विशाल फुरियाची ‘छोरी 2’ पुन्हा भयपटाचा थरार आणणार!

भारतीय भयपट आणि थरारपटांच्या विश्वात दिग्दर्शक विशाल फुरियाने गेल्या दशकभरात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीत ‘लपाछपी’ या भयपटाने प्रवास सुरू करणाऱ्या विशालने बॉलिवूडमध्ये ‘छोरी’ आणि ‘फॉरेन्सिक’सारख्या दमदार चित्रपटांद्वारे आपली ओळख निर्माण केली. आता तो ‘छोरी 2’ घेऊन परतला आहे. नुशरत भरुचा आणि सोहा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या भयपट प्रकाराला एक नवे वळण देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

विशाल यांचे भयपटप्रेम लहानपणापासूनच रुजले आहे. त्याला या शैलीची भीती वाटायची, पण हळूहळू त्याचाच मोह वाढत गेला. त्याच्या मते, ‘ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट’ हा पहिलाच चित्रपट होता, ज्याने त्याला चांगलेच हादरवले. “फ्रेडी या पात्राने मला एवढं घाबरवलं की तो स्वप्नात अडकवेल या भीतीने मी झोपायलाच तयार नव्हतो!” तो आठवतो.

‘छोरी 2’ मध्ये साक्षी (नुशरत भरुचा) ही आता एका 7 वर्षांच्या मुलीची आई आहे. पण जेव्हा तिच्या मुलीचे अपहरण होऊन तिला त्या जुन्या शेतात नेले जाते, तेव्हा ती पुन्हा एका भयावह जगात सापडते. विशालने या चित्रपटात अशा वातावरणाची निर्मिती केली आहे, जी प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटभर अस्वस्थ ठेवेल—गुंतागुंतीच्या बोगद्यांपासून, विहिरींपर्यंत आणि जुन्या पडक्या घरांपर्यंत!

 

बॉलिवूडमध्ये भयपट हा बहुतांश वेळा अतिरंजित आणि ठराविक फॉर्म्युल्यांमध्ये अडकलेला राहिला आहे. त्यामुळे या प्रकाराला फारसा दर्जा मिळाला नाही. मात्र, टिम बर्टन, गिलेरमो डेल टोरो, जॉर्डन पील, ताकाशी मिके, एम. नाईट श्यामलन आणि एरी एस्टर यांसारख्या जागतिक दिग्दर्शकांपासून प्रेरणा घेणाऱ्या विशालला हा प्रकार पुन्हा प्रतिष्ठित करायचा आहे. “बॉलिवूडमधला भयपट हा जास्त करून मसालेदार आणि बी-ग्रेड टॅग असलेला राहिला आहे. मी भारतीय भयपटाला क्लासिक हॉररच्या दर्जावर नेण्याचा प्रयत्न करतो आहे. या प्रकारात प्रेक्षकांना भीती, थरार, रक्तपात, तसेच सहानुभूती आणि प्रेमाची जाणीव करून देण्याची ताकद आहे,” असे तो सांगतो.

विशालच्या मते, एक चांगला भयपट असा असतो जो क्रेडिट्स संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात राहतो. त्याचा ‘छोरी’ चित्रपट हा सामाजिक भीतीचा (सोशल हॉरर) प्रकार असून, तो सामाजिक विषमता आणि अन्याय यांसारख्या मुद्द्यांना स्पर्श करतो. “मी भयपटाचा उपयोग सामाजिक समस्या मांडण्यासाठी केला आहे. ‘छोरी’मध्ये भीती, गूढता, रक्तपात आणि भयशास्त्र यांचा वापर करून सामाजिक प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न केला आहे,” तो सांगतो.

आता विशाल विविध भयपट उपशैलींमध्ये काम करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला फक्त भारतीय संस्कृतीशी निगडित किंवा भारतीय कथा सांगायच्या आहेत. ‘छोरी 2’ प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज असतानाच, तो आपला पुढचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘माँ’वर काम करत आहे. काजोल मुख्य भूमिकेत असलेला हा पौराणिक भयपट अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेखाली तयार होत आहे. जूनमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी फारशी माहिती जाहीर झालेली नसली, तरी हा चित्रपट बॉलिवूडच्या भयपट प्रकाराला नवे परिमाण देईल, अशी अपेक्षा आहे.

