* कथा * सुधा अमृता
कार्यालयातून घरी परतत असताना वाटेत वहिनी भेटली. ती खूप दु:खी दिसत होती. विचारपूस केल्यावर ती म्हणाली, ‘‘निवेदिता आता या जगात नाही, असा रोमितचा संदेश मुंबईहून आला आहे.’’
हे ऐकून मला धक्काच बसला. मी घरी कसा पोहोचला माझे मलाच समजले नाही. घरी येताच एका खोक्यातून निवेदिताचा फोटो काढून बघत बसलो. तेवढयात श्रद्धा आली, तिने विचारले, ‘‘इतका काळजीपूर्वक कोणाचा फोटो बघतोस?’’
‘‘तुला माहीत नाही श्रद्धा, ही निवेदिता आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कोविड झाल्यामुळे पती आणि दोन मुलांना रडत सोडून तिने हे जग कायमचे सोडले.’’
‘‘खूप वाईट झाले, पण तू निवेदिताला कसं ओळखतोस? निवेदिताचा फोटो तुझ्याकडे कसा?’’
‘‘तू गोविंदपुरीच्या माझ्या वहिनीला तर ओळखतेसच.’’
‘‘हो, हनीमूनवरून परतताना आपण त्यांच्या घरी काही काळ थांबलो होतो.’’
‘‘बरोबर ओळखलेस. निवेदिता तिची भाची होती.’’
‘‘पण याआधी कधी तू निवेदिताबद्दल बोलला नाहीस?’’
‘‘अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित मी तुला अजून सांगितल्या नसतील.’’
‘‘पण मी तुझ्यापासून कधी कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही?’’
‘‘तुला नेमके काय म्हणायचे आहे?’’
‘‘काही नाही. तुम्ही पुरुष कसे असता तेच समजत नाही. आता तुझ्या बोलण्यातून स्पष्ट झाले की, तुझ्या आयुष्यात अशा किती निवेदिता आल्या असतील काय माहीत?’’
‘‘तू पुन्हा चुकीचे बोलतेस.’’
‘‘सत्य कडूच असते. वहिनीची भाची आणि त्रास तुला होतोय आणि तरीही तू म्हणतोस की, तुझा तिच्याशी काहीही संबंध नाही.’’
‘‘पण मी निवेदिताशी कधी नीट बोललोही नाही, हे मी तुला कसं समजावू?’’
‘‘जर मला दुसऱ्या कोणी सांगितले असते तर कदाचित मी त्यावर विश्वास ठेवलाही असता.’’
‘‘तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजेस, कारण तुझा पती इतका मूर्ख आहे की, तो गरज असली तरीही खोटं बोलू शकत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे.’’
‘‘खोटं बोलू नकोस, पण मला माहीत आहे की, वायफळ बोलायची तुझी सवय आहे. त्यामुळेच तू आयुष्यात प्रगती करू शकला नाहीस. कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तू जास्त काळ नीट राहू शकत नाहीस.’’