मिश्किली * संतोष शेणवी

काही सिनेमा नट्यांना कुत्र्यांसमवेत फोटो काढून ते छापायची फार हौस असते. असे डॉगी किंवा पपी सोबतचे त्यांचे फोटो बघितले की सौ. उसासे टाकते.

‘‘माझ्याकडेही असाच एखादा छकुला, गब्दुल्ला डॉगी असता तर…’’ ती स्वत:शी पुटपुटते…‘‘मग मी ही असाच झोकात सेल्फी काढून घेतला असता. त्याला घेऊन रोज वॉकिंगला गेले असते, मैत्रीणींवर इंप्रेशन मारलं असतं.’’

एकदा ऑफिसातून घरी पोहोचलो, तेव्हा सौ.च्या मैत्रिणीची पार्टी चालू होती. सौ. सांगत होती, ‘‘अगं काय सांगू? हल्ली तर डॉगींचाच काळ आहे, म्हणजे सध्या ना तिच फॅशन आहे. एकाहून एक सरस देशी, विदेशी कुत्रे मिळताहेत…मलाही असा एखादा डॉगी मिळाला तर किती मज्जा येईल. डॉगीचीही एक वेगळीच ऐट असते हं!’’

त्यावर तिच्या (मूर्ख) सख्यांनीही आपापल्या कुवतीप्रमाणे तिला सल्ले दिले, आपली मतं सांगितली. थोड्याच वेळात त्या निघून गेल्या. सौ. बेडरूममध्ये जाऊन रडत बसली. रडताना ती माझा उद्धार करतच होती.

‘‘कुठल्या दरिद्री माणसाशी लग्न झालंय माझं…एक कुत्रा नाही खरेदी करता येत त्याला. नशिबच फुटकं आहे माझं. लग्नापूर्वी किती स्वप्नं बघितली होती मी…ऐटीत मी चालतेय…सोबत झोकात चालणारा डॉगी आहे.’’

मनातल्या मनात मी म्हटलं, ‘‘अरेच्चा, मी कुणा डॉगीपेक्षा कमी आहे की काय? लग्न झाल्यापासून सतत सौ.च्याच अवतीभोवती घुटमळतो, घोटाळतो आहे. प्रामाणिकपणे, अगदी इमाने इतबारे मी तिचाच आहोत. तरीही शेवटी एकदा ऑफिसला रजा टाकून मी कुत्रा ऊर्फ डॉगी शोधायला निघालो.’’

सगळ्यात आधी मी डॉगी विकणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. तेव्हा समजलं डॉगीच्या किंमती हजारोंमध्ये (हजारो रूपयात) असतात. शिवाय त्यांचा आहारही त्यांच्या डाएट चार्ट प्रमाणे असतो. (भलेही तुम्ही उपाशी राहा.) शिवाय त्यांना वेळोवेळी इजेक्शन वगैरे द्यावी लागतात. डॉगीचा स्पेशल डॉक्टरांकडून ‘चेकअप’ करवून घ्यावा लागतो. तुम्ही उन्हाळ्यानं बेजार, हैराण व्हा किंवा थंडीत कुडकुडत बसा. डॉगीसाठी घरात कूलर आणि हिटर हवाच हवा. ही विलायती कुत्री, सॉरी, डॉगी तशीही नाजूक असतात. जरा दुर्लक्ष झालं तरी ती लगेच कोमेजतात म्हणे.

हे सर्व ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की घरात एक तर मी राहणार किंवा डॉगी…पण सौ. तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती.

प्रसंगाचं गांभिर्य समजूत घेत मी सौ.ची समजूत घातली की आपले देशी डॉगीही चांगलेच असतात. आपण एखादं देशी कुत्रंच पाळूया. ते बिचारं आपल्याला दुवा देईल. त्याचंही भलं होईल, आपली हौस भागेल. त्याला विलायती डॉगीसारखा मेकअप करून देऊया.

