मिश्किली * डॉ. अरुणा शास्त्री

अहो मॅडम, हो, तुम्हालाच म्हणतेय मी… हल्ली आम्ही बाईसाहेब, माईसाहेब वगैरे न म्हणता सरळ मॅडमच म्हणतो. काही जणी म्याडम म्हणतात. तर मॅडम, तुमची हिम्मत कशी झाली मला मोलकरीण, कामवालीबाई, भांडी घासणारी, धुणंभांडी करणारी वगैरे म्हणायची? मला हाक मारताना माझ्या नावाने अन् प्रेमाने हाक मारायची नाही तर सरळ मेड सर्व्हंट किंवा मेड म्हणायचं. नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. मी मोलकरीण किंवा कामवाली नाही. जिथे काम करायला जाते तिथे राणीच्या रूबाबात राहाते. मोलकरीण तर कुणी मला म्हणूच शकत नाही. कुठल्याही नोकरीची पत्रास मी बाळगत नाही. मनात येईल तेव्हा तुमची टुकार नोकरी मी सोडू शकते. गरज तुम्हाला आहे माझी…मला नाही. वाट्टेल तेवढी कामं मिळतात मला. एक घर सुटलं तर दहा घरं असतात जी मला हातोहात उचलतात. ठेवायचं तर ठेवा, नाही तर मी चालले…मै चली, मै चली…ला ला ला. लाला ला…

कामं मी माझ्या मर्जींने आणि माझ्या अटींवर करते हे तुम्ही विसरायच नाही हं, मॅडम. मला कामावर ठेवाल तेव्हा वेळेचं बंधन मला घालायचं नाही. मी काही तुमच्यासारखी किंवा साहेबांसारखी ऑफिसात काम करत नाही जिथे वेळेत पोहोचणं कंपलसरी असतं. मी आरामात माझ्या घरातली कामं करून, मग नटूनथटून कामावर येते. म्हणून ‘उशीर केला, वेळेवर आली नाहीस’ वगैरे कटकट करायची नाही…कळलं?

एक गोष्ट अजून ऐकून घ्या. माझ्याकडे माझा मोबाइल आहे. त्यावरून मी कुणाशीही, कितीही वेळ, केव्हाही अन् कधीही बोलेन. तुम्ही त्यावर आक्षेप घ्यायचा नाही, की कामं खोळंबली आहेत, ही गप्पा मारते, असं बडबडायचं नाही.

त्याशिवाय मला जेव्हा वाटेल तेव्हा, जितक्या वेळा वाटेल तितक्या वेळा हवा तेवढा म्हणजे दीड दोन कप चहा लागतो. त्याशिवाय माझं हातपाय चालत नाहीत. कडक अन् गोडगट्ट चहा घेताना मला कुणी हटकलेलं खपत नाही.

आणि हो मॅडम, अजून एक…दुपारी मला माझ्या आवडत्या सीरियल्स बघायच्या असतात. जर मी फुल स्पीडवर पंखा लावून मूव्ही किंवा सीरियल बघितली तर तुम्ही उगीचच घर डोक्यावर घेऊ नका. कारण टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींमुळे माझं सामान्य ज्ञान खूपच वाढतं. कुठल्या डिटर्जण्टमध्ये शंभर लिंबाची शक्ती आहे अन् कुठली पावडर दहा हातांनी मळ काढते हे सगळं त्यातूनच तर कळतं. आमचे हात मऊ राहायला हवेत. आम्हाला कंबरदुखीचा त्रास नको म्हणून तर या सगळ्या जाहिराती असतात. तुम्ही त्या सर्व वस्तू आधीच घरात आणून ठेवा.

मॅडम, आधीच क्लीयर करा हं. तुमचे सासूसासरे तुमच्या सोबत राहातात का? जिथे म्हातारी खोडं राहातात त्या घरात मी काम करत नाही. कारण जेवढा वेळ आम्ही काम करतो, तेवढा वेळ खडूस म्हातारी डोक्यावर उभी राहाते, ‘इथून केर काढला नाही,’ ‘तिथून पुसून घेतलं नाही,’ असं नाही अन् तसं नाही…खरं कारण असं असतं मॅडम की सुनांवर त्यांची सत्ता नसते म्हणून त्या आम्हाला वेठीला धरतात.

