* भारत भूषण श्रीवास्तव
प्रेम खरोखरच माणसाला आंधळं बनवतं. त्यामुळे माणूस एवढा भावुक, भयभीत आणि संवेदनशील होतो की व्यवहार व दुनियादारी शिकू शकत नाही. अगदी हेच ऋषीशसोबत घडले. त्याने नेहासोबत लव्हमॅरेज केलं होतं. प्रेयसी पत्नीच्या रूपात मिळाल्यामुळे तो खूप खूश होता. पेशाने फुटबॉल कोच आणि ट्रेनर ऋषीशचा आनंद त्यावेळी आणखी दुप्पट झाला, जेव्हा जवळपास दीड वर्षांपूर्वी नेहाने छानशा बाहुलीला जन्म दिला.
भोपाळमधील कोलार भागात असलेल्या मध्य भारत योध्दाज क्लबला प्रत्येक जण ओळखतो. त्याचा कर्ताधर्ता ऋषीश होता. हसतमुख आणि आनंदी असलेल्या या खेळाडूला जो कोणी एकदा भेटत असे, तो त्याचाच होऊन जात असे. परंतु कोणाला माहीत नव्हतं की वरून खूश असल्याचे नाटक करणारा हा माणूस काही काळापासून आतल्या आत खूप कुढत होता. ऋषीशच्या जीवनात काही असं घडलं, ज्याची त्याला स्वत:लाही कधी अपेक्षा नव्हती.
गेल्या ३ जुलैला ३२ वर्षीय ऋषीश दुबेने विष पिऊन आत्महत्या केली, तेव्हा ज्यालाही कळलं, त्याला त्याच्या आत्महत्येचं कारण जाणून आश्चर्य वाटलं. ऋषीशने पत्नीच्या विरहात जीव दिला. त्याचे आई-वडील दोघंही बँक कर्मचारी आहेत. त्या संध्याकाळी जेव्हा ते घरी परतले, तेव्हा ऋषीश घरात बेशुध्द पडलेला होता.
घाबरलेले आईवडील लगेच मुलाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यू संशयास्पद होता, त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं, तेव्हा कळलं की ऋषीशने विष घेतलं होतं. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला. परंतु मरण्यापूर्वी ऋषीशने आपल्या आठवणींचे पोस्टमार्टेम पेनाने कागदावर केले, ते नष्ट होणारे नव्हते. कारण ते शरीर नव्हे, भावना होत्या.
तर मी नसणार
कुटुंब, समाज आणि जगाच्या विरोधात जाऊन नेहाशी लग्न करणारा ऋषीश ३ जुलैला सहजच हिंमत हरला नव्हता. हिंमत हरण्याचं कारण होतं, त्याला कायम धीर देणारी नेहा काही महिन्यांपासून त्याला सोडून माहेरी जाऊन राहिली होती.
पतिशी भांडण झाल्यानंतर पत्नीचे माहेरी जाऊन राहणे काही नवीन गोष्ट नाही, उलट ही एक परंपराच ठरत आहे. जी नेहानेही निभावली आणि जाताना छोट्या मुलीलाही सोबत घेऊन गेली, जिच्यावर ऋषीशचे खूप प्रेम होते.