दुसऱ्याच दिवशी सकाळी मी फिरून येत असताना एक गावठी कुत्रं माझ्या मागे मागे येऊ लागलं. मी जरा चुचकारलं अन् ते थेट घरातच आलं की! प्रथम मी त्याला दूधपोळी खाऊ घातली. मग समोरच्या व्हरांड्यात साखळीनं बांधून ठेवलं. सौ.नं त्याच्याकडे इतक्या प्रेमाने अन् अभिमानानं बघितलं की खरं सांगतो माझा अगदी तिळपापड का काय म्हणतात तो झाला. लग्नानंतर आतापर्यंत एकदाही सौ.नं इतक्या प्रेमानं अन् अभिमानानं माझ्याकडे बघितलं नव्हतं.

वर मानभावीपणे म्हणते कशी, ‘‘बरं का, आता मी माझं सगळं प्रेम या डॉगीवर उधळणार आहे. अन् बरं का, तुमच्याबद्दल असं प्रेम मला वाटलंच नव्हतं हो!’’

दुसऱ्याच दिवशी सकाळी सौ.नं डॉगीची साखळी हातात घेतली अन् त्यांची जोडी फिरायला बाहेर पडली. आता ते गावठी कुत्रंही ऐटीत चालत होतं. तेवढ्यात दुसऱ्या मोहोल्ल्यातील तीन चार कुत्री आमच्या डॉगीवर भुंकायला लागली. सौ.च्या हातात काठी होती, त्यामुळे आमच्या डॉगीवर त्यांनी हल्ला चढवला नाही. पण सौ. पुढे पुढे, मागे मागे कुत्र्यांची फौज, एक डोळा त्या कुत्र्यांवर, दुसरा डोळा आपल्या डॉगीवर, सतत एका हातात डॉगीची साखळी, दुसऱ्या हातानं काठी आपटत भुंकणाऱ्या कुत्र्यांना दूर ठेवणं या गडबडीत सौ.चा पाय खड्ड्यात गेला. जबरदस्त मुरगळला. कशीबशी जोडी घरात आली. सौ.चा दुखरा पाय बरा करण्यासाठी भरपूर पैसे खर्च झाले. त्या काळात ती अंथरूणातून उठतच नव्हती.

आमच्या काळज्या, चिंता अन् कटकटी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या. मला डॉगीला सांभाळण्यासाठी ऑफिसातून रजा घ्यावी लागली. त्याला बांधून ठेवला तर तो भुंकून कहर करायचा. लोकांनी सल्ला दिला की त्याला मोकळा राहू दे. मग तर त्यानं संपूर्ण घराचाच ताबा घेतला. सर्व स्वैर संचार करायचा. त्याला न्हाऊ घालायची जबाबदारीही आता माझ्यावर आली.

डॉगीला घरी आणलं, तेव्हा आमची रमाबाई मोलकरीण महिन्याची रजा घेऊन गावी गेली होती. ती रजा संपवून कामावर आली. नवा चेहरा, नवा माणूस बघून डॉगीनं भुंकत तिच्यावर उडी घेतली. घाबरून रमाबाई पळायला लागली अन् पायऱ्यांवरून धडपडली. तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं. आमच्या डॉगीमुळे, आमच्याच उपचारांचा खर्चही आमच्याच डोंबलावर आला. प्लॅस्टर निघेपर्यंत दोन महिने भरपगारी रजा शिवाय इतर घरातल्या कामांनाही ती जाऊ शकणार नाही म्हणून वर दहा हजार रूपये रोख द्यावे लागले. (त्या सटवीनं पोलिसात जायची धमकी दिली ना?) रमाबाई येऊन काम सांभाळेल, मला थोडा दिलासा, थोडी विश्रांती मिळेल वगैरे सर्व आशा पार मावळल्या. डॉगीचं अन् घरातलं करता करता पुरता दम निघाला.

घरात डॉगी आहे म्हणताना आम्ही नि:शंकपणे सिनेमाला, पार्ट्यांना रात्री उशिरापर्यंत जाऊ शकत होतो. पण आमचा डॉगी हल्ली आळशी व्हायला लागला होता. एकदा आम्ही नसताना घरात चोरी झाली. हा हरामखोर मजेत ब्रेडमटण खात बसला होता. मी ऐकून होतो की कुत्रा आपल्या मालकाशी कधीही दगलबाजी करत नाही पण चोरानं ब्रेडमटण खायला घातलं अन् हा स्वामीभक्ती विसरला.

