला अन् आम्ही दुकानाबाहेर पडलो.

त्या सुंदर सुंदर साड्या बघून मलाही एक साडी घेण्याची फार इच्छा झाली होती. पण दादाने माझ्यासाठी साडी घेतली नाही. मी रागावले होते. घरी आल्या आल्या मी आईकडे तक्रार केली. आईकडे तक्रार करणं म्हणजे स्फोटकांच्या कोठारात पेटती काडी टाकणं असायचं.

आई एकदम भडकली. ‘‘प्रशांत, अरे, स्वत:ची नाही, मनाची काही लाज?’’ तार सप्तकात आईचा तोफखाना सुरू झाला. ‘‘स्वत:च्या बायकोसाठी आठ हजार रुपये खर्च केले. धाकटी बहीण बरोबर होती, तिलाही एखादी साडी घेऊन दिली असती तर काय बिघडलं असतं? बिचारीचा बाप हयात नाही म्हणून तुझ्या दयेवर जगणं नशिबी आलंय.’’

‘‘आई, अगं तिच्यासाठी एवढ्यात साडी कशाला घ्यायची? ती साड्या नेसतच नाही, म्हणून तर तिला भारीतला सलवार सूट घेऊन दिला ना?’’

‘‘म्हणून काय झालं? पुढे साड्या नेसेलंच ना ती? बायकोवर खर्च करायला पैसा असतो अन् सगळे हिशोब आमच्यावर खर्च करतानाच आठवतात.’’

दादा काहीच बोलला नाही. आई दोन तास त्यानंतरही संतापून बडबडत होती.

वहिनीने शालूची घडी आईसमोर ठेवत हळुवारपणे म्हटलं, ‘‘आई, हा शालू आपण शशीसाठीच ठेवूयात…खूप शोभेल हा रंग तिला.’’

आईने रागाने साडी दूर लोटली. ‘‘असू दे सूनबाई, आम्ही शालूसाठी आसुरलेले नाही आहोत. इतकाच पुळका होता तर आधीच तिच्यासाठी आणलं असतं. आता हा देखावा कशासाठी? तुमचा शालू तुम्हालाच लखलाभ होवो…’’ आई जोरजोरात रडायला लागली. ‘‘प्रशांतचे बाबा जिवंत होते तेव्हा खूप चांगलं चांगलं नेसलो. ते मला राणीसारखी ठेवायचे. आता तुमच्या भरवशावर आहोत ना? जसं ठेवाल, तसे राहू. जे द्याल ते वापरू, जे द्याल ते खाऊ…’’ किती तरी वेळ तो शालू तसाच जमिनीवर पडून होता. मग वहिनीने ती घडी उचलली अन् कपाटात ठेवली.

त्यानंतर काही महिन्यांनी दादाच्या एका सहकाऱ्याचं लग्न होत. आम्हा सर्वांना तो घरी येऊन अगत्याचं आमंत्रण देऊन गेला होता.

‘‘आज तो बनारसी शालू नेस ना? घेतल्यापासून तुझ्या अंगावर तो बघितलाच नाहीए…’’ दादाने वहिनीला आग्रह केला.

वहिनी शालू नेसून आली तेव्हा इतकी सुंदर दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरची नजर काढू नये असं वाटत होतं. दादाही मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघत होता.

‘‘चला, चला…सगळे गाडीत बसा…’’ दादा घाई करू लागला.

आईने दादाकडे बघितलं अन् ती तिरस्काराने बोलली, ‘‘हे कपडे घालून तू लग्नाला चलतो आहेस?’’

‘‘का? नवा शर्ट आहे, छान आहे ना?’’

‘‘काय छान आहे? बाहीवर उसवलाय.’’

‘‘अरे च्चा! असं झालं होय? माझ्या लक्षातच आलं नाही…’’ दादा सरळपणे म्हणाला.

‘‘आता तू फाटका शर्ट घालून लग्नाला जा…अन् बायको मिरवतेय बनारसी शालू नेसून. तुला काही कळत का नाही? लोक बघतील तर काय म्हणतील?’’

‘‘मी शर्ट बदलून येतो.’’

‘‘आणा इकडे मी दोन मिनिटांत टाके घालून देते,’’ वहिनी म्हणाली.

दादावहिनी दोघंही पुन्हा खोलीत गेली. दादाने शर्ट बदलला होता. वहिनीनेही बनारसी शालू उतरवून ठेवून साधी सिल्कची साडी नेसली होती.

‘‘का गं बदललीस साडी? किती सुंदर दिसत होतीस?’’ दादा दुखावला गेला होता.

‘‘नाही हो, मला वाटलं, नवऱ्यामुलीपेक्षा मीच जास्त झगझगीत दिसेन की काय म्हणून बदलली.’’ वहिनीने उदास हसत सारवासारव केली.