‘एप्रिल मे ९९’चा टीझर शेअर करत रितेश देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा

* नम्रता पवार

लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी १६ मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात दिसतेय. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आता टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘एप्रिल मे ९९’  या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “मी खूप भाग्यवान आहे. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मला माझे प्रेरणास्थान असलेल्या मान्यवरांचा आशीर्वाद मिळतोय. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. आता टिझर लाँच रितेश सरांच्या हस्ते. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांसाठी काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांची एनर्जी आपल्याला ऊर्जा देते. मला त्यांच्यासोबत काम करताना कायमच प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांच्या हस्ते माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग होणे, ही आनंदाची बाब आहे. माझ्या कामात मला नेहमीच त्यांचे पाठबळ लाभले असून त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा क्षण अधिकच खास झाला आहे.’’

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आठवणींना उजाळा देणारा आहे. सर्व वयोगटासाठी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच नॉस्टेल्जिक बनवेल. तरूणाईलाही तितकाच भावेल. खूप हलकीफुलकी कथा आहे, जी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देईल.’’

 

 

 

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न

* नम्रता पवार

अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर यांच्याही प्रमुख भूमिका यात आहेत. चित्रपटाच्या यशस्वी समारोपानंतर कलाकार आणि निर्मात्यांनी या चित्रपटाविषयीचा आपला उत्साह व्यक्त केला.

चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे. विशेष म्हणजे लोकशाही समूह अंतर्गत असलेले ईओडी मीडिया कंपनीचे संचालक पुष्कर यावलकर यांनी एव्हीकेसोबत हातमिळवणी करत मराठी चित्रपट निर्मितीक्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी निर्माता म्हणून ‘ पुन्हा एकदा साडे मेड तीन’ मध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली आहे.

अमेय विनोद खोपकर पिक्चर्स (एव्हीके), उदाहरणार्थ निर्मित, प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन निर्माते आहेत.

दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात, “या चित्रपटाच्या सिक्वेलचा भाग होणे खूप खास आहे. नुकतेच चित्रीकरण संपले असून चित्रीकरणाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता आणि कलाकार व निर्मात्यांच्या मेहनतीने हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल. प्रेक्षकांना ही नवी धमाल नक्कीच आवडेल.”

निर्माते पुष्कर यावलकर म्हणतात, “अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता. नुकतेच चित्रपटाचे शुटिंग संपन्न झाले असून या सगळ्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप कमाल होता. चित्रपट निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवणे हा माझ्यासाठी एक मोठा प्रवास होता आणि तो या टीमसोबत खूप सुखकर झाला. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सारख्या चित्रपटाचा भाग होणे, ही आनंदाची गोष्ट आहे.

शर्वरी झाली स्प्राईटची महिला ब्रँड अॅम्बेसेडर!

* सोमा घोष

स्प्राईट इंडियाने अधिकृत घोषणा केली आहे की बॉलिवूडची नवी आणि दमदार अभिनेत्री शर्वरी आता त्यांच्या ब्रँडची नवी ब्रँड अॅम्बेसेडर असेल! आपल्या सहजसोप्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाणारी शर्वरी स्प्राईटच्या फ्रेश, यंग आणि कूल अटिट्यूडची परिपूर्ण प्रतिमा आहे.

अतिशय प्रतिभावान अशी शर्वरी ही आपल्या पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानली जाते. 100 कोटींचा ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’, जागतिक स्तरावर हिट ठरलेला ‘महाराज’, आणि दमदार अॅक्शन-थ्रिलर ‘वेदा’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. आणि आता स्प्राईटच्या ‘स्प्राईट, थंड रख ’ या नवीन मोहिमेसाठी तिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले आहे.