वर सौ.नं मलाच ऐकवलं, ‘‘अहो, डॉगी पळालाय. उंदीर नाही. आजपर्यंत तुम्ही कधी त्याला ब्रेडमटण खायला घातलंत का? नाही ना? मग ज्यानं ते दिलं, त्याच्याशी तो प्रामाणिक राहिला.’’

हेही सत्यच होतं. एक धडा शिकलो. तोंड मिटून गप्प बसलो.

माझ्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यात मी कधी एका पैचं घेतलं नव्हतं. पण या डॉगीच्या पायी माझ्यावर कर्जाचा डोंगरच झाला होता.

एका रात्री डॉगी जरा जास्तच भुंकत होता. माझ्या एक लक्षात आलं होतं की गल्लीतली कुत्री रात्री अपरात्री गळे काढतात, तेव्हा लोकांना त्रास होत नाही. पण आमचा डॉगी भुंकतोय म्हटल्यावर शेजाऱ्यांना खूपच त्रास होतो. कुणा हलकटानं पोलिसांना फोन केला अन् पोलिस, त्यांच्यासोबत पशुसंरक्षणवाले आमच्या घरात दाखल झाले. आमच्यावर कुत्र्याला उपाशी ठेवण्याचा गुन्हा दाखल झाला.

मी आपल्या परीनं त्यांना समजावत होतो, ‘‘भाऊ साहेब, तुमचा गैरसमज झालाय, हे बघा अजूनही याच्याजवळ ब्रेडबटर ठेवलेलं आहे. मला कर्ज घ्यावं लागलंय तरीही कुत्र्याला आम्ही अजिबात त्रास होऊ दिला नाहीए.’’

पोलीस इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले, ‘‘तर मग साहेब, थोडं कर्ज अजून घ्या, म्हणजे हे प्रकरण मिटेल नाही तर तुम्हाला मुक्या जिवाला त्रास दिल्याच्या, छळ केल्याच्या आरोपावरून तुरूंगात जावं लागेल.’’

शहाण्याला शब्दाचा मार. मी दुसऱ्याच दिवशी कुत्र्याच्या पालनपोषणासाठी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेतलं. ताबडतोब ते मंजूर झालं. माझ्या तब्येतीसाठी पैसे हवे होते, ते आजतागायत मिळालेले नाहीत.

त्यातल्या त्यात समाधानाची अन् आनंदाची बाब म्हणजे हल्ली सौ.चं श्वानप्रेम कमी कमी व्हायला लागलं होतं. एक दिवस ती म्हणाली, ‘‘बरं का, जे झालं ते झालं. डॉगीमुळे आपली शान वाढली होती हे तर खरंच शिवाय कुत्र्यापासून सावधानचा बोर्ड दारावर लावला गेला. आता तो बोर्ड आपण नको काढूयात. काढला तर लोकांना चेष्टा करायला एक विषय मिळेल. माझं ना, फारच चुकलं. मी तुमचा मान राखला नाही. तुमची किंमत मला कळली नाही. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला समजलं होतं की तुम्ही माझे सगळ्यात जास्त विश्वासू पती आहात. तर आता तो विश्वास तुम्हालाही सार्थ ठरवावा लागेल. म्हणजे असं की दाराशी कुणाचीही चाहूल लागली की तुम्ही डॉगीसारखं, भुंकायला लागायचं, मग मी म्हणेन, ‘‘ऐकलंत का, जरा, डॉगीला मागच्या व्हरांड्यात बांधून ठेवा. बाहेर कुणी आलंय, मी दार उघडते, समजलं का?’’

या डॉगी प्रकरणानं मी इतका वैतागलो होतो की सौ. जे म्हणेल, ते करायला मी तयार होतो. मग एकदा रात्रीच्या अंधारात मी डॉगीला लांब, खूप लांब सोडून आलो.

आता सौ. आणि घराच्या इभ्रतीसाठी मी वेळी अवेळी भो भो भो भो भुंकत असतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...