दादा काहीच बोलला नाही.

त्या दिवसानंतर वहिनीने कधीही तो शालू नेसला नाही. दरवर्षी एकदा उन्हं दाखवून कापूर किंवा लवंगेच्या पुरचुंड्या घालून ती तो व्यवस्थित पांढऱ्या मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवायची.

वहिनीला आईचं बोलणं जिव्हारी लागलंय, हे मला कळत होतं. आमच्या वडिलांच्या अकाली निधनाने आई भयंकर चिडचिडी झाली होती. वहिनीशी तर ती फारच दुष्टपणे वागायची अन् अल्लड वयामुळे मीही अधूनमधून वहिनीची कागाळी आईकडे करून आगीत तेल घालण्याचं काम करत होते.

घरात मी धाकटी होते. सर्वांची लाडकी होते. मला वडिलांची उणीव भासू नये यासाठी दादा सतत प्रयत्न करायचा. शिवाय आम्ही त्याच्या आश्रयाने जगतो आहोत असा न्यूनगंड आईला किंवा मला येऊ नये म्हणूनही तो प्रयत्न करायचा. तरीही आई सतत त्याला टोचून बोलायची, दूषणं द्यायची. स्वत:तच मग्न असतो, बायकोचं कौतुक करतो, आईची-बहिणीची काळजी घेत नाही, एक का दोन…बिच्चारा दादा…कसं सगळं सोसत होता, त्याचं तोच जाणे.

दादा शासकीय अधिकारी होता. पगार फार नव्हता. पण शहरात त्याचा दरारा होता. प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून लौकिक होता. बेताच्या पगारामुळे काही वेळा महिन्याच्या शेवटी पैसे संपले की काटकसर करावी लागायची. एकदा ऐन दिवाळीत दादाकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने आईला विश्वासात घेऊन त्याची परिस्थिती सांगितली. यंदा कुणालाच नवे कपडे नको करूयात अन् फटाके, दिव्यांच्या रोषणाईचा खर्चही बेतात ठेवूयात, वगैरे गोष्टींवर दोघांचं एकमत झालं.

‘‘पण छोटीसाठी मात्र दोन नव्या साड्या घ्यायलाच हव्यात हं! नवे कपडे नाही मिळाले तर तिची दिवाळी आनंदात जाणार नाही. त्यातून पोरीची जात..किती दिवस आपल्याकडे राहाणार आहे? शेवटी परक्याचं धन…’’

‘‘बरं!’’ दादाने मान हलवली.

नव्या साड्या नेसून मी घरभर हुंदडत होते. इतर कुणालाही नवे कपडे नव्हते. पण वहिनीच्या चेहऱ्यावर कुठेही त्रागा, औदासीन्य काहीही नव्हतं. ती मनापासून माझं कौतुक करायची. आई मात्र सतत तिचा राग राग करत असे. दादावहिनी कधी दोघंच कुठे बाहेर जायला निघाली की आईचा पारा चढायचा. ती तोंड फुगवायची. ती दोघं परत आली की आईच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. ‘‘प्रशांत, अरे, घरात लग्न न झालेली बहीण आहे, आधी तिच्या लग्नाचं बघ. मग तुम्ही नवराबायको हवं ते करा…मी काही बोलणार नाही.’’

कधीतरी वहिनीने केसात फुलं माळली, गळ्यात मोत्यांची माळ घातली तरी आईचा तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. ‘‘सुने, अगं सगळा वेळ नटण्याथटण्यात घालवशील तर तुझ्या मुलांकडे कधी बघशील? मुलं जन्माला घातलीत तर त्यांच्याकडे लक्ष नको द्यायला?’’

नवी साडी नेसून, मॅचिंग ब्लाउज, बांगड्या घालून वहिनी दादाबरोबर बाहेर जायला निघाली की आई तोंड वाकडं करून म्हणायची, ‘‘दोन मुलं झाली तरी अजून साजशृंगाराची हौस फिटली नाहीए. नटमोगरी कुठली…’’

banarasi-sari

वहिनीने नटावं, आपल्याबरोबर बाहेर यावंजावं असं दादाला वाटे. तिला छान साडी नेसून कानातलं, गळ्यातलं घालून तयार झालेली बघितली की त्याचा चेहरा खुलायचा. हेच बहुधा आईला आवडत नसे. तिला वाटे वहिनीने दादावर जादू केली आहे. म्हणूनच तो तिला कधी बोलत नाही. रोज सायंकाळी तो घरी आला की आई त्याच्यापाशी बसून वहिनीच्या कागाळ्या सांगायची. खरं तर ती इतकी सोशिक अन् शांत होती, की मलाही तिचं नवल वाटायचं. मला किंवा आईला तिने कधीही एका शब्दाने दुखावलं नव्हतं. तिच्या या गुणामुळेच दादा तिच्या प्रेमात होता. आई सदैव तिचा अपमान करायची, घालूनपाडून बोलायची, पण वहिनीने कधी दादाकडे तक्रार केली नाही. फारच झालं तर बिच्चारी आपल्या खोलीत बसून रडून घ्यायची. वहिनीचे दोघे धाकटे भाऊ होते. शाळेत शिकणारी ती मुलं कधीमधी बहिणीला भेटायला यायची. भाऊ आले की वहिनीला फार आनंद वाटायचा. ती त्यांच्यासाठी काहीतरी नवा पदार्थ करायची.

