* प्रतिनिधी
भारतात प्रवाशांना फसवण्याचा एक लांबचलांब इतिहास आहे. पण हो, बदलत्या काळात फसवणुकीचा चेहरादेखील बदलला आहे. याने आता बदमाश, ट्रॅव्हल एजंट, गाईड, दुकानदार, अनोळखी मित्र आणि टॅक्सी ड्रायव्हर यांचे रूप घेतले आहे. काही उदाहरणं लक्षात घेऊया. मार्च २०१६मध्ये जयपूरच्या करधनी पोलिस ठाण्यात एका तरुणाने परदेशयात्रेदरम्यान त्याच्या एटीएममधून पैसे काढल्याची पोलिस तक्रार नोंदवली. हा युवक सौदी अरबला गेला होता, जिथे त्याने सौदी अरबमधील जैता शहरात ट्रान्झ्क्शन केले होते. त्यानंतर थोडयाच वेळात त्याच्या मोबाईलवर मेसेज आला की १७७७ डॉलर म्हणजे जवळपास एक लाख २० हजार रुपये काढले आहेत.
अशी घटना आपल्यासोबतही घडू शकते
ऑक्टोबर २०१५ मध्ये अजमेर येथे एका फाउंडेशन सोसायटीच्या बॅनर अंतर्गत अनेक वृद्धांना धार्मिक यात्रा करवून आणण्याचे स्वप्न दाखवून काही लोक हजारो रुपये घेऊन फरार झाले. यासाठी काही लोकांनी दोन दिवसांपूर्वी घरोघरी जाऊन पॅम्प्लेट्स वाटले होते. काही लोक या जाळयात अडकले आणि जेव्हा प्रवासाला जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांच्याकडे पश्चाताप करण्याची पाळी आली.
१० जानेवारी, २०१४ हिमाचल प्रदेशातील सिमल्यात गुजरातमधून आलेल्या २ प्रौढ जोडप्यांना सिमल्यातीलच एका ट्रॅव्हल एजंसीने लुटले. १२ दिवसांच्या पॅकेजमध्ये संपूर्ण शहर दाखवण्यासाठी ३४ हजार रुपये घेतले आणि दुसऱ्याच दिवशी एजंट फरार झाले. प्रकरण मनाली पोलिस ठाण्यात नोंदवले आहे. तसे पाहता, जेव्हा मॉलमध्ये सिल्वीने आपल्या क्रेडिट कार्डने रक्कम चुकवली तेव्हाच तिच्या कार्डचे क्लोनिंग करण्यात आले होते. या पर्यटकाने जोवर आपले खाते तपासले तोवर त्याची सगळी जमा रक्कम काढली गेली होती. पर्यटकांना फसवण्याचे हे तर केवळ एक उदाहरण आहे. रोजच पर्यटकांना फसवण्याची अशी उदाहरणं कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्राचे मथळे बनतात. मग ती घटना दिल्लीतील असो की आग्रा, राजस्थान, बिहारमधील असो. देशातील जवळपास प्रत्येक पर्यटनस्थळाजवळच्या पोलिस ठाण्यात पर्यटकांना फसवण्याच्या शेकडो तक्रारी नोंदवल्या आहेत. म्हणून तुम्हीसुद्धा पर्यटनास जाण्याची योजना आखत असाल तर थोडे सावध राहा.
ट्रॅव्हल एजंट्सपासून सावध राहा
नेहमीच आपण वेळ वाचवण्यासाठी आपल्या प्रवासाची योजना एखाद्या ट्रॅव्हल एजंटद्वारे बनवतो. हे एजंट्स आपल्याला असे आकर्षक पॅकेज देतात की आपण त्यावर सहज विश्वास ठेवतो. ट्रॅव्हल एजंट बस, टॅक्सी, गाईडपासून ते हॉटेल, खाणे या सगळयाची व्यवस्था स्वत: करतात आणि अशाप्रकारे ते आपली सगळी सफर नियंत्रित करतात. दिल्लीमध्ये संगणक अभियंता म्हणून एका कंपनीत काम करणाऱ्या अनूप गंगावार याने पर्यटनास जाण्याची योजना बनवली. यासाठी त्याने जुन्या दिल्लीच्या एका ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधला. एजन्सीने त्यांना जयपूर यात्रेचे आकर्षक पॅकेज दिले. अनूप जयपूरच्या त्या हॉटेलमध्ये पोहोचला जिथे त्यांच्या खोलीचे बुकिंग झाले होते. चौकशीअंती तेथील मॅनेजरने त्यांना सांगितले की त्यांच्या नावे हॉटेलमध्ये कोणतीही खोली बुक केली नाहीए.