आणि हो, तुमच्या घरात लहान मुलं असली अन् कधी प्रेमाने मी त्यांना एखादी थप्पड मारली तर लगेच पोलिसात कम्पलेंट करायला जाऊ नका. कळलं ना? माझी स्वत:चीही पोरंबाळं आहेतच ना? त्रास देतात तेव्हा त्यांनाही बदडून काढतेच ना मी? तुमच्या मुलांना माझी मुलंच समजेन. कधी तरी दिले दोन धपाटे तर तारांगण घालायची गरज नाही. घरात सी.सी. कॅमेरे लावल्याची धमकी कोणाला देताय? त्या सी.सी. कॅमेऱ्याला अन् तुम्हालाही कसं गुंडाळायचं ते मला बरोबर येतंय.

अजून एक गोष्ट क्लीयर व्हायला हवीय. माझं स्वत:चे रूल्स अन् रेग्युलेशन्स आहेत. मी कामावर जॉइन होण्याआधीच एका महत्त्वाच्या मुद्दयावर डिस्कस करून घेते. मला आठवड्याला एक याप्रमाणे महिन्याला चार सुट्टया लागतात.? खरं तर मला ‘सिक्स डेज वीक’ ही कामाची पद्धत आवडते. त्याखेरीज सणावाराला सुट्टी मला घ्यावीच लागेल. घरी आम्हीही सणवार करतो ना?

त्याखेरीज कधी मी आजारी पडले, कधी नवरा, कधी मुलं आजारी झाली आणि कधी नात्यात एखादी मयत झाली, अजून काही घडलं तर मी रजा घेणारच! तुमच्या घरी पाहुणे येणार तेव्हाही मी रजेवर जाणारच!

सुट्टयांसाठी वाट्टेल तेवढी कारणं आहेत माझ्यापाशी. खरं तर रजेची १०१ कारणं असं पुस्तकही मी लिहू शकते. पण काय करू, मला लिहायला, वाचायला येत नाही ना? पण मी शिकलेल्या भल्याभल्यांचा नक्षा उतरवते.

मॅडम, आता थोडं अॅडव्हान्सविषयी बोलून घेऊयात? अॅडव्हान्स घेण्यासाठीही माझ्याकडे १०१ कारणं आहेत. गरज तुम्हाला माझी आहे त्यामुळे थोडी कटकट करून का होईना तुम्ही मला अॅडव्हान्स द्यालच. चारपाच हजार मला अॅडव्हान्स लागतील. कापताना मात्र फक्त मी महिन्याला दोनशेच कापून देईन. कटकट केलीत तर अॅडव्हान्स परत न करताच तुमचं काम सोडून पळून जाईन.

मी अत्यंत प्रामाणिक आहे. चोरीमारी करत नाही. अगदी बारीकशी सुईसुद्धा कधी चोरली नाहीए. पण बाकी अनेक गोष्टी अगदी बेमालूम नाहीशा होऊ शकतात. पुन्हा माझा संशय कुणी घेणार नाहीच. कारण मी स्वत: काहीच करत नाही पण दुसऱ्यांना बातमी तर देऊ शकते ना? घरातल्या सर्वांची दिनचर्या मला ठाऊक असते. कोण केव्हा जातं, कोण केव्हा येतं, सोनंनाणं कुठे ठेवलेलं असतं. समुद्राकाठी सुट्टी घालवायला कधी जाणार हे सगळं मलाच ठाऊक असतं. माझ्याकडून माहिती घेऊन हातसफाई दाखवणारा कुणी वेगळाच असतो. त्यामुळे मला मुद्देमालासकट कधीच कुणी पकडू शकणार नाही.