त्यावेळी आईच्या संतापाचा पारा चढायचा. ‘‘व्वा! आज तर उत्साह उतू जातोय सूनबाईचा. चला, भावांच्या निमित्ताने का होईना सर्वांनाच चांगलंचुंगलं खायला मिळेल. पण महाराणी सरकार, एक सांगा, तुमचे बंधुराज येताना नेहमीच रिकाम्या हाताने का येतात? बहिणीकडे जाताना काही भेटवस्तू न्यावी हे त्यांना कळत नाही का? येतात आपले रिकाम्या हातांनी…’’

वहिनी हळूच म्हणायची, ‘‘आई, अजून शाळकरी आहेत हो दोघंही…भेटवस्तू घेण्याइतके पैसे कुठे असतात त्यांच्याकडे?’’

‘‘म्हणून काय झालं?’ दहा पाच रुपयांची बिस्किटं तरी आणता येतात ना? पण नाही. दळभद्री कुटुंबातली आहेत ना? त्यांना रीतभात कशी ठाऊक असणार?’’

वहिनीला अशावेळी रडू अनिवार व्हायचं.

पुढे माझं लग्न ठरलं. माझ्या सासरची माणसं फार सजन्न होती. त्यांनी हुंडा, मानपान काहीही घेतलं नाही. दादाने खूप हौसेने माझं लग्न लावून दिलं. पाठवणीच्या वेळी वहिनीने तो बनारसी शालू माझ्या सूटकेसमध्ये ठेवला. ‘‘छोटी, माझ्याकडून तुला ही भेट.’’

‘‘वहिनी, अगं हा तुझा लाडका शालू…’’

‘हो गं, पण नेसायची वेळ येतेय कधी? तू नवी नवरी, तुला तो शोभेल अन् नेसलाही जाईल. नेसशील तेव्हा माझी आठवण काढ.’’

मी वहिनीला मिठी मारली. मनात म्हटलं, ‘‘खरंय वहिनी, तुझी आठवण नेहमीच काढेन. तुझ्यासारख्या स्त्रिया जगात किती कमी असतात. इतक्या उदार मनाच्या, इतक्या सोशिक, कधीही तोंडातून तक्रारीचा सूर न काढणाऱ्या…मी तुझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेन.’’

माझं सासरचं घर भरलं गोकुळ होतं. एक धाकटा दीर, दोघी नणंदा, सासू, सासरे, कुठल्याही नवपरीणित जोडप्याप्रमाणे आम्हा नवराबायकोलाही एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटे. सायंकाळी नवरा घरी आल्यावर आम्ही दोघं बाहेर फिरायला जाण्याचा बेत असायचा. मी आवरायला लागले की नणंद म्हणायची, ‘‘मीही येऊ का तुमच्याबरोबर?’’

सासूबाई म्हणायच्या, ‘‘काही गरज नाही. आधी होमवर्क पूर्ण कर अन् संध्याकाळच्या स्वयंपाकात मला थोडी मदत कर.’’ नणंद चिडायची. धुसफुसायची पण सासूबाईंचं म्हणणं कुणी टाळत नसे.

मला कळायचं, आम्हाला मोकळेपणा मिळावा म्हणून त्या सीमाला आमच्याबरोबर पाठवत नव्हत्या. मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटायची अन् त्याचवेळी माझी आई माझ्या वहिनीशी कशी वागायची हेही आठवयाचं.

एकदा दादा मला भेटायला आला होता. आईने त्याच्याबरोबर काही भेटवस्तू पाठवल्या होत्या…सासूबाईंनी सर्व वस्तूंचं मनापासून कौतुक केलं होतं. सर्वांना वस्तू दाखवल्या. आईला व दादाला नावाजलं.

मला म्हणाल्या, ‘‘शशी, तुझा दादा प्रथमच आलाय आपल्या घरी. त्याच्या आवडीचा स्वयंपाक कर. एक दोन पक्वान्नं कर.’’ माझंही मन आनंदलं अन् पुन्हा आईची अन् सासूबाईंची तुलना मनाने केलीच. वहिनीच्या माहेरचं कुणी घरी आलं की आईचा रूद्रावतार ठरलेला. स्वत:चा राग, असंतोष व्यक्त करण्यासाठी ती स्वयंपाकघरात जोरजोरात भांडी आपटायची.

