* हरपाल
‘परदेश’ हा शब्द वाचताच सुख, ऐशोआराम, संपत्ती, स्वातंत्र्य, मनमोकळेपणा इत्यादी चित्र डोळ्यांसमोर उभे राहाते. केवळ एक देश नाही तर संपूर्ण जग आणि जगातील प्रत्येक वर्गातील लोक या मोहक शब्दाने आकर्षित होतात. दुसरा देश कसा आहे, तेथील गोष्टी कशा आहेत, तेथील वातावरण कसे आहे, त्या देशाचा इतिहास काय आहे आणि त्या देशाने किती आधुनिक प्रगती केली आहे, या आणि अशा सर्व गोष्टी जाणून घेण्याची ओढ माणसाच्या मनात असते.
नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यात खलिस्तान समर्थक कॅनेडियन नागरिकांवरून निर्माण झालेला वाद हा तेथे स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या १४-१५ लाख लोकांसाठी धोकादायक आहे, कारण आता त्यांना तिथे त्यांच्या नातेवाईकांना बोलावता येत नाही आणि भारतात येण्याचा धोका त्यांना पत्करायचा नाही. दोन्ही देशांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये व्हिसा देणे बंद केले होते. प्रियजनांना भेटू न शकणे, याचे दु:ख दुसऱ्या देशात राहणाऱ्या लोकांसाठी मानसिक तुरुंगात कैद केल्यासारखे असते.
भावी जोडीदार म्हणून परदेशी स्त्री-पुरुषाचे आकर्षण ही आधुनिक समाजाची देणगी नसून असे पूर्वापार चालत आले आहे. म्हणूनच एका विशिष्ट देशाच्या राजपुत्राने विशिष्ट देशाच्या राजकन्येशी लग्न केले होते, असे कथांमध्ये दिसते. कोलंबस आणि वास्को द गामा यांना महासागरात जाण्यास भाग पाडणे ही देखील दुसरा देश पाहण्याची आणि अनुभवण्याची त्यांच्यामधील उत्सुकता होती. वास्तविक, नवीन गोष्टी शोधणे आणि काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्कटता, हा मानवी स्वभाव आहे.
परदेशात का जातात?
‘परदेश’ या शब्दाचे आकर्षण वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे असते. विकसित देशांमधील लोकांना झमगाटापासून दूर शांत निसर्गाच्या कुशीत निवांत क्षण घालवायचे असतात तर विकसनशील देशांतील लोकांना दुसऱ्या देशांतील चकचकीतपणा जवळून अनुभवायचा असतो. गरीब आणि मागासलेल्या देशांतील लोक त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी परदेशात जातात.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि फ्रान्समधील लोक वातावरण आणि ठिकाण बदलण्यासाठी जागतिक पर्यटनाला जातात तर चीन, जपान आणि दक्षिण पूर्व आशियातील लोक युरोप आणि अमेरिकेतील देश पाहाण्यासाठी जातात. तेथे काही आठवडे राहून तेथील सुंदर आठवणी आणि आनंद सोबत घेऊन ते घरी परततात.
गरीब देशांतील लोक आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीपासून सुटका करून घेत उपजीविकेसाठी परदेशात जातात आणि तिथे स्थायिक होतात. अशा लोकांना स्थलांतरित म्हणतात. काही जण त्यांना निर्वासित म्हणतात. अशांमध्ये समाजाच्या बंधनांना घाबरून परदेशात पळून जाणारे काही लोकही आहेत.
भारतातून परदेशात गेलेल्या लोकांचे मुख्य उद्दिष्ट परदेशात राहून स्वत:चा आर्थिक विकास करणे, हे आहे. काही काळापूर्वी एका सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, अनिवासी भारतीयांना त्यांच्या देशात चांगली नोकरी, चांगल्या वैद्यकीय सुविधा, मुलांचे उच्च शिक्षण, स्वच्छ खाद्यपदार्थ या सर्व सुविधा मिळाल्या तर त्यांना त्यांच्या देशात राहाणे अधिक आवडेल.
