* पारुल भटनागर
नोकरी आणि कौटुंबिक जीवनाचा समतोल राखणे हे आजच्या कुठल्याही महिलेसाठी सर्वात मोठे आव्हान आहे, कारण घर आणि कुटुंब तसेच नोकरीची जबाबदारी सांभाळणे किंवा त्याच्यात ताळमेळ राखणे सोपे नाही, विशेषत: जेव्हा कुटुंबाचा पाठिंबा नसतो. अशा परिस्थितीत नवविवाहित वधूबद्दल बोलायचे झाले तर सासू-सासरे आणि साहेब यांच्यातील द्वंद्वात अडकणे तिच्यासाठी स्वाभाविक आहे. अशावेळी ती घर आणि नोकरीत समतोल कसा राखू शकते, ते जाणून घेऊया :
कुटुंबाला प्राधान्य द्या
तुमचं नुकतंच लग्न झालंय हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या नवीन घरात सुरुवातीपासूनच नाती जपून ती बांधून ठेवावी लागतील आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लग्नानंतर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या नवीन घराला प्राधान्य द्याल. यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्या सवयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा, ते काय बोलतात ते आधी समजून घ्या आणि मग प्रतिसाद द्या.
घरात काय आणि कोणत्यावेळी घडते, त्यानुसार स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्यही मागायला हवे, जेणेकरुन तुम्हाला सुरुवातीपासूनच गोष्टी समजून घेण्यात आणि समन्वय साधण्यात अडचणी येणार नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांचा मनापासून स्वीकार कराल आणि त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला घर आणि नोकरी यात ताळमेळ साधण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
कार्यालयात जास्त वेळ थांबून काम करू नका
लग्न झाल्यानंतर जास्त वेळ घरीच घालवावा लागेल, पण याचा अर्थ असा नाही की, नोकरीला प्राधान्य देणे सोडून द्यायचे. फक्त सुरुवातीला तिथे सांगा की, मी काही काळ कार्यालयीन कामासाठी जास्त वेळ देऊ शकणार नाही, पण मी कार्यालयीन वेळेत माझ्या कामाला पूर्ण प्राधान्य देईन.
यामुळे तुमचं म्हणणं तुमच्या साहेबांना नक्कीच समजेल आणि तुम्हाला घर तसेच नोकरीत ताळमेळ राखणंही सोपं होईल. याउलट तुम्ही लग्नापूर्वीप्रमाणेच कामावर जास्त वेळ थांबून काम करत राहिलात तर त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला आणि तुम्हीही त्यांना समजून घेऊ शकणार नाही, साहजिकच तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घेण्यात खूप अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लग्नानंतर काही दिवस कार्यालयीन काम कामाच्या वेळेत करण्यातच शहाणपणा आहे. तरच तुम्ही तुमच्या नवीन नात्यांमध्ये गोडवा आणू शकाल, अन्यथा कामावर होणारा उशीर तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतो.
रात्रपाळी टाळा
असे होऊ शकते की, तुम्ही अशा कंपनीत काम करत असाल जिथे तुम्हाला तीन पाळयांमध्ये काम करावे लागत असेल आणि लग्नाआधी तुम्ही हे तुमच्या सासरच्या मंडळींना सांगितले असेल आणि त्यांना ते मान्य झाले असेल, तरीही सुरुवातीला तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, तुमचा जोडीदार किंवा तुमचे सासरचे कितीही चांगले असले तरी सुरुवातीला त्यांना तुमचे रात्री उशिरा घरी येणे खटकेल.
त्यामुळे तुमच्या साहेबांशी किंवा तुमच्या व्यवस्थापक अधिकाऱ्यांशी बोला आणि त्यांना आधीच समजावून सांगा की, माझे नुकतेच लग्न झाले आहे, त्यामुळे काही काळ घर आणि नोकरीत ताळमेळ साधणे मला कठीण जाऊ शकते, पण सुरुवातीला काही दिवस मी रात्रपाळी न केल्यास मला माझ्या कुटुंबाला अधिकाधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे सोपे जाईल, ज्यामुळे भविष्यात गोष्टींचा ताळमेळ साधणे थोडे सोपे होईल.