स्प्राईट हा ब्रँड नेहमीच आपल्या फ्रेश आणि विनोदी संवादशैलीद्वारे ग्राहकांशी कनेक्ट होत आला आहे. त्यामुळेच या पिढीतील सर्वाधिक कनेक्ट होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शर्वरीला या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे. या नवीन कॅम्पेनच्या माध्यमातून स्प्राईट ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत कूल राहण्याचा संदेश देत आहे!

ब्रिटनची रेल्वे आणि यशराज फिल्म्स एकत्र; प्रेमाच्या एकत्रित शक्तीचा उत्सव साजरा करणार!

* सोमा घोष

२०२५ मध्ये आधुनिक रेल्वेच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स (YRF) एकत्र येत आहेत. रेलवे 200 या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला जात आहे.

योगायोग असा की, २०२५ मध्ये वायआरएफच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) याच्या ३० व्या वर्षाचा मोठ्या दिमाखात उत्सव साजरा केला जाणार आहे. हा चित्रपट भारत, भारतीय आणि संपूर्ण दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी एक पॉप कल्चर माईलस्टोन आहे. डीडीएलजेच्या अनेक दृश्यांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये झाले होते, ज्यामध्ये किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवरील आयकॉनिक सीनदेखील समाविष्ट आहे. याच ठिकाणी शाहरुख खान आणि काजोल यांचे पात्र प्रथम भेटतात आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होते.

ब्रिटनची रेल्वे आणि वायआरएफ यांनी रेल्वे प्रवासातील रोमान्सला समर्पित करत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांच्या सांस्कृतिक सहकार्याची घोषणा केली आहे. सध्या वायआरएफ कम फॉल इन लव  – द  डीडीएलजे म्यूजिकल (CFIL) या डीडीएलजे च्या म्युझिकल अ‍ॅडॅप्टेशनची स निर्मिती करत आहे. या म्युझिकलचा प्रीमियर २९ मे २०२५ रोजी मँचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये होणार आहे आणि तो २१ जून २०२५ पर्यंत चालणार आहे.

ब्रिटनची रेल्वे आणि वायआरएफ एकत्र येऊन कम फॉल इन लव  – द  डीडीएलजे म्यूजिकलच्या माध्यमातून संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाचा उत्सव साजरा करतील. यासाठी मँचेस्टर आणि लंडनच्या प्रमुख रेल्वे स्टेशनवर खास इमर्सिव्ह अ‍ॅक्टिव्हेशन्स आयोजित केले जातील.

कम फॉल इन लव  – द  डीडीएलजे म्यूजिकल या इंग्रजी संगीत नाटकाचे दिग्दर्शन डीडीएलजे चे मूळ दिग्दर्शक आदित्य चोप्रा करत आहेत. ही कथा एका ब्रिटिश-भारतीय मुलीची आहे, जिला तिच्या कुटुंबाने भारतातील एका मित्रासोबत लग्न करण्यास सांगितले आहे. मात्र, परिस्थिती तेव्हा बदलते जेव्हा ती रॉजर नावाच्या एका ब्रिटिश तरुणाच्या प्रेमात पडते.

या भव्य निर्मितीमध्ये एकूण १८ नवीन इंग्रजी गाण्यांचा समावेश आहे. संगीतातील पूर्व-पश्चिम संगम दिसून येतो, कारण संगीत विशाल-शेखर यांनी दिले आहे, तर गीतलेखन आणि कथा नेल बेंजामिन (मीन गर्ल्स, लीगली ब्लॉन्ड) यांनी लिहिली आहे.

क्रिएटिव्ह टीममध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ आहेत – नृत्यदिग्दर्शक रॉब अशफोर्ड (डिज्नीचा  फ्रोजन), भारतीय नृत्यांसाठी सह-नृत्यदिग्दर्शक श्रुती मर्चंट (ताज एक्सप्रेस ), सेट डिझायनर डेरेक मॅकलेन (मौलिन रूज! द म्यूजिकल), आणि कास्टिंग डिरेक्टर डेव्हिड ग्रिनड्रॉड यांचा समावेश आहे.

