पुन्हा चूक होणे नाही

कथा * सुदीप्ती सत्या

सकाळच्या वेळी माझं घर अगदी केराच्या बादलीसारखं दिसतं…नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात अन् धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही.

खोल्यांचे केर काढून फरशा पुसून होताएत तोवर मोबाइल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नणंदेचा होता. सगळा राग वैतागून विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काही सीरियस तर नाही ना? हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ‘‘ताई, नमस्कार बऱ्या आहात ना?’’

‘‘मी बरी आहे गं! पण मोहनाची तब्येत बरी नाहीए. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवतखात नाहीए. रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो…’’ बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं.

‘‘हे कधीपासून होतंय?’’

‘‘एखाद महिना झाला असावा, कदाचित जास्त ही…’’

‘‘ताई, रडू नका, मी आहे ना? आजच जाते मी तिला भेटायला. आता नऊ वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईन…तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा?’’

‘‘नाही…’’

‘‘कमाल करता…इतका वेळ उपाशी आहात? आधी खाऊन घ्या. चहा घ्या अन् काळजी करू नका…मलाही आता भराभरा कामं आटोपायची आहेत. मी एक दोन दिवसात तुम्हाला सगळं सांगते…आजच जातेय मी मोहनाकडे…’’

फोन ठेवून मी कामाला लागले. मोहनाचा विचार डोक्यात होताच.काय झालं असेल मोहनाला? इतकी हुशार, गोड गुणी पोरगी…आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते. इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ‘तिच्याकडून काही शिका’ असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते.मुलं हसून उडवून लावतात.  punhaa chuke hone naahi

दुपारचा स्वयंपाक आटोपून मी मेथीच्या पुऱ्या, गोडाचे भोपळयाचे घारगे केले. बटाट्याचा कीस तळून घेतला. हे पदार्थ मोहनाला फार आवडतात. होस्टेलवर ते मिळतही नाहीत. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही. सरप्राइज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथेच चिठ्ठी ही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी मोहनाला भेटायला जातेय एवढं त्याच्या कानावर घातलं.

मोहनाचं कॉलेज अन् होस्टेल माझ्या घरापासून निदान पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं. दोन बसेस बदलून जावं लागतं. भरपूर वेळ खर्च होतो. म्हणूनच वरेचवर मला जाता येत नाही. इंजीनियरिंगच्या भरगच्च अभ्यासातून इकडे यायला मोहनालाही जमत नाही.

मी होस्टेलवर पोहोचले, तेव्हा मोहनाची मैत्रीण भारती भेटली. ‘‘अरे मामी? नमस्कार…कशा आहात?’’ तिनं हसून विचारलं.

‘‘नमस्कार, कशी आहेस तू? मोहना कुठं भेटेल?’’

‘‘तिच्या रूमवर.’’

‘‘थँक्यू…’’ मी तिचा निरोप घेऊन वॉर्डनच्या केबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या अन् मोहनाच्या रूमवर पोहोचले. दार बंद होतं…कडी नसावी, पण मी दारावर टकटक करताच धक्क्यानं ते उघडलं अन् मी आत गेले. पलंगावर आडवी झालेली मोहना वर गरगरणाऱ्या पंख्याकडे शून्य नजरेनं बघत होती. आवाजानं दचकून तिनं विचारलं, ‘‘कोण आहे?’’ मला बघताच उठून बसली.

‘‘अय्या…मामी तू?’’ तिनं आनंदानं मिठी मारली.

तिचा चेहरा ओलसर होता…‘‘रडत होतीस का?’’ मी विचारलं.

‘‘नाही…’’

मी तिच्याकडे नीट बघितलं…पार कोमेजली होती पोर, हडकली होती. डोळे सुजल्यासारखे…मी प्रेमानं विचारलं, ‘‘काय झालंय तुला? सकाळी तुझ्या आईचा फोन आला, तुला बरं नाहीए म्हणून, अशावेळी तू सरळ माझ्याकडे यायचंस किंवा स्वत:च्या घरी जायचं…इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखववलंस का? काही औषधं वगैरे घेते आहेस का?’’ मी एकामागोमाग एक प्रश्न एकदमच विचारले.

‘‘अगं मामी, बरी आहे मी. तू अशी हवालदिल होऊ नकोस. बैस तू. मी चहा घेऊन येते.’’ पलंगावरून उतरत मोहनानं म्हटलं.

‘‘मी चहा घेऊनच निघालेय…तू कुठंच जाऊ नकोस. तुझ्यासाठी बघ मी मेथीच्या पुऱ्या, भोपळ्याचे घारगे अन् तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय.’’ मी डबा तिच्यापुढे धरला. मला वाटलं होतं ती नेहमीप्रमाणे झडप घालून डबा उघडेल…पदार्थ तोंडात टाकेल…बोटांनी ‘मस्त’ची खूण करेल. पण तसं काहीच झालं नाही.

‘‘नंतर खाईन,’’ म्हणत तिनं डबा शेजारच्या स्टुलवर ठेवला. डब्याच्या धक्क्यानं स्टुलावरचं पुस्तक खाली पडलं. पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची स्ट्रिप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली. नीट बघितली. ‘‘काय गोळ्या झोप येण्यासाठी आहेत…तुला झोप येत नाही?’’ मी तिच्याकडे बघत विचारलं.

तिनं माझी नजर टाळली…‘‘नाही, तसं काही नाहीए. मी चहा घेऊन येते कॅन्टीनमधून,’’ ती घाईनं म्हणाली.

‘‘तुला घ्यायचाय का?’’

‘‘नाही, मला नकोय.’’

‘‘तर मग राहू दे, मलाही थोड्या वेळात निघायचंय. अभ्यास कसा चाललाय?’’

‘‘फारसा चांगला नाही…’’

मला जाणवलं, मोहना बोलताना नजर टाळतेय, एरवी आनंदानं चिवचिवणारी मोहना आज मोकळेपणानं बोलत नाहीए. माझं लग्न झालं, तेव्हा चिमुरडी होती ती. तेव्हापासून आम्हा मामीभाचीचं गुळपीठ होतं. सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची. माझीही ती फार लाडकी होती.

काहीतरी बिघडलंय खास. तिच्या मनावर ताण असेल तर तिनं बोलून मन मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा. नेमकं काय करावं याचा विचार करत असताना तिची रूमपार्टनर भारती आली. तिनं वह्या पुस्तकं शेल्फमध्ये ठेवली अन् बॅडमिंटनची रॅकेट व शटल उचललं.

‘‘मामी, हिला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते. सतत बैचेन, सतत उसासे…मीच डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अभ्यास पार बोंबालला आहे. धड जेवत खात नाही…मला तर वाटतंय की कुणाच्या तरी प्रेमात पडलीय.’’ भारतीनं हसत हसत म्हटलं.

‘‘गप्प रहा गं! तोंडाला येईल ते बोलतेय.’’ मोहनाचा चेहरा लाल झाला होता.

‘‘अगं मला नाही, तर निदान मामीला तरी सांग त्या लव्हरचं नाव. मामी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी,’’ हसत हसत भारती बाहेर सटकली.

‘‘इडियट!’’ मोहनानं आपला राग व्यक्त केला. मी संधीचा फायदा घेत तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले अन् विचारलं, ‘‘खरंच कुणी आहे का? मला सांग, मी बोलते तुझ्या आईशी.’’

तिनं पटकन् आपले हात ओढून घेतले. ‘‘कुणीच नाहीए.’’

मी तिचा चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत घेतला. ‘‘अगदी खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? मी तुझी मामी आहे. तुझ्या जिवाभावाची थोर वयाची मैत्रीणही आहे. काय त्रास आहे तुला? झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही?

माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? एखादी चूक घडली आहे का? ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे? काय डाचतंय तुझ्या मनात? एकदा मन मोकळं कर, माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे. कदाचित मी काही मार्ग काढू शकेन, कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का? होस्टेलमध्ये काही घडलंय का? की आणखी काही आहे? तू अगदी निर्धास्त होऊन मला सांग.’’

मी वारंवार तिल विश्वास दाखवूनही मोहना जेव्हा काहीच बोलेना तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते…तुझा प्रॉब्लेम तूच बघ.’’ मी उठून उभी राहिले.

‘‘मामी…’’ अत्यंत करूण स्वरात तिनं हाक मारली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. क्षणभर मी हेलावले, पण कठोरपणे म्हणाले, ‘‘येते मी…’’

ती ताडकन् उठली अन् मला मिठी मारून गदगदून रडायला लागली. ‘‘मामी, माझ्याकडून एक चूक घडलीय…’’

‘‘कसली चूक?’’ मी तिला शांत करत विचारलं.

‘‘एका पुरूषाशी संबंध.’’

विजेचा झटका बसावा तशी मी दचकले. हे काय करून बसलीय पोर. कुणा मुलावर प्रेम वगैरे गोष्ट वेगळी. मोहनाचं रडणं सुरू होतं. मला खरं तर रागच आला पण ही वेळ रागावण्याची नव्हती. तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होतं. मी तिच्यासकट पलंगावर बसले.

यावेळी तिला प्रेमळ शब्दांची, आधाराची गरज होती. माझ्या तोंडून एखादा शब्द उणा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्त्याही करेल. मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले. ‘‘तू तुझा प्रॉब्लेम सांग, प्रत्येक गोष्टीवर सोल्यूशन असतंच!’’ मी तिला समजावलं.

मोहनानं सांगितलं की ती नेहमीच होस्टेलच्या जवळ असलेल्या चंदन स्टेशनरीकडे फोटोकॉपी काढून घ्यायला जायची. नोट्स, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स सतत लागतात. होस्टेलच्या सर्वच मुलीं त्या दुकानाचा खूप आधार आहे. झेरॉक्स, कुरिअर, स्टेशनरी असे तीनचार व्यवसाय त्या एकाच दुकानातून होतात.

दुकानाचा मालक चंदन मागच्याच भागात राहतो. त्याची पत्नी रीताही अधुनमधुन दुकान सांभाळते. मदतीला एक पोरगा अजून असतो.

वरचेवर तिथे गेल्यामुळे मोहनाचीही चंदन व रीतासोबत चांगलीच ओळख होती. काही मुलींशी रीताची विशेष गट्टी होती. ती त्यांना कधी तरी चहा फराळही द्यायची. रीताला सात व पाच वर्षांची दोन मुलं होती. त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी रीताला कुणी शिकवणारी मुलगी हवी होती. तिनं मोहनाची रूममेट भारतीला विचारलं. कॉलेजनंतर दोन तास भारती बॅडमिंटनचं कोचिंग घ्यायची. तिला ट्यूशन घेणं जमणारं नव्हतं. भारतीनं मोहनाला विचारलं. मोहना हुशार होतीच. लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं. पैसेही मिळतील. दोन तास सत्कारणी लागतील म्हणून मोहना कबूल झाली. रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर रीता व चंदनशीही ती अधिक मोकळेपणानं वागू लागली.

चंदन जरी विवाहित अन् दोन मुलांचा बाप होता तरीही थोडा भ्रमर वृत्तीचा होता. दिसायला अत्यंत देखणा, बोलणं मिठ्ठास…मोहनाही अल्लड वयातली सुंदर तरूणी. दोघंही एकमेकांकडे चोरून बघायची.

आपलं वय, आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती, पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट झाली होती.

