* प्रतिनिधी
नेहमी बायकांची एक तक्रार असते की त्यांचे नवरे त्यांना घरातल्या कामांमध्ये मदत करत नाहीत. ठराविक मर्यादेपर्यंत त्यांची ही तक्रार योग्यही आहे. कारण लग्नानंतर बहुतांश नवरे घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या तर योग्य रीतीने पार पाडताना दिसून येतात, पण जेव्हा गोष्ट स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्याची असते किंवा मग घरातल्या साफसफाईची असते, तेव्हा बहुतेक नवरे काही ना काही बहाणा करून ते काम टाळण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. म्हणायला तर पती आणि पत्नी संसार रथाची दोन चाके आहेत असे म्हटले जाते, पण जर फक्त एकाच चाकावर भार पडत असेल तर संसाराचा गाडा डगमगू लागणे स्वाभाविकच आहे.
नेहमी बायका आपल्या घरातील कामांमध्ये एवढया व्यस्त असतात की त्यांना स्वत:साठी वेळ देणेही शक्य होत नाही. अशात जर त्यांना घरातल्या कामांत पतिची मदत मिळाली तर त्यांचा भार कमी होतोच शिवाय पती पत्नीच्या नात्यातील गोडवाही वाढतो.
अशी वाटून घ्या कामे
घरातल्या कामांना तुच्छ समजणे सोडून काही कामांची जबाबदारी जर पतिने स्वत:वर घेतली तर घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. अशी अनेक कामे आहेत, जी पती आणि पत्नी वाटून घेऊ शकतात :
* किचनला लव्ह स्पॉट बनवा. बऱ्याचदा नवरे किचनमध्ये जाण्याच्या कल्पनेनेही कचरतात. पण इथे तुम्ही पत्नीसह जेवण बनवताना प्रेमाच्या एका नव्या स्वादाचाही आस्वाद घेऊ शकता. भाजी कापणे, जेवण डायनिंग टेबलवर मांडणे, पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवणे, सॅलड बनवणे अशी कामे करून तुम्ही तुमच्या पत्नीला मदत करू शकता. विश्वास ठेवा तुमच्या या छोटया छोटया कामांमुळे तुमची पत्नी मनापासून तुमची प्रशंसा करेल.
* कधीतरी सकाळी पत्नी उठण्याआधी स्वत: उठून तिच्यासाठी मस्त चहा बनवून तर पहा. तुमचा हा छोटासा प्रयत्न तिला दिवसभर आनंदी ठेवेल यात शंकाच नाही. जर पत्नीची तब्येत ठीक नसेल तर हलकाफुलका नाश्ता बनवून तिला आराम देऊ शकता.