डीडीएलजे हा भारतीय सिनेमाचा सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे आणि तो १९९५ पासून आजतागायत मुंबईत सलग प्रदर्शित होत आहे.

रेल्वे २००च्या कार्यकारी संचालिका सुझान डोनेली म्हणतात, “आम्ही यशराज फिल्म्ससोबत भागीदारी करत आहोत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. रेल्वेने नेहमीच चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा दिली आहे आणि जगभरातील संस्कृती जोडण्याचे काम केले आहे. यंदाच्या द्विशतक महोत्सवाच्या निमित्ताने, या आयकॉनिक रेल्वे-आधारित बॉलिवूड ब्लॉकबस्टरच्या ३०व्या वर्धापन दिनाचा आणि याच्या नवीन इंग्रजी म्युझिकलच्या युके प्रीमियरचा एकत्रित उत्सव साजरा करण्याची ही सुवर्णसंधी आहे.”

यशराज फिल्म्सचे सीइओ अक्षय विधानी म्हणाले, “रेल्वेच्या २०० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ब्रिटनच्या रेल्वेसोबत सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो. वायआरएफने नेहमीच भारतीय मुळं जपत जागतिक पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या कथा सांगण्यावर भर दिला आहे आणि डीडीएलजे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. डीडीएलजेच्या ३० व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही या आयकॉनिक चित्रपटाच्या स्टेज अडॅप्टेशनला युकेमध्ये आणत आहोत! आमच्या म्युझिकलचा प्रीमियर २९ मे रोजी मँचेस्टर ओपेरा हाऊस येथे होणार आहे. डीडीएलजेचा सर्वात आयकॉनिक सीन किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवर शूट करण्यात आला होता आणि तो कम फॉल इन लवमध्ये देखील समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे रेलवे 200 सोबत भागीदारी करण्यासाठी हा एक परिपूर्ण क्षण आहे. एकत्र येऊन आम्ही प्रेमाच्या एकत्रित शक्तीचा संदेश देऊ इच्छितो आणि विविधता व समावेशकता यांचे महत्त्व अधोरेखित करू इच्छितो.”

२०२५ मध्ये डीडीएलजेची जादू पुन्हा एकदा परदेशी प्रेक्षकांसाठी खुलणार आहे, आणि या सांस्कृतिक सहकार्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील प्रेम आणि कलेचा एक नवा सोहळा रंगणार आहे!

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर

* सोमा घोष

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक – ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टीझरमध्ये ढवळे आणि माने जोडप्यांच्या नात्याचा प्रवास रेखाटला आहे. सई – समीरमधील गोड संवाद आणि प्रेमळ नाते दिसत आहे तर दुसरीकडे प्रसाद – ईशा यांच्यातील गंमतीशीर नोकझोक दिसत आहे. हलक्याफुलक्या, गंमतीशीर प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक देखील यात पाहायला मिळतेय. संवादांची सहजता, पात्रांची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात या फॅमकॉम चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली असून टिझरच्या शेवटी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांच्या नजरेने मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्नही निर्माण केला आहे. त्यामुळे आता हा ‘गुलकंद’ किती मुरलेला आहे, हे १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात कळेल.

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ” ‘गुलकंद’ हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधातील गोडव्याचा एक अनोखा मनोरंजक प्रवास आहे. तुमच्या आमच्या घरातील ही गोष्ट असून यात दिसणारे हटके कपल्स आपल्याला अनेकदा आपल्या आजुबाजुला दिसतात आणि म्हणूनच ‘गुलकंद’शी प्रेक्षक सहज समरस होतील. बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत असा एक फॅमकॉम चित्रपट येत आहे. प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारताना समीर चौघुलेला पाहिले आहे. मात्र, पहिल्यांदाच ‘गुलकंद’ मध्ये समीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या टिझरमध्ये दाखवलेली ढवळे आणि माने कुटुंबातील जिव्हाळा रसिकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, याचा विश्वास आहे. हा चित्रपट प्रत्येकाला हसवतानाच त्यांच्या आयुष्यातील प्रेमाची गोड आठवण करून देईल.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे. गुलकंदाचे किमान १० आरोग्यदायी फायदे असतात, पण हा चित्रपट ११ व्या आणि सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद! गुलकंदाप्रमाणेच गोड, सुगंधित व आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मांडतो. हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ही आहे. सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे. टिझरमध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा.”

