– सोमा घोष
विनम्र, हसतमुख, सुंदर अभिनेत्री शिवानी सोनार हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर स्वत:ची छाप पाडली आहे. तिने मराठी लघुपट, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज इत्यादींमध्ये काम केले आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ ही तिची मालिका खूपच गाजली, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सिंधुताई माझी माई’ इत्यादी मालिकाही चांगल्याच चर्चेत राहिल्या. कामादरम्यान शिवानीची ओळख अभिनेता अंबर गणपुलेशी झाली. दोघेही लग्न करणार आहेत. अंबरचा शांत आणि काळजी घेणारा स्वभाव तिला प्रचंड आवडला आणि त्यामुळेच तिने लग्नाला होकार दिला. सध्या शिवानी सोनी टीव्ही मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत आहे, तिच्याशी मारलेल्या गप्पांमधील हा काही खास भाग…
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करण्याचे काही खास कारण आहे का?
या मालिकेची कथा खूप वेगळी आणि अनोखी आहे, त्यात माझ्या दोन भूमिका आहेत, एक गौरी आणि दुसरी तन्वी. गौरी ही आधुनिक विचारांची मुलगी आहे, जी शिक्षणासोबतच नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडते. तिची अनेक स्वप्नं आहेत, ती पूर्ण करण्यासाठी ती कठोर परिश्रम करते आणि कधीही हार मानत नाही. तन्वी हा तिचा भूतकाळ आहे, जी खूप शांत होती. ही दोन्ही पात्रं साकारताना मला एक वेगळंच आव्हान वाटतं आणि त्यामुळेच अभिनय करताना खूप छान वाटते.
मालिकेतील कोणते पात्र तुझ्या वास्तविक जीवनाशी मिळतेजुळते आहे?
गौरी हे पात्र मला माझ्यासारखे वाटते. तन्वीसारखी मी अजिबातच नाही, माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझ्यावर कधीही कोणत्याही प्रकारची बंधने लादली नाहीत, पण घराची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते.
तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
मी पुण्याची आहे, शाळेत असताना मला सर्जनशील गोष्टी करायला आवडायच्या. तेव्हापासूनच मी नृत्य आणि नाटकांमध्ये भाग घेत असे. चांगली गोष्ट म्हणजे मला पुण्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच मी वयाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये मला माझी पहिली मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मिळाली. त्यात मी छोटी भूमिका साकारली, पण सर्वांनी माझे कौतुक केले, त्यानंतर मला मोठी कामं मिळू लागली.
तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?
घरच्यांनी मला सुरुवातीपासून साथ दिली आहे. माझे वडील निशिकांत सोनार पोलिसात आहेत आणि माझी आई नेहा सोनार ब्युटीशियन आहे, मला एक लहान भाऊ देखील आहे. लहानपणापासून सर्वांनी मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. मी लहानपणी अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टींमध्ये भाग घेत असे, तेव्हाही ते मला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहन देत.
इंडस्ट्रीत येण्यासाठी तुला कसा आणि किती संघर्ष करावा लागला?
माझ्या सुरुवातीच्या दोन्ही मालिकांचे चित्रिकरण मुंबई किंवा पुण्यात नव्हे तर सांगलीत झाले. तिथे गेल्यावर जुळवून घेणं माझ्यासाठी खूप अवघड जात होतं, कारण मी ४ ते ५ महिन्यांनी घरी जायचे, त्यामुळे घरचं जेवण मिळत नव्हतं, याशिवाय मला मराठी भाषेतील वेगळा प्रकार शिकावा लागला, जे खूप अवघड काम होते. मला चांगले काम खूप लवकर मिळाले, पण काम मिळण्यापेक्षा ते मिळाल्यानंतर जास्त संघर्ष करावा लागला. उदाहरणार्थ, ‘सिंधुताई माझी माई’ या मलिकेदरम्यान मला दिवसभर चप्पल न घालता राहावे लागले, कारण सिंधुताई चप्पल घालायच्या नाहीत. त्यामुळे मी देखील ६ महिने चप्पल घातली नाही, तिथेच जेवावे लागायचे, ज्यात फार काही आवडीचे नसायचे. याशिवाय मी त्वचेची काळजी किंवा स्वत:च्या फिटनेसकडेही लक्ष देऊ शकत नव्हते.