एक दिवस रीताच्या माहेराहून फोन आला. तिची आई सीरियस होती. हॉस्पिटलमध्ये होती. घाबरलेल्या रीतानं फक्त धाकट्याला बरोबर घेतलं, चार कपडे पिशवीत कोंबले आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली.

त्याचवेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची आंबड उठली. भराभर दुकानं बंद झाली. पोलिसांच्या गाड्या शहरात, शहराबाहेर चहू बाजूंनी अंगणात फिरत होत्या.

चंदननेही दुकान बंद केलं अन् तो घरात आला. रीता घाईनं गेली होती घरकामाचा पसारा पडून होता. मोहना मोठ्या मुलाला शिकवत होती, पण त्याला आज अजिबात अभ्यास करायचा नव्हता.

तेवढ्यात लुंगी बनियान अशा वेशातला चंदन चहाचे कप हातात घेऊन आला.

‘‘मोहना, चहा घे.’’

चहाचा कप त्याच्याकडून घेताना मोहनाच्या बोटांना त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. ती एकदम मोहरली. हृदयाची धडधड वाढली. ‘‘ताई कधी येणार?’’ तिनं विचारलं.

तिथंच खुर्चीवर बसून चहा पित चंदननं म्हटलं, ‘‘लवकरच येईल.’’

‘‘चहा फारच छान झालाय,’’ मोहनानं हसून म्हटलं.

‘‘तुमच्यासारख्या मॅडमना माझ्या हातचा चहा आवडला हे माझं भाग्य!’’

अमृतनं बघितलं बाबा अन् टिचर गप्पा मारताहेत, तो तेवढयात तिथून पळाला.

‘‘अरे, अरे…अमृत…’’

कप ठेवून मोहना त्याला पकडायला धावली अन् तिचा पाय घसरला…पडलीच असती पण चंदननं सावरली तिला.

‘‘मॅडम, माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचेत का?’’ त्यानं तिला पलंगावर बसवत विचारलं.

चंदनच्या बळकट बाहूंनी सावरलं अन् मोहनाच्या हृदयानं ठाव सोडला. तिच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या कंरगळीला लागलं होतं. ती स्वत:ला सावरत करंगळी चोळू लागली.

‘‘दुखतंय का?’’

‘‘हो…’’

‘‘आणा मी नीट करतो.’’ म्हणत चंदननं कंरगळी धरून जोरात ओढली. मोहना किंचाळली…कटकन् आवाज आला अन् करंगळी बरी झाली.

तिच्या पावलावरून हात फिरवत चंदननं म्हटलं, ‘‘मोहना, तुझे पायही किती सुंदर आहेत. कोमल, रेखीव गोरेपान.’’

मोहनाच्या अंगावर रोमांच फुलले, तो काय बोलतोय हे लत्रात येण्याआधी ती बोलून गेली. ‘‘तुमच्या गोऱ्यापान छातीवरचे हे काळेभोर केस किती छान दिसताहेत…’’

चंदननं तिला मिठीत घेतलं, चुंबन घेतलं, दोन तरूण देह एकांतात एकमेकांत विरघळले, कळत होतं तरीही सावरता आलं नाही.

दोघांनाही भान आलं, आपली चूक उमगली, मोहना घाईनं होस्टेलवर आली. प्रचंड घाबरली होती ती.

चंदनही स्वत:ला गुन्हेगार समजत होता. मोहना पश्चात्तापाच्या अग्नित होरपळत होती. माहेराहून परत आलेल्या रीतानं, शिकवायला का येत नाही विचारल्यावर ‘प्रोजेक्टचं काम आलंय, वेळ नाही’ असं तिनं सांगितलं.

मोहनाची झोपच उडाली. आपण काय करून बसलो…आईबाबांनी केवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलंय अन्…आपल्या धाकट्या बहिणी…किती अभिमान आहे त्यांना मोहनाचा. हे सगळं घरी कळलं तर?

‘‘मामी हे सगळं कसं सहन करू?’’ मोहनाचा बांध पुन्हा फुटला.

‘‘शांत हो बेटा, ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहील. तू अजिबात काळजी करू नकोस.’’ मी तिला थोपटून आश्वस्त करत होते, पण शंकेची पाल मनात चुकचुकत होती…

‘‘मोहना, तुझे पिरिएड्स कधी झालेत…’’

‘‘नाही झालेत अजून…’’ तिनं निरागसपणे म्हटलं.

मला थोडं टेन्शन आलं. पण वरकरणी तसं न दाखवता मी तिला म्हटलं, ‘‘हे बघ, तू पटकन् आवर…दोनचार दिवस माझ्याकडेच रहायचंय, त्या हिशेबानं कपडे पिशवीत भरून घे.’’

‘‘पण मामी.’’

‘‘आता वेळ घालवू नकोस, मी वॉर्डनकडून चार दिवस घरी जाण्याची परवानगी घेऊन येते.’’

वॉर्डननं परवानगी दिली. वाटेत मी मोहनाला म्हटलं, ‘‘घरी  गेल्यावर माधवी, पल्लवी तुला बघून खूप खुश होतील…तू त्यांच्याशी नेहमीच्या मोकळेपणानं वाग. मात्र जे काही घडलंय ते अजिबात सांगू नकोस. उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ.’’

घरी पोचताच माझ्या मुलांनी मोहनाचा ताबा घेतला. ‘‘तू अशी हडकुळी का झालीस?’’ या प्रश्नावर तिनं ‘‘अभ्यासाचं टेंशन आलंय,’’ म्हणून सांगितलं.

माझ्या नवऱ्यानंही तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. मी बेमालमपणे सर्व स्थिती सांभाळून घेतली.

नवऱ्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली. मोहनाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते.

रात्री मोहनाच्या आईला फोन केला. ‘‘तिला अभ्यास थोडा जड जातोय, पण ती सर्व करेल, मी तिला चार दिवस घरी घेऊन आलेय,’’ असं सांगून तिलाही आश्वस्त केलं.

मोहना जरी मुलांमध्ये रमली होती तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती. डोळ्यातले उदास भाव तिची मन:स्थिती सांगत होते.

रात्री ती पल्लवी माधवीबरोबर झोपली अन् अगदी गाढ झोपली. माझी झोप मात्र रूसली होती. मोहनाला चंदनचं आकर्षण वाटलं याच चूक काहीच नव्हतं. पण तरूण वयातही स्वत:वर ताबा ठेवता आला पाहिजे. आईमुलगी, बाप लेक यांच्यात मोकळेपणाने चर्चा, संवाद व्हायला हवा. आज मोहना आहे, उद्या माझ्या मुलीही अशाच नादावल्या तर? आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे.

पल्लवी माधवीशी मीसुद्धा जवळीक साधायला हवी. स्त्री पुरूष संबंध, निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो, एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरूष जबाबदारीतून सही सलामत सुटतो. अडकते ती स्त्री…मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याइतकी आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी.

हसती खेळती मुलगी. एखाद्या घटनेनं अशी हादरून जाते. कोमेजते…मोहनाला प्रेमानं विश्वासानं जवळ घेतलं म्हणूनच ती मोकळेपणानं सांगू शकली, नाहीतर कदाचित तिनं ताण असह्य होऊन आत्महत्त्याही केली असती.

सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं. मुलं जायला तयार नव्हती. पण शेवटी एकदाची गेली.

आमचा नाश्ता अंघोळी आटोपून मी मोहनाला घेऊन बाहेर पडले. ‘‘आपण कुठं जातोय मामी?’’ तिनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे. आपण तिच्याकडे जातोय.’’

डॉक्टरनं तपासून ‘काळजीचं कारण नाही’ म्हणून सांगितलं. ‘‘या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळे मासिक पाळी थोडी मागे पुढे होते. मी गोळ्या देतेय…सुरू केल्यावर पाळी सुरू होईल. पण ही अशक्त आहे, चांगलं खायला प्यायला घाला. इंजीनियरिंगच्या अभ्यासात तब्येत धडधाकट लागते,’’ डॉक्टरांनी हसून म्हटलं.

मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्ही मोहनासाठी एक सुंदरशी पर्स आणि सॅन्डल्स घेतल्या. तिच्या आवडीचं चॉकलेट आइस्क्रिम खायला घातलं. त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलातच जेवून घेतलं.

मोहनाच्या मनातली सर्व भीती, सर्व काळजी मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती. आता तीही आनंदात दिसत होती.

दिवसभर मजा करून आम्ही घरी परतलो. एकाएकी तिनं मला मिठी मारली…‘‘मामी, आज मला इतकं छान अन् हलकं हलकं वाटतंय…’’

‘‘तू जर काल मला रागावली असतीस, दोष दिला असतास तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते. मनातल्या मनांत कुढत बसले असते.

कदाचित मी माझं आयुष्य संपवून टाकलं असतं.’’

‘‘पण तू इतकं मला जपलंस, इतकी प्रेमानं वागलीस, त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं…’’

‘‘पण अजूनही मला स्वत:चाच राग येतोय. मनातून अपराधीही वाटतंय.’’ बोलता बोलता तिचे डोळे भरून आले.

मी तिला पलंगावर बसवली. तिला पाणी प्यायला दिलं. ‘‘बाळा, चूक तर खरंच मोठी घडली होती, पण तुला चूक कळली, पश्चात्ताप झालाय, यातच सगळं भरून पावलं.’’

‘‘आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही. वेड्या वयातली ती चूक होती. जन्मभर तिची बोच, तो सल घेऊन जगायचं नाही. पुढे केवढं मोठं आयुष्य पडलंय…ते जबाबदारीनं आणि आनंदात जगायचं.’’

‘‘तुझं काही चंदनवर प्रेम नव्हतं. जे घडलं तो एक अपघात होता. संबंध मनातून प्रेम उमलतं, तेव्हा निर्माण होतात. प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी यांच्यात आधी मनातून प्रेम निर्माण होतं, तेव्हा ते शारीरिक संबंधातही दिसून येतं.’’

‘‘आता चंदनला विसर. तो ही आता तुझ्याकडे बघणार नाही. त्याची चूक त्यालाही कळलीच असणार.’’

‘‘लवकरात लवकर यातून बाहेर पड. तब्येत चांगली कर. झपाटून अभ्यासाला लाग. मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजीनियर म्हणून स्वत:ला सिद्ध करशील.’’ मी हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला अन् तिच्या कपाळावर ओठ टेकले.

तिनं पुन्हा मिठी मारली. ‘‘मामी, पुन्हा एकदा थँक्स! किती धन्यवाद देऊ तुला.’’

थोड्याच वेळात तिनं आईला फोन केला.

‘‘आई, आता मी एकदम छान आहे. अगं, मामी ना, डॉक्टर आहे. बघ, कशी ठणठणीत बरी केलीय मला.’’ मोहनाच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं.

पक्क्या मैत्रिणी

कथा * विभा साने

विनिता ज्या घरात भाड्यानं राहत होती, तिथंच एक नवीन भाडेकरू म्हणून पल्लवीही राहायला आली. या आधुनिकेला बघून ही बया आपला संसार मोडणार असंच विनिताला वाटलं…पण घडलं उलटंच. त्या दोघी पक्क्या मैत्रिणी बनल्या…

प्रमोशनवर बदली होऊन निशांत पुण्यात आला. महत्त्वाकांक्षी निशांतला तिथल्या पॉश एरियात कंपनीने सुंदर घर घेऊन दिलं होतं. पंढरपुरातून बस्तान हलवून त्याची बायको विनिता व मुलगा विहान प्रथमच अशा मोठ्या शहरात आली होती. दुमजली बंगल्याच्या वरच्या भागात हे कुटुंब राहत होतं अन् खालच्या तेवढ्याच मोठ्या घरात घरमालक व त्याची पत्नी राहत होती.

