* नरेश साने

मथळा वाचून वाचकांनी दचकू नये हे संभाषण शृंगार रसातील नसून थोडं वेगळं आहे. भारतीय पतीपत्नीत दररोज घडणाऱ्या स्पेशल रोमँटिक संभाषणाची बातमी यातून मिळेल. जे विवाहित आहेत त्यांना समजण्याची गरजच नाही. हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडत असतं अन् जे भाग्यवान अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठी ही फुकटची ट्यूशन किंवा धडा आहे. पटलं तर शिका, मानसिकदृष्ट्या स्वत:ची तयारी करा किंवा आमच्या अनुभवाला पाचकळ विनोद समजून दुर्लक्ष करा. जे करायचं ते करा, तुमची मर्जी! आम्हाला काहीच टेन्शन नाहीए.

किस्सा ट्रेनमधला आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागता लागता आम्ही चपळाईनं जनरल बोगीत जागा पटकावली. पण या चपळाईला काही अर्थच नव्हता कारण डब्यात अजिबात गर्दीच नव्हती. माझ्या समोरच्या सीटवर विंडोजवळ एक नवयौवना बसली होती. तिच्या शेजारी एका मुलानं आपलं सामान रचून अख्खी बर्थ अडवली आहे. माझ्या शेजारीही एक कॉलेज युवती येऊन बसली आहे. ट्रेन हळूहळू सरकायला लागली आहे.

तेवढ्यात अचानक डब्यातल्या सगळ्याच प्रवासी मंडळींचे लक्ष त्या नवयौवनेकडे वेधलं जातं. कानाला मोबाइल लावून मोठ्या आवाजात अगदी स्टायलिशपणे ती बोलू लागली. तिचं बोलणं मजेशीर आहे. इतर कुणीच बोलत नसल्यामुळे तिचं बोलणं अधिकच जोरात ऐकायला येतंय. सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे आहे. ती मात्र बिनधास्त आहे. तुम्हीही ऐका ते संभाषण :

‘‘तुम्ही कुठं आहात? मी ही मागच्या जनरल बोगीतच आहे.’’

‘‘अहो सांगतेय ना, मागच्या डब्यात.’’

‘‘कोणत्या जगात वावरता हो?’’ युवती हसत हसत म्हणते, ‘‘मी गेटवरच उभी आहे. नीट बघाल तर दिसेन ना?’’ आम्ही सगळेच दचकलो. कारण ती जागेवर बसूनच बोलतेय. डब्याच्या दारात ती उभी नाहीए.

आता ट्रेननं वेग धरला. बोलणं सूरुच आहे. ‘‘आधी मला सांगा, तुम्ही आहात कुठं? स्टेशनवर आहात तर मला का दिसत नाही? कुणाच्यातरी सोबत असाल…ती कोण तुमची क्लोज फ्रेण्ड नक्कीच ती सोबत असणार… म्हणूनच तर बायकोला ओळख दाखवत नाहीए तुम्ही…’’

‘‘अस्स?…म्हणजे रेल्वेनं तुमच्यासाठी स्पेशल डबा लावला अन् त्यात तुम्ही चढलात.’’

‘‘अहो किती वेळ सांगतेए… मी डब्याच्या दारातच उभी आहे. बाई गं…पाय निसटला माझा…थोडक्यात वाचले हो…’’

‘‘तर-तर? तुम्हाला कशाला काळजी वाटेल माझी?…तुम्हाला तर वाटेल, बरं झालं, ब्याद गेली…तुम्हाला तेच हवंय ना? पुरे हो…मला काही सांगू नका…मला सगळं माहित आहे…’’

‘‘आता हे शब्द तर तुम्ही उच्चारूच नका…तिलाच सांगा… जिच्याबरोबर तुम्ही दिवसरात्र चॅटिंग करत असता…खरंच…किती किती दुष्ट आहात हो तुम्ही…मला जर कल्पना असती की तुम्ही मला ट्रेनमध्ये एकटी सोडणार आहात तर मी ट्रेनमध्ये बसलेच नसते…खरं सांगते…’’

‘‘हो, माहिती आहे, किती काळजी घेता माझी…लोक आपल्या बायकोवर किती प्रेम करतात, किती जपतात अन् तुम्ही, तुम्हाला तर मी मेलेय का जिवंत आहे यानं काहीच फरक पडणार नाहीए…’’

एकीकडे युवती आपल्या बॅगेतून खाण्याचे पदार्थ काढतेए. सॅण्डविच, ब्रेड रोल खाता खाता पुन्हा संभाषण सुरूच आहे. डब्यातल्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष तिच्याकडेच आहे. माझ्या शेजारी बसलेली कॉलेजकन्यका हसली. मी शांतपणे सर्व घटनाक्रम समजून घेतोय.