एक सत्य असेही
एक सत्य असेही आहे की, आज जर संपूर्ण जग संकुचित होऊन एका शहरात सामावले आहे तर मग अशा लोकांनी याचा फायदा का घेऊ नये, ज्यांच्याकडे जिद्द, समर्पण, अभ्यासू वृत्ती असून ते प्रचंड महत्वाकांक्षीही आहेत. पण, भारतीय मात्र त्यांच्याच देशात राहून विदेशाची कल्पना सोन्या-चांदीचे ढिगारे किंवा अति-आधुनिक गोष्टींनी सजलेले जीवनमान अशीच काहीशी करतात.
खरंतर विदेशी लाडू त्यांना खूपच गोड आणि कधीच न संपणारा वाटत असतो, पण जो हा लाडू चाखतो त्याला विचारा की, त्या लाडवापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती आणि काय करावे लागले? मी असे अनेक लोक पाहिले आहेत की, ज्यांना केवळ घर नीट चालवण्यासाठी आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी आपले सर्व वैयक्तिक सुख पणाला लावावे लागले.
आज अनिवासी भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. आखातातील देशांमध्ये कष्टकरी कामगार म्हणून अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत तर उच्च शिक्षित लोकांनी इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडामध्ये स्वत:चे चांगले नाव कमावले आहे.
मुख्य ध्येय पैसा कमावणे
अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिथलेच होऊन राहातात, असे वर्षानुवर्षे घडत आले आहे. आज इंग्लंड आणि अमेरिकेत अशी काही शहरं आहेत ज्यांच्याकडे ‘छोटा भारत’ म्हणून पाहिले जाते.
काही अपवाद वगळल्यास परदेशात जाण्यापूर्वी सर्वसामान्य भारतीयाला वाटत असते की, पैसे कमावून आपण आपल्या देशात परत येऊ, पण तिथे गेल्यावर तो सर्व स्थानिक परिस्थितीशी संघर्ष करून तिथे आपले पाय घट्ट रोवतो आणि त्यानंतर विचार करतो की, चांगला जम बसवलेला व्यवसाय सोडून आता परत का जायचे? यातीलच काही लोक असेही असतात जे नियम, कायदे, भाषा, वातावरण यांची भीती वाटल्यामुळे परत येतात. पण, एक गोष्ट महत्त्वाची आहे की, तुम्ही रोजगाराच्या उद्देशाने कोणत्याही देशात जात असाल तर त्यापूर्वी त्या देशाची संपूर्ण माहिती नक्की करून घ्या.
जर भारतीय इंग्रजी भाषिक देशात गेले तर त्यांच्यासाठी काम आणि परिस्थिती दोन्ही सोपं होऊ शकतं, पण जगात असेही काही देश आहेत जिथे इंग्रजीमध्ये काम केले जात नाही, कारण ते त्यांच्या भाषेत इतके प्रगतीशील आहेत की त्यांना त्याच भाषेत सर्व काम करायचे असते. अशा देशांमध्ये जाण्यापूर्वी तिथल्या भाषेचे चांगले ज्ञान असले पाहिजे. तिथे गेल्यानंतर भाषा शिकून यश मिळवू, असा विचार असेल, तर तो चुकीचा आहे यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो.
भारतात असे घडत नाही
परदेशात प्रत्येक शिक्षित व्यक्तीला त्याच्या शिक्षणानुसार काम मिळत नाही. अनिवासी भारतीयांची स्थिती वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी आहे. नवीन देश आणि नवीन वातावरणाशी जुळवून न घेतल्याने बरेच लोक निराश आणि चिडचिडे होतात, काहीजण स्वत:लाच दोष देताना दिसतात तर काहीजण चुकीच्या ठिकाणी चुकीचे काहीतरी बोलत बसतात, कारण अशा परिस्थितीत काय करावे, हे त्यांचे त्यांनाच समजत नाही.