माझं लग्न झाल्यावर आईने मला एकांतात बोलावून बजावलं होतं, ‘‘हे बघ छोटी, तुझा नवरा देखणा आहे. त्या मानाने तू डावी आहेस. तुला सांगते ते नेहमी लक्षात ठेव. कायम नटूनथटून व्यवस्थित राहा. स्वत:ला आकर्षक ठेव, तरच नवरा तुझ्यावर प्रेम करेल.’’

‘‘पण वहिनी थोडीही नटली तर तू तिला केवढी ओरडायचीस?’’ मी म्हटलं.

‘‘तिची गोष्ट वेगळी, तुझी गोष्ट वेगळी.’’ आई म्हणाली होती.

इथे माझ्या सासरी कोणताही सण, समारंभ, उत्सव असला की माझी सासू आग्रह करून मला नवी साडी नेसायला लावायची. दागिने घालायला लावायची. सगळ्यांना सांगायची, ‘‘बघा, माझी सून कशी छान दिसतेय ना?’’

तिथे माझ्या आईने लक्ष्मीसारख्या माझ्या वहिनीला सतत धारेवर धरलं होतं. एक दिवस कधी बिचारी सुखाने राहिली नाही. सतत टोमणे, सतत संताप, दादाच्या आयुष्यातही तिने विषय कालवलं होतं. वहिनी तर बिचारी करपून गेली होती.

मला वाटतं त्यामुळेच वहिनीला जीवनाची आसक्ती उरली नव्हती. कॅन्सर झालाय हेदेखील तिने दादाला कळू दिलं नाही. मुकाट्याने घरकामाचा डोंगर उपसत राहिली. दादाच्या लक्षात आलं तेव्हा फार उशीर झाला होता.

मी दादाच्या घरी पोहोचले तेव्हा प्रेतयात्रेची तयारी झाली होती. मी बरोबर आणलेला बनारसी शालू तिच्या निष्प्राण देहावर पसरवला अन् अत्यंत आदराने तिला नमस्कार केला

‘‘छोटी, अगं काय करते आहेस? थोड्या वेळातच सगळ्याची राख होणार आहे.’’ आईने मला बाजूला घेऊन दमात घेतलं.

‘‘होऊ दे…’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मला डोळ्यांपुढे वहिनीचं ते नववधूचं रूप दिसत होतं. सुंदर सतेज चेहरा, ओठावर सलग हास्य अन् डोळ्यांत नव्या संसाराची कोवळी स्वप्नं…

तिरडी उचलली तेव्हा आईचा आक्रोश सर्वांपेक्षा अधिक होता. ती हंबरडा फोडून रडत होती. दादा तर जणू दगड झाला होता. दोन्ही मुलं रडत होती पण धाकटी पाच वर्षांची स्नेहा काहीच न समजल्यामुळे बावरून उभी होती. मी तिला उचलून घेतली. दहनविधी आटोपून घरी परतलेल्या दादाला मी म्हटलं, ‘‘मुलं मोठी आहेत. काही दिवसांनी त्यांना हॉस्टेलला ठेव. हिला मी नेते. मी हिला सांभाळेन, वाढवेन. अन् तू म्हणशील तेव्हा तुझ्याकडे परत पाठवेन.’’

तेवढ्यात आईने म्हटलं, ‘‘छोटी, अगं भलतंच काय बोलतेस? तुझ्यावर कशाला तिची जबाबदारी? उगीचच तुला त्रास?’’

‘‘नाही आई, मला अजिबात त्रास होणार नाही. उलट, ती इथे राहिली तर तूच तिला सांभाळायला असमर्थ ठरशील.’’

‘‘अगं पण, तुझ्या सासूला विचारलं नाहीस, अन् एकदम हिला नेलीस तर त्यांना काय वाटेल? त्या काय म्हणतील?’’

‘‘माझी सासू तुझ्यासारखी नाहीए. त्यांना माझा निर्णय आवडेल. त्या मला पाठिंबाच देतील,’’ मी ठामपणे बोलले.

मला वाटतं वहिनी वरून आमच्याकडे बघते आहे.?शांत, प्रसन्न हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे… ‘‘वहिनी,’’ मी मनातच बोलले, ‘‘तुजी ही लेक मी नेते आहे. तुझा ‘अनमोल ठेवा’ म्हणूनच मी तिला वाढवेन. मला खात्री आहे, ही तुझेच संस्कार घेऊन जन्माला आली आहे. तुझं रूप मी तिच्यात बघते आहे. तू निश्चिंत राहा…’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...