चिडून त्याने आपल्या ट्रॅव्हल एजंटला फोन केला. फोन स्विच ऑफ होता. खूप उशीर झाला होता. त्याची फसवणूक झाली होती. म्हणून आधी व्यवस्थित चौकशी करा, मगच ट्रॅव्हल एजण्ट्सना पैसे द्या.
निवडा चांगला गाईड
अनोळखी आणि नव्या शहरात एकटे फिरणे शक्यही नसते आणि सुरक्षितही मानले जात नाही. अशावेळी एका गाईडची आवश्यकता भासते. खूप लोक गाईडविनाही फिरतात, पण जिज्ञासू पर्यटक फिरण्यासोबत माहिती मिळवण्यासाठी गाईडला प्राधान्य देतात. पण हेसुद्धा सत्य आहे की अलीकडे नकली गाईडद्वारे फसवुकीच्या घटना सामान्य झाल्या आहेत, म्हणून आपल्या गाईडची निवड आपणच करणे फार महत्त्वाचे आहे. नव्या ठिकाणी गाईडचे काम अगदी तसेच असते जसे नेत्रहिनांना काठीचा आधार असतो. म्हणून नेहमी रजिस्टर्ड, परवानाधारक आणि सरकारी गाइडवरच विश्वास ठेवायला हवा.
बदमाशांपासून सावध राहा
थोडा काळ जर तुम्हाला धार्मिक ठिकाणी घालवायचा असेल तर तुम्ही अतिशय सावध राहिले पाहिजे. कारण या ठिकाणी भले तुम्हाला एखादा चमत्कार दिसणार नाही पण ढोंगी बुवाबाबा खूप दिसतील. हे संपुर्ण गेटअप करून फसवायला तयार असतात. हे बाबा अनेकदा इतक्या सफाईने फसवतात की फसवणूक झालेल्यांना जाणीवसुद्धा होत नाही की तो फसवला गेला आहे. जटा आणि भगव्या वस्त्रांनी सजलेले बाबा पाहून अंदाज लावता येत नाही की साधू कोण आणि सैतान कोण. फसवणुकीच्या या खेळात हे ढोंगी साधू देशी आणि विदेशी असा जरासुद्धा फरक करत नाही. म्हणजे दोघांचाही खिसा कापायला यांच्याकडे सारखीच कैची असते. खरंतर सगळयांनी आपापले विभाग वाटून घेतलेले असतात. लोक गंगा स्नान, क्रियाकर्म यासाठी येतात. यात हे पंडित पापपुण्याच्या जाळयात त्यांना फसवतात जेणेकरून ते स्वत:ला त्याच्या चरणांवर समर्पित करतात. त्यांना पापपुण्यातून मुक्ती मिळो ना मिळो पण बाबाचा कमंडलु मात्र नक्कीच भरतो.
लुटारू टॅक्सीड्रायव्हरपासून सावध राहा
कोणताही प्रवास ऑटो टॅक्सीशिवाय शक्य नाही. टॅक्सी ड्रायव्हरच कमीत कमी वेळात निरनिराळया ठिकाणी पोहोचवून आपला मुल्यवान वेळ वाचवतात. अनेकदा तर हे गाईडचेसुद्धा काम करतात. पण सगळेच टॅक्सी ड्रायव्हर असे नसतात. काही असेसुद्धा असतात जे तुम्हाला फसवायची कामं करतात. ते कमी अंतराऐवजी दूरच्या रस्त्याने फिरवतात जेणेकरून वारेमाप भाडे वसुलता येईल. अनेक टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला अशा हॉटेलात घेऊन जातात, जिथे त्यांचे आधीपासूनच सेटिंग असते. तिथे पोहचताच ते आपले कमिशन घेऊन पळून जातात आणि आपण त्या निकृष्ट हॉटेलाला दुषणं देण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही.