इंग्लंडमधील अनिवासी भारतीयांची आणि त्यांच्या मुलांची परिस्थिती आता कोणापासूनही लपून राहिलेली नाही. वर्णभेदाची शिकार झालेली मुलं त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या आई-वडिलांना दोष देतात की, ते मुलांना घेऊन इंग्लंडमध्ये का आले? होय, अमेरिका आणि कॅनडाची स्थिती इंग्लंडपेक्षा बरी आहे, जिथे वर्णभेद नाही आणि स्थानिक मुक्त विचारसरणीचे तसेच उच्च शिक्षित आहेत.
मी असे म्हणू शकत नाही की, अनिवासी भारतीय तेथे आनंदी आहेत. या श्रीमंत देशातही एक प्रचंड मध्यमवर्ग आहे, जो भारताप्रमाणेच गिरणीच्या दोन चाकांमध्ये गव्हासारखा भरडला जात आहे. दिखाऊपणा हे इथल्या लोकांमधील वैशिष्ट्य आहे. ते बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन आलिशान घरं, मोटार आणि इतर सुखसोयी विकत घेतात, ते कर्जात इतके बुडून जातात की, मेहनतीने कमावलेल्या पैशंतील मोठा भाग त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च करावा लागतो. दु:ख हे आहे की, हे ढोंगी, दिखाऊपणाचे जीवन आपलेसे करण्यासाठी त्यांना सतत अधिक परिश्रम करावे लागतात.
आता तर त्यांच्याकडे स्वत:च्या मुलांची काळजी घेण्याइतकाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे त्यांना आई किंवा वडिलांना भारतातून बोलावून त्यांच्याकडे मुलांची जबाबदारी सोपवून काहीसे निश्चिंत व्हायचे असते, कारण मोलकरीण ठेवता येण्याइतपत त्यांची आर्थिक स्थिती बरी नसते. त्यामुळे स्वयंपाक करणे, भाजी आणण्यासाठी बाजारात जाणे, मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडणे अशी घरातील सर्व कामं आपल्या आई-वडिलांनी करावीत, अशी त्यांची अपेक्षा असते.
वर्णभेद आणि विषमतेचा सामना
इकडे येऊन आराम करा, असे सांगून आई-वडिलांना इकडे बोलावले जाते, त्यानंतर हळूहळू त्यांच्यावर जबाबदारी लादली जाते. त्यामुळे ते आतल्या आत घुसमटून जातात आणि मग भारतात परत कसे जायचे, असा प्रश्न त्यांना पडतो.
अनिवासी भारतीयांची तरुण मुलं कधी घरात तर कधी बाहेरच्या वातावरणात धक्के खातात. त्यांनी पारंपरिक जीवन नाकारल्यास त्यांना बिघडलेले आणि अनियंत्रित म्हटले जाते. जर मुलं संस्कारांना धरून असतील तर त्यांना त्यांच्या मुक्त विचारांच्या मित्रांसमोर झुकावे लागते. अनेक मुलं आज्ञाधारक राहून आपल्या इच्छा-अपेक्षांचा गळा घोटतात तर अनेक जण अंतर्मुख होतात. घरातील वातावरण भांडणाचे असेल तर जीवनात इतरांपेक्षा जास्त संधी न मिळाल्याने काही मुलं निराश होऊन जातात.
अनिवासी भारतीयांच्या मुलांनी शिक्षण घेणे आणि कामाच्या शोधात जाणे चुकीचे नाही, पण जेव्हा त्यांना कामाच्या शोधात वर्णभेद आणि विषमतेचा सामना करावा लागतो तेव्हा ते रागावतात, कारण ते कोणत्याही प्रकारे स्वत:ला अनिवासी मानायला तयार नसतात. ते स्वत:ला त्या देशाचे नागरिक समजतात आणि त्यांच्यात निर्माण होणारी बंडखोरी त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर दुष्परिणाम करते.





