* मदन कोथुनिया
नुकताच अन्य देशांत ‘वर्ल्ड ऑर्गेज्म डे’ साजरा करण्यात आला आणि यासंदर्भातील गोष्टी तेथे लोक मोकळेपणाने करतातही. मात्र भारतीय सेक्स आणि ऑर्गेज्मवर बोलताना तोंड लपवतात. बहुसंख्य लोक तर या विषयावर आपलाच साथीदार किंवा पार्टनरसोबतही बोलू शकत नाहीत. एक मजेशीर गोष्ट अशी की हिंदीत ऑर्गेज्मचा अर्थ लैंगिक पूर्ती सांगितला जातो, जो या शब्दाचा योग्य अर्थ नाही.
महिला आणि पुरुष दोघं एकमेकांपेक्षा शारीरिक रचनेत खूपच वेगळे आहेत. धर्मानुसार दोघांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणखीनच वेगळा आहे. जिथे पुरुषांना सर्व प्रकारची सवलत लहानपणापासूनच भेट म्हणून मिळते, तिथे महिलांना मात्र लहानपणापासूनच वेगळया प्रकारे वाढवले जाते. त्यांच्यासाठी कितीतरी प्रकारचे नियम तयार केले जातात. लहानपणापासून ते वयात येईपर्यंत त्यांना अशा प्रकारची शिकवण दिली जाते की त्या आपल्या शरीराशी संबंधित गोष्टी इच्छा असूनही सांगू शकत नाहीत.
जे पुरुषांसाठी योग्य ते महिलांसाठी चुकीचे का : जर एक महिला पुरुषाशिवाय संबंध ठेवून शारीरिक सुख प्राप्त करण्यास सक्षम असेल तर ही गोष्ट समाजाच्या पचनी पडत नाही. आम्ही येथे थेट मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथूनाबाबत बोलत आहोत, ज्याच्याबद्दल जास्तकरून मुलांना वयाच्या १० ते १२ वर्षींच माहिती होते. पण मुलींना वयात आल्यानंतरही याबाबत जास्त माहिती नसते. पुरुषाशी शारीरिक संबंध न ठेवताही शरीरसुख प्राप्त करू शकतात. ही गोष्ट त्या मैत्रिणींकडेही मान्य करत नाहीत. कारण समाजाने असे गृहित धरले आहे की पुरुषांसाठी मास्टरबेशन ठीक आहे पण महिलांसाठी चुकीचे आहे.
अशाच प्रकारे मास्टरबेशनवर बोलणे पुरुषांसाठी साधारण गोष्ट आहे, पण महिलांसाठी ती अशी गोष्ट आहे, जी तिची असूनही तिची नाही. खरंतर अशा मुद्यावर बोलणे खूपच गरजेचे आहे. हे जितक्या सहजपणे पुरुषांसाठी स्वीकारले गेले तेवढेच महिलांसाठी स्वीकारायला हवे.
मुली पीरियड्स, ब्रा या त्यांच्या सामान्य गोष्टींबाबत साहसाने बोलल्या तरी त्यांना पब्लिकली ट्रोल केले जाते. हे लज्जास्पद असल्याचे बोलले जाते. अशावेळी ऑर्गेज्म आणि तेही मुलींच्या ऑर्गेज्मवर बोलणे कल्पनेपलीकडचे आहे.