या व्हॅलेंटाईनला होणार लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचा अनोखा संगम!

* नम्रता पवार

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने चित्रपटप्रेमींना एक खास भेट दिली आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून एव्हरेस्ट एंटरटेनमेंटकडून सर्व चित्रपटप्रेमींसाठी व्हॅलेंटाईनची ही खास भेट ठरली आहे. ‘ मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत.

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशीबाची ही जादुई सफर पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसेल. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल.

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणणं आमच्यासाठी खूप खास आहे. प्रेमाचा रंग आणखी गडद करणारी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना प्रेमाचा एक नवा अनुभव देईल. या चित्रपटात प्रेमाची जादू आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असल्याने प्रेक्षकांना प्रेमाचा हा प्रवास नक्कीच आवडेल.”

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ प्रेमकथा सर्वांच्याच आठवणीतल्या असतात. त्या काळाच्या पलीकडे ही टिकतात. मी याआधी ही काही प्रेमकथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही माझी सातवी प्रेमकथा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली अतिशय आधुनिक प्रेमकथा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डेच्या वातावरणात ‘प्रेमाची गोष्ट २’ ची अनोखी पहिली झलक म्हणजे आमच्याकडून प्रेक्षकांना एक विशेष रोमँटिक भेट आहे. ललित, ऋचा आणि रिधिमा यांचा अभिनय आणि अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला खास रंगत आणेल. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये प्रेम आणि नशीबाच्या खेळाची झलक पाहून प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.” एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या जून २०२५ मध्ये अनुभवायला मिळेल.

 

 

उत्सव कुटुंबासोबत साजरे करायला आवडतात – शिवानी सोनार

– सोमा घोष

विनम्र, हसतमुख, सुंदर अभिनेत्री शिवानी सोनार हे मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर स्वत:ची छाप पाडली आहे. तिने मराठी लघुपट, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज इत्यादींमध्ये काम केले आहे. ‘राजा रानीची गं जोडी’ ही तिची मालिका खूपच गाजली, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सिंधुताई माझी माई’ इत्यादी मालिकाही चांगल्याच चर्चेत राहिल्या. कामादरम्यान शिवानीची ओळख अभिनेता अंबर गणपुलेशी झाली. दोघेही लग्न करणार आहेत. अंबरचा शांत आणि काळजी घेणारा स्वभाव तिला प्रचंड आवडला आणि त्यामुळेच तिने लग्नाला होकार दिला. सध्या शिवानी सोनी टीव्ही मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारत आहे, तिच्याशी मारलेल्या गप्पांमधील हा काही खास भाग…

तू भेटशी नव्यानेया मालिकेत काम करण्याचे काही खास कारण आहे का?

या मालिकेची कथा खूप वेगळी आणि अनोखी आहे, त्यात माझ्या दोन भूमिका आहेत, एक गौरी आणि दुसरी तन्वी. गौरी ही आधुनिक विचारांची मुलगी आहे, जी शिक्षणासोबतच नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडते. तिची अनेक स्वप्नं आहेत, ती पूर्ण करण्यासाठी ती कठोर परिश्रम करते आणि कधीही हार मानत नाही. तन्वी हा तिचा भूतकाळ आहे, जी खूप शांत होती. ही दोन्ही पात्रं साकारताना मला एक वेगळंच आव्हान वाटतं आणि त्यामुळेच अभिनय करताना खूप छान वाटते.

मालिकेतील कोणते पात्र तुझ्या वास्तविक जीवनाशी मिळतेजुळते आहे?