अनेक टॅक्सी ड्रायव्हर नावापुरते टॅक्सी चालवतात. त्यांचे खरे काम फसवणूक करणे हेच असते. नवीन पर्यटकांना ते त्यांना अपेक्षित ठिकाणी नेऊन सोडण्याऐवजी आपल्या भागात नेतात आणि आपल्या टोळीसोबत फक्त लुटतच नाहीत तर कित्येकदा महिला प्रवाशांशी वाईट वर्तनसुद्धा करतात. अशावेळी या लोकांपासून वाचण्यासाठी सरकारी कॅब किंवा रेडिओ टॅक्सीवरच विश्वास ठेवा.
फेरीवाल्यांपासून सावध
अनेकदा ट्रॅफिक लाईट आणि फूटपाथवर फेरीवाले पुस्तक, घडयाळ, चष्मा यासहीत अनेक वस्तू ब्रँडेड आहेत असे सांगत विकण्याचा प्रयत्न करतात. काही लोक चढया किंमतीत अशा वस्तू विकत घेतात, ज्या नंतर नकली निघतात. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसला हे दृश्य अगदी सामान्य झाले आहे.
प्रत्येक अनोळखी मित्र नाही
नेहमीच ट्रेन किंवा बसमध्ये असे इंटरेस्टिंग लोक भेटतात, जे हसरे आणि बोलके असतात. याची बोलण्याची पद्धत इतकी छान आणि प्रभावी असते की अनेक लोक यांच्याशी ओळख वाढवतात. परिणाम असा की एक साधी भेट चांगल्या मैत्रीत रूपांतरित होते. हळूहळू तो अनोळखी आपली सगळी माहिती मिळवतो. याच माहितीपायी तुमची फसगत होते. अशा परिस्थितित यांची तक्रारसुद्धा करता येत नाही कारण त्या अनोळखी माणसाने दिलेली सगळी माहिती चुकीचे असते. म्हणून अनोळखी शहरात कोणाशी इतक्या लवकर मैत्री करू नये.
दुभाषिक ठेवण्याची सोय
नव्या प्रदेशात भाषेची समस्यासुद्धा फसवणुकीस कारणीभूत ठरू शकते. आपले म्हणणे योग्य प्रकारे न समजल्याने अशा वृत्तीचे लोक या कमजोरीचा फायदा घेतात. तुम्ही एखाद्याला आपल्या भाषेत समजावू पाहात आणि समोरच्याला काही वेगळेच समजते. या गैरसमजात कळते की तुम्ही फसवणुकीचे शिकार ठरला आहात. ही समस्या टाळण्यासाठी एखाद्या गाईडची अथवा दुभाषिकाची मदत अवश्य घ्या.
चलन बदलताना चौकस राहा
अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्यात विदेशी पर्यटक अधिक असतात. कोणत्याही विदेशी पर्यटकांचे पहिले काम विदेशी चलन बदलणे असते. यासाठी मनी एक्सचेंजरची मदत घेता येते. सहसा असे होते की लांब रांग टाळण्यासाठी विदेशी पर्यटक एखाद्या मनी एक्सचेंजरची मदत घेतात, जे बेकायदेशीर मार्गाने हे काम करत असतात. अशाप्रकारे पर्यटक आपले चलन गमावतो आणि हाती येते नकली चलन, ज्याने काहीच खरेदी करता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा की चलनाची देवाणघेवाण परवानाधारक एक्सचेंजरकडूनच करावी. अर्थात पर्यटन करताना जर कोणत्याही प्रकारच्या अघटीत फसवणुकीपासून बचाव करायचा असेल तर थोडी सावधगिरी बाळगावी.