- गीता शिंदे
मला आजपर्यंत समजू शकला नाहीस’ ‘तुला समजून घेणं खूप अवघड आहे, तू मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केलास,’ ‘मी तुला कधीही समजू शकणार नाही. ‘तू मला समजून घेऊ शकली असतीस तर किती बरं झालं असतं.’
अशा प्रकारचे संवाद अनेक दाम्पत्यांमध्ये वेळोवेळी होत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवल्यानंतरही दाम्पत्यांची एकमेकांबद्दल तक्रार असते की अजूनही ते एकमेकांना समजून घेऊ शकले नाहीत. रोजच्या आयुष्यातही ते वारंवार एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून दोष देताना दिसून येतात. कधीकधी तक्रारींच्या रूपात मनातला क्षोभ बाहेर पडतो. तर कधी ओल्या लाकडाप्रमाणे आयुष्यभर दोघेही मनातल्या मनात धुमसत राहतात.
‘अ’ यांना असं वाटत की त्यांची पत्नी गमतीने बोललेली एखादी गोष्टही गंभीरपणे घेते, खरी मानते आणि मग रुसून बसते. ‘‘आम्ही दोघं आता वयस्कार होऊ लागलो तरी अजूनपर्यंत ती मला समजू शकलेली नाही. मी गमतीने बोललेल्या गोष्टीही ती उगाचच गंभीरपणे घेऊन मनाला लावून घेते.’’
‘ब’ यांना वाटतं की त्यांचे पती त्यांची निष्ठा आणि समर्पण आजपर्यंत समजूच शकलेले नाहीत. ‘‘कोणत्याही पुरुषाबरोबर मग भले तो नात्याने माझा भाऊ का असेना, बोलणं, भेटणं ते सहन करू शकत नाहीत. शेवटी मी दोन मुलांची आई आहे. आणि संपूर्ण प्रामाणिकपणे मी त्यांना समर्पित केलं आहे तरीही हा माणूस मला समजून घेऊ शकत नाही.’’
‘क’ यांची तक्रार आहे की, माहेरची श्रीमंत असणारी त्याची पत्नी माहेरच्यांसमोर तोरा मिरवण्यासाठी माझं संपूर्ण बजेट खलास करते. ते म्हणतात, ‘‘माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत हे तिला समजत का नाही? मोठ्या लोकांशी स्पर्धा करण्यासाठी देखावा करणं योग्य नाही. मी माझ्या आयुष्यात कसाबसा जमाखर्चाचा मेळ घालतोय आणि हिला मात्र आपल्या देखाव्यापुढे मुलांच्या भविष्याचीही चिंता नाही.’’
‘डी’ यांना आपल्या पत्नीबद्दल सेक्ससंबंधी खूप तक्रारी आहेत. ‘‘सेक्ससारख्या नाजूक, सुंदर आणि आयुष्यातला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला ती एक कर्तव्य समजते आणि एखादं काम उरकून टाकल्याप्रमाणे वागते. आज आम्हाला मुलं झाल्यानंतरही ते परमोच्च सुख मात्र मला मिळालं नाही जे कुणाही पुरुषाला हवंहवसं वाटतं. ती माझ्या शारीरिक गरजा कधी गंभीरपणे समजूनच घेत नाही.’’