कामावरच्या गप्पागोष्टी घरी आणू नका
तुमचा जोडीदार कितीही चांगला असला तरीही कामावरच्या गप्पागोष्टी घरी सांगू नका. तुमचे कुटुंब खूप सहकार्य करत असले तरी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की, हे तुमच्या आईचे घर नाही, जिथे तुम्ही घरी पोहोचताच तुमच्या कामाबद्दल बोलायला सुरुवात करत होता.
कामावरून येताच तुम्ही कधी तुमच्या सहकाऱ्यांबद्दल, कधी साहेबांनी तुम्हाला आज कोणते काम दिले होते त्याबद्दल, कधी तुम्ही कामावर केलेली मौजमजा, कधी तुम्ही उद्या कामावर करणार असणारे काम, वगैरे गोष्टी घरी सांगितल्यामुळे थोडयाच दिवसांत तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांना अशा गोष्टींचा कंटाळा येऊ लागेल. त्यांना वाटेल की, तुमच्याकडे फक्त कामावरचे बोलण्यासाठीच वेळ आहे. याउलट त्यांच्यासोबत चांगला ताळमेळ साधण्यासाठी कामावरून घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत चहा प्या, त्यावेळी त्यांच्याकडून काही नवीन गोष्टीं समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता.
यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल आणि तुमच्या कुटुंबाला तसेच जोडीदारालाही बरे वाटेल की, तुम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत आहात, कारण नात्यात गोडवा आणि जवळीक दोन्ही बाजूंनी असली पाहिजे. प्रयत्न केवळ एका बाजूने करून चालत नाही.
कुटुंबासोबत वेळ घालवा
तुमचं नवीनच लग्न झाले असेल तर जोडीदार आणि कुटुंबासोबत मौजमजेचे क्षण घालवणे, फिरायला जाणे स्वाभाविक आहे, कारण लग्नाचे सुरुवातीचे दिवसच आयुष्यभर लक्षात राहतात, नाहीतर नंतर माणूस कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून जातो. त्यामुळेच लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत अधूनमधून कामावरून सुट्टी घेऊन कधी कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाण्याचा तर कधी फिरायला जाण्याचा बेत आखा. कधी चित्रपट पाहायला जा.
यामुळे नवीन नातेसंबंध समजून घेण्यासोबतच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जेव्हा कधी तुमचे कुटुंब तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला सांगेल तेव्हा नाही म्हणू नका, तर गोष्टींचे व्यवस्थापन करायला शिका. यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या म्हणण्याचा आदर करता तेव्हा तुमचे कुटुंबीयही तुमच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करतील, पण हे सर्व प्रयत्न तुम्हाला सुरुवातीलाच करावे लागतील. तरच दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा निर्माण होईल.
पगाराची किंवा बढतीची बढाई मारू नका
असे शक्य आहे की, तुमचा पगार तुमच्या जोडीदारापेक्षा जास्त असेल किंवा कंपनीतील तुमचे पद खूप मोठे असेल, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर किंवा घरात तुमच्या पगाराबद्दल किंवा पदाबद्दल सतत फुशारकी मारावी. यामुळे तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबियांतील कमीपणा दाखवून द्याल.
त्यापेक्षा तुम्ही त्यांना समजून घेणे उत्तम ठरेल, अन्यथा तुमच्या अशा वागण्यामुळे सुरुवातीलाच नात्यांमध्ये कडवटपणा येईल. त्यामुळे लग्नानंतर नोकरी आणि घर यात ताळमेळ साधायचा असेल तर समजूतदारपणे वागा, अन्यथा एकदा नात्यात निर्माण झालेली कटुता आयुष्यभर कायम राहील, जी टाळणे बऱ्याच अंशी आपल्याच हातात असते.