घरालगतच्या गॅरेजच्या वरही एक वन बेडरूम किचन हॉल असा सुंदरसा फ्लॅट होता. विनिताचं घर अन् तो रिकामा फ्लॅट यासाठी सुंदर कठडे असलेला संगमखरी जिना होता.

इथं येताच एका चांगल्या शाळेत विहानचं अॅडमिशन केलं. शाळा तशी फार लांब नव्हती. पण विनिताला स्कूटी चालवता येत नसल्यानं निशांतलाच मुलाला शाळेतून आणणं, पोहोचवणं करावं लागे. काही दिवस सुरूवातीला हे जमलं, पण ऑफिसच्या कामाची जबाबदारी जशी वाढत गेली तसा निशांतला ऑफिसमध्ये अधिकाधिक वेळ घालवावा लागायचा. तो पार दमत होता.

एक दिवस त्यानं विनिताला म्हटलं, ‘‘तू स्कूटी चालवायला शिकून घे ना, निदान विहानला शाळेत सोडणं, शाळेतून परत आणणं आणि इतर बारीक सारीक कामं तू करू शकशील.’’

‘‘छे बाई, मी कशाला शिकू स्कूटी? मला गरजच नाहीए बाहेरची कामं करायची. ही कामं पुरूषांनीच करायची. आमच्या घरी तशीच पद्धत आहे…मी घरातच बरी!!’’ विनितानं म्हटलं.

नाइलाजानं विहानसाठी ऑटोरिक्षाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर पुन्हा हा विषय निघाला नाही. विनिता हौशी होती. उत्तम गृहिणी होती. बोलकी अन् मनमिळावू होती. पण घराच्या बाहेरचं क्षेत्र तिला अपरिचित होतं. दोन महिन्यांत तिनं घर मनासारखं लावून घेतलं. घरमालकिणीच्या मदतीनं मोलकरीणही चांगली मिळाली.

घर मांडून झाल्यावर विनितानं शेजारपाजारच्या घरात राहणाऱ्या लोकांशी ओळख करून घेण्याची मोहीम उघडली. पण लहानशा गावातून आलेल्या विनिताला मोठ्या शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांना फार संबंध वाढवायला आवडत नाही, त्यांचे संबंध फक्त हाय, हॅलो अन् तोंडभरून हसणं एवढ्यापुरते मर्यादित असतात हे कळायला थोडा वेळ लागला. एक दोन बायकांशी ओळख झाली, पण तीसुद्धा अगदी औपचारिक…त्यामुळे घरकाम आटोपलं की ती टीव्ही लावून बसायची. अधूनमधून खाली मालकीणबाईंकडे जायची.

घरमालक व मालकीण वयस्कर होते. त्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली असल्यानं ती दोघं सहा महिने मुलांकडे अन् सहा महिने भारतात असायची. विनिता सुगरण होती. एखादा छानसा पदार्थ ती अधुनमधून त्या म्हाताऱ्यांनाही देऊन यायची. तिच्या प्रेमळ वागण्यानं त्यांनाही खूप समाधान वाटायचं. लहानगा विहानही त्यांना आजीआजोबा म्हणायचा. शाळेच्या गंमती सांगायचा. विनिता निशांतही त्यांना काका काकूच म्हणत होते. बहुधा रविवारच्या सुट्टीला ते चौघं कधी वर तर कधी खालच्या घरात चहा एकत्रच घ्यायची.

असेच एका रविवारी चौघे खालच्या लॉनवर चहा घेत असताना काकांनी विचारलं, ‘‘एवढ्यात सुट्टी घेऊन गावी किंवा फिरायला वगैरे जायचा विचार आहे का तुमचा?’’

निशांतनं सांगितलं, ‘‘नाही काका, सध्या सहा आठ महिने तर मी कुठं जायचा विचारही करू शकत नाहीए. ऑफिसच्या कामाची जबाबदारी इतकी वाढलीय ना?’’

विनितानं विचारलं, ‘‘काका, तुम्ही हा प्रश्न का बरं विचारलात?’’

‘‘कारण आम्हाला सहा महिने मुलांकडे जायचंय, तेव्हा इथली, घराची काळजी राहणार नाही आम्हाला…’’ काकूंनी म्हटलं.

विनिताला मात्र जरा दचकायला झालं. घरी आल्यावरही तिला तिच काळजी लागून राहिली. खालचे लोक गेले तर ती अगदीच एकटी पडेल…रोज काही ते भेटत नाहीत पण त्यांचे आवाज येतात…चाहूल असते.

विनिताला गंभीर मूडमध्ये बघून निशांतने तिला विचारलंच, ‘‘ का गं? काकाकाकू जाणार म्हणून तू नर्व्हस का झाली आहेस?’’

विनितानं त्याला आपला प्राब्लेम सांगितल्यावर त्यालाही पटलं की सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत तो घराबाहेर असतो. एवढ्या मोठ्या घरात विनिता अगदीच एकटी पडेल.

काही वेळानं विनिता म्हणाली, ‘‘निशांत, आपण काकाकाकूंना गॅरेजच्या वरच्या घरात भाडेकरू ठेवायला सांगूयात का? त्यांना भाडंही मिळेल अन् आपल्याला सोबतही होईल.’’

निशांतलाही ही कल्पना आवडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्यानं काकाकाकूंना ही आयडिया सांगितली. त्यांनाही ती आवडली अन् त्यांनी भाडेकरू शोधायची कामगिरीही निशांतच्याच अंगावर टाकली.

पाच सहा दिवसांनंतर विनिता अन् काकाकाकू गप्पा मारत असताना सायंकाळी एक कार फाटकाशी थांबली. गाडीतून स्मार्ट जीन्सटॉप, हायहिल सॅन्डल, खांद्यावर मोठीशी बॅग अशा वेशातली एक तरूणी उतरली. तिनं विचारलं, ‘‘उमेश साहेबांचं घर हेच का?’’

‘‘होय, मीच उमेश, बोला, काय काम आहे?’’

‘‘गुड इव्हनिंग सर, मी पल्लवी,’’ असं म्हणून तिनं काकांशी हस्तांदोलन केलं. ‘‘आज निशांतकडून कळलं तुमच्याकडे एक?फ्लॅट रिकामा आहे…भाड्यानं देण्यासाठी…मी त्याचसाठी आले आहे.’’

‘‘अच्छा, तर ती फॅशनेबल मुलगी भाडेकरू म्हणून येतेय.’’ मनांतल्या मनांत म्हणत विनिता उठून आपल्या घरी निघाली. तेवढ्यात काकांनी काकूंशी अन् विनिताशी पल्लवीची ओळख करून दिली. पल्ल्वीनं दोघींना हॅलो म्हटलं अन् काकांशी बोलत ती वरचा फ्लॅट बघायला निघून गेली. विनिताला तिचं वागणं खूपच खटकलं. वयानं इतकी लहान असूनही तिनं नुसतं ‘हॅलो’ म्हटलं. वाकून नमस्कार नाही, पण निदान हात जोडून नमस्कार करायला काय हरकत होती?

वरून त्यांचं बोलणं ऐकायला येत होतं. पल्ल्वी सांगत होती, ती एका मल्टीनॅशनल कंपनीत एझिक्युटिव्ह पोस्टवर आहे. ‘‘असं बघा, माझे कामाचे तास फिक्स नसतात. शिफ्ट ड्यूटी असते. येण्याजाण्याच्या वेळाही अनिश्चित असतात. कधी रात्री यायला उशीर होतो तर कधी पहाटेच उठून मी फ्लाइट घेते. टूरही बरेचदा असतात. तुम्हाला हे सगळं चालेल ना?’’

‘‘काहीच हरकत नाहीए,’’ काकांनी परवानगी दिली.

‘‘मी आधी यासाठीच सगळं सांगतेय, कारण सध्या मी जिथं राहतेय त्यांना या सगळ्या गोष्टी चालत नाहीएत. मी रात्री उशीरा घरी येते म्हणजे माझं चारित्र्य वाईट असणार असं त्यांना वाटतंय…किती संकुचित विचार…छे!’’

पुढे काय झालं ते विनिताला कळलं नाही. ती आपल्या घरी निघून गेली. विनिताच्या मते पल्लवी खूपच आधुनिक आणि बिनधास्त होती.

त्या सायंकाळी निशांतला घरी यायला खूपच उशीर झाला. आल्या आल्या तो जेवला अन् लगेच झोपी गेला. त्यामुळे पल्लवीबद्दल विचारायला तिला जमलंच नाही. पुढल्या शनिवारी विनिता शॉपिंग वगैरे करून उशीरा घरी परतली. तेव्हा वरच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये दिवा लागलेला होता. बहुधा नवीन भाडेकरू आलेले दिसताहेत असा विचार करून ती वर गेली तर फ्लॅटला कुलूप होतं.

रात्री बारा वाजता घंटीच्या आवाजानं विनिताची झोप उघडली. तिनं निशांतला उठवून खाली बघून यायला सांगितलं…कदाचित काका काकूंना काही प्रॉब्लेम झाला असेल.

थोड्याच वेळात निशांत परत आला तर विनितानं विचारलं, ‘‘कोण होतं? काय झालं?’’

‘‘काकांची नवी भाडेकरू पल्लवी…’’

‘‘निशांत, तुला कुणी घरगुती, समजदार भाडेकरू नाही का मिळाला? आता ही अशीच वेळी अवेळी घंटी वाजवून त्रास देणार…काककाकू तर उद्या परवाच जाताहेत. त्यांच्या लेकांकडे…रहायचं आपल्याला आहे.’’ विनितानं म्हटलं.

निशांतला प्रचंड झोप येत होती. तो त्यावेळी वाद घालण्याच्या मन:स्थितीत नव्हता. फक्त इतकंच बोलला, ‘‘ती उच्चशिक्षित, नोकरी करणारी मुलगी आहे. केव्हा येते, केव्हा जाते याच्याशी आपल्याला काय करायचंय? आज पहिलाच दिवस आहे. जिन्याच्या दाराची किल्ली बरोबर न्यायला विसरली होती…’’ अन् तो पुन्हा ढाराढूर झोपी गेला.

विनिताला निशांतचं हे बोलणं अजिबात रूचलं नाही. पण तिला पल्लवीचा मात्र खूपच राग आला. विनिता तशी शांत, समजूतदार होती. निशांतला ऑफिसातून यायला उशीर झाला तरी ती कधी चिडचिड करत नसे उलट हसतमुखानं गरमागरम चहा करून देऊन त्याचा श्रमपरिहार करायची.

रविवारी सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. चहा करताना विनिताला पल्लवीची आठवण आली. तिनं निशांतला न विचारताच तिचाही चहा केला अन् वर देऊन आली. दारावर टकटक केली तेव्हा झोपाळू डोळ्यांनी पल्लवीनं दार अर्धवट उघडलं, चहा कप घेतला अन् थँक्स म्हणून दरवाजा लावून घेतला.

