(अंतिम भाग)
दिर्घ कथा * रजनी दुबे
आत्तापर्यंत आपण वाचलंत :
आयएएसच्या कोचिंगसाठी पारूल दिल्लीतल्या एका गर्ल्स होस्टेलमध्ये येऊन राहिली होती. एकदा ती जेवायच्या सुट्टीत बाहेर पडली अन् पावसात अडकली. पावसापासून बचाव व्हावा म्हणून ती एका बंगल्याच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिली. तेवढ्यात आतून रांगत एक लहान मुलगी व्हरांड्यात आली. पारूलनं तिला उचलून घेतलं व ती घरात गेली. तिथं बाळाची आजी भेटली. मग पारूल रोजच तिला व आजींना भेटायला जाऊ लागली. तिथंच डॉ. प्रियांशुशी भेट झाली. त्यानं पारूलला लग्नाची मागणी घातली. दोन्ही घरातून या नात्याला सहर्ष स्वीकृती मिळाली. पारूल लग्न होऊन घरी आली. प्रिया, ते बाळ म्हणजे डॉ. प्रियांशुच्या दिवंगत बहिणीची मुलगी होती. बाळाच्या वडिलांचा घरात कधी उल्लेख होत नव्हता. पण पारूलला एकदा त्यांचा पत्ता मिळाला व तिनं शेखरला, प्रियाच्या वडिलांना पत्र टाकलं...
आता पुढे वाचा :
सुमारे एक महिन्यानंतर घराची डोअर बेल वाजली. बाहेर कुणी अनोळखी माणूस उभा होता. ‘‘डॉ. प्रियांशु, मिसेस पारूल व कमलाबाईंना बोलवा. कोर्टाचं समन्स आहे,’’ त्यानं म्हटलं. एव्हाना आई पण तिथं आल्या होत्या. त्यानं आमच्या सह्या घेऊन काही कागद आम्हाला दिले व तो निघून गेला. मी ते कागद जेव्हा वाचले, तेव्हा घेरी येईल की काय असं मला वाटलं. शेखरनं आमच्यावर केस केली होती. आम्ही त्याच्या नावाचा वापर प्रियंवदाच्या अनौरस मुलीचा बाप म्हणून केल्याचा आरोप आमच्यावर केला होता. त्याखेरीज त्याची बेअब्रू केली होती व त्याच्या संपत्तीवर अधिकार सांगत होतो असंही त्यात म्हटलं होतं.
एवढंच नाही तर बिचाऱ्या निरागस प्रियालाही त्यात त्यानं ओढलं होतं. प्रतिवादी क्रमांक ४ प्रिया-वय-९ महिने. (आत्मजा-वडील अज्ञात) मला एकदम धक्काच बसला, कुणी माणूस एवढा निष्ठूर कसा होऊ शकतो अन् इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो? मला रडूच यायला लागलं. आई पण रडत होत्या. त्या सर्व कागदपत्रात माझ्या पत्राची झेरॉक्सही टाचणीनं लावलेली होती. त्याचाच आधार घेत त्या हलकट माणसाने कोर्टात धाव घेतली होती अन् कोर्टाला विनंती केली होती की आम्ही प्रियाच्या वडिलांच्या जागी त्याचं नाव लावण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. नुकसानभरपाई म्हणून त्यानं आमच्याकडून काही लाख रूपये मागितले होते. मी तर हतबद्ध झाले.