* ममता सिंह
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर लोकांना एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या. रोख रकमेच्या कमतरतेमुळे दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवणं कठीण झालं. अशावेळी ऑनलाइन बँकिंग आणि कार्डद्वारे होणारे व्यवहार वरदान ठरले. पेट्रोल पंपपासून किराणा मालाच्या खरेदीपर्यंत दुकानदारांनी कार्डद्वारे खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. बिल भरण्यासाठी ऑनलाइन बँकिंगची मदत झाली. या कॅशलेस व्यवहारांमध्ये जितका फायदा असतो, तितकीच जोखीमही असते. कारण यावर कार्ड आणि बँक अकाउंट हॅकिंगची टांगती तलवार कायम असेल. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांमध्ये थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
हॅकिंग म्हणजे काय?
ऑनलाइन किंवा कार्डने करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये बऱ्याचदा हॅकर्स फेक वेब पेज आणि कम्प्युटर व्हायरसद्वारे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड डिटेल किंवा ऑनलाइन पासवर्ड चोरतात. याला हॅकिंग म्हणतात. अकाउंट आणि कार्ड डिटेलचं हॅकिंग करून हॅकर्स लोकांच्या बँक खात्यांमधून ऑनलाइन चोरी करतात.
नजर ठेवून असतात हॅकर्स
२०१६ मध्ये देशात बऱ्याच प्रमुख बँकांचे ३२ लाख कार्ड डिटेल्स हॅक झाले होते. यावर तात्काळ पावलं उचलत बँकेने सर्व ग्राहकांचे एटीएम कार्ड्स ब्लॉक केले. दोन आठवड्यांच्या आत सर्व ग्राहकांना नवीन एटीएम कार्ड्स देण्यात आले. पिन बदलेपर्यंत बँकांनी या खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन ५००० रुपये केली होती. देशविदेशातील हॅकर्स कायम यावरच लक्ष ठेवून असतात की, कधी ग्राहकांच्या हातून चूक होतेय आणि त्यांना याचा फायदा करून घेता येतोय. यामुळेच नेटबँकिंग आणि कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
कार्ड किंवा अकाउंट हॅक झालं तर काय कराल?
सायबर लॉ एक्सपर्ट पवन दुग्गल यांच्या सांगण्यानुसार कॅशलेस व्यवहाराच्या वाढत्या प्रमाणासोबतच हॅकिंगच्या घटनाही खूप सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे अकाउंट किंवा कार्ड हॅक झाल्यास तात्काळ काळजी घ्या आणि पुढील गोष्टी करा.
* हॅकिंगची माहिती तात्काळ बँकेला द्या आणि कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.
* तुम्ही बाहेर असाल तर संबंधित बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून आपले कार्ड ब्लॉक करण्यास सांगा.
* बँकेला सूचना देऊन आपले कार्ड आणि नेटबँकिंग बंद करा.
* पोलिसांना याची लेखी तक्रार द्या.
* यादरम्यान स्वत: व्यवहार करण्यासाठी चेकचा वापर करा.
* ज्या बँक खात्याचा वापर तुम्ही नेटबँकिंग किंवा कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी करता त्यामध्ये जास्त पैसे ठेवू नका.
* क्रेडिट कार्ड होल्डर असाल तर क्रेडिट लिमिट कमी ठेवा, जेणेकरून हॅकिंगच्यावेळी कमीत कमी नुकसान होईल.
बँक करेल भरपाई
हॅकिंगमुळे झालेलं ग्राहकाचं नुकसान भरून काढण्याची जबाबदारी बँकेची असते. जर हॅकिंगमुळे ग्राहकाचं दहा हजार रुपयांचं नुकसान झालं असेल तर ग्राहक बँकेकडे तेवढ्याच रकमेची मागणी करू शकतो. पण त्यासाठी तुमच्याकडे बँकेच्या निष्काळजीपणामुळेच नुकसान झालं हे सिद्ध करणारे पुरेसे साक्षीदार असावे लागतील. बऱ्याचदा ग्राहकांना याची माहिती नसते. त्यामुळे ते हॅकिंगमुळे झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी बँकेकडे करत नाहीत.
सावधगिरी बाळगा
कार्ड किंवा नेटबँकिंगचा वापर करताना सावधगिरी बाळगा. तुम्ही चुकूनही कधी आपले नेट बँकिंग डिटेल, १६ अंकी कार्ड नंबर, कार्ड व्हॅलिडिटी अवधी आणि कार्डच्या मागे असलेला ३ अंकी सीव्हीव्ही नंबर कोणाला सांगितला तर ती व्यक्ती तुमची सगळी कमाई लुटू शकते.
* आपला एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहा. हे काम तुम्ही कोणत्याही एटीएममध्ये जाऊन करू शकता.
* कोणत्याही कस्टमर केअरमधून फोन करून कोणीही कार्ड डिटेल विचारत असेल तर त्या व्यक्तिला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स सांगू नका.
* लक्षात ठेवा बँक कधीही कोणत्याही ग्राहकाकडून कार्ड डिटेल किंवा पासवर्ड मागत नाही.
* आपला मोबाइल नंबर आपल्या खात्याशी जोडा. त्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे काढल्यास तुम्हाला तात्काळ मेसेज येईल.
* दर ३ दिवसांनी आपले बँक स्टेटमेंट तपासा. आजकाल या सर्व सेवा ऑनलाइन असल्यामुळे तुम्ही कधीही माहिती मिळवू शकता.
* केवळ आपल्या कार्यालयातील किंवा खासगी संगणकाद्वारेच आर्थिक व्यवहार करा. या दोन्ही ठिकाणी अॅन्टीव्हायरस असेल. दोन्ही सर्व्हर सुरक्षित असतील.
* सायबरमध्ये जाऊन नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे व्यवहार करणं टाळा. अशा ठिकाणी हॅकिंगचा धोका अधिक असतो.
* आपला नेटबँकिंग पासवर्डही २-३ महिन्यांनी बदलत राहा.
* तुम्ही न केलेल्या व्यवहाराचा मेसेज जर तुमच्या मोबाइलवर आला तर तात्काळ बँकेला कळवा.
* अशावेळी आपल्या कार्डाद्वारे किंवा नेटबँकिंगद्वारे होणारी देवाणघेवाण थांबवा.
* बऱ्याचदा तुम्हाला लॉटरी लागल्याचे इमेल्स येतात. ते पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी तुमच्या खात्याची माहिती मागितली जाते. असा इमेल्सना उत्तर न देता ते डिलीट करा.