विनिता गोंधळली. दोन मिनिटं बोलावं एवढंही कळत नाही या बाईला. कदाचित तिच्या झोपेत व्यत्यय आला असेल. संपूर्ण दिवस घराचं दार बंदच होतं. सायंकाळी पल्लवी व्यवस्थित नटूनथटून खाली आली. चहाचा कप परत केला. पण विनिताशी बोलण्याऐवजी सगळा वेळ निशांतशीच गप्पा मारत होती. विहानशीही थोडी फार बोलली.

विनितानं विचारलं, ‘‘चहा करू का?’’ तर म्हणाली, ‘‘नको थँक्स!’’ मी चहा घेत नाही. विनिताच्या मनात आलं, ही बया नक्की दारू पित असणार. मग विनितानं म्हटलं, ‘‘स्वयंपाक घर लावून झालं का? स्वयंपाकासाठी काही मदत हवी आहे का?’’ पल्लवी फाडकन् उत्तरली, ‘‘छे छे स्वयंपाकाची भानगड मी नाही ठेवली. कोण करत बसेल एवढा?खटाटोप? उगाचच वेळ घालवायचा…मी बाहेरून मागवते किंवा बाहेरच जेवते.’’

थोड्याच वेळात ती कारमध्ये बसून निघून गेली. जाण्यापूर्वी निशांतला म्हणाली, ‘‘आज मी माझी किल्ली बरोबर ठेवली आहे बरं का निशांत…काळजी नको करूस.’’ यावर निशांत जोरात हसला अन् ती ही हसली.

रात्री झोपताना विनितानं म्हटलं, ‘‘शी गं बाई! कशी आहे ही पल्लवी…मुलींची म्हणून काही लक्षणं नाहीएत तिच्यात. सगळीच कामं पुरूषांसारखी करते. लग्न करून संसार कसा करणार ही? अशा मुलींचं सासरी पटतही नाही. नवरा त्रस्त असतो, नाहीतर डिव्होर्स तरी होतो.’’

हसून निशांतनं म्हटलं, ‘‘तिला स्वयंपाक करायला आवडत नाही, यात तिला नाव ठेवण्यासारखं काय आहे? ती किती धीट, स्मार्ट अन् हुशार आहे, हे का बघत नाही? ऑफिसच्या कामात परफेक्ट आहे. कुणावर अवलंबून नाही. हिचा नवरा दु:खी राहिल हे आपण कोण ठरवणार? ज्यांच्या बायका आजच्या काळातही घरातच राहतात, बाहेरचं कोणतंही काम करत नाही, वाहन चालवत नाहीत, प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असतात असे नवरेही दु:खी असू शकतात की! खरं तर बाई काय किंवा पुरूष काय बदलत्या काळानुरूप सर्वांनीच बदलायला हवं, नवे बदल स्वीकारले पाहिजेत.’’

विनिताला निशांतच्या बोलण्यातला टोमणा बरोबर समजला. ती स्वत: प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असते. वाहन चालवता येत नाही…पल्ल्वीचं त्यानं इतकं कौतुक करणंही तिला खूप खटकलं. तिच्या मनानं तिला सावध केलं, ‘‘बघ हं विनिता, अशाच मुली दुसऱ्यांचे संसार उधळतात…जपून रहा. सध्या निशांत पल्लवीचं फारच कौतुक करतोय…’’

काकाकाकू अमेरिकेला जाऊन बरेच दिवस झाले होते. पल्लवी आपल्या कामांत अन् विनिता आपल्या आयुष्यात एकदम रमलेल्या होत्या. स्वत:च्याही नकळत विनिता पल्लवीवर, तिच्या येण्याजाण्यावर, कोण सोडायला येतं, कोण घ्यायला येतं, तिनं काय कपडे घातलेत वगैरे बारीक लक्ष ठेवून होती. हे पल्लवीलाही कळत होतं, पण त्याकडे ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती. कारण तिच्यामते विनितासारख्या हाऊस वाइफ्स्ना स्वयंपाक करणं अन् लोकांवर लक्ष ठेवणं या पलीकडे उद्योगच नसतो.

अशा तऱ्हेनं हाय, हॅलो होऊनही दोघींच्यात एक अदृश्य भिंत उभी होती. खरं म्हणजे दोघी स्त्रिया, एकाच वयाच्या, दोघीही शिक्षित, तरीही दोघींच्या विचारसरणीत, संस्कारात खूपच म्हणजे टोकाचा फरक होता. एकीसाठी नवरा, संसार, मुलगा हेच सगळं जग होतं तर दुसरीसाठी घर ही फक्त झोपण्यासाठी अन् राहण्याची सोय एवढंच महत्त्व होतं.

एकदा विनिताच्या लक्षात आलं की चोवीस तासांपेक्षाही अधिक वेळ लोटला होता, पण पल्लवी कुठं जाता येताना दिसली नाही. पण मग विचार केला कदाचित टूरवर गेली असेल, जावं लागतं तिला किंवा नसेल बाहेर जावसं वाटलं. तर स्मार्ट मॅडम घरातच विश्रांती घेत असतील. पण तरीही राहवेना तेव्हा विहानला म्हणाली, ‘‘जा, वर जाऊन पल्लवी आंटीबरोबर खेळून ये थोडावेळ.’’ विहान वर गेला अन् लगेचच धावत खाली आला. ‘‘मम्मा, अगं आंटी झोपून आहे, तिला ताप आलाय.’’

हे ऐकताच हातातलं काम सोडून विनिता वर धावली. दारावरची घंटी दाबली. आतून क्षीण आवाज आला, ‘‘दार उघडंय.’’

विनिता दार ढकलून आत गेली. पल्लवी पलंगावर पांघरूण घेऊन अर्धवट ग्लानीत पडून होती. कपाळावर हात ठेवला तर चटकाच बसला. भरपूर ताप होता. विनितानं घरात नजर फिरवली. प्रचंड पसारा…एकही वस्तू जागेवर नव्हती. ती पटकन् खाली आली. थर्मामीटर, पाण्याचा बाहुल, दोन स्वच्छ रूमाल, फ्रीजमधली पाण्याची बाटली अन् यूडी केलनची बाटली घेऊन पुन्हा वर धावली. ताप बघितला, एकशे तीन…तिनं बाऊलमध्ये गार पाणी ओतलं त्यात यूडी केलनचे थेंब घातले अन् कपाळावर गार पाण्याच्या पट्टया ठेवायला सुरूवात केली. थोड्याच वेळात ताप कमी द्ब्राला. पल्लवीनं डोळे उघडले. तिला थोपटत विनितानं विचारलं, ‘‘औषध आहे का? गोळी वगैरे घेतली का?’’

पल्लवीनं खुणेनं शेल्फकडे खूण केली. तिथं गोळ्या होत्या. विनितानं खाली येऊन कपात दुध व दोनतीन बिस्किटं घेतली. पल्लवीला दोन बिस्किटं खायला घालून दूध घ्यायला लावलं अन् दोन गोळ्या दिल्या. दमलेली पल्लवी पुन्हा अंथरूणात आडवी झाली अन् तिनं डोळे मिटून घेतले. विनिता बराच वेळ हलक्या हातानं तिचं डोकं चेपत बसली होती. तिला गाढ झोप लागली तेव्हा विनिता आपल्या घरी आली. दोन तासांनी विनिता गरमागरम सूप अन् ताजे भाजलेले टोस्ट घेऊन वर गेली. अत्यंत प्रेमानं तिनं सूप अन् टोस्ट पल्लवीला घ्यायला लावले. पुढले चार दिवस विनितानं पल्लवीसाठी खूपच काही केलं. एखाद्या कुशल नर्सप्रमाणे तिची सेवा केली.

तिच्या त्या प्रेमळ, निस्वार्थ सेवेनं पल्लवी मनातल्या मनात शरमिंधा झाली होती. विनितासारख्या हाऊसवाईफ फक्त हेरगिरी करतात हे स्वत:चं विधान तिलाच खटकत होतं. योग्यवेळी विनितानं केलेल्य मदतीमुळेच पल्लवीचं आजारपण थोडक्यात आटोपलं होतं. ती मनातून खूपच कृतज्ञ होती.

यानंतर पल्लवीची वागणूक बदलली. आता ती विनिताशी मोकळेपणानं बोलायची. विनिताचं बघून तिनं आता आपलं घरही स्वच्छ अन् व्यवस्थित ठेवायला सुरूवात केली होती.

हल्ली तर निशांतचं काम अधिकच वाढलं होतं. एक दिवस तो ऑफिसातून घरी परतला तो अत्यंत आनंदात शीळ वाजवतच. विनितानं चहा केला. चहा घेता घेता तो सांगू लागला की त्याच्या कामावर कंपनी खुश आहे. त्याला एका ट्रेनिंगसाठी फ्रांसला पाठवते आहे कंपनी. जर ते ट्रेनिंग त्यानं उत्तमरित्या पूर्ण केलं तर दोन वर्षं कुटुंबासह त्याला फ्रान्समध्ये जॉब करायची संधी मिळेल.

परदेश गमनाची संधी हे ऐकून विनिताही आनंदली. पण ट्रेनिंगसाठी निशांतला एकट्यालाच जायचंय हे ऐकून ती एकदम दचकली. निशांतशिवाय ती एकटी कशी राहू शकेल? तिच्या सासरी किंवा माहेरी तिच्याजवळ येऊन राहण्यासारखं कुणीच नव्हतं. विनितानं स्वत:ला सावरत आधी त्याचं अभिनंदन केलं. मग हळूच म्हणाली, ‘‘जर तुम्हाला फ्रान्सला जायचंय, तर मला अन् विहानलाही घेऊन जा. मी तुम्हाला एकट्याला तर जाऊच देणार नाही. तुम्ही गेल्यावर तीन महिने मी विहानसोबत एकटी कशी राहणार याचा थोडा तरी विचार केलाय का तुम्ही?’’

भविष्यातली सोनेरी स्वप्नं रंगवत असलेल्या निशांतला विनिताचं हे बोलणं अजिबातच रूचलं नाही. तो एकदम भडकला. ‘‘तो तुझा प्रॉब्लेम आहे. माझा नाही. कधीपासून सांगतो, काळानुसार स्वत:ला बदल. वाहन चालवायला शिक, कॉम्प्युटर शिकून घे. घराबाहेरची कामं अंगावर घे. पण तू तर सगळी कामं पुरूषांची अन् बायकांची अशी वाटणीच करून टाकली आहेस. म्हणे आमच्याकडे अशीच पद्धत आहे…’’

‘‘इतके कष्ट करून आता ही सोन्यासारखी संधी हाती आली आहे तर तुझ्यासाठी ती संधी सोडून देऊ? नाही, अजिबात नाही. तुला एकटीला राहता येत नसेल तर विहानला घेऊन तू तुझ्या आईकडे जाऊन रहा किंवा माझ्या आईकडे जाऊन राहा. मोठ्या शहरात राहून तू, तुझे विचार बदलतील असं वाटलं होतं, पण तू थेट गावंढळच राहून गेलीस. कुठं नोकरीत उच्चपद मिळवताना आधार देणाऱ्या बायका असतात अन् कुठं अशा पाय मागे ओढणाऱ्या बायका…’’

चहाचा कप खाली ठेवून तो उठला अन् टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये शिरला. विनिताच्या डोळ्यात पाणीच आलं. तिचा इतका सुंदर मांडलेला संसार मोडणार की काय? पण निशांत तरी काय करणार? मोठी कंपनी, मोठा हुद्दा, परदेशवारी, भरपूर पगार ही सगळी त्याची स्वप्नं होती अन् तो विनितालाही सतत नवं काही शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होता. आपणच कमी पडलो…आपली चूक झाली हे विनिताला मान्य होतं.