गौरी हे पात्र मला माझ्यासारखे वाटते. तन्वीसारखी मी अजिबातच नाही, माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझ्यावर कधीही कोणत्याही प्रकारची बंधने लादली नाहीत, पण घराची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मी पुण्याची आहे, शाळेत असताना मला सर्जनशील गोष्टी करायला आवडायच्या. तेव्हापासूनच मी नृत्य आणि नाटकांमध्ये भाग घेत असे. चांगली गोष्ट म्हणजे मला पुण्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच मी वयाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये मला माझी पहिली मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मिळाली. त्यात मी छोटी भूमिका साकारली, पण सर्वांनी माझे कौतुक केले, त्यानंतर मला मोठी कामं मिळू लागली.

तुला कुटुंबाकडून किती पाठिंबा मिळाला?

घरच्यांनी मला सुरुवातीपासून साथ दिली आहे. माझे वडील निशिकांत सोनार पोलिसात आहेत आणि माझी आई नेहा सोनार ब्युटीशियन आहे, मला एक लहान भाऊ देखील आहे. लहानपणापासून सर्वांनी मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली. मी लहानपणी अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टींमध्ये भाग घेत असे, तेव्हाही ते मला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहन देत.

इंडस्ट्रीत येण्यासाठी तुला कसा आणि किती संघर्ष करावा लागला?

माझ्या सुरुवातीच्या दोन्ही मालिकांचे चित्रिकरण मुंबई किंवा पुण्यात नव्हे तर सांगलीत झाले. तिथे गेल्यावर जुळवून घेणं माझ्यासाठी खूप अवघड जात होतं, कारण मी ४ ते ५ महिन्यांनी घरी जायचे, त्यामुळे घरचं जेवण मिळत नव्हतं, याशिवाय मला मराठी भाषेतील वेगळा प्रकार शिकावा लागला, जे खूप अवघड काम होते. मला चांगले काम खूप लवकर मिळाले, पण काम मिळण्यापेक्षा ते मिळाल्यानंतर जास्त संघर्ष करावा लागला. उदाहरणार्थ, ‘सिंधुताई माझी माई’ या मलिकेदरम्यान मला दिवसभर चप्पल न घालता राहावे लागले, कारण सिंधुताई चप्पल घालायच्या नाहीत. त्यामुळे मी देखील ६ महिने चप्पल घातली नाही, तिथेच जेवावे लागायचे, ज्यात फार काही आवडीचे नसायचे. याशिवाय मी त्वचेची काळजी किंवा स्वत:च्या फिटनेसकडेही लक्ष देऊ शकत नव्हते.

तुला ऑडिशनमध्ये नकाराचा सामना करावा लागला का?

मला बऱ्याचदा नकाराचा सामना करावा लागला, अनेकदा लोक म्हणाले की, मी छान दिसत नाही, माझ्यामध्ये नायिकेची वैशिष्ट्ये नाहीत, जेव्हा की मी सुंदर आहे. याशिवाय आजकाल मला हे देखील ऐकायला मिळते की, सोशल मीडियावर तुमचे फॅन फॉलोअर्स कमी आहेत. गुणवत्ता असूनही आजकाल फॉलोअर्स कमी झाल्यास काम मिळत नाही. प्रोडक्शन हाऊस ऑडिशन मेसेजमध्ये फॅन फॉलोअर्सची संख्यादेखील लिहितात.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची किती इच्छा आहे?

हिंदी टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मी ऑडिशनही देत आहे. काही चांगलं कामं मिळालं तर ते मी नक्कीच करेन.

तू इंटिमेट सीन म्हणजेच अंतर्गत दृश्यं कितपत सहजतेने करू शकतेस?

मी अजून अशी अंतर्गत दृश्यं केलेली नाहीत आणि मी किती सहजतेने ती करू शकेन, हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे. अशी दृश्यं करणं गरजेचं असेल तर ती करताना माझ्या काही मर्यादा नक्कीच कायम असतील.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

मला फॅशन आवडते आणि या इंडस्ट्रीत फॅशनेबल राहाणे गरजेचे आहे. मी कोणत्याही ब्रँड किंवा डिझायनरला फॉलो करत नाही. जे काही सुंदर आणि आरामदायक कपडे असतील ते मी खरेदी करते.

