- शोभा कटारे
नोकरदार महिलेला एकाचवेळी घर आणि कार्यालय दोन्ही सांभाळणं थोडं कठीण असतं. सर्व महिलांना त्यांचे स्वयंपाकघरातील काम लवकरात लवकर उरकून कामावर जायचं असतं आणि संध्याकाळी लवकरात लवकर जेवण बनवून थोडा आराम करायचा असतो.
जरी आजकाल प्रत्येकाच्या घरात फ्रीज, मिक्सर ग्राइंडर आणि मायक्रोवेव्ह यांसारख्या गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांचा वापरही केला जातो तरी आजकाल बाजारात अनेक स्मार्ट किचन अप्लायन्सेस म्हणजेच उपकरणेही उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून महिला त्यांचा वेळ वाचवू शकतात आणि ही उपकरणं वापरण्यासही खूप सोपी आहेत.
एग बॉयलर
आपण अनेकदा अंडी उकडण्यासाठी एखादे भांडे वापरतो. यामुळे एकतर अंडी उकडण्यास जास्त वेळ लागतो आणि दुसरे म्हणजे गॅस बराच काळ सुरू राहातो. पण, आता एग बॉयलरच्या मदतीने तुमचं काम सोपं झालं आहे. हे वापरण्यास देखील सोपं आहे. यामध्ये अंडी उकडली की नाही, हे सतत पाहाण्याची गरज नाही. अंडी उकडल्यावर हे उपकरण आपोआप बंद होते.
फायदे
* ऑटोशट ऑफ (आपोआप बंद होणे) हा याचे वैशिष्ट्य आहे.
* हलके असते.
* टाइमर असतो.
* तुम्ही डिशवॉशरमध्ये इलेक्ट्रिक नसलेले भाग ठेवू शकता.
व्हेजिटेबल चॉपर
भाजी चिरण्यात बराच वेळ वाया जातो आणि स्वयंपाकघरदेखील अस्वच्छ होते. अशावेळी, जर तुम्ही ‘फाईव्ह इन वन’ व्हेजिटेबल चॉपरचा वापर केला तर तुमचं काम खूप सोपं होईल. यात भाज्या सहज कापल्या जातात. त्यासाठी तुम्हाला हव्या त्या आकाराचे ब्लेड तुम्ही वापरू शकता. तुम्ही व्हेजिटेबल चॉपरचे ब्लेड काही सेकंदात बदलू शकता. हे उपकरण स्वयंपाकघराला खूप अस्वच्छ होण्यापासूनही वाचवते.
इलेक्ट्रिक स्किलेट
जेव्हा अन्न शिजवल्यानंतर ते थंड होते तेव्हा ते पुन्हा गरम करणे खूप कठीण होते. अशावेळी इलेक्ट्रिक स्किलेट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. याच्या मदतीने अन्न लगेच गरम होईल. स्वयंपाक करण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते बेक आणि तळण्यासाठीदेखील वापरू शकता, याशिवाय ते गरम भांडे म्हणून देखील वापरले जाऊ शकते. हे नॉनस्टिक आहे आणि ऑटोमॅटिक हिट कंट्रोल म्हणजेच स्वयंचलितपणे उष्णता नियंत्रित करू शकते.