आजच्या काळात गृहिणीलाही घराबाहेरचं जग माहीत असायला हवं. समर्थपणे घराबाहेरही वावरता आलं पाहिजे. इतक्या वर्षात प्रथमच विनिताला शिकलेली असूनही खूप खूप असहाय वाटलं. कारण ती फक्त घर एके घर एवढंच करत राहिली होती. इतकी मोठी संधी, असा आनंदाचा प्रसंग असूनही पतीपत्नीमध्ये विनाकारण ताण उत्पन्न झाला होता.

दुसऱ्या दिवशी चहा प्यायच्यावेळी पल्लवीही तिथं पोहोचली. आल्या आल्या तिनं अत्यंत उत्साहानं, आनंदानं निशांतचं अभिनंदन केलं आणि पार्टी पाहिजे म्हणून सांगितलं.

निशांतचा राग अजून शांत झाला नव्हता. तो थोडा कडवटपणे म्हणाला, ‘‘कशाची पार्टी अन् काय? मी या आयुष्यात काहीही करू शकणार नाही पल्लवी.’’

पल्लवीला काहीच समजेना…विनिताला वाटलं, या बिनधास्त पोरीला हे सगळं कळायला नको, ती तर माझी खूपच चेष्टा करेल…मला बावळट म्हणून खूप हसेल. पण निशांतनं रागारागात सगळी हकीगत, त्याचा प्रॉब्लेम, त्याची समस्या पल्लवीला सांगून टाकली.

विनिताला तर ही धरती दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. पण पल्लवीनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं अन् मग हसायला लागली. हसता हसताच म्हणाली, ‘‘डोंट वरी निशांत, अहो ही काय समस्या आहे का? हा प्राब्लेम काही दिवसात सुटतोय बघा. तुम्ही तुमचं पॅकिंग अन् माझ्या पार्टीची तयारी सुरू करा.’’

चकित झालेला निशांत तिच्याकडे बघतच राहिला. विनिताकडे वळून पल्लवीनं म्हटलं, ‘‘विनिता नर्व्हस होऊ नकोस किंवा घाबरूनही जाऊ नकोस. आपल्याला अमुक एक करायचंच आहे, शिकायचंच आहे, हे एकदा ठरवलं ना की मग पुढ सगळं अगदी सोपं होतं. मी आजपासूनच तुला कॉम्प्युटरचे, इंटरनेटचे धडे देते. निशांत जाण्याआधी बाहेरचीही काही कामं तू करायला लागशील. ती जबाबदारी माझी, निशांत परत येण्यापूर्वीच तू कार चालवायला, स्कूटर चालवायलाही शिकणार आहेस…मी आलेच.’’ ती पटकन् वर निघून गेली.

विनिताही चकित झाली होती. ही बिनधास्त बाई, जिला ती दुसऱ्यांचे संसार मोडणारी समंजत होती, ती तर चक्क विनिताचा मोडणारा संसार साधायला मदत करतेय. इतकी जबाबदार अन् संवेदनशील आहे पल्लवी असा विचार तर विनितानं कधीच केला नव्हता.

पल्लवी येताना लॅपटॉप घेऊन आली होती. तो ऑन करत तिनं म्हटलं, ‘‘विनिता, मी तुझा गुरू आहे. हे सगळं मी तुला शिकवेन, पण तुलाही माझा गुरू व्हावं लागेल.’’

‘‘म्हणजे असं बघ, तुझा हा सुंदर संसार बघून मलाही आता लग्न करावं, घर मांडावं असं वाटायला लागलंय. पण अगं, घरातलं कोणंतही काम मला येत नाही. एखाद्या हाऊसवाईफसाठी जेवढं बाहेरचं जग जाणून घेणं गरजेचं आहे, तेवढंच नोकरी करणाऱ्या स्त्रीलाही घरातली कामं येणं गरजेचं आहे. आता आपण एकमेकींना जे येत नाही ते शिकवू म्हणजे झालोच ना गुरूशिष्य?’’ पल्लवीनं हसत म्हटलं.

‘‘खरंय,’’ अत्यंत कृतज्ञतेनं पल्लवीचे हात आपल्या हातात घेत विनितानं म्हटलं, ‘‘पण माझी एक अट आहे, आपलं हे नातं, स्टूडंट-टीचरचं, गुरूशिष्याचं नको…आपण पक्क्या मैत्रिणी होऊन हे काम करूयात.’’

‘‘एकदम मान्य!’’ पल्लवीनं म्हटलं. ‘‘अन् मिस्टर निशांत, तुम्हालाही किचनमध्ये काही धडे गिरवावे लागतील. फ्रान्समध्ये चहाचा कप घेऊन विनिता समोर येणार नाही. तेव्हा थोडी फार पोटपूजा करता येण्याइतपत तुमचीही तयारी असू दे…काय?’’

यावर तिघंही मनापासून हसले. वातावरण एकदम हलकंफुलकं अन् आनंदी झालं होतं.

अल्पना

* अनुराधा चितके

जवळ जवळ वीस वर्षांनंतर मी एक दिवस अल्पनाला भेटलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी अमेरिकेला परत जाताना अल्पनाही तिच्या मुलीसह माझ्याबरोबर असेल.

त्या दिवशी ड्रायक्लिन होऊन आलेल्या माझ्या कपड्यांमध्ये माझ्या लहेंग्याऐवजी एक लेडीज डे्स आला होता,  तो परत करून माझे कपडे घेण्यासाठी मी ड्रायक्लिंग करणाऱ्या माणसाच्या दुकानावर गेलो तेव्हा तिथे एक तरुणी त्याच्याशी जोरजोरात भांडत होती. तिचा आवेश, तिची भाषा बघून मला खरंच वाटेना की ती अल्पना असेल…पण ती अल्पनाच होती.

काही वेळ मी त्या दोघांमधलं भांडण थांबेल म्हणून वाट बघितली, शेवटी दुकानदाराला जरा मोठ्या आवाजातच म्हटलं, ‘‘अहो भाऊ, माझ्या कपड्यांच्या ऐवजी हा एक लेडीज डे्स चुकून आलाय तेवढा परत घ्या अन् माझा लहेंगा झब्बा मला परत करा,’’  मी डे्स दुकानातल्या फळीवर ठेवला.

‘‘अरेच्चा? हाच तर माझा डे्स…तुमच्याकडे कसा आला? चार पाच दिवस यांच्याकडे शोधतेय मी…इतके दिवस काय झोपला होता का तुम्ही?’’ तिचं अजूनही माझ्याकडे लक्ष नव्हतंच. तिने झडप घालून तो डे्स उचलला.

मीच म्हटलं, ‘‘अगं अप्पू? तू, तुम्ही अल्पना आहात ना? इथे कशी तू?’’

तिने माझ्याकडे बघितलं अन् मग हसून म्हणाली, ‘‘होय, मीच अल्पना. तुझा बेस्ट फ्रेण्ड. पण अरुण तू इथं कसा? तू तर अमेरिकेत सेटल झाला होतास ना?’’

नंतरच्या वीस मिनिटांत तिने गेल्या वीस वर्षांमधल्या सगळ्या घडामोडींची माहिती मला दिली. मी अमेरिकेला गेल्यानंतर लगेचच तिचं लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने श्रीमंत घरातली लाडकी लेक असूनही तिला अन् तिच्या आईवडिलांना या स्थळाच्या बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं होतं. नवरा कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत होता. घरची परिस्थिती अगदीच सुमार होती. त्यामुळे अल्पूला तिची गव्हर्नमेंटची नोकरी अजूनही करावी लागत होती. तिला एकच मुलगी आहे अन् ती इंजिनिअरिंगच्या फायनलला आहे. काय न् काय अल्पना अखंड वटवटत होती अन् मी फक्त तिच्याकडे बघत होतो.

अंगाने थोडी भरली होती तरी अजूनही ती तेवढीच देखणी दिसत होती. रंग गोरापान, नितळ कांती, मोठे टपोरे डोळे, रेखीव नाक, खांद्यापर्यंतच्या बॉबकटमध्ये अधिकच स्मार्ट वाटत होती.

मी काही बोलायचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने विचारलं, ‘‘तू आलास कधी अमेरिकेहून? मृणाल कुठाय? कशी आहे? मुलंबाळं किती? परत जातो आहेस अमेरिकेला की आता इथेच राहाणार?’’

‘‘अगं, आता इथेच सगळं रस्त्यात उभं राहून बोलणार आहेस का? चल, माझ्या घरी जाऊयात. इथे जवळच राहातो आहे मी. चल…’’

‘‘नको, नको, आज मी घाईत आहे, पुन्हा कधी तरी येते मी तुझ्याकडे. तुझं कार्ड दे मला.’’

‘‘मघा दुकानदाराशी भांडताना घाई नव्हती तुला…अन् आता घाईत आहेस?’’

‘‘पण भांडणाचा फायदा झाला ना? एक तर तू भेटलास अन् दुसरं म्हणजे लेकीचा हरवलेला डे्सही मिळाला.’’

‘‘पण तू भाडंणात तरबेज झाली आहेस हं! नवऱ्याशीही अशीच भांडतेस का?’’

‘‘मग काय तर? अरे बायकोला नवरा केवळ भांडायसाठीच मिळालेला असतो. मृणालने शिकवलं नाही तुला?’’

आम्ही बोलत बोलत माझ्या गाडीजवळ आलो होतो. माझी नवी मर्सिडीज बघून अल्पनाचे डोळे विस्फारले, ‘‘वाऊ…मर्सिडीज? ऐट आहे बाबा तुझा.’’ एखाद्या लहान मुलीसारखे निरागसपणे अल्पनाने गाडीकडे बघत म्हटलं.

‘‘चल, तुला तुझ्या घरी सोडतो, त्या निमित्ताने तुझं घरही बघून होईल..बस्स.’’

‘‘वाऊ? दॅट्स ग्रेट! पण दहा मिनिटं थांब. त्या समोरच्या गल्लीत एक डे्स शिवायला दिलाय. तो घेऊन येते. गल्ली अरुंद आहे. तुझी मर्सिडीज तिथे जाऊ शकत नाही. मला फक्त दहा मिनिटं लागतील…चालेल?’’

‘‘अगदी चालेल. मी इथेच गाडीत बसतो…तू डे्स घेऊन ये. मी वाट बघतो.’’

‘‘ठीकाय…मी आलेच!’’

गाडीत बसल्या बसल्या माझ्या मनात वीस वर्षांपूर्वीच्या किती तरी आठवणी पिंगा घालू लागल्या.

वीस वर्षांपूर्वी इथे दिल्लीतच लाजपतमध्ये आमची दोघांची कुटुंब शेजारी शेजारी राहात होती. दोन्ही घरांचं अंगण एकच होतं. अल्पनाच्या घरात तिच्यासकट धाकटा भाऊ व आईवडील मिळून चारजण होते. आमचं कुटुंब मोठं होतं. आईबाबा, आम्ही चार भावंडं, आमची आजी अन् एक आत्या अशी आठ माणसं होती. त्या एरियात मराठी कुटुंबं आमची दोनच असल्यामुळे आपसात आमचं खूपच सख्य होतं.

अल्पनाची आई माझ्या आईहून दहा-बारा वर्षं लहान असल्यामुळे माझ्या आईचा सल्ला घ्यायला, काही विचारायला नेहमीच आमच्याकडे यायची. अल्पनाचा धाकटा भाऊ तिच्याहून दहा वर्षांनी लहान असल्यामुळे दोन्ही घरात खूप लाडका होता. अल्पनाचे बाबा बँकेत खूपच वरच्या पोस्टवर होते त्यामुळे सतत कामात बिझी असायचे. अल्पना दिसायला सुंदर होती, गुणी अन् हुशार होती शिवाय खूप हसरी, बडबडी अन् प्रेमळही होती. माझ्या दोघी बहिणींची ती फार लाडकी होती. ती जरी माझी समवयस्क होती तरी आमची सगळ्यांचीच बेस्ट फ्रेण्ड होती. आमचा दादा सगळ्यात मोठा होता. त्याने स्वत:च धंदा सुरू केला होता अन् तो त्यातच आकंठ बुडाला होता.

बारावीपर्यंत मी अन् अल्पना एकाच शाळेत होतो. मग मी इंजिनिअरिंगसाठी मुंबईला गेलो. तिथेच वर्गातल्या मृणालशी ओळख, मैत्री अन् प्रेम जमलं. लग्न करून आम्ही दाघे अमेरिकेत निघून गेलो. त्यानंतर इकडच्या आठवणी पुसट होत होत्या.

मी अमेरिकेला असतानाच अल्पनाचं लग्न झालं. आईबाबा असेपर्यंत भारतातल्या, दिल्लीतल्या बातम्या कळायच्या. आई अन् बाबा गेल्यानंतर मात्र अल्पनाच्या कुटुंबाची काहीच बातमी कळली नव्हती. त्या कुटुंबाचा अन् आमचा जणू संबंधच संपला होता.

खरोखंरच आयुष्य इतकं गतिमान अन् धकाधकीचं झालंय की जे आज, आता घडतंय तेवढ्याशीच आपला संबंध असतो. तेवढ्याचाच आपण विचार करतो. कधीतरी अल्पनाच्या रूपात भूतकाळ समोर येतो तेव्हा त्याबद्दल आपण विचार करू लागतो.

मी आठवणीत रमले असतानाच अल्पना आली. मी गाडीचं दार उघडून तिला गाडीत घेतली.

‘‘मन अमेरिकेत गेलं होतं का?’’ गाडीत बसत तिने विचारलं, ‘‘अमेरिकेहून कधी आलास? इथेच कायमचा राहाणार आहेस की परत जायचंय तिथे?’’

‘‘परत जायचंय. इथे एका प्रोजेक्टसाठी वर्षभर पाठवलंय कंपनीने. इथे जवळच भाड्याचं घर घेतलंय. हल्ली भारतातही खूप सोयीसुविधा झाल्या आहेत.’’

‘‘मृणाल कशी आहे? मुलं काय करतात?’’

‘‘एकच मुलगा आहे.’’

‘‘काय करतोए?’’

‘‘इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.’’

‘‘म्हणजे तुलाही एकच मुलगा आहे?’’

‘‘हो ना. तुझ्याप्रमाणेच आम्ही दोघं आमचा एक असं कुटुंब आहे.’’

बोलत बोलत आम्ही अल्पनाच्या घरी पोहोचलो. अल्पनाच्या आग्रहामुळे मी तिचा फ्लॅट बघायला वर गेलो.

छोटासा दोन रूमचा फ्लॅट होता, पण अत्यंत कलात्मक पद्धतीनं सजवला होता. घराच्या दारातच फुललेला मोगरा, डायनिंग टेबलशेजारच्या खिडकीवरचा बहरलेला हिरवागार मनीप्लँट, कोपऱ्यातून काचेच्या फळ्यांवर मांडलेले अभिजात शोपीसेस. प्रत्येक गोष्ट घराच्या मालकिणीच्या उत्तम अभिरूचीची साक्ष देत होती. अभाविपणे मी बोलून गेलो, ‘‘सुरेख आहे तुझं घर. नोकरी करून एवढं सगळं कसं काय सांभाळेतस?’’

माझं बोलणं पूर्ण होतंय तोवर आतून एक अत्यंत देखणा पुरुष संतापून ओरडतच बाहेर आला. ‘‘इतका वेळ कुठे उंडारत होतीस? मला कामावर जायचंय, विसरलीस का? तुझ्याप्रमाणे माझा ऑफ नाहीए.’’

अल्पनाची परिस्थिती खूपच विचित्र झालेली. मीही अवघडून कधी तिला तर कधी त्याला बघत होतो.

‘‘हे माझे मिस्टर शशीकांत अन् शशी हा अरुण. आमच्या शेजारी राहायचे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला?’’ अल्पनाने आमची ओळख करून दिली.

‘‘ठीकाय…पण आता मला अजिबात वेळ नाहीए अन् असला तरी तुझ्या जुन्या यार दोस्तांना भेटण्याची मला अजिबात हौस नाहीए.’’ मी हात मिळवण्यासाठी पुढे केलेल्या माझ्या हाताकडे न बघता तो आत निघून गेला.

मी अवाक्…मग म्हटलं, ‘‘ठीकाय, अल्पू, मी निघतो. मृणाल वाट बघत असेल,’’ अल्पूकडे न बघताच मी घराबाहेर पडलो.

गाडीत बसताना नजर वर गेली. घराच्या बाल्कनीत अल्पू उभी होती. डोळ्यांतलं पाणी पुसत होती. तिची असहायता चेहऱ्यावर दाटून आली होती. तिची करूण मूर्ती घरापर्यंत माझ्यासोबत करत होती.

घरी पोहोचताच मृणालला सगळं सांगितलं. तिलाही ऐकून बरं वाटलं नाही. आमच्या लग्नापासून मृणालही अल्पना व तिच्या कुटुंबाला ओळखत होती. अल्पनाच्या आईने मृणालला लग्नात दिलेली कांजीवरम साडी अजूनही तिने जपून ठेवली आहे. अल्पनाचं सौंदर्य, तिचा स्वभाव यामुळे मृणालही तिच्या प्रेमात पडली होती. कधी कधी मला ती चिडवायचीही, ‘‘अरे अरुण ही माधुरी दीक्षित तुझ्या शेजारी असताना तू माझ्या प्रेमात कसा पडलास?’’

बराच वेळ आम्ही अल्पनाबद्दल बोलत होतो. तेवढ्यात माझा मोबाइल वाजला.

‘‘मी…मी…अल्पना बोलतेए.’’

‘‘बोल…’’

‘‘तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. पहिल्यांदाच तू माझ्या घरी आलास अन् विनाकारण तुझा अपमान झाला.’’

‘‘नाही गं…अपमान वगैरे काही नाही, पण मला सांग, खरं खरं सांग, तुझा अन् शशीचा काही प्रॉब्लेम चाललाय का?’’

‘‘प्रॉब्लेम? माझा काही प्रॉब्लेम नाहीए…सगला प्रॉब्लेम शशीचा आहे.’’

‘‘जरा नीट सांगशील का? मी काही मदत करू शकेन.’’

‘‘आता फोनवर नाही सांगू शकत पण…एक गोष्ट नक्की की शशीचा तापट, संतापी स्वभाव अन् संशयी वृत्ती माझ्या सहन करण्यापलीकडची आहे. त्याच्या अशा स्वभावामुळे मी कुणाकडे जात नाही, कुणाला घरी बोलावत नाही. आज तू अवचित भेटलास अन् मी तुला वर यायला म्हटलं.’’

‘‘हे सगळं तुझ्या आईबाबांना माहीत आहे?’’

‘‘सुरूवातीला सांगायचा प्रयत्न केला होता…त्याचाच परिणाम आजतागायत भोगते आहे.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुला ठाऊक आहे, माझे बाबा फार संतापी होते. त्यांना जेव्हा याचं वागणं कळलं तेव्हा ते संतापून शशीला खूपच टाकून बोलले, नको नको ते बोलले.’’

‘‘अरे, माझ्या लग्नापासून शशी बाबांना कधी आवडला नव्हता. त्यांच्या मते त्याची नोकरी, त्याचा पगार, त्याचं शिक्षण, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, काहीच त्यांना पसंत नव्हतं. त्यांच्या मते तो माझ्यासाठी पूर्णपणे अयोग्य होता. पण तो दिसायला इतका देखणा होता की त्याला बघताच मी त्याच्यासाठी वेडी झाले. आईबाबांनी किती समजावलं पण मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. शेवटी आमचं लग्न झालं. आम्ही दोघं जेव्हा आईबाबांना भेटायला जात असू तेव्हाही शशीला सतत वाटायचं की ते त्याला मान देत नाहीत, त्याच्या पगाराबद्दलचा, नोकरीबद्दलचा तिरस्कार त्यांच्या डोळ्यांतून दिसतो.’’

‘‘अन् मी जेव्हा शशीबद्दल बाबांकडे तक्रार केली तेव्हा ते त्याला म्हणाले की तू आमच्या मुलीच्या लायकीचा कधीच नव्हताच अन् यापुढेही असणार नाहीस.’’

‘‘त्यानंतर माझं माहेर सुटलंच. शशी अधिक वाईट वागायला लागला. असा आहे माझा संसार. आईबाबा आता सुरेशकडे अमेरिकेत असतात. छान सेटल झाले आहेत. ते कधीही माझ्याकडे आले नाहीत अन् मीही त्यांच्यांकडे गेले नाही. फक्त माझी लेक प्रिया हीच माझ्या आयुष्यातली हिरवळ आहे, तिच्यासाठीच मी जगते आहे, तीच माझा आधार आहे.’’

‘‘तिच्याशी कसे वागतात शशी?’’

‘‘प्रियावर फार जीव आहे त्यांचा. पण त्यांच्या स्वभावामुळे प्रिया त्याला खूपच घाबरून असते. आमच्या भांडणात ती उगीचच भरडली जाते. भेदरलेल्या हरणासारखी जगतेय ती…’’

‘‘खरं तर तू काही दिवस आईबाबांकडे जाऊन राहायला हवं.’’

‘‘सुरेशकडे ती दोघं सुखात आहेत. सुरेश व त्याची बायको दोघांची खूप सेवा करतात. त्यांना तिथली सिटीअनशिपही मिळाली आहे. पण मला वाटतं माझं दु:ख मी त्यांना सांगून त्यांच्या आयुष्यात वादळ उठायला नको…बरं ते सगळं सोड, एक महत्त्वाचं म्हणजे मी उद्या चारच्या सुमारास तुझ्याकडे येते. आईबाबांना काही पेपर्स द्यायचे आहेच, तू तिथे गेल्यावर ते पेपर्स त्यांना मेल कर.’’

‘‘नक्की…नक्की करेन, उद्या तू ये. मी अन् मृणाल तुझी वाट बघूं. लेकीलाही घेऊन ये, तिची ओळख होईल?’’ मी फोन बंद केला.

पण दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत आम्हाला वाट बघावीच लागली नाही. सकाळी सातलाच प्रियाचा फोन आला. ती खूप घाबरली होती. ‘‘मामा, तुम्ही ताबडतोब आमच्या घरी या. काल बाबांनी आईला खूप मारलंय. आईनेच तुम्हाला फोन करायला सांगितलंय.’’