मी खुप मोठी खवय्यी आहे. माझा भाऊ हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे, त्यामुळे वेळ मिळताच आम्ही दोघेही एखाद्या तरी उपाहारगृहात जातो आणि तिथले वेगळे पदार्थ खाऊन बघतो.

तूला स्वत:ला प्रेजेंटेबल ठेवणे किती गरजेचे आहे?

आजकाल गृहिणी असो की नोकरदार महिला, प्रत्येकीने प्रेजेंटेबल असायलाच हवे. सोशल मीडियामुळे हा बदल आला आहे आणि आज प्रत्येकजण तो फॉलो करत आहे. मला हे योग्य वाटते.

तू सण-उत्सव कसे साजरे करतेस?

मला सण-उत्सव कुटुंबासोबत साजरे करायला आवडतात आणि मला अशा प्रकारे मिळून साजरे करणे जास्त गरजेचे वाटते. या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटणे, घर सजवणे, छान पदार्थ बनवणे इत्यादी सर्व मला खूप आवडते.

तू तरुण कलाकारांना काही संदेश देऊ इच्छितेस का?

आज बहुतांश तरुणांमध्ये धीर किंवा संयमाचा अभाव आहे. त्यामुळे ते खूप लवकर हार मानतात, साहजिकच त्यांना नैराश्य येते. त्यांचा स्वत:वरचा विश्वास उडतो आणि ते नको त्या गोष्टीच्या आहारी जातात, जे चुकीचे आहे. तुम्ही जे काही कराल ते मेहनतपूर्वक आणि मन लावून करा.

आवडता रंग – गडद निळा.

आवड पोशाख – भारतीय.

आवडता परफ्यूम – जाराचा बॉडी मिस्ट.

आवडते पुस्तक – मुरलीधर खैरनार यांचे ‘शोध’ हे पुस्तक.

आवडते ठिकाण – गोवा.

वेळ मिळाल्यास – वेगवेगळ्या उपाहारगृहांमध्ये जाऊन तिथले वेगवेगळे पदार्थ खाणे.

सामाजिक कार्य – गरजूंची सेवा.

‘१९ व्या वर्षी स्लिप डिस्क, वजन वाढलं आणि मग ३० किलो वजन कमी केलं!’ : श्रेया चौधरी

* सोमा घोष

आज सगळे श्रेया चौधरीवर फिदा आहेत! बंदिश बँडिट्स या सर्वांनी कौतुक केलेल्या वेब सीरिजमधील तिच्या अप्रतिम अभिनयापासून ते तिच्या आकर्षक रूपड्यापर्यंत, श्रेया रोजच चर्चेत आहे. पण श्रेयाचा फिटनेसचा प्रवास फारसा सोपा नव्हता. १९ व्या वर्षी स्लिप डिस्क झालं, वजन ३० किलोपर्यंत वाढलं, पण नंतर त्यावर मात करून तिने तिचे स्वप्न गाठले.

आठवडाभरापूर्वी, श्रेयाने तिच्या लहानपणीच्या आदर्श ऋतिक रोशनला तिच्या फिटनेससाठी प्रेरणा दिल्याबद्दल श्रेय दिलं होतं. आता, एका हृदयस्पर्शी पोस्टमध्ये, तिने तिच्या फिटनेसची गाडी रुळावरून का उतरली होती याचे खरे कारण उघड केले आहे.

“मी जेव्हा सोशल मीडियावर माझ्या फिटनेसच्या संघर्षाबद्दल सांगितलं, तेव्हा लोकांकडून इतका स्नेह आणि पाठिंबा मिळेल असं वाटलं नव्हतं. मला सशक्त वाटलं, म्हणून मी माझं मन मोकळं केलं. लोकांची सकारात्मक प्रतिक्रिया मला अजूनही काहीतरी शेअर करायला प्रेरणा देते. मी हे सगळं उघड केलंय, कारण लोकांनी स्वतःवर आणि त्यांच्या मानसिक सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर ते कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात.”

