* फातिमा खातून
अमर आणि रिनाचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाला फक्त ६ महिने उलटून गेले होते. सर्व सुरळीत सुरू होते. दोघेही लग्न आणि एकमेकांची सोबत यामुळे खूप आनंदी होते. मात्र, अचानक एक समस्या निर्माण झाली. ती कोणाला सांगता येत नव्हती की, कोणाचा सल्ला घेता येत नव्हता. अचानक आयुष्य बदलल्यासारखे वाटू लागले आणि वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा उत्साह थंडावला.
अमरचा विवाहित मित्र समीरला याबद्दल समजले. त्याने हातवारे करून अमरला विचारण्याचा प्रयत्न केला, पण अमरने काहीच उत्तर न दिल्याने एके दिवशी तो पत्नीसह अमरच्या घरी गेला. दोघांनीही अमर आणि रिनाला त्यांच्या समस्यांबद्दल मोकळेपणाने विचारले. त्यानंतर त्या दोघांनीही त्यांच्या समस्या उघडपणे सांगितल्या.
त्या ऐकून समीर आणि त्याची पत्नी हसली. त्यांनी सांगितले की, ते देखील या टप्प्यातून गेले आहेत. त्यांनी त्यावर कोणता उपाय शोधला, हे देखील त्यांनी सांगितले.
त्यांच्या सल्ल्यानुसार, अमर आणि रिनाने आपल्या समस्या सोडवल्या आणि काही दिवस गमावलेला सर्व आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा आला. हे फक्त त्यांच्या मित्राच्या मैत्रीने आणि मदतीमुळे शक्य झाले.
एक पवित्र बंधन
लग्न हे २ जिवांमधील एक सुंदर आणि पवित्र बंधन आहे, जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि आयुष्य एकत्र घालवू इच्छितात. परंतु, लग्न हे एक आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे नातं आहे, ज्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून अविरत प्रेम आणि वचनबद्धता आवश्यक असते. जोडप्यांना आनंदी आणि निरोगी वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे मित्रांची मजबूत सोबत, जी प्रोत्साहन, सल्ला आणि मदत मिळवून देऊ शकते.
असे मित्र बना, जे वैवाहिक जीवनाचा रथ पुढे नेतील आणि तो पुढे नेत राहाण्यासाठी मदत करतील.
वैवाहिक जीवनात सोबत उभे राहाण्याचा प्रश्न येतो तेव्हा सर्व मित्र तयार होत नाहीत. काही मित्र वैवाहिक नातेसंबंधासाठी विषारी, नकारात्मक किंवा अगदी कुचकामी ठरू शकतात, तर काही एकनिष्ठ, सकारात्मक आणि मदत करणारे ठरू शकतात. वैवाहिक जीवन धोक्यात आणणारे किंवा धोक्यात घालणारे मित्र टाळा किंवा त्यांना मर्यादेत ठेवा.