मी ताबडतोब गाडी काढली. मृणाललाही सोबत घेतलं. पोलीस इन्स्पेक्टर मित्र राणालाही फोन करून बोलावून घेतलं. आम्ही अल्पनाच्या घरी पोहोचलो. अल्पनाची परिस्थिती फारच वाईट होती. एक डोळा सुजला होता. काळानिळा झाला होता. चेहऱ्यावर माराचे वळ होते. हाताला फ्रॅक्चर असावं बहुतेक. ती घाबरली होती. रडत, कण्हत होती. प्रिया तिला चिकटून बसली होती. पलंगावर डोकं धरून शशीकांत बसला होता.

आम्हाला अन् पोलीसच्या युनिफॉर्ममधल्या राणाला बघून प्रथम तो घाबरला. पण एकदम उसळून अल्पनाकडे बघत विचारलं, ‘‘तू यांना बोलावलंस?’’

‘‘मी इन्स्पेक्टर राणा. तुमच्या मुलीच्या फोनमुळे मी इथ तपास करायला आलोय.’’ खणखणीत आवाजात राणानं म्हटलं तसा शशीकांत घाबरला. मी अन् मृणाल मुकाट उभे होतो.

आधी राणाने शशीकांतला अटक केली. मी अन् अल्पना त्या दोघांबरोबर पोलीस चौकीला गेलो. मृणाल प्रियाजवळ थांबली. शशिकांतविरूद्ध एफआयआर नोंदवली. मग प्रिया व मृणालसह आम्ही घरी आलो.

घरी येताच प्रथम मृणालने तिच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. मग सगळ्यांसाठी चहा केला. थोडं खाणं झालं. डॉक्टरने अल्पनाला औषधोपचार केले. जरा सगळं निवळल्यावर मी अल्पूला म्हटलं, ‘‘हे असं नेहमीच होतं का? तुझ्या नवऱ्याला हे माहीत नाही का बायकोला मारणं हा गुन्हा आहे?’’

‘‘ हे दुसऱ्यांदा झालंय, दोन तीन वर्षांपूर्वी मला एकदा ऑफिसात चक्कर आली. तब्येत खूपच बिघडली. तेव्हा एक कलीग त्याच्या गाडीने घरी सोडून गेला तेव्हाही शशीनं मला फार मारलं होतं. माझ्या बाबतीत तो फार पद्ब्रोसिव्ह आहे.

मला कुठल्याही पुरुषाबरोबर तो बघू शकत नाही.’’

‘‘अगं पण हे सगळं तू का सहन करतेस? त्याला तुझा पैसा हवाय अन्  मग इतकं पद्ब्रोसिव्ह असणं?’’

‘‘हजारदा मनात आलं वेगळं व्हावं…पण मुलीचा विचार मनात येतो…अन् मी सहन करते.’’

‘‘अगं पण सहन करण्याचीही एक सीमा असते. मानलं की आईबाबा, सुरेश, त्याची बायको यांना आपलं रडगाणं सांगायला नको म्हणून तू आजवर गप्प बसलीस…पण हे असं कुठवर सोसशील?’’

‘‘आता नाही सोसणार. प्रियानेच मला वेगळं व्हायला सुचवलंय. मी आता घटस्फोट घेणार.’’

‘‘फारच छान. आमचा तुला पाठिंबा आहे.’’

आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेव्हा प्रिया व अल्पना पण आमच्या सोबत होत्या. त्यांना सुरेशकडे पोहोचवण्याची जबाबदारी मीच घेतली होती.

दीड दमडीची नोकरी

कथा * भावना गोरे

‘‘हॅलो,’’ फोनवर विद्याचा परिचित आवाज ऐकून स्नेहा खुशीत आली.

‘‘आणि काय विशेष? सगळं सरोगाद आहे ना?’’ वगैरे औपचारिक गप्पा झाल्यावर दोघीही आपापल्या नवऱ्याबद्दल बोलू लागल्या.

‘‘प्रखरला तर घराची, संसाराची काही काळजीच नाहीए. काल मी त्याला म्हटलं होतं, घरी जरा लवकर ये. चिंटूचे शाळेचे बूट अन् अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे. पण तो इतका उशिरा आला की काय सांगू?’’ विद्या म्हणाली.

स्नेहानं म्हटलं, ‘‘रूपेश पण असंच करतो. अगं, शुक्रवारी नवा सिनेमा बघायचा प्लॅन होता आमचा. पण हा इतक्या उशिरा आला की आम्ही पोहोचेपर्यंत तिथं मध्यांतर व्हायला आलं होतं.’’

विद्या आणि स्नेहा दोघीही गृहिणी होत्या. दोघींचे नवरे एकाच कंपनीत काम करत होते. मुलंही साधारण एकाच वयाची होती. कंपनीच्या एका पार्टीत दोघी प्रथम भेटल्या. दोघींच्याही लक्षात आलं की त्यांचे स्वभाव, त्यांच्या समस्या साधारण सारख्याच आहेत. प्रथम त्या मुलं, त्यांचे अभ्यास, महागाई वगैरेवर बोलायच्या. नंतर मात्र नवऱ्याला सतत नावं ठेवणं हाच त्यांच्या गप्पांचा विषय झाला.

तेवढ्यात स्नेहाच्या घराची डोअरबेल वाजली. तिनं म्हटलं, ‘‘विद्या, बहुतेक मोलकरीण आलेली आहे. मी फोन ठेवते.’’ फोन ठेवून तिनं दार उघडलं अन् रखमा आत आली. आली तशी मुकाट्यानं भराभरा कामं आटोपू लागली.

‘‘काय झालंय गं रखमा? आज एवढी गप्प का? फार घाईत दिसतेस?’’ स्नेहानं विचारलं तशी ती रडू लागली.

‘‘काय झालं?’’ घाबरून काळजीनं स्नेहानं विचारलं.

‘‘काय सांगू बाई, माझा धनी एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. काल चुकून एका मुलाला शाळेतून घरी न्यायला विसरले तर शाळेनं त्याला ड्यूटीवरून काढून टाकलंय.’’ रखमानं रडत रडत सांगितलं.

‘‘हे तर वाईट झालं,’’ स्नेहानं सहानुभूती दाखवली.

रखमा काम आटोपून गेली अन् स्नेहाला आठवलं आज भाजी नाहीए घरात. लव आणि कूश शाळेतून घरी येण्याआधी तिला भाजीबाजार गाठायला हवा. घाईघाईनं आवरून ती भाजीच्या मोहिमेवर निघाली. मनातून रूपेशला भाजीही आणून टाकायला जमत नाही म्हणून चिडचिड चाललेलीच होती. घरी येऊन स्नेहानं स्वयंपाकाला सुरूवात केली. मुलं शाळेतून आल्यावर त्यांची जेवणं, थोड्या गप्पा, त्यानंतर शाळेचं होमवर्क, त्यानंतर पार्कात खेळायला घेऊन जाणं, आल्यावर उरलेला अभ्यास की लगेच रात्रीचा स्वयंपाक. तेवढ्यात रूपेश येतो, जेवतो की लगेच झोपतो. हीच त्यांची दिनचर्या होती.

कधीकधी स्नेहाला या सगळ्याचा वैताग यायचा. मग ती रूपेशशी भांडायची. ‘‘माझ्यासाठी नाही तर निदान, मुलांसाठी तरी थोडा वेळ काढता येत नाही का तुला?’’

रूपेशही चिडून म्हणायचा, ‘‘अख्खा दिवस घरात असतेस तू. काय करतेस बसून? बाहेर मला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं. ते तुला कुठं माहीत आहे?

विद्याला विचार, प्रखरही माझ्याबरोबर थांबून काम करत होता. सध्या आमच्या कंपनीची परिस्थिती वाईट आहे. एक नवी कंपनी आल्यामुळे आमचा बिझनेस एकदम डाऊन झाला आहे.’’

‘‘पुरे हो तुमचं! तुमच्या कंपनीत रोजच काहीतरी प्रॉब्लेम निघतो. इतकी कंपनीची अवस्था वाईट आहे तर सोडून द्या ही नोकरी,’’ स्नेहा रागानं फणफणत असते.

दुसऱ्या दिवशी फोनवर हा सगळा मसाला विद्याला पोहोचवला जातो.

एकदा मात्र विद्या अन् स्नेहानं बराच प्रयत्न करून एका रविवारी पिकनिकचा बेत जमवला. गप्पा, खादाडी, हसणं, मुलांचे खेळ यातही प्रखर अन् रूपेश मात्र त्यांच्या कंपनीच्याच कामांबद्दल बोलत होते.

शेवटी वैतागून स्नेहानं म्हटलं, ‘‘तुम्ही दोघं ही कंपनी सोडून स्वत:चा बिझनेस का सुरू करत नाही?’’

‘‘बिझनेस?’’ तिघांनी एकदमच विचारलं.

‘‘हो ना. थोडं लोन घेऊ, थोडा पैसा आपलं सोनंनाणं गहाण ठेवून उभा करता येईल. छोटासा बिझनेस छोट्याशा भांडवलावर उभा करता येईल की?’’

स्नेहाची कल्पना सर्वांना पसंत तर पडली. पण व्यवसाय म्हणजे काही पोरखेळ नसतो. प्रखरनं तर स्पष्टच नाही म्हटलं, ‘‘बिझनेसमध्ये फार रिस्क असते. आपला व्यवसाय चालेल, न चालेल, कुणी खात्री द्यायची? नको रे बाबा…मी नाही करणार बिझनेस…’’

विद्याला मात्र कल्पना आवडली. ‘‘स्नेहा बरोबर म्हणते आहे. स्वत:चा बिझनेस म्हणजे कुणाचं बॉसिंग नाही, मनांत येईल तेव्हा सुट्टी घ्यावी. बॉसच्या मिनतवाऱ्या करायला नकोत.’’ ती म्हणाली.

‘‘पण व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. सगळं काही डावावर लावलं तरी जिंकूच याची खात्री नसेल.’’ प्रखर म्हणाला. मग तो विषय तिथंच संपला.

रूपेशचं खरं तर बायको, मुलांवर, संसारावर खरोखर खूप प्रेम होतं. त्यांना फिरायला न्यावं, त्यांना वेळ द्यावा असं त्यालाही वाटायचं. पण बॉसच्या धाकानं तो कधी मोकळेपणानं वागू शकत नव्हता. स्नेहाच्या म्हणण्यावर तो गंभीरपणे विचार करू लागला.

दुसऱ्या दिवशी स्नेहानं विद्याला फोन करायला म्हणून रिसीव्हर हातात घेतला अन् डोअरबेल वाजली. रखमा आली वाटतं. असं पुटपुटतं तिनं दार उघडलं तर समोर रूपेश उभा. तिला नवलच वाटलं.

‘‘तुम्ही एवढ्यात तर ऑफिसला गेला होता, मग इतक्या लवकर परत कसे आलात?’’

‘‘मी आता ऑफिसला जाणारच नाही. नोकरी सोडून आलोय मी,’’ हसत हसत रूपेशनं सांगितलं.

स्नेहाला काहीच कळेना. ‘‘बॉसशी भांडण झालं का? अशी कशी नोकरी सोडलीत?’’

‘‘अगं बाई, यापुढे स्वत:चा व्यवसाय करायचा आहे ना? बिझनेस?’’