श्रेया पुढे म्हणाली, “१९ व्या वर्षी माझ्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. मी मानसिकदृष्ट्या खूपच खालावले होते. या सगळ्यात माझं वजन खूप वाढलं. यामुळे माझ्या आरोग्यावरही परिणाम झाला. कोणतीही शारीरिक हालचाल बंद झाली आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यात स्लिप डिस्क झाल्याने सगळं आणखी कठीण झालं. पण मी माझ्या स्वप्नांसाठी खूप महत्त्वाकांक्षी होते, त्यामुळे हा एक मोठा धक्का होता. मी स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचं मला जाणवलं.”

“एका रात्री मी स्वतःला सांगितलं की आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी मला स्वतःला निरोगी ठेवायचं होतं. त्यानंतर मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं, ३० किलो वजन कमी केलं, आणि स्लिप डिस्कची समस्या कधीच परत आली नाही.”

श्रेया पुढे म्हणाली, “आज मी माझ्या फिटनेसच्या उत्तम अवस्थेत आहे. फिट राहूनच मी अभिनेत्री होऊ शकले. मला वाटतं की जीवनातल्या अडथळ्यांकडे नकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी, त्यांना सकारात्मकतेने बघायला हवं. शेवटी, जीवन ही एक भेट आहे आणि आपण ती संपूर्णपणे जगायला हवी.”

हास्याची नवी लहर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’चा टीझर प्रदर्शित

* नम्रता पवार

काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.

‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!

पाच लेखकांचे पाच एपिसोड्स रसिकवर्गाला पाहायला मिळणार असून येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्रदर्शित होईल. या पाच एपिसोड्स व्यतिरिक्त एक एपिसोड नक्कीचं खास ठरेल, कारण प्रियदर्शनी इंदलकर सुत्रसंचलनाबरोबर लेखकांना रोस्ट देखील करणार आहे. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रोस्टिंगचे अनकट सीन पाहायला मिळणार आहेत. आता आठवड्याचा प्रत्येक शुक्रवार हा प्रेक्षकांसाठी हास्याचा खास दिवस ठरेल यात शंकाच नाही.

एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया म्हणतात , ” ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा मराठी मनोरंजनक्षेत्रातील प्रतिभावान लेखकांचा स्टेजवरील लाईव्ह परफॉर्मन्सचा नवीन प्रयोग आहे. जो प्रेक्षकांना खळखळून हसवेल. तसेच त्यांच्या विनोदी अंदाजातील वैविध्यही यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. एव्हरेस्ट हास्य मराठी हा प्लॅटफॉर्म आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, ज्यातून आम्ही नव्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या शोमध्ये फक्त कॉमेडीच नाही तर रोस्टिंगसारखे अनोखे फॉरमॅट देखील आहेत. यापुढे ही असेच अनेक नवनवीन एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळतील. आम्हाला खात्री आहे, की ऑलमोस्ट कॉमेडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि रसिकवर्ग हा शो एन्जॉय करतील.”

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली,”  मला जेव्हा अमोलचा फोन आला की, आम्ही एक शो करतोय आणि तुला या शोचे होस्टिंग करत या लेखकांना रोस्ट करायचे आहे. मी खूप आश्चर्यचकित झाले, इतके मोठे, अनुभवी कलाकार असूनही त्यांनी मला फोन केला. मी याला एक चांगली संधीच म्हणेन. कारण या आधी मी कधी अशा प्रकारचे काम केले नाही. स्टँडअप हा प्रकार मला ट्राय करायचा होता आणि या शोच्या निमित्ताने मला याचा अनुभव घेता आला. सगळ्यांनी मला या प्रवासात खूप सांभाळून घेतले. मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि संजय छाब्रिया यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली. आता हा आमचा प्रवास अजून लांबपर्यंत चालणार असून अजून जास्त लोकांपर्यंत हे आम्ही पोहोचवणार आहोत.”

 

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें