* सोमा घोष
यंदाची दिवाळी मराठी अभिनेत्री ईशा संजयने दिवाळीपूर्वीच काही अशा प्रकारे साजरी केली…
दिवाळी हा प्रत्येकासाठीच आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे. दिवाळीत दिवे लावणे, चांगले कपडे घालणे, आवडीचे पदार्थ बनवणे आणि सणाचा आनंद घेणे, हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते. यात काही कलाकार असेही आहेत ज्यांना केवळ त्यांच्या कुटुंबासोबतच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या माणसांसोबतही दिवाळी साजरी करायला आवडते, कारण इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना आनंदित करतो. चला तर जाणून घेऊया, झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत राजश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय यावेळी दिवाळी कशा प्रकारे साजरी करणार आहे, जी तिने चित्रिकरणावेळी सर्व टीमसोबत साजरी केली. सोबत काम करणाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा होता.
सुंदर अनुभव
आपला अनुभव सांगताना ईशा म्हणते की, मी यावेळी सेटवर दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी केली. चित्रिकरणावेळी दिवाळी साजरी करण्याचा एक फायदा म्हणजे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करता येते. ती ‘ प्री दिवाळी’ म्हणजेच दिवाळीपूर्वीची दिवाळी असते. खरं तर, सेटवर रोज एकत्र काम करत असल्यामुळे, संपूर्ण टीम एक कुटुंब बनून जाते, कारण इथे त्यांच्यासोबत खूप वेळ घालवावा लागतो, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणे, हा एक वेगळाच अनुभव होता. यावेळी मी माझ्या टीमच्या भावेश दादाला भेट म्हणून चॉकलेट दिले, कारण तो सेटवरील प्रॉपर्टीची खूप काळजी घेतो, तसेच, कधीही कोणतेही काम करण्यास नकार देत नाही, तो अतिशय नम्र आहे. मी फटाके फोडत नसले तरी यावेळी मी सेटवर फुलबाजी पेटवली होती.
भेटीगाठींचा उत्सव
आनंदाचा हा सण ईशा तिच्या कुटुंबासह आणि आजूबाजूच्या सर्वांसोबत साजरा करते. माझ्या घरी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, असे ती सांगते. मी वर्षभर या सणाची वाट पाहात असते. मला त्या दिवशी सर्वांना भेटायला आवडते.
सजावटीत कमतरता नसते
दिवाळीतील घराच्या सजावटीबद्दल ईशा सांगते की, माझी आई खूप चांगली रांगोळी काढते, कधी फुलांनी तर कधी विविध रंगांनी ती वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढते, जी तिच्या मनावर अवलंबून असते. दरवर्षीची तिची संकल्पना वेगळी असते. मी देखील तिच्यासोबत रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते, पण मला ती तितकीशी चांगली जमत नाही. म्हणूनच मी लाइटिंगकडे जास्त लक्ष देते, ज्यामध्ये लांबलचक स्ट्रिंग लाइट्स असतात, ज्या सतत चमकत राहातात. त्या मी बाल्कनीत लावते, याशिवाय मी मेणबत्त्या, दिवे, अशा सर्व प्रकारच्या दिव्यांनी घर सजवते, ते दिसायला खूप छान दिसते.
स्वादिष्ट फराळ बनवला जातो
मला फराळ खूप आवडतो, विशेषत: दिवाळीत, माझी आई सर्व प्रकारचा स्वादिष्ट फराळ घरीच बनवते, त्यात बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, चकली, करंजी इ. सर्व असते. मला आठवते की, लहानपणापासून मी कधीच माझ्या आईला बाहेरून फराळ विकत आणताना पाहिले नाही, कारण तिला विकतचा फराळ आवडत नाही. अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बहिणीलाही ती फराळ पाठवून देते.
माझ्यासाठीही ती फराळ राखून ठेवते. त्यासाठीच आई दिवाळीत दोनदा फराळ बनवते, ज्यासाठी मी तिला मदत करते. आईची तयारी सुमारे १५ दिवस आधीच सुरू होते. मला आईने बनवलेले फराळाचे सगळेच पदार्थ आवडत असले तरी तिच्या हातची चकली खूप जास्त आवडते. दिवाळीनंतरही मी सकाळी चहासोबत चकली खाते.
सुट्टी मिळते
दिवाळी आवडण्याचे विशेष कारण म्हणजे: ईशाला दिवाळीत सगळ्यांना भेटता येते, कारण दिवाळी व्यतिरिक्त तिला कामातून वेळ मिळत नाही. यंदा दिवाळीच्या दिवशी पूर्णपणे मोकळे असणे आणि कुटुंब तसेच मित्र – मैत्रिणींना भेटणे तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे, कारण याआधी सर्वांपासून इतक्या दूर ती कधीच राहिली नव्हती. त्यामुळेच तिला दिवाळीत घरी जाण्याची खूपच उत्सुकता आहे. शिवाय ती खूप बोलकी असल्यामुळे सगळ्यांशी खूप गप्पा मारते.
सुपर पॉवर मिळाल्यास
सुपर पॉवर म्हणजेच महासत्ता मिळाल्यास, ईशा तिच्या टीममध्ये काम करणाऱ्या सर्व लाइट दादा, स्पॉट दादा इत्यादींना दिवाळीला किमान ५ दिवसांची सुट्टी देऊ इच्छिते, जेणेकरून ते जिथे राहतात तिथे घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासह दिवाळीचा आनंद चंगल्या प्रकारे घेऊ शकतील.
सरतेशेवटी, दिवाळीनिमित्त ईशा सर्वांना सांगू इच्छिते की, यावेळी तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्र – मैत्रिणींना भेटून तुमचा आनंद साजरा करा. इन्स्टाग्राम आणि फेसबूकचा आधार घेऊ नका, फटाके फोडू नका, रंगीबेरंगी दिव्यांनी घर सजवा, जेणेकरून प्रदूषण कमी होईल.