तुला ऑडिशनमध्ये नकाराचा सामना करावा लागला का?
मला बऱ्याचदा नकाराचा सामना करावा लागला, अनेकदा लोक म्हणाले की, मी छान दिसत नाही, माझ्यामध्ये नायिकेची वैशिष्ट्ये नाहीत, जेव्हा की मी सुंदर आहे. याशिवाय आजकाल मला हे देखील ऐकायला मिळते की, सोशल मीडियावर तुमचे फॅन फॉलोअर्स कमी आहेत. गुणवत्ता असूनही आजकाल फॉलोअर्स कमी झाल्यास काम मिळत नाही. प्रोडक्शन हाऊस ऑडिशन मेसेजमध्ये फॅन फॉलोअर्सची संख्यादेखील लिहितात.
तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची किती इच्छा आहे?
हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मी ऑडिशनही देत आहे. काही चांगलं कामं मिळालं तर ते मी नक्कीच करेन.
तू इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्यं कितपत सहजतेने करू शकतेस?
मी अजून अशी अंतर्गत दृश्यं केलेली नाहीत आणि मी किती सहजतेने ती करू शकेन, हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे. अशी दृश्यं करणं गरजेचं असेल तर ती करताना माझ्या काही मर्यादा नक्कीच कायम असतील.
तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?
मला फॅशन आवडते आणि या इंडस्ट्रीत फॅशनेबल राहाणे गरजेचे आहे. मी कोणत्याही ब्रँड किंवा डिझायनरला फॉलो करत नाही. जे काही सुंदर आणि आरामदायक कपडे असतील ते मी खरेदी करते.
मी खुप मोठी खवय्यी आहे. माझा भाऊ हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे, त्यामुळे वेळ मिळताच आम्ही दोघेही एखाद्या तरी उपाहारगृहात जातो आणि तिथले वेगळे पदार्थ खाऊन बघतो.
तूला स्वत:ला प्रेजेंटेबल ठेवणे किती गरजेचे आहे?
आजकाल गृहिणी असो की नोकरदार महिला, प्रत्येकीने प्रेजेंटेबल असायलाच हवे. सोशल मीडियामुळे हा बदल आला आहे आणि आज प्रत्येकजण तो फॉलो करत आहे. मला हे योग्य वाटते.
तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?
मला सण-उत्सव कुटुंबासोबत साजरे करायला आवडतात आणि मला अशा प्रकारे मिळून साजरे करणे जास्त गरजेचे वाटते. या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटणे, घर सजवणे, छान पदार्थ बनवणे इत्यादी सर्व मला खूप आवडते.
तू तरुण कलाकारांना काही संदेश देऊ इच्छितेस का?
आज बहुतांश तरुणांमध्ये धीर किंवा संयमाचा अभाव आहे. त्यामुळे ते खूप लवकर हार मानतात, साहजिकच त्यांना नैराश्य येते. त्यांचा स्वत:वरचा विश्वास उडतो आणि ते नको त्या गोष्टीच्या आहारी जातात, जे चुकीचे आहे. तुम्ही जे काही कराल ते मेहनतपूर्वक आणि मन लावून करा.
आवडता रंग – गडद निळा.
आवड पोशाख – भारतीय.
आवडता परफ्यूम – जाराचा बॉडी मिस्ट.
आवडते पुस्तक – मुरलीधर खैरनार यांचे ‘शोध’ हे पुस्तक.
आवडते ठिकाण – गोवा.
वेळ मिळाल्यास – वेगवेगळ्या उपाहारगृहांमध्ये जाऊन तिथले वेगवेगळे पदार्थ खाणे.
सामाजिक कार्य – गरजूंची सेवा.