* मोनिका अग्रवाल
गृहिणी असणं ही एक शिक्षा आहे का? सर्वांनाच ठाऊक आहे की बदलत्या काळानुसार गृहिणीची भूमिकासुद्धा आता बदलली आहे. परंतु तिच्या जबाबदाऱ्या कमी न होता अधिक वाढल्या आहेत. तसं बघता या आधुनिक काळात घरातील प्रत्येक कामासाठी मशिन उपलब्ध आहेत, परंतु या मशिन स्वयंचलित आहेत का? आजही गृहिणीची धावपळ सुरूच आहे ना?
जबाबदाऱ्या तर पूर्वीही होत्या, परंतु आवाका मर्यादित होता. परंतु आज आवाका अमर्यादित आहे. आज स्त्रिया घरापासून बाहेरच्या जबाबदाऱ्यांसह मुलांच्या अभ्यासापासून सर्वांचं भवितव्य घडवण्यात आणि भविष्यातील बचत योजना तयार करण्यात व्यस्त असतात आणि तेसुद्धा संपूर्ण एकाग्रतेने.
गृहिणीची धावपळ भल्या पहाटेपासून सुरू होते. मग भले ती शहरी असो वा ग्रामीण. रात्री सर्वांनंतर ती विश्रांतीचा विचार करते. रोज पती, मुलं आणि घरातील अन्य सभासदांची देखभाल करण्यात ती इतकी व्यस्त असते की स्वत:ला कायम दुय्यम दर्जावरच ठेवते. ती इतरांच्या अटी, इच्छा आणि आनंदासाठी जगण्याची इतकी अधीन होते की जर एखाद्या कामात काही कमतरता राहून गेली तरी अपराधभावाने ग्रसित होते. परंतु त्यानंतरही तिच्या वाट्याला आप्तस्वकीयांचे टोमणे येतात. तिच्या कामाचं श्रेय आणि सन्मान तिच्या वाट्याला येत नाही.
सन्मानाची अपेक्षा
गृहिणी एक अशी सपोर्ट सिस्टीम आहे, जी प्रत्येकाला जगण्याची उर्जा देते. याचा अर्थ नोकरदार महिला कमी आहे असं नव्हे. स्त्री भले ती घरात काम करत असो वा बाहेर, ती काम करतेच ना. परंतु इथे आपण त्या स्त्री, त्या गृहिणीबद्दल बोलत आहोत, जिला समाजाच्या दृष्टीने महत्व नाही. तिला एकही सुट्टी नसते, तिला पगार मिळत नाही. खरं सांगायचं तर कोणत्याही गृहिणीला पगार अपेक्षित नसतो. परंतु ती आपल्या माणसांची ज्याप्रकारे सेवा करते, त्यांची काळजी घेते, त्या मोबदल्यात सन्मानाची अपेक्षा नक्कीच बाळगते आणि तो तिचा मानवीय अधिकारही आहे.
एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ४० टक्के ग्रामीण आणि ६५ टक्के शहरी स्त्रिया, ज्यांचं वय १५ वर्षं वा त्याहून अधिक आहे, पूर्णपणे घरगुती कार्यात व्यस्त असतात. त्याहून आश्चर्याची बाब ही की आकडेवारीनुसार ६० वर्षांहून अधिक वयाच्या एकचतुर्थांश स्त्रिया अशा आहेत, ज्यांचा सर्वाधिक वेळ या वयातही घरगुती कामं करण्यात जातो.