बरं, तर मॅडम, आता थोडं पर्सनलही बोलून घेऊयात? म्हणजे हा मुद्दा तसा रोमॅण्टिक आहे. म्हणजे कसं की तुमचे फारसे म्हातारे न झालेले साहेब किंवा वयात आलेला मुलगा यांना नादी लावण्याचेही १०१ प्रकार मला येतात. आता बघा, केरफरशी करताना माझी साडी पोटऱ्यांपर्यंत वर खोचलेली असते तिकडे त्यांचं लक्ष गेलं किंवा तुम्हीच दिलेल्या ‘लो कट’ ब्लाउजकडे ते टक लावून बघत बसले अन् त्यांना ‘कुछ कुछ’ व्हायला लागलं तर मला दोष द्यायचा नाही. कारण तुम्ही दिलेलेच ‘लो कट’ ब्लाउज मी वापरणार. तुमच्या नकळत त्यांनी मला बक्षीस, चिरीमिरी दिली तर तुम्ही रागवायचं नाही. अर्थात् मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही म्हणा…

आणि बरं का म्याडम, एक मजेदार गोष्ट अजूनही तुम्हाला सांगितलेली नाहीए. तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तुमच्या घरात काम करणाऱ्या आमच्यासारख्या मेडसर्व्हंट्स जेव्हा आपसांत भेटतात तेव्हा त्या काय काय बोलतात. त्यांच्या गप्पांमध्ये फक्त तुम्ही लोकच ‘टारगेट’ असता.

प्रत्येकीने आपापल्या मालकिणींना त्यांचं रंगरूप अन् स्वभावावरून मजेदार नावं दिली आहेत. कुणी ‘काळीढुस्स म्हैस’ आहे कुणी सुस्तावलेला अजगर आहे. कुणी मांजरीसारखी चोरून खाणारी, तर कुणी फॅशनेबल बेडकी. मॅडम, आम्ही तुमच्या नकलादेखील करतो. आम्ही सुट्टी घेतली की तुमची कशी चिडचिड होते, किती फजिती होते याची नक्कल करून तर आमची खूपच करमणूक होते.

आम्ही अनेक तऱ्हेने स्वत:ला रमवून घेतो. कॉलनीत कुणाकडे काय चाललंय, कुणाचं कुणाशी लफडं आहे. कुणाच्या घरात दोघांमध्ये तिसरा ‘तो’ किंवा ‘ती’ आहे याची बितंबातमी आमच्याकडे असते. त्यातून पुन्हा त्या सर्व बातम्यांना तिखटमीठ मसाला लावून आम्ही त्या सगळीकडे पसरवण्याचं महत्त्वकार्य करतो. या बातम्या व्यवस्थित ब्रॉडकास्ट होतात, आमचं हे न्यूज चॅनल खूपच लोकप्रिय आहे.

आपल्या मालकिणीला ब्लॅकमेल करायला मला आवडतं. सणासुदीला बक्षिसी अन् दिवाळीचा बोनस तर घेतेच, पण दरवर्षी पगारवाढही घेते. याखेरीज कुणी आपल्या मेडला काय दिलं हे पण वाढवून सांगते. म्हणजे आपण कमी पडू नये या भीतीने मालकीण मलाही भरभरून देते.

आता जाता जाता शेवटचं सांगते. वाटलं तर धमकी समजा. आमच्या घरकाम करणाऱ्या मेड सर्व्हंट्सची एक युनियन आहे. मीच त्याची अध्यक्ष आहे. आमच्या मंथली मीटिंग्ज असतात. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही चक्क संपावर जातो. तक्रार करायला पोलिसात जायलाही मागेपुढे बघत नाही. कारण शेवटी जिंकणार आम्हीच आहोत. कारण कायदा आमचीच बाजू घेणार ही आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्वव्यापी आहोत. सर्वशक्तिमान आहोत. तुम्हाला कामावर ठेवायचं असेल तर ठेवा…नाही तर ही मी निघाले…

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...