* डॉ. परिणीता तिवारी
लहान मूल अनेक कारणांमुळे रडत असतं. त्याच्यामध्ये इतकी क्षमता नसते की ते आपल्याला काय त्रास होतोय हे मोठ्यांना सांगू शकेल. म्हणूनच ‘रडणं’ हाच एकमेव उपाय दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे असतो. सर्व आईवडिलांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा की त्यांचं बाळ का रडत आहे? त्याच्या रडण्याचं कारण काय आहे? त्याला काय सांगायचं आहे, कधीकधी हे समजून घेणं खूपच कठीण होतं. खासकरून जेव्हा प्रथमच कुणी जोडपं आईवडील झालेले असतात.
खरंतर ‘रडणं’ हा मुलाच्या जीवनाचा एक भागच असतो. लहान बाळ तर दिवसाला किमान दोन तास रडतं आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढत जातं किंवा कमी कमी होत जातं. मूल जन्माला आल्यापासून ते पुढील सहा महिन्यांपर्यंत दिवसाला २-३ तास तरी हमखास ते रडत राहातं, मग तुम्ही त्याची कितीही काळजी घ्या. ६ महिन्यांनंतर मुलाचं रडणं कमी होऊन ते दिवसात फार तर एखादं तासच रडतं. हळूहळू आईला आपल्या बाळाच्या गरजा समजू लागतात तेव्हा ती बाळाच्या गरजा वेळीच पूर्ण करू लागते तेव्हा बाळाचं रडणं आणखीनच कमी होतं.
अनेक कारणं आहेत रडण्याची
भूक लागणे : जेव्हा बाळ रडू लागतं तेव्हा त्याला भूक लागली असावी ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात येते, परंतु हळूहळू आई आपल्या बाळाची लक्षणं ओळखू लागते तेव्हा ती बाळाला रडण्याआधीच खायला देऊ लागते. जेव्हा बाळ भुकेलं असतं तेव्हा ते रडू लागतं, कुणाकडे जायलाही तयार नसतं, सतत तोंडामध्ये हात घालत राहातं.
डायपर खराब होणे : अनेक मुलं रडून हे सांगत असतात की त्यांचं डायपर बदलण्याची गरज आहे, तर काही मुलं अशीही असतात जी अस्वच्छ डायपरमध्येही राहातात. म्हणूनच वेळोवेळी डायपर तपासत राहा.
झोप येणं : नेहमी आपल्याला असं वाटतं की मुलं किती नशीबवान आहेत जी थकल्यावर किंवा झोप आल्यावर जेव्हा हवं तिथे झोपू शकतात. पण तसं नाहीए. मुलालादेखील झोपण्यासाठी आरामदायी आणि शांत जागेची गरज असते. जर असं झालं नाही तर मुलं रडू लागतात, त्रस्त होतात, चिडचिडी होतात आणि खासकरून जेव्हा ते फार थकलेले असतात.