एवढ्यात एक स्टेशन निघून गेलं. पतीपत्नी अजूनही भेटलेले नाहीत. संभाषण मात्र आता अधिक तीव्र होतंय.

‘‘मला वेडी समजता का हो तुम्ही? मी मागचे पुढचे सगळे डबे फिरून बघितलेत…कुठं लपून बसला आहात?’’

‘‘मला उगीचच चिडायला लावू नका. मागच्या डब्यात असता तुम्ही, तर मला दिसला असता ना?…सगळं समजतं मला…तुम्ही मुद्दाम माझ्यापासून दूर राहताय.’’

‘‘छे हो, चूक माझीच आहे. मी अशी वेड्यासारखी प्रेम करते तुमच्यावर…अन् तुम्ही मला मूर्ख बनवता…’’

‘‘एन्जॉय करा…मला काहीही टेंशन नाहीए. माझं काय…राहीन अशीच…तुम्ही तुमच्या नवीन मैत्रीणीसोबत आयुष्य घालवा…’’

‘‘नाही…खरं सांगतेय…आता तर सरळ घटस्फोट घेणार मी…’’

‘‘आता काय सगळं ट्रेनमध्येच सांगू का मी? मी काही बोलत नाही याचा अर्थ माझ्या तोंडात जीभ नाही किंवा मी मुकी आहे असा नाही…’’

‘‘फॉर गॉड्स सेक…इट इज टू मच यार…आता भेटा तर खरं, मग दाखवते तुम्हाला…’’

तरुणीच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य अन् फिरकी घेण्याचं समाधान आहे. अन् बोलण्यातून मात्र राग झळकतो आहे. आम्ही त्यामुळे कन्फ्यूस्ड आहोत…(बावळटासारखे घटनेचा अन्वयार्थ लावण्यात गुंतलो आहोत).

अचानक त्या नवयौवनेच्या दुसऱ्या मोबाइलची रिंग वाजते. ती तो मोबाइल उचलून बोलू लागते. या मोबाइलवरचं संभाषण तसंच राहातं.

युवती आता हसत हसत तिच्या आईशी वार्तालाप करते आहे. ती मघापासूनचा सगळा किस्सा आईला अगदी रंगवून सांगते आहे. वर म्हणते, ‘‘अगं आई, मी त्याला असा ताणला नाही तर तो अगदी अलगद माझ्या हातातून निसटून जाईल. खरोखर फारच केअरलेस आहे तो. असं ठेवते म्हणून लायनीवर असतो, नाहीतर…’’

या बोलण्यात व्यत्यय येतो तो पहिला फोन पुन्हा वाजायला लागतो म्हणून. युवती आईला, ‘‘नंतर बोलते’’ म्हणून फोन बंद करते अन् पहिला फोन उचलते.

‘‘अरेच्चा? मी कुठं जाणार? सगळा डबा शोधतेय मी…तुम्हाला शोधण्यासाठी…मी बरी हरवेन?…’’

‘‘खरंय…खरंय…तुमच्यासारखी मी नाहीए…यू आर मोस्ट केअरलेस पर्सन…’’

‘‘बरं…बरं…काही हरकत नाही…घरी पोहोचा. बघतेच मी तुम्हाला?’’

एव्हाना पुन्हा स्टेशन आलं होतं. हे माझं उतरण्याचं ठिकाण होतं. आता त्या संभाषणातून नाइलाजानं मला बाहेर पडावं लागत होतं. पुढे नेमकं काय घडलं कळणार नव्हतं. पण या चाळीस मिनिटांच्या प्रवासात क्षणभरही बोअर झालं नव्हतं. मनोमन मी याचं समाधान मानलं की माझी सौ. यावेळी माझ्यासोबत नव्हती. नवऱ्याला मुठीत ठेवण्याच्या अशा टिप्स फुकटात मिळाल्या तर कोणती बायको असली सुवर्ण संधी सोडेल? तिनं हे ऐकलं असतं तर माझी काही खैर नव्हती.

एक गोष्ट मात्र कळली, पतीपत्नीतील भांडणं समोरच्याला विचित्र वाटली तरी त्याच्या मुळाशी त्यांचं प्रेम असतं अन् खरंय ना? ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो ना? पतीपत्नी प्रियकर प्रेयसीही असतात आणि मित्रही. त्यामुळेच त्यांना एकमेकांवर अधिकार गाजवावा असं वाटतं. भारतीय संसाराचं हेच वैशिष्ट्य आहे की रोजरोज भांडत नवरा बायको एकत्र राहातात, पाश्चिमात्त्य लोकांना यांचं कोतुक वाटतं अन् नवलही!

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...