रूपेशच्या बोलण्यावर स्नेहा हसली खरी. पण मनातून खरं तर ती घाबरली होती. तिच्या मनात होतं प्रखरही धंद्यात राहिला तर दोघांच्या मदतीने व्यवसाय करता येईल. एकावर एक अकरा होतातच ना? प्रखरनं स्पष्टच नकार दिल्यावर मग तिनंही त्यावर विचार केला नाही. पण रूपेश आता जॉबच सोडून आलाय म्हटल्यावर…स्नेहा काही बोलणार तेवढ्यात रखमा आली. स्नेहा तिच्याकडून स्वयंपाकघराची स्वच्छता करून घेऊ लागली.

‘‘रूपेश, मी भाजी घेऊन येते,’’ म्हणून स्नेहा निघाली. तसा रूपेश म्हणाला, ‘‘मी पण चलतो.’’

भाजीवाल्यानं रुपेशला बघितलं तर हसून म्हणाला, ‘‘साहेब, आज तुम्ही कसे? कामावर नाही जायचं का?’’

‘‘मी नोकरी सोडलीय,’’ हसून रुपेशनं म्हटलं.

‘‘काय?’’ दचकून भाजीवाल्यानं विचारलं अन् रूपेशकडे अशा नजरेनं पाहिलं जणू तो रखमाचा नवरा आहे, ज्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय.

स्नेहा बिचारी गप्प बसली. घरी येऊन तिनं भाजी केली. कोथिंबीर, उसळ केली. कणिक भिजवून वरणाला फोडणी घातली. भराभरा कामं आटोपून तिनं रूपेशला म्हटलं, ‘‘मी भाताचा कुकर लावून जाते. तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर.’’

‘‘मी चलतो तुझ्यासोबत, आल्यावर कुकर लाव.’’ म्हणत रूपेशही तिच्याबरोबर निघाला.

बाबांना बघून मुलांनाही आश्चर्य वाटलं.

‘‘बाबा, आज तर ‘रेनी डे’ नाहीए. तुम्ही कसे सुट्टीवर?’’ धाकट्यानं निरागसपणे विचारलं.

घरी आल्यावर स्नेहानं कुकर लावला. जेवायला वाढेपर्यंत पोरांनी ‘भूक भूक’ करत भंडावून सोडलं.

जेवणं झाल्यावर रुपेश म्हणाला, ‘‘चल, जरा निवांत बिझनेस प्लॅनिंग करूयात.’’

पण स्नेहाला स्वयंपाकघर, ओटा स्वच्छ करायचा होता. अजून धुणं व्हायचं होतं. ती म्हणाली, ‘‘तुम्ही जरा मुलांचं होमवर्क आटोपून घ्या. मी कपडे धुवून येते. मग प्लॅन करू.’’

मुलांचं होमवर्क घेणं रूपेशला जमेना. त्याला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं.

धाकट्यानं विचारलं, ‘‘भोपळा अन् वांग यात काय अन् कसा फरक आहे?’’

रूपेशनं म्हटलं, ‘‘लिहि ना, भोपळा पिवळा आणि वांग जांभळं काळं असतं,’’ हे ऐकून दोघं मुलं हसायला लागली. धाकटा तर टाळ्या वाजवू लागला.

दंगा ऐकून बाथरूममधून स्नेहा बाहेर आली. ‘‘हे काय अभ्यास का करत नाहीए?’’ मुलानं तोच प्रश्न आईला विचारला.

‘‘भोपळा हा वेलावर लागतो. क्रीपर म्हणजे वेल. वांगं रोपावरझाडावर लागतं. श्रब असा शब्द आहे.’’

मुलं वडिलांकडे बघून पुन्हा हसू लागली. त्यांना नीट अभ्यास करण्याची तंबी देऊन स्नेहा कपडे धुवायला गेली.

रूपेश डोळे बंद करू आडव झाला. मुलांनी काहीतरी विचारलं, पण त्यानं उत्तर दिलं नाही. त्याला झोप लालगी आहे असं समजून मुलं खेळायला निघून गेली.

रूपेशला खरंच झोप लागली. जागा झाला तेव्हा सायंकाळ झाली होती.

स्नेहा मुलांना रागवत होती, ‘‘तुम्ही अभ्यास पूर्ण केला नाहीत, खेळायला निघून गेलात. आता आपण आधी अभ्यास, करूयात.’’

तेवढ्यात रूपेश उठलेला बघून तिनं त्यांचा दोघांचा चहा केला. मुलांना दूध दिलं अन् चहा घेऊन ती मुलांचा अभ्यास घ्यायला लागली.

रूपेशच्या मनात आलं, सकाळपासून स्नेहा कामं करतेय. ती बिझनेससाठी वेळ कसा अन् कधी काढेल?

पुन्हा रात्रीचा स्वयंपाक…ओटा धुणं, अन्नाची झाकपाक, मुलांची उद्याची तयारी…

दुसऱ्या दिवशी रूपेश कामावर गेला नाही. रखमा कामावर आली. काम करता करता म्हणाली, ‘‘बाई, तुम्ही माझ्या नवऱ्याला कामावर ठेवून घ्यायला साहेबांना सांगा ना? त्याला काम नाही लागलं तर माझ्या मुलांची शाळा बंद होईल.’’

स्नेहाच्या सांगण्यावरून रखमानं मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं. आता स्नेहा तिला काय सांगणार की तिचाच नवरा नोकरी सोडून आलाय म्हणून. तो रखमाच्या नवऱ्याला कुठून काम देणार?

रखमा गेली अन् रूपेशनं म्हटलं, ‘‘स्नेहा, जरा तुझे दागिने आण बघू. बघूयात त्यात किती पैशाची सोय होऊ शकतेय.’’

स्नेहानं कपाटाच्या लॉकरमधून दागिन्यांचा डबा काढून आणला. रूपेशच्या हातात डबा देताना तिचे हात थरथरत होते.

तेवढ्यात विद्याचा फोन आला. ‘‘आज ऑफिसची पार्टी आहे, तू येणार आहेस ना?’’

‘‘बघते,’’ तिनं कसंबसं म्हटलं अन् फोन ठेवला. दागिने नाहीत म्हटल्यावर आता यापुढे पार्ट्यांना कसं जायचं?

ती रूपेशकडे येऊन म्हणाली, ‘‘दागिने दोन तीन दिवसांनी विकले किंवा गहाण ठेवले तर चालेल का?’’

‘‘चालेल ना!’’ रूपेशनं डबा तिला देत म्हटलं.

त्या निर्जीव दागिन्यांबद्दल स्नेहाल इतका प्रेमाचा उमाळा दाटून आला. या पाटल्या माझ्या आईनं दिलेल्या. या बांगड्या आजी अन् मामाकडची भेट. ही अंगठी ताईनं दिलेली, हा नेकलेस अन् सेट रूपेशने किती प्रेमानं माझ्यासाठी आणला होता. तिचे डोळे भरून आले. एकेका दागिन्याचा ती मुका घेऊ लागली.

तेवढ्यात फोन वाजला. विद्या विचारत होती, ‘‘अगं, तू येते आहेस की नाहीस पार्टीला? काहीच कळवलं नाहीस?’’

‘‘हो, हो, अगं राहिलंच ते. पण एक सांग, पार्टी आहे कशासाठी?’’

‘‘बॉसचा वाढदिवस आहे. म्हणूनच ऑफिसला दोन दिवस सुट्टी दिलीय ना?’’

‘‘बरं, मी येतेय पार्टीला,’’ तिनं फोन ठेवला अन् सरळ रूपेशपाशी गेली.

‘‘मला बुद्धु बनवलंत तुम्ही, म्हणे नोकरी सोडून आलोय, खरं तर बॉसच्या वाढदिवसाची सुट्टी आहे तुम्हाला.’’

‘‘हो गं! ऑफिसला सुट्टी आहे हे खरंय. पण मी खरंच विचार करतोय की नोकरी सोडावी म्हणून. मी आजच्या पार्टीतच माझा राजीनामा देणार होतो. हे बघ, लिहून तयारच आहे.’’

दोन दिवसांपूर्वी लिहिलेला राजीनामा त्यानं तिला दाखवला. म्हणजे रूपेश खरोखर नोकरी सोडतोय तर!

सायंकाळी पार्टीसाठी तयार होत असताना स्नेहाला सारखं भरून येत होतं. आता हे दागिने तिला परत कधीच बघायला मिळणार नाहीत किंवा काही वर्षांनंतर जेव्हा व्यवसाय छान चालेल, भरपूर पैसा हातात येईल तेव्हा नवे दागिने घेता येतील. पण निदान सध्या काही वर्षं तरी दागिन्यांशिवाय राहावं लागेल.

गाडीतून पार्टीला जाताना तिच्या मनात आलं जर रूपेशनं नोकरी सोडली नाही तर रखमाच्या नवऱ्याला ते लोक ड्रायव्हर म्हणून ठेवून घेऊ शकतील.

रूपेशही काळजीतच होता. स्नेहानं धंद्यात मदत करायची म्हटलं तर तिच्याकडं जास्तीचा वेळ कुठं होता? मुलं अजून पुरेशी मोठी झालेली नव्हती. सासर माहेर कुठूनच कुणी वडिलधारं येऊन राहील अशी परिस्थिती नव्हती. सगळा वेळ तर घरकामात अन् मुलांमध्ये जातो. मग धंदा कसा होणार?

ती पोहोचली तेव्हा पार्टी सुरू झाली होती. प्रखर आणि विद्या त्यांची वाटच बघत होते. पार्टीच्या शेवटी बॉस बोलायला उभे राहिले. सगळ्या स्टाफला उद्देशून ते म्हणाले, ‘‘आजची पार्टी माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पत्नींना समर्पित आहे. त्या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळतात आणि ऑफिसच्या कामासाठी आपल्या नवऱ्यांना पूर्ण मोकळीक देतात म्हणूनच आमचं ऑफिस व्यवस्थित चाललंय. झोकून देऊन ऑफिसचं काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या पत्नींचा मी आभारी आहे. आज की शाम…बीबीयों के नाम…’’’

स्नेहाला भीती वाटत होती की रूपेश आता त्याचा राजीनामा सादर करतो आहे की काय? हृदय धडधडत होतं. नोकरी सुटली तर पार्ट्या वगैरे बंदच होतील.

घरी परतताना रूपेशनं म्हटलं, ‘‘स्नेहा, तू माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, संसारासाठी खरोखर खूप राबतेस. बॉस बरोबर बोलले. तू घर सांभाळतेस म्हणूनच मी ऑफिसची जबाबदारी सांभाळू शकतो. मी उगीचच तुझ्याशी भांडलो, ओरडलो…सॉरी, माझं चुकलंच!’’

‘‘नाही रूपेश, माझंच चुकलं. मी तुमच्या नोकरीला दीडदमडीची ठरवत होते. पण ती किती महत्त्वाची आहे, हे मला आता कळतंय. आज जो काही संसार आहे तो तुमच्या नोकरीमुळेच आहे. तुमच्या कष्टाचं फळ आहे. पण मला त्याची सवय झालीय ना, म्हणून मी उगीचच चिडचिड करत बसते. जर हे सगळं नसलं तर मी कशी राहीन? काय काय करीन? बरं झालं तुम्ही राजीनामा दिला नाहीत ते.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें