* गरिमा पंकज

नवजात बाळाची त्वचा अतिशय पातळ आणि नाजूक असते, कारण त्वचा इतक्या लवकर संरक्षणासाठी आवश्यक असलेले अडथळे पूर्णपणे विकसित करू शकत नाही. त्यासाठी सुमारे वर्षाचा कालावधी लागतो. वातावरण, तापमानातील बदलांचा थेट परिणाम बाळाच्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्याच्या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच बाळासाठी चांगली बेबी केअर उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय योग्य तापमान आणि मॉइश्चरायझरचा पुरेसा वापर या बाबींचाही विचार करावा लागेल. बाळाच्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अॅलर्जी किंवा संसर्गाचा धोका कमी करणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते.

त्वचेवर उद्भवणाऱ्या सामान्य समस्या

सुरकुत्या, त्वचेवर लालसरपणा आणि कोरडेपणा यासारख्या समस्या नवजात बाळामध्ये सामान्य असतात. त्याच्या त्वचेत काही समस्या दिसल्यास घाबरू नका. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर तो नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची त्वचा नवीन वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर काही समस्या नैसर्गिकरित्या उद्भवू शकतात, ज्या काळानुरूप बऱ्या होतात. अनेकदा वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर मऊ केस असतात. याउलट उशिरा जन्मलेल्या बाळाची त्वचा अनेकदा कोरडी आणि सालपटे निघाल्यासारखी दिसते. मात्र काही आठवडयांतच त्याच्या त्वचेची ही समस्या दूर होऊ लागते, पण जर काळानुरूप नवजात बाळाच्या त्वचेवर उद्भवलेल्या समस्या बऱ्या होत नसतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

जन्मखुणा

रक्त पुरेसे परिपक्व न झाल्यामुळे बाळाच्या त्वचेवर छोटे लाल डाग दिसू शकतात. या खुणा चेहरा आणि मानेच्या मागे येतात. बाळ रडू लागल्यानंतर त्या प्रकर्षांने जाणवतात, पण या सर्व खुणा वर्षभराच्या आत स्वत:हून निघून जातात. जन्माला आल्यानंतर बाळाच्या त्वचेवर खरचटल्यासारखे किंवा रक्ताचे डाग दिसू शकतात, तेही काही आठवडयांत बरे होतात.

काही विशेष खबरदारी घ्या

बाळाची त्वचा निरोगी आणि मुलायम राहावी यासाठी दैनंदिन जीवनात काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते :

बाळाला अंघोळ घालणे : नवजात बाळाची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि कोमल असते. त्यामुळे त्याला अंघोळ घालताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. त्याला रोज अंघोळ घालण्याची गरज नसते. जन्माला आल्यानंतर पहिले काही आठवडे बाळाचे खराब डायपर बदलणे आणि स्पंज बाथ पुरेसा असतो. वर्षभरानंतर त्याला प्रत्येक २-३ दिवसांनी अंघोळ घालायला हरकत नाही. यामुळे किटाणूंपासून संरक्षण होण्यासह त्याला प्रसन्न वाटेल. अंघोळ घालण्यासाठी टपात ३-४ इंच पाणी भरणे गरजेचे असते. बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी पाणी जास्त गरम नाही ना? हे तपासून पाहा. त्याला कोमट पाण्यात २-३ मिनिटे अंघोळ घालणे पुरेसे ठरते. यादरम्यान शाम्पू किंवा साबण त्याच्या डोळयात जाणार नाही, याची काळजी घ्या.

सतत अंघोळ घातल्यास बाळाची त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणूनच तुम्ही बाळाला अंघोळीनंतर एखादी चांगली बेबी पावडर आणि मॉइश्चरायझर लावू शकता. लोशन लावत असाल तर ते त्याच्या ओल्या त्वचेवर लावा. त्वचेवर ते घासून लावण्याऐवजी हळूवारपणे लावा. बाळाच्या त्वचेसाठी वापरली जाणारी उत्पादने जसे की, लोशन, साबण, शाम्पू इत्यादीची निवड करण्यापूर्वी ते मुलायम आणि पेराबिन फ्री असतील याकडे लक्ष द्या. शक्य झाल्यास त्याच्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खास बेबी स्किन केअरचीच निवड करा.

मालिश : बाळाची मालिश करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. नैसर्गिक तेलाने केलेली मालिश त्याच्या त्वचेला पोषण देते. बाळाची मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, राईचे तेल, खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरता येईल. हे तेल खूपच गुणकारी असते. बाळाची सुगंधित आणि केमिकल असलेल्या तेलाने मालिश करणे टाळावे, अन्यथा त्याच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. मालिश करण्यापूर्वी बाळाला दूध पाजलेले नसावे आणि ज्या खोलीत मालिश केली जाईल तिचे तापमान सामान्य असेल याकडे लक्ष द्यावे.

डायपरसंबंधी काळजी : बाळाच्या शरीरावर डायपरमुळे चट्टे पडू शकतात. डायपर खूप वेळापर्यंत बाळाला घालून ठेवल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. बाळ सतत डायपर ओले करू शकते. त्यामुळे वेळेवर डायपर न बदलल्यास त्याला रॅशेश होऊ शकतात. बाळाच्या त्या भागाच्या आसपासची त्वचा लाल आणि सालपट निघाल्यासारखी दिसते. त्वचेला खाज येऊ शकते. यापासून वाचण्यासाठी शक्य तितक्या लवकर ओला डायपर बदला. डायपर खूप घट्ट असेल किंवा बाळाच्या त्वचेला एखाद्या खास ब्रँडच्या डायपरमुळे अॅलर्जी झाली असेल तर तुम्ही डायपर लगेचच बदलायला हवा, अन्यथा यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

बाळाचा गुप्तांगाचा भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा. बाळाचा डायपर बदलताना तो भाग गरम पाण्याने स्वच्छ करून व्यवस्थित पुसून नंतरच नवीन डायपर घाला. त्याच्यासाठी असा डायपर निवडा जो मुलायम आणि जास्त शोषून घेणारा असेल. जास्तच लालसर चट्टे येऊ लागल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंक ऑक्साईड असलेले डायपर रॅश क्रीम लावू शकता.

सूर्य किरणे : बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्याचा थेट सूर्यकिरणांशी संपर्क येऊ देऊ नका. यामुळे त्याला सनबर्न होऊ शकते. तुम्हाला बाहेर जायचे असल्यास आणि त्यावेळी बाळाचा उन्हाशी संपर्क येणार असल्यास त्याला संपूर्ण हातांचे शर्ट, पॅन्ट आणि टोपी घाला. उघडया राहणाऱ्या भागावर बेबीसेफ सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. तो थोडा मोठा झाल्यावर त्याला काही वेळ कोवळया उन्हात नेता येईल. यामुळे त्याच्या शरीरातील ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघेल.

सुती कपडे घाला

बाळाला अगदी सहज लालसर चट्टे येतात, कारण त्याची त्वचा जिथे दुमडते तिथे त्याला घाम खूप जास्त येतो. त्यामुळे त्याला सुती कपडे घालायला हवे. हे कपडे नरम असतात आणि घाम अगदी सहज शोषून घेतात. सिंथेटिकच्या कपडयांमुळे बाळाला अॅलर्जी होऊ शकते. त्याचे कपडे धुण्यासाठी नेहमी सौम्य साबण किंवा पावडर वापरा. आजकाल बाजारात बाळाचे कपडे धुण्यासाठी खास तयार करण्यात आलेले साबण, पावडर उपलब्ध आहेत.

तापमानाकडे लक्ष द्या

बाळाच्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी वातावरण, तापमानाकडे लक्ष देणे गरजेचे असते. तापमान कमी किंवा जास्त असल्यास बाळ व्यवस्थित झोपू शकणार नाही. याचा परिणाम त्याच्या शारीरिक विकासावर होईल. त्यामुळे तुम्हाला तापमानातील बदलांकडे लक्ष द्यावे लागेल. विशेष करून जास्त गरम होत असल्यास किंवा जास्त थंडीच्या दिवसात बाळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...